Jun 14, 2021
ललित

आरती

Read Later
आरती

आरती ......( मानाची )

             घालीन लोटांगण वंदीन चरण
             डोळ्यांनी पाहीन रूप तुझे...|
             प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन
             भावे ओवाळींन म्हणे नामा... ||
         
          आरती नंतरची ही शेवटची प्रार्थना निल्याच्या घरातल्या गणपतीला घातली आणि आमचं टोळकं पुढं गण्याच्या घरी आरती करण्यासाठी आलं. आमच्या या ग्रुपमध्ये आम्ही खालच्या आळीची बारा जण फिक्स असायचो. मी स्वतः म्हणजे सोन्या ,दिग्या, टिल्या, निल्या, गण्या, पप्या, अन्वर, सुलेमान, रहीम, सुऱ्या, हिऱ्या अन शिऱ्या. अं...काय झालं... नावं वाचून चकित झालातं. अहो ही अन्वर आणि रहीम आमच्या करीम चाचाची मुलं अन हा सुलेमान सलीम चाचांचा. करीमचाचा अन सलीमचाचा दोघे सख्खे भाऊ आणि समद्या गावकऱ्यांचे भाईजान. करीमचाचा आमच्या गावच्या ग्रामपंचायतीचे शिपाई तर सलीमचाचा भारतीय सैन्यदलातून रिटायर झालेले फौजी आणि आमच्या गावचे उपसरपंच सुद्धा. पार त्यांच्या खापर पणजोबापासून त्यांचं कुटुंब हैदराबादहून आमच्या इकडे आलेलं होतं. एका मोठ्या हिंदू मुस्लिम दंगलीत आपल्या कुटुंबाचा जीव वाचावा म्हणून ते इकडे महाराष्ट्रात आले होते. असो !
          दरवर्षी हे आरतीचं काम आमच्याकडं ठरलेलं असायचं. खालच्या आळीच्या तब्बल एकवीस घरातल्या आरतीची जबाबदारी आमच्या खांद्यावर होती आणि हे विधिलिखित असल्यागत आम्हीही ती पार पाडायचो. अन्वर आमचा लीडचा आरतीकार होता. गड्याचा आवाज लय गोड होता. तो आरती म्हणायला लागला की समदी माणसं डोळं झाकून अन कान देऊन नुसतं ऐकत बसायची. कान तृप्त होऊन जायचे. म्हणून तर गावच्या एकुलत्या एक गणपती मंडळाच्या आरतीचा माईक कायम अन्वरच्या हातात असायचा. तसा सुलेमान याच्याउलट होता. ह्या गड्याचा आवाज एकदम खडा होता. म्हणून दर शिवजयंतीला महाराजांच्या नावाची घोषणा द्यायचा मान मंडळाच्या पोरांनी त्याला दिला होता. त्याने घोषणा दिली की सरसरून अंगावर काटा यायचा. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जेव्हा सलीमचाचा शाळेतला तिरंगा फडकावायचे तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू असायचे अन छाती अभिमानानं भरून यायची.
           बरं फक्त तेचं आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असं नाही. त्यांच्या ईदला ते दोघे भाऊ स्वखर्चातुन समद्या गावासाठी शिरकुरमा करायचे. गळाभेट घेऊन सर्वांना ईद मुबारक द्यायचे. त्यांनी कधी आम्हांला त्यांच्यापेक्षा वेगळं मानलं नाही नि आम्ही गावकरी म्हणून त्यांना. त्यांचं कुटुंब आमच्या गावाचा एक अविभाज्य भाग बनलं होतं. आमच्या गावाचा मला खूप अभिमान वाटायचा. हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे ज्वलंत उदाहरण आम्हां सर्व पोरांमध्ये एक नवी ऊर्जा भरायचं. असो.. तर आम्ही गण्याच्या घरची आरती उरकली अन आम्ही आमच्या घरांकडे वळलो. आमच्या घरातल्या गणपतीची ही आम्ही लगोलग आरती उरकली. प्रसाद खाल्ला अन आमची गँग मंडळाच्या आरतीला जायचं म्हणून गडबड करू लागली.   
            तेवढ्यात एका म्हातारीनं आम्हांला हाक मारली. अन म्हणाली, “ अय पोरांनु... या की रं इकडं...तेवढी आमची बी आरती करा की ...समदी तयारी केलिया...आरतीचं ताट काढलंय... परसाद काढलाय...या ”
           अन्वर हात वर करून आलो आलो म्हणणार तेवढ्यात निल्यानं त्याचा हात खाली दाबून धरला आन म्हणला, “ अय अनव्या, काय यडा बिडा झाला का काय ? ” 
           यावर अन्वर म्हणाला, “ का काय झालं ? ” मग निल्या त्याला हातातलं घड्याळ दाखवत म्हणाला,“ हे बघ किती वाजल्यात ? आठ...किती ?...आ..ss..ठ. दोन मिनिटांत लगा मंडळाची आरती सुरू व्हईल. तिथं नाय पोचलो तर महेशदादा आपल्या नावानं बोंबलंल अन आरती म्हणायचा मान त्या वरच्या आळीच्या किश्याला दिलं. आपल्या ग्रुपची काय इज्जत राहिलं का ? ” 
