आठवणीतले पान

A small effort to put a smile on your faces.. in fond memory of P. L. Deshpande...a small tribute to a great personality.

अवं हायेस जित्ती का मुडदा पडला तुया !

अरे का गं अशी का बोलतेस , नीट बोलायच ना फटाकडी !

हे पाय मले थे कायी सांगजो नको , मले बोला वाटीन त मी बोलीन कोन्याच्या बापाची शान नायी मले रोखाची , सांगून ठेवतो , काय समजत मले तू !

अगं बाई तू खुप महान आहेस मला माहीत आहे , 

पण ही काय भाषा झाली ! 

बोलण्याची ही पद्धत असते का ?

पाय माय बायी ही बायी बारंबार थेच बोलते , माय मायी शाळा घेन बंद कर , मले पावुन मायी मास्तरीन पळे घरी , तं तू काय चीज हाये , पयले मले सांग हा कुटचा नियम हाये का तू आठदिसानच बोलशीन माया संग ?

आता तुयी मर्जी मायासंग बोल नको बोलजो म्या त बोलनार ?

येकटीच बोल्तो व बाई तुयी गरज नायी मले ,

त मी का म्हन्तों , मले माया आज्याची गोठ सांगांची हाये बापा तुम्हाले , येक डाव आजा बजारातून आल्ता , बुढीन पानी देल्ल प्याले , तिथच बाजीवर{ खाट } बसला थकला होता तं झाला ऊताना बाजीवर मंग माय आभायाले पाये टकरमकर , 

म्या त्याच्या जोळ बसलो होतो ,

मले बुढा आभायातलं बुढीच खाटल दाकवत हुता , 

अव बाले थे पाय बुढीच खाटल , 

म्या म्हटल आबाजी येवढ्या दुर कावुन ठेवते मंग बुढी खाटल ?

पन मले थ दिसतच नायी हाय , 

कुट हाय माया आजीच खाटल ? 

अव भयताड बेलनं , शोभतं व बुढीची नात ! 

थे पायन,,वरती आभायात ,,,

हो काव आबाजी , येवढ्या वरती कवा गेल्ती आजी खाटल घेवुन ? आन कशी गेल्ती ,,,मले नायी नेल्त तिनं,,,

ओ आज्जी ,,लय बाजींदी{ खोटारडी } हास तू ,,, 

मंगाशी मी मनतच होतो , कुट गेल्ती वं आजी तं तू कायीच बोल्ली नायी,,

पाय वं , मंग आबाजी थे म्हने मले सुरकी च्या घराजोळ गेल्तो,,,

पाय किती बाजींदी हाय,,,

मले जाचं तिथ ,,,मले नायी झोपाच हिथ,,,

मले आभायातल्या खाटल्यावर झोपाच,,,!

माय,,, मले तवा कायी समजे नायी , 

ल्हान होतो बाई तवा,,,

आज्या लय पोटधरुन हासत सुटला , 

म्या भोकांड पसरल्यावर ,

मंग म्हनला , अव पोट्टे थ्या खाटल्यावर बसशीन तं आपटशीन ना बाई ,,, 

पाय बर त्या खाटल्याले तं दोर्‍याच नायी हात,,,

कशी झोपशीन मंग व बाई,,,?

म्या वर पायल,,,,

होव आबाजी ,,खरचं दोर्‍याच नायी,,,!

अस्स आता मायीत झाल,,,, 

म्हनून आज्जी फेंगडत{ लंगडत } चालते,,!

म्या डोक्यावर बोट मारत म्हटल,,,

तवाच त म्हनो मी ,, 

आन तिच नाक दबल आसन , नायी का आबाजी,,? 

म्हनुन तुमची माय तिले नकटी म्हन्ते,,,?

तेवढ्यात बायी , आज्जी भाहेर आली आन मले म्हने , 

कोन म्हन्ते मले नकटी नाव सांग मले , 

एकेकीले पाहुनच घेतो,,, 

माया आज्जीचा पारा चढला हुता बाप्पा , 

अश्शी चळचळ करत हुती,,

तिले पावुनच आज्ज्या भारी घाबरलाच ,,,

ताडदिशी ऊटून ऊभा राह्यला,,,

कोन व भागवान,,कोन म्हन्ते तुले नकटी,,,

हे पोट्टी ना कायी बोल्ते , 

माया बायकोले कोन म्हनन नकटी,,,?

