Feb 24, 2024
वैचारिक

आता नको , पुन्हा बघु!

Read Later
आता नको , पुन्हा बघु!

देवेन शनिवारी ऑफिसचे काहीही काम न वाढवता दुपारी घरी आला.

जेवणाची तयारी झाली असावी बहुधा. . रावी जेवणाची ताटं घेत होती. कुठल्यातरी खमंग पदार्थाचा स्वाद हवेत  दरवळत होता. .. .

पावभाजी होती की आलू पराठे?

त्याला अंदाज लावता आला नाही. 
तो कधीच लावता यायचं नाही.
तो फार खवैया नसला तरीही आवडीने खाणारा होता पण हे वासावरून पदार्थ ओळखणे. ..  किंवा खाल्यानंतर  त्यात काय काय टाकलय हे ओळखणे. . या शास्त्रात तो कच्चा होता.

फ्रेश होऊन आला तर याशिकाने अगदी होटेल स्टाईलमधे टेबल मांडला होता. .

"काय प्रिन्सेस . . कुणी स्पेशल गेस्ट येणार आहेत का?"

"नो.  नॉट अॅट ऑल. . !"

"अगं मग . . एवढा खास इंतज़ाम. . . सांग ना प्रिन्सेस . . सरप्राईज  असेल मम्माचं तरीही.  तुझी माझी एक टीम ना!" म्हणजे तो ला ओपाला चा महागडा डिनर सेट जेवायला होता.
दिल्लीहून आणलेले महागडे काचेचे ग्लास पाण्यासाठी घेतले होते.
टेबल क्लॉथ ही नवीनच!
तो बेडरूम मधे चेंज करायला गेला तर तिथलं बेडशीटही ठेवणीतलं टाकलेलं!
काहीतरी आहे. . काहीतरी लपवलं जातंय असं वाटलं.
पण याशिका काहिच सांगत नव्हती.

त्याने आता रावीकडे निरखून पाहिलं . .

रोजच्या लुकमधे बायकोला इतकं गृहित धरलं जातं की बहुतेक वेळा नवराबायको एकमेकांना वेगळ्या दृष्टिक्षेपातून पाहतच नाहीत.
विशेषतः बायको घरातल्या कपड्यावरच कामात असते त्यामुळेही असेल कदाचित! पण सगळ्याच नवर्‍यांचं घाईत विशेष  लक्ष जात नाही.
आज रावीही सुंदर  दिसत होती. खास ड्रेस घातला होता. ती घरात इतके महाग कपडे वापरायची नाही.

"तात्या अन आई जेवले का गं ?"

" हो ना ! त्यांचं झालं मग मी अन याशी तुमचीच वाट पाहत होतो. . नाही का गं?"

" हो ना पापा. . अाणि दादा तर खाऊन खेळायला पण गेला त्याच्या फ्रेंडकडे. . आम्ही तर तुमचीच  वाट पाहत होतो!"

"रावी कुणी घरी येणार आहे का? . . जेवायला किंवा जेवणानंतर?.  घर भारी सजवलंय म्हणून म्हटलं "

" नाही ना देवेन सहज असंच.  वाटलं म्हणून!"

त्याने मनात सगळा हिशोब मांडला, कुणाचा वाढदिवस  , लग्नाचा वाढदिवस  किंवा काही खास सणवारही नव्हता. साधा सरळ विकेंड होता. आणि रावीचा आग्रह होता की सोबत जेवूयात घरीच या!

" येस. . रावी. . नक्की तुझी किटी पार्टी असणार?. .किंवा कसलं हळदी कुंकु?"

ती मोठ्यांदा हसली. ." नाही देवेन. . काहितरीच काय?" पण तिच्या डोळ्यात कुठेतरी पाणी तराळल्यासारखे वाटले त्याला. . की भास झाला?

त्याने नाद सोडला व  गुपचुप जेवायला बसला. हसत खेळत मस्त जेवण झालं.  गप्पा व चविष्ट  पदार्थ समोर ठेवलेले. . सजवलेले,  त्यात प्रेमाने वाढणं. . पोट अन मन गच्च् भरलं. . देवेनला खूप भारी वाटलं.

"थँक्यू  रावी न याशी . . यू मेड माय डे. . आजचं लंच लक्षात राहिल. . अगदी थ्री स्टार मधे जेवल्याचा फील आला .!\"

" हो ना . .माझ्याकडून पण थँक्यू . . पण देवेन . . असं आपण नेहमीच जेवू ना सोबत?. . म्हणजे हा आनंद . .आणि हे खेळकर कुटुंब  असंच राहिल ना ?"

" हो राहिलच की. . हा काय प्रश्न झाला रावी. . ? आणि असं का वाटतंय तुला ?"

"काही नाही सहजच!" ती पटकन वॉशरूम कडे वळली.

देवेनला कळेचना.

" याशी कुणी आलं होतं का किंवा कुणाचा फोन?"
" पापा. . मम्माच्या फ्रेंडच्या मम्माचा फोन आला होता ना , सकाळी, तुम्ही गेल्यावर . . .मला नाही माहित. . बाय . . मी चालले समोर खेळायला." ती धूम पळाली समोरच्या फ्लॅटमधल्या मैत्रिणीं  कडे.

देवेन विचारातच पडलेला होता. तितक्यात आई हॉलमधे येवून बसली . . टि. वी. लावला.
देवेन आईच्या बाजूला बसला सोफ्यावर. .

"काय गं आई . . रावी ला बरं नाहिये का? काही म्हणली का ती?"

" हो रे तिचं मनच थार्‍यावर  नाही आज. . पण तरीही केवढं आवरलं. . तिने आल्यावर. . सगळा स्वयंपाक केला. मस्त केला मेनूपण!"

