आठवणीतील भुलाबाई

अक्कल माती,चिक्की माती ,जात ते रोवाव, पासून अस्स माहेर सुरेख बाई पर्यंत त्याला सुरात गाणी व्हायची.



* आठवणीतील भुलाबाई*

बागेत गुलाबी, पिवळ्या बहरलेल्या गुलबक्षीने सुलुताईंचे लक्ष वेधले.
घेतली काढून फुले, आणि घरी येऊन वेणी गुंफायला बसल्या.हातां बरोबर ओठ ही गुणगुणायला लागले.
" शरद ऋतू आला आनंद आम्हाला झाला , भुलाबाईं ना जाळी विणली, महालक्ष्मी जणू भासली"
गाण्याच्या स्वरलहरीं वर मन झोके घेत सिनेमाच्या फ्लॅशबॅक प्रमाणे मागे मागे गेले.

असेच दिवस होते ते, गणपती विसर्जन झाले दुसरे दिवशी पौर्णिमा होती.

मंदा, कुमुद ,बरोबर सुलू शाळेच्या वाटेवर असलेल्या बुचाची लांब दांडी ची फुले घेऊन दुपारी घरी आली. आज अश्विन शुद्ध पौर्णिमेला भुलाबाई येणार याचा आनंद मनात होता.

सुलुच्या ताईने कोनाडा स्वच्छ करून क्रेप पेपरची रंगीत फुले त्यावर लावली, पाटावर भुलाबाई भुलोजी राव, बाळासकट विराजल्या.

"सुले अभ्यास दुपारीच करून ठेव संध्याकाळी वेळ मिळणार नाही "ताईने दटावले.
रोज अभ्यासाला टाळमटाळ करणारी सुलू आज पटकन बसली अभ्यासाला हे पाहून आईने आश्चर्य दाखवले.
"आई ,आज काय प्रसाद"?

\"ओळखायचं \"आईने हसत हसत म्हंटले.

. पाच वाजले तशी मैत्रिणींचा घोळका हजर .
"पहिली ग पूजू बाई देवा देवा" पासून गाणी अगदी अभिनयासकट गायली. "कारल्याची बी लाव ग सुने" गाण्यात कुमुद सून व सुलु सासू , तर" झिपर कुत्रा सोडा ग बाई"
"नणंद-भावजय दोघीजणी मध्ये, दादाच्या मांडीवर बसीन म्हणत पटकन जवळचीच्या मांडीवर बसायचे ,अशी धमाल मस्ती करत गाणी अगदी तालासुरात व्हायची.

" आता पुरे हं, अजून पुष्कळ घरी जायचे ना मग आरती करा" असे आईने आठवण करूनदिली.
दोन मुली हाताचा पाळणा करीत त्यावर सुपारी ठेवून" निज-निज हळकुंड बाळा म्हणायला लागायच्या."
तोपर्यंत सुलूची आई प्रसादाचा डबा घेऊन हजर .मग खरी चढा ओढ सुरू व्हायची कोण प्रसाद ओळखतो? गोडा परी की तिखटा परी? असे प्रश्न.
पहिलाच दिवस आईने गोड म्हणताच "श्री बालाजी ची सासू कशी" पासून सर्व नावं घेतली, पण ओळखता येईना.
कुमुद नी सुलू ला इशार्याने विचारले?

नाही माहित सुलुने मान हलवत सांगितले.

आईने मग हाताने गोल गोल असा इशारा केला तेव्हा लाडू? नाही मग-- मोदक? म्हणताच आईने हसून हो ss,म्हणून डबा उघडला.
आनंदात सर्व जणी होssय करत ओरडल्या व प्रसाद घेऊन दुसऱ्या घरी पळाल्या.

अशी कितीतरी घरी गाणी म्हणायला जायचं .आठ वाजेपर्यंत घरी आलं की पोट बऱ्यापैकी भरलेलं असायचं.
खरंच किती छान दिवस होते महिनाभर कसा निघून जायचा कळायचे नाही.

कोजागिरी पौर्णिमा हा तर खासच दिवस त्या दिवशी अंगण स्वच्छ करून भुलाबाईंना अंगणात आणायचे , चंद्राच्या प्रकाशात छान आरास करायची, रांगोळी काढायची आणि मग जोरात गाणी सुरू व्हायची रोज पाच गाणी म्हटली तरी आज मात्र सर्व गाणे गाऊन घ्यायची .अगदी टिपरी च्या तालावर.

