कराष्टमी पुजा आणि महात्म्य

Aathvi The Goddess Of Health And Prosperity


आटपाट नगर होतं. त्या नगरातील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहत होते. भौतिक साधन सगळ्यांच्या समोर अगदी हात जोडून उभी होती. वरवर जरी सर्व आनंदी, सुखी वाटत होते तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रश्न होतेच. वंचना, चिंता याने अनेकांची रात्रीची झोप उडवली होती.


त्या शहरात राहत होत्या जया आणि रेखा. जया संयुक्त परिवारात राहायची तर रेखा स्वतंत्र एकल कुटुंबात. दोघीही एकाच ऑफिसमध्ये काम करत होत्या, समवयस्क असल्याने त्यांच्यात लवकरच छान मैत्री झाली. एकमेकींना स्वतःची सुख-दुखे ही त्या सांगायच्या. अनेक वर्षापासून रेखाच्या घरी पाळणा हलला नव्हता त्यामुळे ती आपलं हे दुःख जयाला नेहमी बोलून दाखवे आणि जया नेहमीच तिला धीर देत असे.

एकदा काय झालं! ऑफिस सुटल्यावर जया घरी जाण्यासाठी घाई करू लागली तर, दिवाळी तोंडावर आली असल्याने रेखाला मात्र खरेदीचा मूड होता.

रेखा -"जया आज ऑफिस सुटल्यावर मला थोडी दिवाळीची खरेदी करायची आहे तू चलशील ना माझ्याबरोबर?"

जया -"आय. एम. सॉरी रेखा! पण आज माझ्या घरी ना आठवीची पूजा आहे त्यामुळे, मला लवकर घरी जायचं आहे. आपण उद्या - परवा जाऊया ना!"


रेखा -"अगं असं काय करतेस? उद्यापासून माझ्याकडे मी घर पेंटिंग करायला माणसं बोलावली आहेत त्यामुळे, पुढचे तीन-चार दिवस घराच्या पेंटिंग मध्ये जातील. मग दोन दिवस आवरा-आवरी, साफसफाई शिवाय मग दिवाळीचा फराळ. नंतर मग खरेदीला वेळच नाही मिळणार ग!"

जया -"रेखा खरच मला तुझी अडचण कळते आहे ग पण घरी आठवीची पूजा असताना मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. शिवाय जर आठवी म्हणजेच \"काराष्टमीची\" पूजा केली नाही तर आमच्याकडे दिवाळी पण करता येत नाही. दिवाळी करायची असेल तर आधी आठवी पुजाविच लागते बाई!"

रेखा -"तू एवढ आठवीच्या पूजेबद्दल बोलते आहेस पण मला ना या सर्व अंधश्रद्धाच वाटतात. अग काही होत नाही पूजा केली नाही तर. बाकी तुझ्या घरी तर मोठ्या जाऊ बाई, सासुबाई सगळेच आहेत की नाही मग फक्त तूच पूजेला नसली तर काय मोठा फरक पडणार आहे?"

जया -"तुझं म्हणणं तुझ्या ठिकाणी अगदी बरोबर आहे पण जसं ऑफिसमध्ये प्रत्येकाला स्वतंत्रपणे स्वतःचा परफॉर्मन्स द्यावा लागतो ना अगदी तसंच देवापुढेही द्यावा लागतो बरं का! अगं खूप महत्त्व आहे माझ्याकडे या पूजेचं. मी काय म्हणते आज बाहेर खरेदी करण्यापेक्षा माझ्याबरोबर माझ्या घरी चल आणि या पूजेचे महत्त्व आणि महात्म्य माझ्या सासूबाईंकडून समजावून घे."

खरंतर रेखाला एक जुनाट जुनाट त्वचारोग होता. अनेक इलाज, डॉक्टर, वैद्य, हकीम, औषधी रेखांनी घेतल्या परंतु फायदा झाला नाही. त्या औषधाचा परिणाम म्हणूनच रेखाला मुलबाळही होत नव्हतं. त्यामुळेच ती थोडी चिडचिड ही झाली होती आणि हट्टी ही. म्हणून जया आठवीच्या पूजे करतात तिला घरी जाण्याची गळ घालत होती.

शेवटी मैत्रिणीच्या आग्रहाखातर रेखा जयाकडे गेली.

जया -"आई आज माझी मैत्रीण रेखा आली आहे. तिच्या मनात आठवीच्या पूजेबद्दल खूपच उत्सुकता आणि कुतुहल आहे."

सासू -"हो का? बर बर तुम्ही दोघी आधी फ्रेश होऊन या तोपर्यंत मी आणि मीना (जयाची मोठी जाऊ) पूजा मांडून ठेवतो."

