आस 6

एका पुरूषाची व्यथा


सुमती मला सोडून गेली खरंतर हा माझ्या आयुष्यातील तिसरा खूप मोठा धक्का होता. सुमती गेल्यानंतर मी खूप एकटा पडलो होतो. खरंतर ही डायरीच माझी सोबती झाली होती. या डायरीमुळेच मी आजपर्यंत जो काही शिल्लक आहे तो आहे. उगीचच दिवस ढकलायचा म्हणून ढकलत होतो. मला ना कोणी मित्र होते ना कोणी जवळचे नातेवाईक. आधीच्या घरात राहत होतो तिथे आजूबाजूचे लोक थोडे तरी ओळखीचे होते पण या नवीन ठिकाणी सगळेच अनोळखी होते. नातवासोबत खेळण्यात जो काही थोडा वेळ जात होता तो घालवत होतो, पण आता त्याच्यासोबत खेळलेले सुनबाईला आवडत नव्हते. ती सारखे त्याला मारत होती आणि रागवत होती.

नातवाला रागवलेले आणि ओरडलेले मला अजिबात आवडत नव्हते. मी काही बोलायला गेलो तर ती उलट उत्तर देत होती आणि मुलाला काही सांगितले तर तो मलाच बोल लावत होता. खरंतर या गोष्टी माझ्या मनामध्ये खूप खोल रुतल्यामुळे मी त्या डायरीत लिहू शकलो; नाहीतर त्या गोष्टीही मी विसरून गेलो असतो. आता तर मला पूर्णपणे विसरभोळेपणा जाणवत होता. जेवलेलेसुद्धा माझ्या लक्षात राहत नव्हते. सुमतीची प्रकर्षाने आठवण येत होती. तिची खूप सवय झाली होती. आता या म्हाताऱ्याला कोणाचाच आधार नव्हता.

आयुष्याची सांजवात
सरता सरत नाही..
या कातरवेळी
आधार कुणाचा नाही..

सरले आयुष्य सारे
दिवस हा सरत नाही..
जीर्ण शरीराला आता
आधार कुणाचा नाही..

तारूण्यात कमावलेले
क्षणीक सुख आता नाही..
मावळतीच्या देहाला
आधार कुणाचा नाही..

हसतखेळत जगताना
थकवा कधी आला नाही..
आता फक्त बसून होतो
तरी आधार कुणाचा नाही..

माझ्या काहीच लक्षात राहत नसल्याने मी प्रत्येक वेळी माझी डायरी सोबत ठेवत होतो. एखादी घटना घडली की मी लगेच ती लिहून ठेवत होतो. थोड्यावेळाने वाचून त्यामध्ये मन रमवत होतो. आता माझी सोबत म्हणजे ही डायरी झाली होती. एखादी घटना घडली की त्यामध्ये लिहायचे हे माझे नेहमीचे सवयीचे झाले होते.

माझा नातू आता चालू लागला होता. त्याची पावले माझ्याकडे येत होती. त्याचे ते लुटलूट चालणे मला आवडत होते. याक्षणी सुमती असायला हवी होती असे मला सारखे वाटत होते. आज त्याने पहिला शब्द आप्पा म्हणून उचारला तेव्हा मला खूप आनंद झाला. मी लगेच हे डायरीमध्ये लिहून ठेवत आहे. त्याची आई त्याला माझ्याजवळही येऊ देत नव्हती. मला सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत होता पण मी कोणाशी बोलू शकत नव्हतो.

माझा मुलगा एक दिवसही माझ्यासोबत बसून जेवला नाही, की माझ्यासोबत प्रेमाने दोन शब्द बोलला नाही. या सर्व गोष्टीचा मला खूप त्रास होत होता. आता मी बऱ्यापैकी कविता करत होतो. शब्द आठवत नव्हते पण तोडकं मोडकं लिहीत होतो. माझ्या विसरभोळेपणामुळे मला कोणी मित्रही नव्हते त्यामुळे माझी डायरी माझी खूप सुंदर मैत्रीण बनली होती. मी तिच्यामध्ये माझ्या मनातील बोल लिहून ठेवायचो, शिवाय नवनवीन कविता बनवायचो. जगण्याचं एक उत्तम साधन म्हणजे ही डायरी होती.

आज असाच डायरी घेऊन बसलो होतो आणि माझा नातू तिकडून अगदी आनंदाच्या भरात पळत पळत माझ्याकडे आला. मी सुद्धा उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत होतो.

"आजोबा, आजोबा" असे तो बोबड्या बोलाने बोलत होता ते ऐकून मला खूप बरे वाटले. मी टक लावून फक्त त्याच्याकडेच पाहत होतो.

"आजोबा, आज संध्याकाळी आपण सगळेजण फिरायला जाणार आहोत. तुम्ही सुद्धा आमच्या सोबत येणार आहात असे आईच म्हणाली. तुम्ही येणार ना आमच्या सोबत? किती मज्जा येईल ना! आज पहिल्यांदा आपण सगळेजण कुठेतरी जात आहोत. आजोबा तुम्ही येणार ना?" छोटा नातू इतका आग्रह करत होता ते पाहून मला खूप समाधान वाटले. मी क्षणाचाही विचार न करता त्याच्यासोबत जायला तयार झालो.

आजोबांना सोबत घेऊन ते सर्वजण जातील का? पुढे नक्की काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all