Feb 25, 2024
पुरुषवादी

आस 3

Read Later
आस 3


आज माझ्याकडे सगळ्या सुखयुक्त वस्तू आहेत. मी त्याच्यामध्ये निवांत आहे. आता माझे नेहमीचे रुटीन सुरू आहे. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला जातो आणि रात्री येतो. घरच्यांची सगळी सोय करण्यासाठी माझी पत्नी करत होती. सुमती सर्वांना काही हवे नको ते सारं काही पाहत होती. या सगळ्या गोष्टी पाहून मला जणू स्वर्ग ठेंगणे झाले होते. माझ्यासारखा सुखी मीच असे मला वाटत होते. पण म्हणतात ना नियतीचा खेळ काही वेगळाच असतो त्याप्रमाणे काहीसं..

आज मी ऑफिसमधून घरी आलो. सगळे व्यवस्थित नेहमीप्रमाणे सुरू होते. पण मी घरी आल्यानंतर माझी मुलगी अजूनही आली नाही म्हणून सुमती कांगावा करत होती. मी तिच्याकडे दुर्लक्ष केले कारण माझा माझ्या मुलीवर खूप विश्वास होता. तिचे काहीतरी काम असेल असे म्हणून मी दुर्लक्ष केले पण माझ्या पत्नीचा सारखा मला तगादा सुरू होता म्हणून मी माझ्या मुलाला विचारले. तेव्हा तो देखील मला काही माहित नाही असे म्हटला.

आम्ही तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली पण कोणालाच त्यातील काहीच माहित नव्हते. शेवटी मी हताश होऊन तिच्या खोलीत जाऊन बसलो तेव्हा मला तिथे एक चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी वाचून पाहिले तेव्हा मला समजले की माझी मुलगी कुणा मुलासोबत पळून जाऊन लग्न केले आहे तेव्हा माझे हात पाय गळूनच पडले. माझी मुलगी तिचा मला गर्व होता, माझा विश्वास होता अशी मुलगी इतकी वर्षे बापासोबत राहून देखील बापाची माया, बाबाचे प्रेम न समजता एका नवीन काल-परवा आलेल्या मुलासोबत जेव्हा पळून जाते तेव्हा या बापाचे काळीज तुकडे तुकडे होऊन जाते हे तिला कसे समजणार?

पुढील आयुष्य तिला त्याच्यासोबत काढायचे होते तर एकदा आपल्या बापाला त्याबद्दल विचारावे असे तिला एकदाही वाटले नसेल? घरातून निघून जाताना या बापाला काय वाटेल असे तिला वाटले नसेल? अरे, या बापाचे मन म्हणजे तिला काय वाटले? वरून जरी हा फणसासारखा दिसत असला तरी आतून मऊच असतो पण तिला इतक्या वर्षात बाबासोबत राहून तिचा बाबा कसा आहे हे समजलेच नाही. खरंतर इथूनच माझी हार होण्याला सुरुवात झाली.

जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा मला वाटले माझ्या घरात जणू लक्ष्मी आली. तिच्या पावलांनी मला हे सारे ऐश्वर्य मिळाले, मला प्रमोशन मिळाले. मी मेहनत केली पण त्याकडे मी लक्ष दिले नाही तर माझ्या घरात लक्ष्मी आली म्हणून मुलीला कवटाळून घेतले. तिला कोणी काही बोलले तर त्या व्यक्तीवरच मी ओरडत होतो आणि तिचे लाड वेळोवेळी पुरवत गेलो. तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत गेलो पण तिला या बापाचे मन कधीच समजले नाही हे माझे केवढे मोठे दुर्दैव?

सुमती डोळ्यातून पाणी काढून ती रडू लागली. आता आपली अब्रू गेली म्हणून एका कोपऱ्यात जाऊन बसली पण मी काय करणार होतो? आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्या मुलाचा हात धरून जेव्हा घरातून निघून जाते तेव्हा या बापाचे काळीज कसे झाले असेल हे शब्दाने व्यक्त होत नाही त्यासाठी बापच व्हावे लागते..

ती नेमक्या कोणत्या मुलाबरोबर पळून गेली आहे? तो मुलगा कसा आहे तिच्यासाठी योग्य आहे का? हे पाहण्यासाठी माझा जीव तडफडत होता आणि मी शेवटी शोधूनही काढले. तो चांगला मुलगा होता शिवाय नोकरी करत होता म्हणजे हिला दोन वेळचे पोटभर जेवू घालणार होता याचे समाधान करून मी माझ्या घरी परतलो. हे सारे काही होते पण माझी मुलगी मला ओळखू शकली नाही याचे मला वाईट वाटले. एका गोष्टीने ती म्हणाली असती की बाबा मला याच मुलाशी लग्न करायचे आहे तर मी नकार दिला असतो का? त्यातून काहीतरी तोडगा काढलाच असतो ना? शेवटी माझ्या मुलीचे सुख तेच माझे सुख पण शेवटी या बापाला न सांगता चिमणी उडूनच गेली..

मुलगी दुसऱ्या मुलाच्या हात पकडून पळून जाऊन लग्न करते ते दुःख मी पचवतो न पचवतो तोच त्या हबक्याने माझे आई-वडीलही निवर्तले आणि मी पोरका झालो.. एकाच वेळी सगळी संकटे माझ्या अंगावर कोसळली आणि त्याच क्षणी सारे काही होत्याचे नव्हते झाले. मी रडून दुःखही मोकळे करू शकत नव्हतो आणि मनातले कुणाला सांगूही शकत नव्हतो. मी ऑफिसमधून घरी आलो की सुमती कुरकुर करायची. आईबाबा खूप त्रास देतात म्हणायची, पण मला कधी ते जाणवलेच नव्हते. माझे दुःख माझ्या मनात साठवून मी शून्य होऊन बसलो होतो. याक्षणी माझ्यासाठी ही माझी डायरी म्हणजे एक मन मोकळे करण्याचे साधन होते आणि मी डायरी लिहिण्याचा निर्णय घेतला हा खरंच योग्य होता असे वाटले.

या जन्मात अजूनही आई-वडिलांनी केलेल्या उपकाराची परतफेड करायचे बाकी होते पण त्या आधीच ते दोघेही एकापाठोपाठ एक निघून गेले. त्यांनी थोडासुद्धा माझा विचार केला नाही. आपल्या मुलाला आपलाच आधार आहे असे त्यांना का वाटले नसेल? हा प्रश्न मला सतत सतावत होता. आधी मी स्वतःला कामात झुकून घेतले होते. कुटुंबाकडे लक्ष द्यायलाही मला वेळ नव्हता त्यामुळे आता कामातून थोडे लक्ष काढून घेऊन कुटुंबाकडे लक्ष द्यायला हवे असे मला मनापासून वाटले तरीही पाच-सहा वर्षांनी रिटायर होणारच आहोत तेव्हा आपले कुटुंब आपल्या सोबतच असेल असे वाटून मी कामाला लागलो.

आता सुमती मुलाचे लग्न करूया म्हणून मागे लागली होती. ते झाल्यावर काय होईल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//