आठवणींचे गाठोडे.
भाग -एक.
"मॅडम, पार्सलऽऽ.."
घराच्या गेटवर थाप देऊन डिलिव्हरी बॉय ओरडत होता.
"रेवा, बघ गं काय आलंय." झोपाळ्यावर भाजी निवडत बसलेल्या सासूबाईंनी रेवाला आवाज दिला.
स्वयंपाकघरातील पसारा आवरत असलेली रेवा पदराला हात पुसत घाईतच बाहेर आली.
"रोख रक्कम देताय की ऑनलाईन पेमेंट करताय?" तिच्या अवताराकडे एकवार बघत त्याने विचारले. तशी त्याच्याकडे बघून ती ओशाळवाणी हसली.
"ते ऑनलाईन वगैरे जमत नाही रे बाबा मला, रोख रक्कमच देते." हातातील पैसे तिने बरोबर मोजून दिले.
ही पोरं वरचे एक दोन रुपये चिल्लर नाहीत म्हणून स्वतःच्या खिशात घालतात हे तिला एव्हाना कळले होते, म्हणून चिल्लर रुपयांचे एक पॉकेट तिने तयारच करून ठेवले होते. न जाणो कधी चिल्लर नाही म्हणून आपला कष्टाचा रुपया त्यांच्या खिशात जायचा? त्यापेक्षा आपण आपल्या तयारीत राहिलेले बरे!
भाजी निवडता निवडता सासूची तीक्ष्ण नजर रेवावर खिळली होती. " काय सारखी सारखी उधळपट्टी सूरू असते गं? आधीच घरातील वस्तू घरात मावत नाहीत आणि त्यात पुन्हा नव्या वस्तू हव्यातच." त्यांची कुरबूर सुरु झाली.
"अहो आई, स्वतःसाठी नाही घरासाठीच घेतलंय." रेवा सासूचे हावभाव बघून म्हणाली.
"स्वतःसाठी घेऊन ठेवणार कुठे गं? आधीच कपाटात एकटीचे ढीगभर कपडे पडून आहेत, त्यात पुन्हा नव्याची भर. काय आजकालच्या पोरींना कपडे लागतात, आम्ही दोन जोडी कपड्यावर संसार केलाय." त्यांच्या आवाज जरा फुटला आता.
"आई, अहो फ्रिजकव्हर फाटले ना म्हणून ते घेतले. तसेही जुने झाले होते." रेवा बोलून गेली.
"फाटले तर शिवून घ्यायचे ना. थोडं कुठे उसवलं तर द्या टाकून, पण शिवून वापरणार नाही. आम्ही कसा संसार केला असेल? तेव्हा कुठे एवढं दिसतेय घरात. पण आजकालच्या पोरींना त्याची कदरच नाही. पैसा आला हातात की द्या उडवून." सासुच्या तोंडाचा पट्टा अविरत सुरु झाला.
तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. फ्रिजचे चार वर्षांपूर्वीचे ते कव्हर खरंच खूप जुने झाले होते, पण सासूबाईंना ते काढून टाकवेना.
स्वयंपाकघर आवरून झाल्यावर ती थोडावेळ पडायचं म्हणून आडवी झाली, पण मनात सासूबाईंचे शब्द आठवले आणि सोबत कपड्यांचे कपाट डोळ्यासमोर उभे राहिले.
तिने थकवा बाजूला झटकून कपाट उघडले. सासूबाई म्हणत होत्या, तसे खरंच कपाट कपड्यांनी गच्च भरले होते. आज ते आवरायचे आणि नको असलेले कपडे वेगळे काढायचे म्हणून तिने सगळे कपडे भराभरा खाली रिचवायला सुरुवात केली.
खाली मध्ये बसलेली ती आणि सभोवताल विखूरलेल्या तिच्या साड्या. केलेल्या घड्या मोडून परत नवी घडी घालून तेच नव्याने ती रचून ठेवत होती. दरवेळीप्रमाणे आजही तिला नको असलेली साडी हवीशी वाटायला लागली. त्यामुळे प्रत्येक साडी कपाटात जात होती.
रेवा कामाला तर लागली, पण जीव अडकलेल्या या साड्यांचा मोहपाश ती खरंच दूर सारू शकेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)