आस 4

एका पुरुषाची व्यथा


मुलाचे लग्न व्हावे अशी सुमतीची इच्छा होती. मला मात्र इतक्या लवकर मुलाचे लग्न करावे असे वाटत नव्हते पण एक मन म्हणत होते की, याचा हात धरून पुन्हा दुसऱ्याची मुलगी आमच्या घरात येऊ नये. जे माझ्या मुलीने केले होते ते इतरांच्या मुलीने करू नये. कारण एका बापाला होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या मी सहन केल्या आहेत त्यामुळे त्या बापाचे काळीज तुटण्यापासून मला वाचवायला हवे. असा विचार करून मी मुलाचे लग्न करण्यास तयार झालो.

मुलासाठी मुली बघण्याचा कार्यक्रम ठरवत होतो. एक चांगला दिवस पाहून मुलाला मुलगी पाहून आलो. एक दोन करत करत पाच मुली पाहून झाल्या. पाचवी मुलगी पसंत पडली. सगळे पाहणे झाल्यानंतर लग्न करण्याचे ठरले. एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांचे लग्न लावून देण्याचे ठरवले. मुलीसाठी काही खर्च केले नाही तर सुनेसाठी तरी खर्च करूया अशा विचाराने मी जो काही पैसा साठवला होता तो मुलाच्या लग्नात खर्च करून टाकला. अगदी मोठ्याने मुलाचे लग्न केले. त्याच्या लग्नामध्ये कोणत्याही गोष्टीची कसूर सोडली नव्हती. सून म्हणजे आपली मुलगी अशा म्हणण्याने तिला आपुलकीचा हात दिला होता. तिच्यासाठी जास्त किमतीच्या साड्या आणि दागिने घेतले होते. आम्ही मुलीसाठी जे काही करणार होतो ते सारे काही सुनेसाठी केले. दुसऱ्याची मुलगी ही आपल्या घरात नांदायला येणार म्हणून आम्ही तिला खूप जपत होतो. आमची मुलगी समजूनच आम्ही तिच्याशी वागत होतो. तिला परकेपणाची भावना कधीच दिली नाही.

मुलाचे लग्न अगदी व्यवस्थितरीत्या पार पडले. सगळ्या पाहुण्यांनी कौतुकांचा वर्षाव केला. तसेही आम्ही कोणतीच कसूर सोडली नव्हती. सारे काही अगदी पद्धतशीर केले होते त्यामुळे नावे ठेवण्यात कोणताही कसूर शिल्लक ठेवला नव्हता.

आमच्या सुनेने गृहप्रवेश केला आणि ती मुलीच्या रूपाने आमच्या घरात आली. सुरुवातीला तिला काहीच काम येत नव्हते. सुमतीने अगदी लेकीला शिकवावे तसे तिला सारे काही शिकवले. ती आता प्रत्येक कामामध्ये पारंगत झाली होती. आता ती घरामध्ये हळूहळू रुळत होती. काही दिवसांनी तिला दिवस गेले. आता आम्हाला नातवंडं येणार म्हणून आम्ही दोघे खूप आनंदात होतो. सूनेचे सगळे गोड कौतुक पुरवत होतो. नातवंड आणि आजी आजोबा यांचे नाते काही निराळेच असते. ते नाते आम्हाला मनापासून अनुभवायचे होते. मुलांचे बालपण मला काही अनुभवता आले नाही. कामाच्या ओघात मी स्वतःला वाहून घेतले होते पण आता नातवंडांचे बालपण हे मनापासून अनुभवायचे असे मी ठरवले होते. सुमतीने देखील माझ्याकडून तसे कबूल करून घेतले होते. आम्ही दोघांनी मिळून नातवंडांना खूप प्रेम द्यायचे असे ठरवले होते.

आजी आजोबा नात्याची
गंमतच असते न्यारी..
लहान होऊन जगताना
मजा येते भारी..

गोड कौतुक करताना
घाई होते सारी..
लहान होऊन जगताना
मजा येते भारी..

इथेच भरते यात्रा
अन् इथेच होते वारी..
लहान होऊन जगताना
मजा येते भारी..

काही महिन्यांनी आमच्या घरात एक गोड नातू जन्माला आला. त्याच्या पायगुणाने मुलाला प्रमोशन मिळाले आणि आम्ही ज्या घरात राहत होतो तिथून आम्हाला दुसरीकडे जावे लागले. हक्काचे घर सोडून दुसऱ्या घरात जाताना आमचा पाय निघत नव्हता पण नातवंडासाठी आम्ही तेही करायला तयार झालो. मुलगा ज्या गावी नोकरीला होता तिकडे आम्ही गेलो. आमचे राहते घर भाड्याने दिले होते. खरंतर हे घर सोडून दुसऱ्या भाड्याच्या ठिकाणी जाणे मला पसंत नव्हते, पण सुमतीसाठी आणि नातवंडासाठी मला हे करणे भागच पडले.

नवीन घरात गेल्यावर पुन्हा काही घडेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all