आता मी काय करू?

मनाविरुद्ध लग्न झाल्यावर होणार्‍या अडचणी आणि वैचारिक मुद्दे.

"आता मी काय करू? "

                   - ©स्वाती बालूरकर,  सखी



"मनाविरूद्ध झालेले लग्न " असा जर विषय डोक्यात घेतला तर मी विचार करूनही बेचैन होते . म्हणजे ते दोघेही हे सगळं कसे सहन करत असतील. . लग्न म्हटलं की आयुष्य भराचा प्रश्न असतो. विषयाचा दूसरा टप्पा आहे , हा प्रश्न जो मुलगा किंवा मुलगी दोघांच्याही मनात येत असावा. लग्न तर झालं .. . आता मी काय करू?

आणि दुर्दैवाने पुष्कळदा त्याची पुढची  पायरी ठरते घटस्फोट !

यादरम्यान वारंवार हा शब्द कानावर पडत आहे -घटस्फोट , . . ब्रेकप . .  डिवोर्स ! रिमॅरेज!

एकदा डाव मांडणच अवघड त्यात मांडलेला डावच विस्कटायचा आणि मग पुन्हा डाव मांडायचा?

मानसिक , शारिरीक , सामाजिक व आर्थिक  सगळ्याच दृष्टिने हे काम खूप कठिण आहे.
आजकाल च्या पीढीत लव्ह , रिलेशन आणि ब्रेकप हे फार सामान्य शब्द झालेत. . जे आमच्या तरूणपणी नव्हते . किंवा मनाविरुद्ध  लग्न झालं तरीही तो मुलगा किंवा मुलगी निभावून न्यायचे. कधी कधी पटत नाहीय हे कळेपर्यंतच  १-२ अपत्य झालेली असायची मग लेकरांसाठी ते तसाच संसार ओढायचे शिवाय सामाजिक बदनामीची भीती होती ती वेगळीच!

मग अाता असं काय झालंय?
(ही माझी वैयक्तिक मते आहेत त्यामुळे सहमत असाल तर ठीक आणि नसाल तर ठीकच ! कारण हा विषय वादाचा मुद्दा असूच शकत नाही)

माझ्यामते  आजकाल व्यक्तिस्वातंत्र्य  अधिक झालंय! स्वतःसाठी जगणे. . स्वतःचा आनंद महत्वाचा!अशा माईंडसेट मधे ही पिढी  मोठी होती आहे. त्याग वगैरे गोष्टी इतिहासजमा  झाल्यात बहुतेक!

त्यामुळे आई किंवा बाबांच्या आनंदासाठी लग्न करणारे लोक कमीच राहिलेत ! चुकुन त्यांनी केलंच  तर ते अधेमधेच मोडतं किंवा खटके उडतात . . नंतर काहीच शिल्लक रहात नाही, ना नातं,  ना सुख ना प्रतिष्ठा !

मनाविरूद्ध लग्न हे कुणाकडूनही असू शकतं!
मुलीकडून , मुलाकडून किंवा दोघांच्याही आईवडिलांकडून!

परिणाम काय ? तोच!

एक उदाहरण ओळखीतलच आहे की सुमाचं (कुसुम नाव तिचं) लग्न झालं, ठरवून, दाखवून, औपचारिकतेने!
आईवडिलांनी सगळी हौस केली आपल्या ऐपतीच्या बाहेर जावून. .
अॅरेंज मॅरेज  असूनही. . !
पण पुढचं सगळं सर्वसामान्य लग्नाप्रमाणे गोड- गोड झालंच नाही.

नवर्‍याने बायकोकडे दुर्लक्ष  केलं. . काही महीने तिला कळालच नाही की हे काय होतंय?
सण- वार, हौस- मौज, येणे -जाणे, देवदर्शन  , आहेर मानपान यात काही महीने गेले.
गोव्याला फिरायला जायचा प्लॅन होता दोन वेळा पोस्टपोन झाला व तिसर्‍यांदा  रद्दच झाला.

सुमाला कळेचना की हे असच सर्वांसोबत होतं की काहीतरी वेगळं. . आहे!

सासू म्हणाली तो लाजाळू आहे. . थोडा वेळ लागेल रुळायला, पण किती वेळ ?

मग दोघेच पुण्यात राहण्यास आले. . सुमाने हौसेने घर लावलं , स्वयंपाक वगैरेपण करू लागली पण  त्याने कधीतरीच खावं. तो बाहेरुन जेवून यायचा किंवा येवून जेवायला जायचा! कधी भूक नाही तर कधी थकलोय अन कधी पोट बिघडलंय!

तिला कळेचना की आता काय करू?

आईबाबा आनंदात आहेत की धनसंपन्न स्थळ मिळालं. त्यांना काय सांगणार!
कुणालाही सांगण्यासारखं तो काहीही बोललाच नव्हता. त्याला थोडा वेळ द्यावा. म्हणून ती सहन करत राहिली.

