अस्सं सासर सुरेख बाई

"तुला सांगते मी प्रज्ञा, सुरुवातीला खूप चांगल्या प्रेमळ आहेत असेच तुला वाटेल. अगदी आई पेक्षाही जास्त लाड करतील."हो- ना मग हळूहळू त्यांचे खरे रूप समोर येईल .दाखवायचे दात असतात ते .मग हळूहळू दात नख बाहेर काढतील, तू सुरुवातीलाच सांगून मोकळी हो --मला काम आणि नोकरी दोन्ही जमणार नाही.
अस्सं सासर सुरेख बाई

"प्रज्ञा केव्हा येणार आहे तुझी सासू, म्हणजेआमची मैत्रीण आशा"? शोभा काकूंनी विचारले.
"अग बाई-- नाहीये का इथे? तरीच मागच्या भिशीला नव्हती आली." पुष्पा बोलली.
\"मुलीकडे गेलीये दोन महिने झाले\"
"कांग काही विशेष".
आजकाल बरेच दा नसते इथे. सर्वांच्या प्रश्नार्थक चेहर्‍यावरचे भाव पाहून प्रज्ञाला कसं -कसं झालं .
तेवढ्या त गीता काकूंनी हळद-कुंकू लावून नाश्त्याची प्लेट सर्वांच्या हातात दिली,त्यामुळे सर्व जणी खाण्यात बिझी झाल्या.
"छान झाली ग डाळ- करंजी , आणि गौरी ची आरास पण, एकीने हसून दाद दिली."
\"प्रज्ञा अग घे ना\",
\"नको काकू उशीर होईल मी घरी घेऊन जाते सोनू एकटा आहे घरी\"
बरं बरं सुनंदाचा तुझ्या नणंदेचा पत्ता लिहून दे, रेखा च माहेर तिथलच आहे तेव्हा भेटून येईल शोभाला.
हो काकू देते
प्रज्ञा व रेखा दोघी बाहेर येऊन बोलत उभ्या राहिल्या. प्रज्ञाने मोबाईल ने तिला नंबर व ॲड्रेस दिला. आत चाललेल्या गप्पा बाहेर ऐकू येत होत्या.
\"बरेच दिवस राहणार दिसते आशा मुलीकडे .आज-काल वारंवार जाते.\"
\"कां बरं ?पटत नाही वाटतं सुनेशी.तशी ही प्रज्ञा बोलण्यात जरा तेज आहे.
हो असंच वाटतं तरीच सारखी मुली कडे जात असते ,विचारलं तर म्हणते मुलीला बरं नसतं.
आजकाल सर्वीकडे हेच आहे.
आत चाललेल्या गोष्टी ऐकून प्रज्ञा चा मूड खराब झाला.
मुलीकडे आई बरेच दिवस राहायला गेली, हे सहजपणे अजूनही आपल्या समाजात मान्य होत नाही, नक्कीच सुनेशी पटत नसेल असा सर्वसामान्य समज असतो.
दुसऱ्या दिवशी प्रज्ञा च्या सासुबाई चा फोन आला तेव्हा तिने "आई तुम्ही लवकर या ना " म्हणून गळ घातली.
" राहू दे कि आईला माझ्या जवळ म्हणत नणंदेने ने आर्जव केली.
"अहो ताई ,इथे आईंच्या मैत्रिणींच्या पोटात दुखतय मला विचारत होत्या केव्हायेणार म्हणून.??
तू नको लक्ष देऊ ग प्रज्ञा.
पुढच्या महिन्यात येते आहे आई. तिला हि तुझीच काळजी, "आता काय तूच तिची लाडकी मी काय चार दिवस कौतुकाची" असे म्हणत नणंदेने समजूत काढली.

प्रज्ञा विचार करत होती सासू-सुनेचं नातं किती नाजूक असतं .आई मुलींमध्येही वाद होतात पण त्यांचं रक्ताचं नातं असल्याने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो पण, माझ्यात आणि सासुबाई मध्ये थोडीशी जरी वादावादी झाली तरी दोघींपैकी एकी ला वाईट ठरविले जाते.
मागे सासुबाईच्या ताई रहायला आल्या होत्या.सहज गप्पा मारताना त्या म्हणाल्या"आज कालच्या मुलींना देव धर्म कुलाचार नको असतो .आमच्या वेळेस आमच्या सासूबाई जे म्हणतील ते प्रमाण असायचे. आमची नाही म्हणायची हिम्मतच नव्हती.
त्यावर प्रज्ञा सहजच म्हणाली "मावशी आजकाल मुली, सुना नोकरी करतात त्यांना हे सर्व करायचे तर सुट्टी घ्यावी लागते, त्यामुळे कधी कधी ते जमत नाही.
त्यावर तेव्हा त्या काही बोलल्या नाही.
पण नंतर आईंना सुनावले."तुझी सून फार अगाऊदिसते , तुझ ऐकणारी दिसत नाही, तेव्हा तुझं काही खरं नाही हो".
आई हसून म्हणाल्या "अगं तसं नाहीये खूप चांगली आहे प्रज्ञा, फक्त जे वाटतं ते बोलून मोकळी होते.
आमचं छान जमत ग दोघींच. "दिसतच आहे तू आपली दिवसभर जुंपलेली आहे कामाला".
\"अगं म्हणूनच तर माझी तब्येत देखील उत्तम आहे\" असे म्हणून आईंनी विषय बदलला.
जितके दिवस मावशी होत्या आईंनी प्रज्ञा ला तू तिच्याशी वाद घालू नको असे सांगितले.

