आठवणीतील प्राणी

Marathi Blogs,Marathi Lalit Lekhan

लहानपणी आमच्या कॉलनी मध्ये दोन गायी यायच्या.एक लाल रंगाची आणि दुसरी पांढऱ्या रंगाची.पांढरी गाय रंगाप्रमाणेच शांत आणि मृदू स्वभावाची होती,अगदी "गरीब गाय"  या संकल्पनेला जागणारी,तर लाल गाय मारकुटी आणि वाकड्या शिंगांची.या गाईचे एक शिंग तुटलेले होते तर दुसरे वाकडे वाढलेले.बहुतेक त्या कोणाच्या तरी पाळलेल्या गाई होत्या.



तेव्हा "पाळीव प्राणी"अथवा आताच्या "भाषेत"pet animals ही संकल्पना, मोत्या,टिप्या अथवा टिल्या नावाचा गावठी कुत्रा,मन्या नावाचा एखादा बोका किंवा मनी नावाची मांजर इथपर्यंतच मर्यादीत असायची.कोणा कोणाकडे मीठु किंवा राघू अशा बाळबोध नावाचे बडबडे पोपट सुद्धा असायचे.त्यातही हा मोत्या अथवा मन्या चार पाच घरांचा किंवा कधी कधी आख्या गल्लीचा मिळून असा commen pet असायचा आणि तो सगळ्यांच्याच खाल्ल्या अन्नाला जागायचा.



तर या दोन गाईंच्या गल्लीत यायच्या वेळा देखील साधारण ठरलेल्या असायच्या.आठवड्यातून दोन तीन दिवस तरी त्या गल्लीत हजेरी लावायच्या.पांढरी गाय सकाळी तर लाल गाय दुपारच्या निवांत वेळी चक्कर टाकायची.पांढऱ्या गाई ने गल्लीत एन्ट्री मारताच आम्हा पोरांची वरात तीच्या मागून गल्लीभर फिरायची.कोणी तिची शेपटी डोक्याला लावायचे तर कोणी तिच्या पोटाखालून पास व्हायचे.कोणी तिच्या गळ्याला खाजवत राहायचे.एवढे अंगचटिला जाऊनही गाय मात्र शांत असायची. शांतपणे प्रत्येक घरासमोर उभी राहून आत घरात बघत रहायची.आणि मग प्रत्येक घरातून तिला काहीतरी खायला घालून तिच्या कपाळाला हात लावून नमस्कार केला जायचा.



याउलट तऱ्हा होती ती लाल गाईची,तिने गल्लीत एन्ट्री मारताच प्रत्येकजण धास्तावायचा.दुपारच्या निवांत वेळी गल्लीतील काक्या,माम्या,मावश्या काम आवरून गहू अथवा भाज्या  निवडन्याच्या सबबीखाली "गॉसिप"करायला बसायच्या.लाल गाई नेही म्हणूनच बहुतेक ही वेळ हेरून ठेवली असावी.अशा महत्वाच्या वेळी आम्हा मुलांवर एक महत्त्वाची जबाबदारी दिली जायची,लाल गाई वर लक्ष ठेवण्याची.



आम्ही पोरं सुदधा मग डोळे लाल गाई च्या एन्ट्री वर आणि कान बायकांच्या गप्पांवर ठेवून आजूबाजूला खेळत राहायचो.आणि कोपर्यावरून ती गाय गल्लीत वळताना दिसली की गप्पांमध्ये रमलेल्या बायकांना ओरडून सावध करायचो..."लाल गाय आली"



हा इशारा ऐकताच महत्वाच्या टप्प्यावर आलेले गॉसिप अर्धवट सोडून बायकांची त्रेधा उडायची.पुढ्यात निवडायला घेतलेले धान्य शिताफीने लपवले जायचे,निवडून झालेल्या किंवा न झालेल्या भाज्या पदराखाली लपवून उरलेले भाज्यांचे देठं गाई पुढे टाकले जायचे.पण गाय सुद्धा बायकांच्या वर हुशार होती.तिला हा डाव बरोब्बर कळायचा. मनात असेल तरच ती त्या देठांना तोंड लावायची,नाहीतर पुढे जाते आहे असे भासवून अचानक मागे फिरायची आणि बेसावध झालेल्या बायकांना वेळप्रसंगी ढकलून धान्यामध्ये तोंड खुपसायची.मग अशा वेळेला तिला कितीही हुसकावले तरीही तिचे काम झाल्याशिवाय ती काही डोके वर काढायची नाही.



