आस 2

एका पुरूषाची व्यथा


आजोबांच्या खिशातील चिठ्ठी पाहून पोलिस संभ्रमात पडले कारण ती चिठ्ठी होती एका वृद्धाश्रमाची. विसावा असे त्या वृद्धाश्रमाचे नाव आणि त्याच्या खाली पत्ता लिहिलेला होता. त्या वृद्धाश्रमाशी या आजोबांचे काय नाते असेल? की त्या वृद्धाश्रमातून पळून येऊन त्यांनी हे सुरू केले आहे असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले म्हणून ते आजोबांना घेऊन विसावा वृद्धाश्रमात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी सगळीकडे चौकशी केली. त्या वृद्धाश्रमाच्या संचालकांकडे गेले आणि तिथे त्यांनी त्या आजोबांचे नाव, गाव, पत्ता सारं काही विचारून घेतले. तेव्हा त्या संचालकांनी सांगितले,

"या आजोबांविषयी आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही त्यांना विचारण्याचा खूप प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला काही सांगितले नाही म्हणून शेवटी आम्ही येथे आश्रमात त्यांना आसरा दिला." संचालक म्हणाले.

"तुम्हाला हे कुठे भेटले?" पोलिस म्हणाले.

"एके दिवशी ते इथे गेटपाशी असलेल्या कट्ट्यावर बसलेले दिसले. आम्ही त्यांना पत्ता विचारून घरी सोडण्यासाठी म्हणून सारं काही विचारले पण ते काहीच बोलले नाहीत म्हणून नाईलाजाने त्यांना आमच्या आश्रमात ठेवण्यात आले." संचालक म्हणाले.

"पण आजोबांशी त्यानंतर काही बोलणे झाले का? यांनी काही सांगितले का? यांच्या घरचे कुणी विचारपूस करायला आले का? आमच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कोणती अशी मिसिंग केस आली नाही. मग कोण असतील हे आजोबा? मुलांना पकडणाऱ्या टोळी गँगचे साथीदार तर नसतील ना? इथे राहून मुलांबद्दल माहिती कळवायचे आणि त्यांना पळवून नेण्यास मदत करायचे. आम्ही यांचा चेहरा आणि वय पाहून यांना सोडून द्यायचे असे तर नसेल ना? असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी विचारले. पण त्यांना योग्य असे काहीच उत्तर मिळाले नाही.

"बरं ठीक आहे पण हे आजोबा इथे येताना त्यांनी काही सामान वगैरे आणले होते का? आम्हाला यांच्याविषयी काहीही माहिती असेल ती सांगा." पोलिस म्हणाले.

"हो. यांच्या हातामध्ये एक कापडी पिशवी होती त्यामध्ये यांचा एक ड्रेस आणि थोडे थोडे सामान होते त्यामध्ये एक डायरीसुद्धा होती. ती वाचून आम्हाला त्यांचे नाव मधुकर असे आहे हे समजले. पण ती डायरी त्यांनी पुढे वाचू दिली नाही. डायरी लगेच घेऊन पिशवीत घातले आणि ती पिशवी नेहमी त्यांच्यासोबत असायची त्यामुळे आम्हाला ती डायरी पुढे वाचता आली नाही पण आता तुम्ही आला आहात तर तुम्ही ती डायरी वाचू शकता." असे म्हणून त्यांनी आजोबांविषयी जी काही माहिती होती ती सांगितली.

"अच्छा, कुठे आहे ती डायरी? आजोबा, ती डायरी द्या इकडे." असे पोलिसांनी म्हणताच आजोबांनी पोलिसांना घाबरतच ती डायरी दिली. डायरी उघडून पाहताच त्यातील सुवाच्च अक्षराने पोलिसांचे मन मोहीत झाले.

"इतके सुंदर आणि वळणदार अक्षर मी पहिल्यांदाच पाहत आहे!" असे उद्गार पोलिसांच्या तोंडून पडले. ते मनमोहून टाकणारे शब्द एक एक वाचत असताना त्यांना आपण कुठे आहोत याचे भान राहिले नाही. एकटाक ती डायरी वाचून काढावी असे पोलिसांना वाटले की काय कोण जाणे म्हणून ते तिथेच बैठक मारून ती डायरी वाचू लागले.