प्रज्ञाला आठवलं तिचे नी पराग चे लग्न ठरले तेव्हा, ऑफिसमधल्या तिच्या मैत्रिणींनी सासू बद्दल बरेच ज्ञान पाजले होते.
लग्ना ला आलेल्या तिच्या चुलत, मावस बहिणीं तिची सुटकेस तयार करता करता आपले अनुभव सांगून प्रज्ञा चे ब्रेन वॉशिंग करत होत्या.
"तुला सांगते मी प्रज्ञा, सुरुवातीला सासूबाई खूप चांगल्या, प्रेमळ आहेत असेच तुला वाटेल. अगदी आई पेक्षाही जास्त लाड करतील.
"हो- ना मग हळूहळू त्यांचे खरे रूप समोर येईल .दाखवायचे दात असतात ते .
मग हळूहळू दात नख बाहेर काढतील.
तू सुरुवातीलाच सांगून मोकळी हो --मला काम आणि नोकरी दोन्ही एकसाथ जमणार नाही.
तेवढ्यात आईचा आवाज आला-- "झाली की नाही तयारी आणि हिला जरा सासरी कसे रहावे त्याबद्दल चार समजुतीच्या गोष्टी सांगा फार धांदरटआहे ग ही"
" हो काकू ,आम्ही समजावले तिला म्हणत त्या हसू लागल्या.

लग्नानंतर आठ दहादिवसातच प्रज्ञा चे ऑफिस सुरू झाले.
प्रज्ञा टिफीन नेणार नं मग काय हवं ते आधी सांग???
भाज्या कोणकोणत्या आवडतात ? आधीच आपण ठरवलेले बरे.
परागला शेपू सोडून सर्व चालते मग प्रज्ञाने कारली नको ,दूधी नको असे करत करत 3-4 भाज्या बाद केल्या.

सकाळी उठून पाहते तो आईचा स्वयंपाक तयार होत आला.
प्रज्ञाला थोडं लाजल्यासारखं झाल, पण मैत्रिणींन कडून जे ऐकले होते त्या प्रमाणे ही सुरुवात आहे हळूहळू समजेल खरं रूप काय, असा तिने विचार केला.
प्रज्ञा मी डब्बा केलेला चालेल ना तुला?कि तू तुझा करणार ?
प्रज्ञा -- मला जमेल असं वाटत नाही.
बरं बरं मी करेन पण तुला करावे असे वाटले तर तसं बोल मोकळेपणाने . सासू बाई म्हणाल्या.
आणि खरंच प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने बोलून तिचे मन जाणूनघेतले . हळूहळू प्रज्ञा ला घर आपलस वाटू लागलं त्यामुळे दात, नख वगैरे कुठेच न लागता सर्व सोपं झालं आणि प्रज्ञा आपल्या संसारात छान रमली.

दोन दिवसांनी सासूबाईंचा परत फोन आला .
"अगं प्रज्ञा तू गीता कडे गेली होती कां??
हो आई.
अगं तिची सून रेखाआली होती भेटायला .खूप कौतुक करत होती तुझं ती .किती छान स्वभाव आहे किती अगत्य आहे म्हणून.
मला ना इतकं बरं वाटलं म्हणून सांगते .
\"पण आई तुम्ही या ना लवकर आता, घर तुमची वाट पाहत आहे\"
. "हो ग परवाचं तिकीट काढलं आहे, सांगितलं मी शोभा ला फोन करून तेव्हा तू रिलॅक्स हो.
येतेच आहे मी सर्वांना उत्तर द्यायला पाहते न कोण कोण काय बोलल ते.
प्रज्ञाने सुटकेचा श्वास सोडला व गुणगुणत ती कामाला लागली.
-_--------------------------------------
टीप--
सासू सुनेच नातं नेहमी विळ्या-भोपळ्या प्रमाणे च असत असं नाही तर ते अंबट गोड मुरब्या सारख ही होऊ शकत. फक्त मनात आधी पासून भिती न ठेवता मनमोकळेपणाने बोलण असावं.
तुम्हाला पटतंय ना???
------------------------------------------लेखिका सौ.प्रतिभा परांजपे