गाई च्या हेरगिरी च्या या कामाचा उपयोग आम्ही मुले कधी कधी बदला घेण्यासाठी सुद्धा करायचो.लाल गाय गल्लीत आली की, आदल्या दिवशी रंगात आलेला खेळ मोडलेल्या एखाद्या काकू चे धान्य अथवा निवडलेली भाजी मग त्या  दिवशी लाल गाई च्या पोटात गेलीच म्हणून समजा.अशावेळी मग आम्ही मुले,गाय टप्प्यात आल्याशिवाय ती आल्याची खबर गॉसिप गॅंग ला द्यायचोच नाही.



पण एवढी आडदांड असूनही या गाय माऊलीने आम्हा मुलांना अथवा गल्लीतील कोणालाही मारल्याचे आठवत नाही, नुसती अंगावर धावल्यासारखे करायची.



असेच दोन गल्ल्या सोडून पलीकडच्या गल्लीमध्ये एका पुढारलेल्या घरामध्ये एकमेव पामेरियन कुत्रा होता.शेपटी सकट दीड दोन फूट लांबी आणि दोन वीत उंची असलेलं हे प्रकरण स्वभावाने भलतेच तिखट होते.त्याच्या घरासमोरून जाताना अथवा त्याच्या गल्लीला लागून असलेल्या आडव्या गल्लीतून दळण द्यायला जाताना आम्हा बहिणींची कायम त्रेधा उडायची.त्याच्या गल्लीतून जाताना कोणाची नुसती चाहूल जरी लागली तरी हा बारीकसा जीव ,जोर लावून भुंकायला सुरु करायचा.आणि त्याच्या भुंकण्याचा जोर तेव्हाच जास्त असायचा जेव्हा त्याच्या गळ्यातील पट्टा खिडकीला बांधलेला असायचा.मोकळं असल्यावर मात्र हे प्रकरण जीव खाऊन न भुंकता तब्बेतीप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे दमाने आम्हा मुलांवर भुंकायचे. मोठ्यांच्या मात्र वाटेला जायचे नाही.



या पामेरियन च्या घरात एक बाणेदार आज्जी होती.सगळा गोतावळा असूनही स्वतंत्र संसार थाटून एकटी राहणारी.बरेचदा ही आज्जी दुपारी आमच्या घरी यायची.माझी आई शिलाईकाम करत असल्या मुळे तिचे आईकडे काम असायचे.ती आज्जी घरी आली की बरेच वेळा तिच्या मागून हा कुत्रा उडया मारत आमच्या घरी यायचा,आणि घरात शिरल्याबरोबर जणूकाही स्वतःचेच घर असल्यासारखे घरभर फिरायला सुरू करायचा.माझी आई स्वच्छतेची भक्त आणि स्वभावाने कडक,त्यामुळे तिला काही त्याचे हे असे भटकणे पटायचे नाही.त्यामुळे ती त्याला दटावायची,"काय त्या गावभर फिरून आलेल्या पायांनी घरात फिरतोय,जा तिकडे बाहेर जाऊन बस.आणि तो मुका जीव सुद्धा गपगुमान बाहेर ओट्यावर जाऊन पायावर पाय टाकून मुकाट बसून राहायचा..जणू काही घडलेच नाही अशा थाटात.त्याची ही फजिती सुरक्षित अंतर राखून आम्ही मुले एन्जॉय करायचो.ज्या कुत्र्याला सगळी मूले घाबरतात तो माझ्या आईला घाबरतो हे बघून आम्हाला खूप गम्मत वाटायची.घरी आल्यावर मात्र तो कुत्रा आमच्यावर अजिबात भुंकायचा नाही.कदाचित "हर कुत्ता अपनी गली मे शेर होता है",हे त्याला माहीत असावे.