खूप आनंद पण भुलाबाई परत जाणार याचं दुःखही मनात असायचं. मग व्हायची स्पेशल आरती, शेवटी खूप प्रसाद,आटवलेल दूध.

"आजी कोणती गाणी गाती आहे तू एवढं मन लावून?" नाती ने विचारले तेव्हा सुलभाताई भानावर आल्या.

" भुलाबाईंची".

बाई, भु-ला-बा-ई ह्या कोण?नाती ने विचारले. अगं पूर्वी कुमारिका मुली बसवत असत भुलाबाई,भुलोजी म्हणजे पार्वती आणि शंकर च .

तेवढ्यात सून रेखाही आली.
"आई ते गाणं त्यात असं माहेर सुरेख बाई ते म्हणा ना" .

" अक्कण माती चिक्कण माती जाते ते रोवाव" पूर्ण गाणं गायलं. "असं माहेर सुरेख बाई गोड गोड खायला मिळत असं सासर द्वाड कोंडून मारीत"

आजी सासर खूप वाईट असतं? सासू मारते ?नातीच्या भाबडा प्रश्न ऐकून रेखा व सुलभाताई दोघी चपापल्या .बापरे? आत्तापासून हिच्या मनात सासर विषयी भीती बसेल.
अगं,पूर्वी गाण्यात म्हणायचे ,
आजी-- तू पण सासू?
हो---
"आईची"?
हो बर, या सासू,नी मी सून रेखांनी सांगितले .
पण-- तुझी आजी प्रेमळ आहे त्यांनी नाही हो मला कधी त्रास दिला.
हो तर आजी तर तुझं किती कौतुक करते. "आई मग गाण्यात असं कां"?
अगं ते पूर्वी, खूप लवकर लग्न व्हायचे ना मुलींना काम करायचं कंटाळा यायचा.
"आजी तुझं लग्न"?
हो गं मॅट्रिक झाले नी झालं लग्न. अर्धवट वय धड लहान पण नाही धड मोठी पण नाही.
मनात भीती असायची पण-- इकडची माणसं चांगली होती. सर्व शिकवलं सासूबाईंनी. माहेरी सगळ्यात लहान ना फार काम येत नसे, कधी कधी चुका व्हायच्या सासूबाई कधी प्रेमाने कधी जरा कडकशब्दात समजवायच्या .मग धाक वाटायचा पण त्यामुळे सर्व नीट छान जमले इतकी वाईट नसतात ग सासरची माणसं हे समजलं. ते गाण्यात आपलं उगाचच,

काळ बदलला,आता थोडा बदल हवा गाण्यांमध्ये.
आहे ना, आजी ते मालिकांमध्ये "सुंदर आमचे घर"
"असं सासर सुरेख बाई" नाही कां?
"लाडकी सुन मी या घरची रोज रोज कसरत" असे एक्टिंग करत गाणं म्हणताच रेखा व सुलभाताई हसायला लागल्या.

तेवढ्यात सुलभाताईंचा फोन वाजला.
कोणाचा आहे बघू \"?
हॅलो कोण? स्वाती( मोठ्या दिरांची नातं ) .
आज कसा काय फोन? कशी आठवण ह्या आजी ची?
"अगं तुझ्या कडे एक काम होतं आमच्या क्लबमध्ये कोजागिरीचा इव्हेंट आहे"
.त्यासाठी मला ती भुलाबाईंची गाणी हवी होती. तुला खूप येतात नाही कां? मला रेकॉर्ड करून पाठवशील?
मी इवेन्ट मेनेजर आहे आमचा प्रोग्राम आहे. ग. लुगडं नेसून,नथ घालून टिपर्या वाजवत.
हो पाठवीन की.
मी नंतर तुला सर्व इवेन्ट चे विडियो शुट पाठवीन,व यूट्यूब वर ही अपलोड करेन. काकूआजी तू पहा ते आणि शेयर कर.

सुलभाताई विचार करूलागल्या बेंगलोर सारख्या शहरात, इंजीनियरस्वाती, आणि भुलाबाई ची गाणी??
या ऑनलाइन च्या जमान्यांनी आउटडेटेड झालेल्या भुलाबाई परत ऑनलाइन झाल्या. जेणेकरून नव्या पिढीला माहिती होईल ,आपली संस्कृती आपली परंपरा टिकून राहील.
नव्या उत्साहाने सुलभाताई गाऊ लागल्या "शरद ऋतू आला आनंद मनाला झाला".
---------------------------------------
लेखन..सौ.प्रतिभा परांजपे