आता कुठे ती वयात आली..

आता कुठे ती वयात आली..



राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी - 2

विषय:-सुखाची परिभाषा

शीर्षक:-आता कुठे ती वयात आली


तिने निसर्गावर, उडणा-या पक्ष्यांवर

झाडांवर, पानांवर कविता केली...

त्यांनी तिला दुर्लक्षित केले...!

तिने समुद्राची गाज, नदीचा अवखळपणा दाखविला...त्यांनी, त्यात काय विशेष...? म्हटले...!

तिने फुलांचे फुललेले सौंदर्य आणि त्यांच्या भोवती रुंजी घालणा-या भ्रमराच्या प्रणयावर काव्य केले...त्यांनी, सृष्टीची सृजनता आहे.. तिला उत्तर मिळाले...!

तिने नजरेचे सौंदर्य, हृदयातील धडधडणा-या स्पंदनांची जाणीव करून दिली...त्यांची तर नजरच बदलली...!

अंधा-या रात्री तिला सोडून गेलेल्या चंद्राचा प्रकाश...तिच्या एकांतात सोबत असलेल्या काजव्यांची साथ...अंग गोठवणार्‍या रात्री आठवणींच्या गोधडीतील ऊबदार स्पर्शाचा सहवास... जाणवतंय का...? विचारले...त्यांनी तिला खुळ्यात काढले....!

बस्स....

तिने मग दुबळी झालेली नाती आणि फसव्या मैत्रीचे मुखवटे फाडून मनाच्या अंतरंगातील खोल डोहात कुठेतरी दडलेल्या स्वतःच्या दु:खावर कविता केली आणि पुरुषप्रधान संस्कृती मुळातून हादरली

बघं ना तिच्या लेखनीतून महा-कवीता प्रसवली...!खरेच, आता कुठे माझी कविता योग्य वयात आली.....!

 ©दीपाली समर्थ..

जिल्हा:- भंडारा