एकदा असाच शनिवार होता.
त्याला सुट्टी असायची पण तो विकेंड बाहेरच घालवायचा! 

तो कधीच सांगून जायचा नाही की येण्याची वेळ सांगायचा नाही.
जास्त प्रश्न विचारले की त्याला राग यायचा !
कंटाळून तिने मग स्वतःसाठी जगण्याचे ठरवले.
शनिवारी  दुपारी ती  शाळेतल्या जुन्या मैत्रिणीचा पत्ता काढून भेटण्यासाठी गेली.
खूप छान वाटलं . इतक्या वर्षानंतरही  मैत्रिणींना भेटून खूप हलकं वाटलं. आणखी दोघी शाळेतल्या वर्ग मैत्रिणींनाही त्या मैत्रिणी ने  तिथे बोलावले होते म्हणून त्या पण  आलेल्या होत्या.

छोटंसं गेट टुगेदरच म्हणाना ४ जणींचं !

त्यांच्या गप्पा व आनंदाचे किस्से ऐकून सुमाला गलबलून आलं. म्हणजे लग्न करून लोक सुखी पण राहतात . . ?

मैथिली  म्हणाली ,"अगं नवं लग्न झालंय तुझं पण तो ग्लो कुठे आहे? का खंगलीस अशी?"

सुमापुढे प्रश्न की सांगावं की नाही?
इतक्या वर्षांनी भेटल्यात. . त्यात आपलं रडगाणं काय सांगणार? शिवाय सगळीकडे चर्चा होईल. या सगळ्याजणी किती सुखी आहेत. त्यांना माझं दुख कळेल का ?

आई बाबांनाही ती स्वतःहून क्वचितच फोन करायची कारण बोलताना मनाचा बांध तुटला अन सगळं बाहेर पडलं तर? बाबांनी रिटायरमेंट च्या पैशात किती कठिन परिस्थिती  मधे थाटामाटात लग्न केलं होतं.

आता ती माहेरी परत गेली तरीही काय करणार? असे प्रश्न पडलेले सतत.

तो उत्साह , उल्लास नाही.
लाजणं -मुरडणं नाही.
त्याने तिला बघणे, जवळ घेणे  किंवा स्पर्शही नाही.
ती आतल्या आत गुदमरत होती.
त्याच्या या वागण्याचे कारण माहित नव्हते. तो सांगत नव्हता अन त्याने कारण सांगितल्याशिवाय  तिला निर्णय घ्यायचा नव्हता!

मी त्याला आवडत नाही असे असावे. . यामुळे तिला प्रचंड न्यूनगंड  यायला लागला.
यापेक्षा ती अविवाहितच बरी होती. किमान आनंदी होती व स्वतःबद्दल  आत्मविश्वास  होता.

पण लग्न त्याच्या होकारानेच झालं होतं. सासूबाई म्हणाल्या होत्या की तो थोडासा अबोल आहे, स्वभावाने शांत आहे त्यामुळे त्याच्या कलाने घे.. . पण किती कलाने आणि किती दिवस ?

त्याच्या  या वागण्याला कंटाळून  एक दिवस तिच्या संयमाचा बांध तुटला आणि ती त्याला जाब विचारत त्यांच्याजवळ खुप रडली परंतू तिला समजून घेण्याऐवजी तो म्हणाला की  "शिकलेली आहेस ना मग असा तमाशा करत जाऊ नकोस ! तुला असच रहावं लागेल. तुला  माझ्या वैयक्तिक  आयुष्यात शिरण्याची गरज नाही.  फक्त मला माझं स्वतंत्र आणि सुखी राहू दे. तू माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस !  आई बाबांसाठी मी हे लग्न केलंय . . त्यांची सून बनून रहा किंवा तू तुझं आयुष्य  जग!"

आता मात्र सुमाला काय निर्णय घ्यावा कळत नव्हतं.   ती  त्याच्या माघारी कुठे जाईल या विचाराने दुसर्‍या दिवशी त्याने तिला घरातच कोंडून टाकले आणि स्वतः बाहेर  गेला.

तो दोन - दोन दिवस आलाच नाही. नंतर तर हे पण नेहमीचच झालं.

एकदा तर त्याने घरात सामान व भाजीही आणली नाही, पैसेही दिले नाहीत आणि बाहेरून कुलुप लावून  निघून गेला.

उपासमार झालेल्या  त्या क्षणी सुमाने ठरवलं की आता जगायचं नाही .

आईवडिलांना त्रास द्यायचा नाही आणि नवऱ्याला पण नाही!

आणि तिने गळफास लावून घेण्याचा अन आयुष्य संपवण्याचा पूर्ण प्लान बनवला.

  ती पंख्याला ओढणी लटकवत होती इतक्यात तिच्या आईचा व्हिडिओ कॉल आला.