" काय झालं मन थार्‍यावर  नसायला?. . आणि आल्यावर स्वयंपाक  . . म्हणजे कुठे गेली होती?"

" वसंताच्या आईचा फोन आला होता. . घरी गेली होती भेटायला !"

" वसंता म्हणजे ती पंधरा-वीस  दिवसांपूर्वीच  गेली , रावीची मैत्रीण . . तीच नं?"

" हो तीच. . .बघ ना ,अचानक ब्रेनहॅमरेजने गेली. . तीच. . पण मरण वेळ देत नाही माणसाला . . अन जीवनही वेळ देत नाही. . सगळ्या इच्छा तशाच राहुन जातात. . खूप त्रासदायक  आहे हे. . तुम्हाला वाटेल . . . हिला आज असं  का बरं वाटतंय ?. . पण माझ्याकडे याचं उत्तर नाही!"


रावीचं हे बोलणं  ऐकून देवेनला आठवलं की हो मागच्या महिन्यात तिची मैत्रिण  अचानक गेली होती. . रावीने ते खूप मनाला  लावून घेतल होतं.

"त्याचं आज काय रावी?"

" वसंताच्या आईने मदतीसाठी बोलावलं होतं. . .त्या एकट्या पडल्यात खूप. वसंताच्या आठवणीने व्याकुळ झाल्या होत्या. घर आवरायचं होतं. बाई लावली होती त्यांनी परंतु जवळची मैत्रिण म्हणून  मी वसंताची  आलमारी आवरावी असं वाटलं.  आणि हो काय काय सापडलं माहितीय?"

"काय गं ?"

" तिला भयंकर कपड्यांचं वेड होतं.. .  अहो घेतच रहायची व ऑनलाइन ऑर्डर तर विचारूच नका!
आलमारित ऑनलाइन  आलेले ५-६ ड्रेस व पर्सेस ची पॅक पाकिटं तशीच होती. . .काकूंना तर माहितही नव्हते. .. केव्हा  मागवले. मी व तिने शिवायला टाकलेले ४ ड्रेस तसेच होते. एक गणपतीत ३ नवरात्रीत, एक दिवाळीत   घालेन. . आता घडी नाही मोडणार अशी म्हणाली  होती मला.. . मागच्या महिन्यांत पण  नाहिच ना
भारीतल्या जरीच्या साड्या. . अन  अजून काय काय निघालं. . तिला वाटलं तरी  होतं का की ती हे आवडीने घेतलेले नवीन कपडे घालूनही पाहू शकणार नाही. . ."

" रावी शांत हो. . रडू नकोस!"

"आधीच देवाने तिला कोवळ्या वयात वैधव्य दिलं होतं. त्यातून  उभी राहून गेली पंधरा वर्षे खंभीरपणे आनंदाने जगत होती. काकूंना केवढा आधार व अभिमान होता तिचा. "

" नशीबापुढे काय. . . एवढ्या दिवसांनी किती बेचैन पाहतोय मी तुला. सावर गं!"

"बरोबर आहे रे जवळची मैत्रिण  होती मग काय हे ? पुन्हा करू ,पुन्हा करू म्हणू तिचं सगळं तसंच राहून गेलं. ! असं वाटतंय हिला" सासूबाईंना दमजत होतं सगळं.

आता रावीचा बांध फुटला व ती सासूबाईंच्या बाजूला बसून  हमसून हमसून रडू लागली.
सासूबाईंनी डोक्यावरून हात फिरवुन  तिला जवळ घेतलं.


देवेन उठला व तिच्या पाठीवर थोपटून  म्हणाला" काहीतरीच हिचं. . वेडी आहेस का रावी? . . चला तोंडाला पाणी मार ! आराम कर चल ये!"


तो बेडरूम मधे जावून पडला खरं पण रावीच्या  त्या वागण्याचा  व विचाराचा . . खोलवर अभ्यास करून तो आतून पार कोलमडून गेला होता.

रावीला क्रॉकरी जमा करण्याचा खूपच शौक. पण ती वापरायला काढायचीच नाही. आता कशाला? कुणीतरी पाहुणे येतील किंवा विशेष  काही असेल तेव्हाच काढायचे. . एरवी ते शोकेसमधेच!

आता नको पुन्हा जाऊयात, आता नको पुन्हा कधीतरी करूयात, आज कशाला ? कुणी आल्यावर बघु हे डायलॉग  त्यांच्या घरात नेहमीचेच. 

खूपदा तो सुद्धा तिच्या कितीतरी इच्छा अशाच दुर्लक्ष  करायचा. पण हो खरंय? आयुष्याचा काहीच भरवसा नाही. जगला तोच क्षण खरा. . .हे बोचलंय तिला. वसंताचे नवे कपडे पाहून ती आतून हलून गेलीय हे लक्षात आलं त्याच्या.


"आपण  असेच राहू का ? " तिच्या या  प्रश्नाला देवेन सहज  हो म्हणाला होता. .. पण आता जाणवत होतं की अशाश्वत जीवनाचा खरच भरोसा नाही. .


आता असं त्यालाही वाटलं. . म्हणूनच  जगुण घ्यावं. . हवं तसं . . रोजच्या रोज. . . ! कारण हे जगणंच  किंवा राहिलेलं उधार जगणं पुन्हा आठवणी बनून जातं!

त्याने रावीला बोलावलं. ती सहज येवून बाजूला पडली. देवेन ने तिला घट्ट मिठीत घेतलं , कपाळावर ओठ टेकवले व म्हणाला, रोज सुंदर जगुयात, हवं तसं . . आता नको, पुन्हा बघु असं नाही म्हणणार मी!

© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक  १५ . ०६. २२

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 25 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.

//