बस व लय झाल तुमच,,,

मंगापासून तुमीच माया समोर नकटी बोलत हाय,,,

म्या नकटी आन तुमच नाक थे धोब्याच धोपटन नाकावर मारल्यावर होते तस फेंदरल हाय त्याच काय ,,,?

आज्जी मायी लय कोपली हुती,,,

आज्जा त मंग लयच भेला {घाबरला }हुता , 

त्याले समजल हे बायी कायी आयकत नायी आता,,,

आज्ज्यानं लागलीच हत्यार टाकल ना माय,,,

आवो भागवान ह्या धरनीवर तुया सारकी बायी शोधुनयी सापडनार नायी वं,,,,

मायी मेनका , रंभा हास तू ! 

कोनाची शान माया अप्सरेले नकटी म्हनाची हाय , 

अवं तुले सांगू का , मी ह्या सुरसुरीले थे आभायातलं खाटल दाखवत होतो बाप्पा , 

इचार तिले,,,हो वं सुरसुरु काय म्हन्ते तुया आज्या ,, 

होवं आज्जे ,,थे वरच खाटलं दाकवत हुते ,,,

आज्जे त्या कवा नेल वं तिथ खाटल ? 

मले नायी घेवुन गेल्ती येकटीच गेल्ती , 

गेल्ती त गेल्ती दोर्‍याही नायी बांधल्या ,,,

मले नेल असत तं दोर्‍या बांधल्या असत्या ना म्या ,,,

मंग काय आज्जी आन आज्जा लय येळ हासत होते,,,मले समजतच नवतं कावुन हासत्यात ते,,,

मंग म्या वर पायल थ आज्जीच खाटल गायब ,,

म्या बोंबलोच,,आज्जे तुय खाटल कोनं चोरल,,,

थे त दिसतच नायी हाय,,,पायन व आज्जी,,,

आज्जी न वर पायल माय बाई होव कुट गेल माय खाटल ,,,

आन आज्जी , बाजीवर चढून खाटल शोधत हुती ,,,,

थांब व आज्जे म्या येतो तुले शोधु लागाले म्हनत म्या बी बाजीवर चढून आभायातल खाटल शोधु लागलो,,,,!

आन आबाजी आमचा पोट धरुन धरुन हासत होता,,,,

बाप्पा ह्या बायीच काय कराव बाप्पा आता,,!

अव बयताड बेलन ,, 

बाजीवर चढुन पायल्याने आभायात हारपलेल खाटल दिसनार व्हय,,,!

थे तं इथूनयी दिसत ना माय,,,!

आज्जी तशी नात,,,!

हा,,,हा,,,हा,,,अवं तुले काय सांगू बायी ल्हान पनी लय मज्जा ये बाई आज्या आजी संग ,,,घरात आंगनात आजी राहे आबाजी राहे,,आबाजी आज्जी गोठी सांगत,,,बंडीत बसुन बायी आमी वावरात जावो लयी मजा ये बिचारे,,,आता कोनी नायी रायलं !

गेले थे दिस,,,आता तं तुही लय म्हाग झाली,,, बोलाले येळ नायी ह्या सुरसुरी संग,,,!

अग फटाकडी अशी काय नाराज होतेस,,बस लिखान वाढलं एवढेच झाल,,अधुन मधुन येते ना मी बोलायला,,,तुझ्या शिवाय माझ्या जीवनात हास्य नाहीये,,,तुला माहीत आहे , आज पु. ल. देशपांडें चा स्मृतिदिन आहे ,,, विनम्र अभिवादन त्यांना ! 

आजची सुरसुरीची फुरफुरी मी त्यांना अर्पण करते , चालेल ना ,,,?

अव माय ,,, हाव,,म्याच करतो अर्पन ,,,पु. ल. ना लय लय मनापासून अर्पन,,,पायापडतो बाप्पा,,!

एक प्रयत्न छोटस हास्य ओठांवर आणायचा !

विनोद निर्माण करणे सोप्पे नव्हे !

हे अतुलनीय काम माझ्या आईवडीलांनी केले

ऊदाहरणा दाखल : माझा लहान भाऊ " विनोद "

संगीता अनंत थोरात

12/06/2021

०००००००