आठवणींचे गाठोडे.

एक छोटीशी कथा.

आठवणींचे गाठोडे..!

(एक लघुकथा )




"मॅडम, पार्सल ss"

घराच्या गेटवर थाप देऊन डिलिव्हरी बॉय ओरडत होता.

"रेवा, बघ गं काय आलंय." झोपाळ्यावर भाजी निवडत बसलेल्या सासूबाईंनी रेवाला आवाज दिला.

स्वयंपाकघरातील पसारा आवरत असलेली रेवा पदराला हात पुसत घाईतच बाहेर आली.

"रोख रक्कम देताय की ऑनलाईन पेमेंट करताय?"
तिच्या अवतारकडे एकवार बघत त्याने विचारले. त्याच्याकडे बघून ती ओशाळवाणी हसली.


"ते ऑनलाईन वगैरे जमत नाही रे बाबा मला, रोख रक्कमच देते." हातातील पैसे तिने बरोबर मोजून दिले.


ही पोरं वरचे एक दोन रुपये चिल्लर नाहीत म्हणून स्वतःच्या खिशात घालतात हे तिला एव्हाना कळले होते, म्हणून चिल्लर रुपयांचे एक पॉकेट तिने तयारच करून ठेवले होते. `न जाणो कधी चिल्लर नाही म्हणून आपला कष्टाचा रुपया त्यांच्या खिशात जायचा? त्यापेक्षा आपण आपल्या तयारीत राहिलेले बरे!´

भाजी निवडता निवडता सासूची तीक्ष्ण नजर रेवावर खिळली होती. " काय सारखी सारखी उधळपट्टी सूरू असते गं? आधीच घरातील वस्तू घरात मावत नाहीत आणि त्यात पुन्हा नव्या वस्तू हव्यातच." त्यांची कुरबूर सुरु झाली.

" अहो आई, स्वतःसाठी नाही घरासाठीच घेतलंय. " रेवा सासूचे हावभाव बघून म्हणाली.

"स्वतःसाठी घेऊन ठेवणार कुठे गं? आधीच कपाटात एकटीचे ढीगभर कपडे पडून आहेत, त्यात पुन्हा नव्याची भर. काय आजकालच्या पोरींना कपडे लागतात, आम्ही दोन जोडी कपड्यावर संसार केलाय." त्यांच्या आवाज जरा फुटला आता.

" आई, अहो फ्रिजकव्हर फाटले ना म्हणून ते घेतले. तसेही जुने झाले होते."
रेवा बोलून गेली.

" फाटले तर शिवून घ्यायचे ना. थोडं कुठे उसवलं तर द्या टाकून, पण शिवून वापरणार नाही. आम्ही कसा संसार केला असेल? तेव्हा कुठे एवढं दिसतेय घरात. पण आजकालच्या पोरींना त्याची कदरच नाही. पैसा आला हातात की द्या उडवून. "
सासुच्या तोंडाचा पट्टा अविरत सुरु झाला.

तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. फ्रिजचे चार वर्षांपूर्वीचे ते कव्हर खरंच खूप जुने झाले होते, पण सासूबाईंना ते काढून टाकवेना.

स्वयंपाकघर आवरून झाल्यावर ती थोडावेळ पडायचं म्हणून आडवी झाली, पण मनात सासूबाईंचे शब्द आठवले आणि सोबत कपड्यांचे कपाट डोळ्यासमोर उभे राहिले.

तिने थकवा बाजूला झटकून कपाट उघडले.
सासूबाई म्हणत होत्या, तसे खरंच कपाट कपड्यांनी गच्च भरले होते. आज ते आवरायचे आणि नको असलेले कपडे वेगळे काढायचे म्हणून तिने सगळे कपडे भराभरा खाली रिचवायला सुरुवात केली.
खाली मध्ये बसलेली ती आणि सभोवताल विखूरलेल्या तिच्या साड्या. केलेल्या घड्या मोडून परत नवी घडी घालून तेच नव्याने ती रचून ठेवत होती. दरवेळीप्रमाणे आजही तिला नको असलेली साडी हवीशी वाटायला लागली. त्यामुळे प्रत्येक साडी कपाटात जात होती.

"आई! कुठे आहेस अगं तू? "
शाळेतून परतलेली तिची मुलं आरोळी देत आत आली.

