आशीर्वाद

कथा एका आशीर्वादाची


आशीर्वाद


" आई अग तो भिकारी चांगला धडधाकट होता ग. त्याला कशाला दिलेस पैसे?" सलोनी चिडून आईला विचारत होती.
" ही माणसे ना अशी बिचारी दिसतात.. पण खूप चतुर असतात.. कामं करायची नसतात ना.. म्हणून मग अशी भीक मागतात.. आळशी कुठचे.." सलोनी थांबतच नव्हती. तिचे बोलणे ऐकून शेवटी आई वैतागली.
" अग, किती बोलतेस? सगळं पुस्तकी ज्ञान.. तुला काय माहित, तो का भीक मागतो आहे. दान सत्पात्री द्यावे हे मलाही समजते. पण त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघून मला नाही रहावले. आणि माझी आई नेहमी म्हणायची की दानधर्म केला ना की चांगले आशीर्वाद मिळतात. आणि ते आशीर्वाद कधीही वाया जात नाहीत." सलोनीला आईचे बोलणे पटले नाही. तिने मान उडवून मागे पाहिले. तो मगाचा माणूस वडापाव खात होता. त्याच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते.

काही दिवसांनंतर सलोनी कॉलेजच्या कॅम्पला गेली. आडगावात कॅम्प होता, त्यामुळे सगळेजण भरपूर खाणेपिणे सोबत घेऊन निघाले होते. दिवसभर त्या आदिवासी भागात त्यांनी सौरदिवे लावले. तिकडच्या लोकांना ते कसे वापरायचे ते शिकवले. तिथे खड्डे वगैरे यांनाच करायला लागले. शारिरीक कष्टांची सवय नसल्याने सगळे खूपच दमले होते. तिकडच्या लोकांनी यांना जेवण द्यायची तयारी दाखवली. पण आपल्या समाजकार्याचा त्यांना भुर्दंड का? आपण पुढे धाब्यावर पोटभर जेवू असा विचार करून काम झाल्यानंतर सगळे थकून परत निघाले. गाडी अर्ध्या रस्त्यावर आली आणि पंक्चर झाली. पंक्चर काढायला काही वेळ नक्कीच लागणार होता. जवळचा खाऊ आणि पाणी कधीच संपले होते. धाब्यावर जेवायचे आहे म्हणून कोणी पाणी भरूनही घेतले नव्हते. सलोनी भुकेनी आणि तहानेने व्याकुळ झाली होती. आसपास कोणती टपरीही दिसत नव्हती. सगळ्यांना भुकेले पाहून ड्रायव्हरने पटापट काम चालवले होते.
समोरून एक बाईकवाला येताना दिसला. यांना बघून त्याने गाडी थांबवली. काय झाले ते विचारले. त्याला बघून मुलींना धीर आला.
" दादा , इथे कुठे पाणी मिळू शकेल का? खूप तहान लागली आहे." एकीने धीर करून विचारले..
" तुमच्याकडे पाणी पण नाही का?" त्याने विचारले. मुलांनी नाही म्हणून मान हलवली.

"काय राव केवढा तो आळशीपणा.." तो सलोनीकडे बघून हसला. " तुम्ही थांबा.. आलोच मी.." तो परत बाईकवर बसून गेला. थोड्याच वेळात तो सामान घेऊन येताना दिसला. त्याने दोन पिशव्या आणल्या होत्या. एका पिशवीत पाण्याच्या बाटल्या होत्या तर दुसर्‍या पिशवीत बिस्किटचे पुडे..

" घ्या हे."

" याचे पैसे?"
" आम्ही अन्नाचे पैसे घेत नाही.. तसेही तुम्ही आमच्या भावंडांना मदत करायला आला होता.." तो असे बोलल्यावर कोणीच परत काही बोलले नाही. ते पाणी त्यावेळेस तरी सगळ्यांनाच अमृततुल्य वाटले. बिस्किट खाताना सलोनीची नजर गाडीच्या आरशावर पडली. तिला आपल्या चेहर्‍यावर तेच भाव दिसले जे त्या दिवशी त्या माणसाच्या चेहर्‍यावर होते..
त्याक्षणीच आईने सांगितलेल्या आशीर्वादाचा अर्थ तिला समजला..

कथा कशी वाटली सांगायला विसरू नका.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई