Feb 25, 2024
पुरुषवादी

आस 9

Read Later
आस 9


आता बरीच रात्र झाली होती. मला खूप भीती वाटत होती, शिवाय मला खूप भूकही लागली होती. मी इकडे तिकडे आतुरतेने त्यांची वाट पाहत बसलो होतो. मुलगा आता लगेच येईल या आशेने मी बसलो होतो पण तो काही आलाच नाही. तो या बापाला विसरून गेला. इतक्यात एक माझ्या वयाची व्यक्ती तिथे आली आणि ते माझ्या विचारपूस करू लागले. मी खूप घाबरलो होतो त्यामुळे मला काहीच बोलता आले नाही. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मला त्या गेटमधून आत घेऊन गेले. मी तिथे बसून पोटभर जेवलो आणि तिथेच झोपी गेलो.

जेव्हा सकाळी गाड्यांचा आवाज तसेच पक्षांचा किलबिलाट ऐकायला आला तेव्हा मला जाग आली. मी एकदम खडबडून उठलो आणि मुलगा आला असेल म्हणून चटकन बाहेर आलो पण तो काही आला नव्हता. मी नाईलाजाने पुन्हा आत गेलो. तेथे बरेच जण माझ्या वयाची मंडळी होती. मी तिथे विचारले तेव्हा मला समजले की ते एक वृद्धाश्रम होते. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा माझ्या मुलावरचा विश्वासच उडाला.

येथे आल्यापासून माझ्या वयाची बरीचशी मंडळी माझे मित्र बनले होते. आता माझा इथे जीव रमत होता. सगळे एकमेकांशी जिव्हाळ्याने बोलत होते. तिथे आपुलकी होती जी मला घरात मिळत नव्हती पण राहून राहून नातवाची खूप आठवण येत होती. इथे दिवस कसा जायचा ते समजत नव्हते पण रात्र काही सरत नव्हती. काही केल्या तिथे झोप लागत नव्हती. मी खूप स्वप्ने पाहिली होती जी तारुण्यात पूर्ण करायचे राहून गेली होती. रिटायर झाल्यानंतर सगळे स्वप्नं पूर्ण करावे असे ठरवले होते पण आता परिस्थिती पूर्ण बदलली होती. आता असे वाटते की ज्या त्या वेळी करायचे होते ते करून घ्यायला हवे होते पण आता वाटून काय उपयोग? हातातून वेळ निघून गेली होती.

दिवस रात्र कष्ट करून पैसे गोळा केले पण त्याची मुलांना काहीच किंमत नव्हती. मुलगी तर खूप आधीच मला धोका देऊन निघून गेली आणि आता मुलाने सुद्धा त्याची पायरी सोडली. खरंच आहे आई वडील आणि सहचारिणी याशिवाय जगात आपले कोणीच नसते. त्याची सत्यता मला आता येत होती पण आता वेळ निघून गेली होती त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो.

दिवसामागून दिवस जात होते पण संध्याकाळचे साडेपाच वाजले की माझी पावले आपोआप गेट जवळ असलेल्या कट्ट्यावर जाऊन विसावायची. का कुणास ठाऊक? पण माझे कोणीतरी येईल अशी चाहूल लागायची आणि त्यांच्या वाटेकडे मी आस लावून बसायचो. यातील एकही गोष्ट खरी होणार नव्हती हे माहीत असले तरीही वेड्या मनाची कोण समजूत काढणार?

या म्हातारपणात मला काहीही नको होते. फक्त हवा होता तो म्हणजे आधार फक्त आपल्या माणसांचा पण तो सुद्धा माझ्या नशिबात नव्हता.

अशाप्रकारे मधुकर काकांची डायरी वाचून झाल्यानंतर पोलिसांचे डोळे पाणावले. त्यांना मधुकर काकांचे जीवन चरित्र वाचून खूप वाईट वाटले. एक खूप चांगली व्यक्ती असलेल्यांची मुले अशी कशी काय करू शकतात याचे त्यांना नवल वाटले. मुलांना आई-वडील ओझे वाटू लागतात हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटले.

आता मधुकर काकांच्या मुलाचा पत्ता शोधून काढायचा असे पोलिसांनी मनाशी ठाम ठरवले. पण इतक्या मोठ्या शहरात फक्त मधुकर या नावावरून मुलाचा पत्ता कसा काय शोधणार? असे ते म्हणत होते.

मधुकर काकांचा पत्ता सापडेल का? आणि त्यांच्या मुलाने असे का केले असेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//