आस 5

एका पुरूषाची व्यथा


मी सुमतीसह मुलाच्या घरी राहायला गेलो. तेथे नातवंडासोबत खेळता खेळता दिवस कसा जायचा हे समजतच नव्हते. काही दिवस सुनबाईचे वागणे ठीक होते पण तिथे राहायला गेल्यानंतर मात्र तिचे रूप पालटले. ती आता आधीप्रमाणे वागत नव्हती. तिच्या वागण्यात खूप बदल झाला होता. तो आम्हा दोघांनाही जाणवत होता. पण सुमती असू दे असे म्हणून काही बोलत नव्हती. मला ते सगळे वागणे दिसत होते. आपले हक्काचे घर सोडून आपण इथे मुलाकडे रहायला येणे हे मुळातच मला पटत नव्हते, त्यात हा सुनबाईचा बदललेला स्वभाव पाहून आणखीनच आपला निर्णय चुकला असे मला वाटत होते.

राहून राहून मला सूनेचे वागणे खटकत होते पण मी काहीच करू शकत नव्हतो. सुमतीसह पुन्हा आपल्या घरी जावे असे वाटत होते पण सुमती यायला तयार नव्हती त्यामुळे माझा नाईलाज होता. मला काही वेळेस खूप टेन्शन येऊ लागले. जवळ सुमती होतीच पण तरीही कुणाचा तरी आधार हवा होता. नातवंडाच्यात दिवस सरत होता. सांजवातीला मात्र मन अस्वस्थ होऊन जाई. मग मी माझ्या डायरीकडे वळे. आधीच्या आयुष्यात डोकावून मन रमवत होतो. त्यावेळी मन शांत होई. मुलाला काही बोलावे तर तो त्याच्या कामात गुंतला होता. त्याच्याकडे पाहून मला माझे तारूण्यातील दिवस आठवले. एका वेळी मीसुद्धा असाच कामात गुंतून गेलो होतो. मला ना कोणी नातेवाईक दिसत होते ना घरचे. मी फक्त आणि फक्त कामच करत होतो.

आज मला थोडे थोडे आठवेनासे झाले. सकाळपासून काय घडले हे लिहायला घेतले तर काहीच आठवेना. मालती पण म्हणाली की माझी स्मरणशक्ती कमजोर झाली आहे पण मला तसे फक्त डायरी लिहायला बसलो तरच जाणवत होते. शिवाय डायरी लिहायची आहे हे मात्र लक्षात राहते. ही गोष्ट कशी विसरत नाही हे समजतच नाही. रात्री झोपायला आलो की आपोआप डायरी हातात येतेच. कदाचित सवय झाली असेल म्हणून. पण लिहायला घेतलो तर काहीच आठवत नाही. असे का होते काय माहित?

आज सुमतीला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे. खरंतर आत्ताच माझ्या नातवाने सांगितले म्हणून मी डायरीत लिहून ठेवले. आता तर मला काहीच लक्षात राहत नाही. फक्त छोटा बंटी म्हणजे नातू आणि सुमती याव्यतिरिक्त इतर नातीसुध्दा लक्षात राहत नाहीत. मला सुमती रोज झोपताना गोळ्या देत होती पण त्या कशासाठी हेच लक्षात राहत नव्हते. मी रोज रोज तेच प्रश्न विचारून सुमतीला भंडावून सोडत होतो. पण गेली दोन दिवस सुमती घरात दिसत नव्हती. दिवसभराचे मला काहीच लक्षात राहत नव्हते.

आज घरात पाहुणे आले होते. सुमती कुठेच दिसत नव्हती. मी खूप घाबरलो होतो. माझे काळीज उगीचच उडत होते. मला कसेतरीच होऊ लागले. मी डायरी घेऊनच बसलो होतो. काय लिहावे तेच समजेना. इतक्यात एक पाहुणा जवळ आला आणि म्हणाला, "काका, सुमती काकू गेल्या. खूप वाईट झालं." हे ऐकताच कुणीतरी माझं हृदय घेऊन जात आहे असे वाटले. माझ्या डोळ्यातून आपोआप आसवे ओघळत होते.

सप्तपदीच्या साक्षीने मिळाली साथ
सोबतीने चालत होतो वाट..
काळाने असा घातला घाव
वेगळी झाली आपली वाट..

मधुकर काकांच्या आयुष्यात यापुढे काय घडेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all