जया आणि रेखा फ्रेश होऊन पूजेकरता हॉलमध्ये आल्या. तिथे एका चौरंगावर ज्वारीच्या धांड्यांची झोपडी बांधली होती. भिंतीवर आठवी मातेचा फोटो लावला होता. चौरंगावर कोरा कपडा अंथरूण त्यावर मातीचे चार घडे आणि मध्ये एक छोटा करवा (छोटे बोळकं) ठेवलं होतं. ते पाचही मातीचे घडेल पापडीने झाकले होते. त्या पापडी वर करंजी, अनारसा, वडा आणि कणकेचा दिवा ठेवला होता. जया आणि रेखांनी आठवी मातेला हळदीकुंकू, फुलं,अक्षद वाहिली. मीनाने नैवेद्याचे ताट आणले. यथासांग पूजा झाली. आरती झाल्यावर, जयाच्या सासूने रेखाला आठवीच्या पूजेची माहिती दिली.

सासू-"हे बघ रेखा आठवीची पूजा ही विशेषता विदर्भात केली जाते. आपली भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान, निसर्ग पूजक संस्कृती आहे. आठवीची पूजा ही त्याचेच प्रतीक. या दिवशी चंद्र-सूर्याची पूजा करतात. चार मातीचे मोठे घडे आणि एक छोटा करा (बोळक) पूजेसाठी चौरंगावर ठेवलं जातं. या पाचही घड्यांमध्ये मग उसाचे तुकडे, आवळे, बोर, भाजी(कोवळा हरभऱ्याचा पाला) लिंबू, तांदळाचा लाडू, वेणी, फणी, चक्र, भोवरे असे सर्व टाकून हे पाच घडे पापडीने झाकले जातात. या पापडीवर करंजी, अनारसा, वडा आणि कणकेचा प्रत्येकी एक दिवा ठेवतात. नैवेद्याला ज्वारीच्या कण्यांची आंबील केली जाते. खरंतर विदर्भाचे मुख्य पीक ज्वारी म्हणून, अश्विन महिन्यातील कृष्ण अष्टमीला या नवीन धान्याची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासोबतच असेही म्हणतात की, पौराणिक काळात गांधारी आणि कुंतीने ही पूजा केली होती. आपण आपल्या आईला पूजे करिता काहीतरी मदत करावी म्हणून अर्जुनाने आकाशात बाण मारला. त्या पूजेने प्रसन्न झालेल्या इंद्राने मग कुंतीला प्रसाद वाटण्यासाठी स्वतःचा ऐरावत हत्ती दिला. ऐरावत हत्ती हे संपन्नतेचे प्रतिक आहे त्यामुळे, या पूजेने जशी कूंतीला संपन्नता लाभली तशीच सर्वांना लाभावी असा एक हेतू आहेच. त्याशिवाय आठवी माता त्वचारोग ठीक करते असेही म्हणतात. म्हणूनच अनेक जण आजच्या दिवशी उपवास करतात. जयाला मानेच्या खाली पाठीवर शेरन्या( पांढरे छोटे डाग) आल्या होत्या, तिने हा उपवास कबूल केला तर तिच्या शेरण्या लगेच गेल्या.

आमच्या मीनाला लग्नाच्या आठ दहा वर्षे झाली तरीही मातृत्वाचे सुख नव्हते. दोघांनी तपासण्या केल्या. कुठे काहीच प्रॉब्लेम नव्हता पण तरीही घरात पाळणा हलत नव्हता. मग गावाकडच्या माझ्या चुलत सासूबाईंनी आठवीची पूजा करायला सांगितली आणि आमच्या मीनाने राम-शाम या जुळ्यांना जन्म दिला. खरंतर वेळी फणी चक्र भवरे हे सर्व आठवी मातेचे अलंकार आहेत. आपल्याकडे जे काही आहे ते सर्व आठवी मातीला समर्पित करून तिने तिचा कृपाप्रसाद आणि कृपाशीष आपल्याला द्यावा एवढाच त्या मागचा उद्देश. अजून एक काही ठिकाणी ही पूजा रात्री केली जाते तर काही ठिकाणी सकाळी. पण उद्देश मात्र एकच आठवी मातीच्या कृपेने सर्व संपन्नता घरी यावी.


जयाच्या सासूबाईंच्या सांगण्याचा रेखावर फारच परिणाम झाला आणि तिनेही उपास केला. मग काय आश्चर्य एका वर्षातच रेखाचा त्वचारोग ठीक झाला आणि तिच्या घरी पाळणा हलला. आठवी माता जशी रेखा, जया, मीनाला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हालाही होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


©® राखी भावसार भांडेकर.


**********************************************

सदर कथा ही संपूर्णतः काल्पनिक असून कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखिकेचा मानस नाही. केवळ आपल्या प्रथा, परंपरा आणि सण समाजापर्यंत पोहोचावे म्हणूनच हा लेखन प्रपंच.

धन्यवाद.

🎭 Series Post

View all