हातपाय धुवून लहानगा वैभव अंगणात खेळायला गेला.नववीत शिकणारी सानिका तिच्या खोलीत आली.
एवढया कपड्याच्या पसाऱ्यात आईला बसलेली बघून सानिकाला, म्हणजे तिच्या लेकीला हसूच आलं.

"थांब, एक सेल्फी काढूया आपण. मी अँड आई! विथ कपड्यांचा पसारा!!"
ती हसत म्हणाली.

" गप गं. पसारा नाहीय, आठवणींचे गाठोडे आहे हे. "
सेल्फी घेणाऱ्या मुलीला दटावत रेवा म्हणाली.

"भारीच साड्या आहेत गं तुझ्या!" आता लेकीनेही तिथेच ठाण मांडले.

रेवाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आले.

"ही साडी बघ, माझ्या आईची आहे." एका मऊसूत कॉटनच्या साडीवर हात फिरवत रेवा सांगत होती. " माझ्या आईला तिच्या आईने, म्हणजे माझ्या आजीने दिली होती. पण मलाच इतकी आवडली की ती मी स्वतःसाठी ठेऊन घेतली. लग्नाच्या आधीची गोष्ट आहे गं ही."
साडीबरोबर ती आजीच्या आठवणीत हरवली. सानिकाही तिच्या गोष्टीत रंगू लागली.

"ही साडी माझ्या लग्नात शालूच्या सोबतीला घेतलेली. किती वेगळा रंग आहे नाही? ही बघ, पहिल्या दिवाळीची साडी आणि ही पाहिली संक्रात होती ना, तेव्हाची."
ती भरभरून सांगत होती. कपाटातल्या प्रत्येक साडीची एक वेगवेगळी आठवण.

" ही साडी तू जन्माला आलीस तेव्हाची आणि ही तुझ्या पहिल्या वाढदिवसाची. "
रेवाचं अजूनही संपलं नव्हतं.
" ह्या दोन साड्या तुझ्या मावशीच्या लग्नातल्या. पाहिल्यांदा एवढया भारीतल्या घेतल्या होत्या.. त्यात दोन - दोन. "
ती हसून म्हणाली.

" ही साडी वैभवच्या मुंजेची आणि ही.. तुझ्या आत्याने मला पहिल्यांदा गिफ्ट केलेली. "
सांगत असतांना तिचा आनंद अजूनही तसाच होता.

"वॉव! आई किती आठवणी आहेत ग तुझ्या? भारीच की."
तिला साडया ठेवायला मदत करत सानिका म्हणाली. आता कपाट बऱ्यापैकी आवरले होते.

" पण काय गं आई, तुझ्याकडे बाबांच्या आठवणीची अशी एकही साडी नाहीये का गं? "
कपाट बंद करत सानिकाने विचारले.

" म्हणजे? "
न उमगून रेवा म्हणाली.

" म्हणजे बाबांनी तुला खास अशी भेट दिलेली? "
सानिका.
" अगं आहेत ना. माझ्या वाढदिवसाच्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या. लग्नाच्या एवढ्या वर्षांत त्यांनी दिलेल्या तर भरपूर साडया आहेत माझ्याकडे. "
ती हसून म्हणाली.

" हो गं.लग्नाला वीस वर्ष झालीत तुझ्या. तर चाळीस एक साडया जमा झाल्याच असतील. "
तिला चिडवत सानिका म्हणाली.

पण अशा काही निमित्याव्यतिरिक्त कधी काही गिफ्ट केलंय का त्यांनी? "

तिने सहज विचारले, पण तिच्या या प्रश्नाने रेवाच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव अचानक बदलले.

"एवढ्या साडया काय कमी आहेत होय? पुन्हा त्यात भर कशाला?"
चेहऱ्यावरचे भाव लपवत ती म्हणाली.

" साडी म्हणूनच नाही गं, पण अशी एखादी वस्तू, कधी एखादा दागिना.. हवं तर एखादा साधा रुमालच,असं कधी काही दिलंय का त्यांनी तुला? "
सानिका.

" नाही गं सानू! आणि खरं सांगू का, अशी कधी गरजच नाही पडली ना. माझ्याकडे तर त्यांनी दिलेले सारेच आहे."
रेवा म्हणाली. पण तिच्या मनात मात्र कुठेतरी खंत जाणवत होती.

"खरंच खरं सांगत असशील तर हे सांग, की तुला कधी वाईट नाही वाटले या गोष्टीचे?"
तिच्या डोळ्यांचा वेध घेत सानिकाने विचारले.