कॉल नाही घेतला आई काळजी करेल व शेवटचं या जन्मात आई बाबांना पाहूयात असा विचार करून तिने कॉल उचलला .

तिचा चेहरा तसा अवतार पाहून आई घाबरली  "बेटा कशी आहेस ?"या एका प्रश्नाने ती धाय मोकलून रडायला लागली  .
" आई मला आता जगायचं नाही, खूप झालं गं !"
आई आणि वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याक्षणी तिचं मन वळवलं. पुण्यातल्या तिच्या मावस भसवाला तिथे पोहोचण्यास सांगितले आणि वडील लगेचच तिला घेण्यासाठी पुण्याकडे निघाले .

वडील येईपर्यंत तो पहाटे परत आलेला होता आणि गुपचुप त्याच्या रुममध्ये झोपलेला होता. तिने मावस भावाला फोन करून घरी न येता बाहेरच थांबण्यास सांगितले.
वडील जेव्हा सकाळी आले तर सुमाने  त्यांना सांगितलं की त्याच्याशी काहीच बोलू नका, निरोपही घेवू नका. औपचारिकता सोडा आता.
त्यांनाही ते ठीक वाटलं  आणि तिची बॅग पॅक करून तेथून निघाले!

ती परत आली आणि हिम्मत बनवली. आईवडिलांसोबत राहिली. ओळखीच्या वकील काकांकडून त्याला नोटीस पाठवली. त्याच्याकडून लग्नाचा अर्धा खर्च तिने परत मिळवला.
पुढे शिक्षण पूर्ण केलं .
वकील झाली .   वकिलीचे शिक्षण पूर्ण करून ती आता अशा अडल्यानडल्या महिलांना मदत करत आहे आणि आई वडिलांना आधार म्हणून राहिलेली आहे.
  कुठं मुलाच्या मनाविरुद्ध तर कुठे मुलीच्या मनाविरुद्ध!  कधी काही वागण्यात चुकलं म्हणून आणि तर कधी इगोपोटी. .   लग्नाची नाती तुटतात .

एका ओळखीतल्या मुलीचं उदाहरण तर असं ऐकलं की तिचं एका परजातीय मुलावर प्रेम होतं पण आई वडिलांनी नकार देवून  जबरदस्ती दुसरीकडे लग्न  करून दिलं. तेव्हा ती शांत बसली.
बाहेर तिने प्रियकराशी गुपचुप लग्न करून घेतलं आणि नवऱ्याला स्पष्टपणे सांगितलं की मला तुझ्यासोबत राहायचं नाही .

वर्ष दोन वर्षे सर्वांनी प्रयत्न केल्यानंतरही त्यांची मनं जुळली नाहीत . ती त्या प्रियकरासोबत राहू शकत नव्हती आणि घरचे लोक नवर्‍याला सोडू देत नव्हते.

मग तिने घटस्फोट घेतला आणि ती परत आली.
या प्रसंगात नवरा खूप सहनशील होता. . त्याने पूर्ण प्रयत्न  केला. . पण जमलं नाही.
तो पुन्हा काय करेल? ती पुढे काय करेल? प्रियकराला घरचे लोक स्वीकार करतील का ?
हे सगळं अनिश्चित आहे  पण असं डाव मांडून मग मोडून पुन्हा डाव मांडायचा किती अवघड आहे!

  कधी कधी चूक लग्न झाल्यावर नवर्‍या मुलांना  हा प्रश्न पडतो की आता काय काय करू?  आणि कधी नवर्‍या मुलीलाही प्रश्न पडतो की आता मी काय करू?

काही गोष्टी घरी सांगता येत नाहीत व काही जण मित्र मैत्रिणींशीही शेअर करत नाहित.

मला वाटतं . . कुठेतरी योग्य व्यक्तिजवळ मन मोकळं करावं. . तोडण्याचा विचार नसावा पण त्यांच्या परिस्थितिजन्य त्यांच्या स्वभावानुसार  त्यांच्या घराच्या परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घ्यावा .

जीवावर बेतल्यावरही सोबत राहायचं किंवा एकमेकांचा तिरस्कार वाटला तरी सोबत रहायचं हे योग्य नाही पण छोट्या मोठ्या क्षुल्लक कारणांसाठी सुद्धा भांडण करून लगेच डिवोर्स  घेणंही चूक! असं मला वाटतं.

  प्रत्येकाने प्रसंगी मी कुठे चूक आहे? . . हा विचार व  थोडासा बदलही करणं गरजेचं आहे.

लग्नात केवळ मुलगा मुलगी नाही तर दोन कुटुंब, दोन घरं ,दोन्हीकडचे नातेवाईक , परिचित सगळेच जोडले जातात.

हे असं आहे. ." मी आता काय करू ?"हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. . मग योग्य सल्ला घेवूनच निर्णय  घ्यावा.

©® सौ. स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

दिनांक  २८ .०१. २०२२