\"मी मधुकर. आज मी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर या पोस्टवर आहे. आज माझ्याकडे सर्व काही वस्तू आहेत. गाडी बंगला सारं काही माझ्याकडे आहे. सर्व सुख वस्तूंनी युक्त असा मी आहे. मला कशाचीही कमी नाही. आज ऑफिसमध्ये खूप मोठे सेशन झाले. त्यामध्ये डायरी लिहिण्याविषयी मान्यवरांनी खूप सुंदर गोष्टी सांगितल्या आणि त्यातूनच प्रेरणा मिळून मी आजपासून डायरी लिहीत आहे. माझ्या आयुष्यातील घडणाऱ्या घटना एकाच डायरीत कैदबद्ध असाव्यात म्हणून मी एक मोठी डायरी घेतली आहे. जेणेकरून त्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र नमूद केलेल्या असाव्यात म्हणूनच सर्वात मोठी डायरी मी घेतली आहे.

माझ्या परिवारात माझे आई-वडील, बायको, मुलगा, मुलगी आणि मी असे एकूण सहा जण राहतो. सर्व काही सुखवस्तू असल्यामुळे सगळेजण गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मी सकाळी लवकर ऑफिसला जातो आणि रात्री येण्यास थोडासा उशीर होतो. माझ्या घरच्यांना मी वेळ देत नाही याची सल माझ्या मनात नेहमीच आहे. पण रविवारचा दिवस मी माझ्या कुटुंबासाठी देतो. त्या दिवशी कोणतेही काम करत नाही त्यामुळे त्या एका दिवसाचा पुरेपूर वापर मी कुटुंबाला वेळ देण्यासाठी करतो. सगळं काही व्यवस्थित आहे पण एक सल मनात नेहमी राहतेच. ती म्हणजे मला बायकोचा मिळणारा अपुरा वेळ. आम्हा दोघांना कधी निवांतपणा मिळालाच नाही. ती नेहमी आई-वडिलांची सेवा तर करत असे, नाहीतर मुलांच्यात गुंतलेली तर असे किंवा मग माझी कामे करताना दिसे. निवांत असे दोन क्षण आम्ही एकांतात कधी बसलोच नाही. मला नेहमी वाटायचे कुठेतरी बाहेर जावे, दोघे एकांतात नदीकिनारी बसून खूप गप्पा माराव्या पण मुलांना आणि माझ्या आई-वडिलांना सोडून ती कधी आलीच नाही. तिला तिचा संसार महत्त्वाचा होता पण त्या संसारात मी कुठेतरी मागे पडत होतो हे मला प्रकर्षाने जाणवत होते. तरीही रिटायर झाल्यानंतर मुले मोठी होतील तेव्हा आयुष्य सगळे एकांतात घालवायचेच आहे असा विचार करून मी शांत राहत होतो.

लग्न झाले तेव्हा आमची परिस्थिती थोडी बेताचीच होती. मलाही फारसा पगार नव्हता पण तरीही मी रात्रंदिवस काम करून माझ्या बायकोला म्हणजेच सुमतीला घर खर्चाला पैशाची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करत होतो. घर खर्च होऊन काही पैसे शिल्लक राहत होते हे मला समजत होते आणि मग मी समाधान मानत होतो. मुले हळूहळू मोठी झाली होती. त्यांना पंख आले होते पण त्या पंखात बळ देण्याचे काम करत होतो. एकदा का त्यांच्या पंखात बळ आले की ते उंच भरारी घ्यायला मोकळे असा विचार मी करत होतो.

पण आज काही वेगळेच घडले, जे घडायला नको वाटत होते, ज्याची कधी जाणीवच नव्हती ते घडले होते. एकेक शब्द वाचत असताना पुढे नक्की काय घडले असेल? अशा कुतूहलाने पोलीस एक एक पान वाचत होते.

यापुढे काय असेल? ते वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all