आजवर हा प्रश्न कधी रेवाला पडला नव्हता. उलट पापड लोणची विकून चार पैसे हातात आल्यावर तिच कधी मुलांना, तर कधी नवऱ्याला काही ना काही घेत असायची. पण त्याबद्दल्यात त्यानेही काही द्यावं असं तिच्या मनात आले नव्हते.
रेवाने नजर खाली केली. घरात काही कमी नव्हते, पण वीस वर्षाच्या संसारात नवऱ्याने प्रेमाने एखादी भेटवस्तू दिल्याचे तिला आठवत नव्हते.


"काय गुळपीठ चाललंय गं मायलेकीचं? चहा वगैरे मिळणार आहे की नाही आज?"
सासूबाई आत येत म्हणाल्या.

" आजी, तुला कधी आजोबांनी एखादी भेटवस्तू दिली होती का गं? "
आजीच्या गळ्यात हात टाकत सानिकाने विचारलं.

" दोन जोडी कपड्यावर दिवस काढलेत गं बाई मी, तेव्हा कुठे आमचा संसार टिकला.तुमच्यासारखी उधळपट्टी करायला आमच्याकडे पैशाचे झाड नव्हते हो. "
सासूबाई नेहमीप्रमाणे म्हणाल्या.

" पैशाचं झाड नसेल तरी एखादयावेळेस गिफ्ट दिलं तर चालतं गं."
सानिका आजीच्या गालाला गाल घासत म्हणाली.

"आजोबांनी तुला कधी काही दिले नाही, तेच नकळत बाबांच्या मनावर बिंबले आणि मग त्यांनी आईला गृहीत धरून आजवर असं काही दिलेच नाही. पुढे जाऊन आपला वैभवसुद्धा असाच वागला तर? तू कधी काही बोलली नाहीस. आईनेही बाबांना कधी काही मागितले नाही पण माझ्या पिढीच्या मुली तशा नाहीत गं, वैभवची बायको उगाच त्याच्याशी भांडत बसेल. " सानिका हसून म्हणाली.

ऑफिसमधूनआज लवकर परतलेला आकाश दारातच त्यांचा संवाद ऐकत होता. सानिकाचे म्हणणे हृदयात खोलवर पटले त्याला आणि आल्यापावली बाहेर खेळणाऱ्या वैभवला घेऊन तो बाजारात गेला.
दुकानात गेल्यावर गुलाबी रंगाचा एक सुंदर ड्रेस त्याने निवडला.

" बाबा हा ड्रेस कोणासाठी हो? "
वैभव विचारत होता.
"अरे आईसाठी आहे. पण सीक्रेट आहे हं, घरी गेल्या गेल्या सांगू नकोस तिला."
आकाश.

" पण आज तर आईचा वाढदिवस नाही आणि ती ड्रेस पण घालत नाही, मग? "

त्याच्या छोटया चेहऱ्यावर मोठा प्रश्न होता.

" तिच तर खरी गंमत आहे. सरप्राईज आहे आईसाठी. ती आपल्या सगळ्यांना खूप काही घेत असते ना म्हणून आज तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट!"

बाबांचं म्हणणं पटलं त्याला. स्वारी खुश होऊन घराकडे परतली.


रात्री जेवणानंतर आकाशने रेवाच्या हातात ड्रेसची पिशवी दिली.

" काय आहे हे? "
तिने आश्चर्याने विचारले.

"सरप्राईज गिफ्ट!" वैभव आनंदाने ओरडला.

ड्रेस बघून रेवाच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आले. कधी नव्हे ते सासूबाईंना देखील आज आनंद झाला.


" आई, कपाटातील तुझ्या आठवणीच्या गाठोड्यातील वापरात नसलेल्या साड्या गरजू लोकांना देऊन टाक गं."
सानिका म्हणाली.

" हो, म्हणजे आठवणीचे दुसरे गाठोडे ठेवायला जागा होईल."
सासूबाईंनी सानिकाला टाळी देत साथ दिली, आणि सगळे हसायला लागले!



समाप्त.



**********

संसाराचा गाढा ओढतांना प्रेमाबरोबर कधीकधी निमित्त नसतांना देखील एखादी छोटीशी भेटवस्तू  आपल्या पार्टनरला द्यायला हवी, त्याने प्रेम आणखी वाढते.

तुम्हाला काय वाटते, नक्की सांगा. आणि जी कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.