          असं म्हणल्या बरोबर सगळ्या पोरांनी एकसाथ मुंडक हलवलं अन एकसुरात म्हणाले, “बरोबर हाय लगा निल्याचं. गप चला आपलं मंडळाच्या आरतीला. ” 
          अन्वरने म्हातारीकडं पाहिलं तर म्हातारी मोठ्या आशेनं पोरांच्याकडं बघत होती. तिला वाटलं आता समदे येतील आरतीला पण कशाचं काय ही चिल्लर गँग मंडळाकडे उधळली. म्हातारी घरात आली अन कशीबशी मोडक्या तोडक्या शब्दांत तिने आरती केली. आपल्या पलंगावर खिळलेल्या नवऱ्याच्या अंगावर आरतीचं ताट फिरवलं, धुपाचा धूर हाताने त्याच्या आजूबाजूला ढकलला अन त्याला प्रसाद दिला. 
          हे दोघे म्हातारा म्हातारी म्हणजे शिरपती आजोबा अन त्यांची बायको सुलभा आजी. त्यांचं घर आमच्या घराजवळ होतं. एवढ्या दिवस ते मुंबईत राहत होते आपल्या पोराबाळां सोबत. पण पुढे शिरपती आजोबांचं दुखणं वाढलं. त्यांची फुकटची सेवा करायला शिरपती आजोबांच्या सुनेला नको वाटू लागलं. मुलगा ही काही बोलायचा नाही. औषधपाण्याला खर्च झाला की घरात भांडण व्हायची. 
          शिरपती आजोबांनी आपलं भविष्य ओळखलं अन ते स्वतःचं सुदामला म्हणाले की,“ मला अन तुझ्या आईला आपल्या गावी सोडून ये. आता तसंही आमचे किती दिवस राहिलेत. ती आहे तोवर घेईल माझी काळजी. तुमच्या संसारात उगा आम्हां म्हाताऱ्याची अडचण नको.” 
         सुदामला ही गोष्ट अपेक्षित असल्यासारखं तो ही यासाठी एका पायावर तयार झाला अन त्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात त्या दोघांना आणून गावी सोडलं. महिन्याला घरातला बाजार येईल एवढे पैसे फक्त तो पाठवायचा मुंबईहून. सुलभा आजीही खूप स्वाभिमानी होती. कधीचं अडीनडीला कुणाला काही गावात मागायला जायची नाही. बहुतेक दोघांची ही जगण्याची इच्छा संपत आली होती. म्हणून यावर्षीचा गणपती उत्सव थाटामाटात साजरा करायचा असं त्यांचं ठरलेलं होतं.
        आम्ही दरवर्षी आमच्या खालच्या आळीतल्या लोकांच्या घरी जाऊन आरती म्हणायचो पण यावर्षी हे दोघे नव्याने आल्याने आम्ही त्यांना गिणतीत धरलं नव्हतं. अन्वरला कालचा झालेला हा प्रकार अजिबात आवडला नव्हता. त्याला राहून राहून आपण काहीतरी मोठी चूक केली असं वाटायचं. फक्त दहा मिनिटं लागली असती खरं तर आरतीला पण तेवढ्यासाठी मंडळाची आरती म्हणायचा मान गमवावा लागला असता. चार दिवस याचं विचारात गेले कारण रोज आमच्या घरातली आरती झाली की सुलभा आजी बाहेर दरवाजात येऊन आम्हांला हाक मारायची पण आम्ही न ऐकल्यासारखं करायचो अन मंडळाकडे निघून यायचो. अन्वर मात्र रोज वळून सुलभा आजीचा रडवेला झालेला चेहरा पाहायचा. त्याचं हृदय आजीचा चेहरा आठवला की पिळवटून निघायचं. 
          त्यानं करीम चाचाला एकदा ही गोष्ट सांगितली. तर करीमचाचा त्याला म्हणाले, “ देख मेरे बच्चे, ख़ुदा कभी इस बात का हिसाब नहीं रखता की तुमने कितनी बार कितने ज़ोरसे उसकी अजान पढी. वो तो इस बात का हिसाब रखता है की ज़िंदगी में तुमने कितनी इंसानों की कितनी बार मदद की. अब तुम सोचों तुम्हें क्या करना है.”
          त्यादिवशी पाचवा दिवस होता. सर्वांच्या घरातल्या आरत्या झाल्या. आता आम्ही सगळे मंडळाकडे जायला निघणार तेवढ्यात अन्वरने आम्हांला त्या आजीच्या घरी जाऊया असं सांगितलं. आम्ही त्याला म्हणालो,“ कशाला अनव्या लगा...तुला माहितेय ना आपल्याला मंडळात जायला उशीर होतो. मग ? ” 
         पण अन्वर त्याच्या निर्णयावर ठाम होता. तो एकटाचं पुढे निघाला आजीच्या घराकडे. आता म्होरक्याचं न्हाई म्हणल्यावर आम्ही तर तोंड वर करून कुठे जाणार होतो. गपचूप सगळे त्याच्या मागे सुलभा आजीच्या घरात शिरलो. आम्हांला पाहून आजीला खूप आनंद झाला. आजीच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याचं पाणावलेल्या डोळ्याने अन थरथरत्या हाताने आजीने मग आरतीची तयारी केली. आजीची ती लगबग बघून आमच्या ही डोळ्यांत नकळत पाणी तरळलं. फक्त अन्वर हसत होता. आरती झाली. आजीने ओंजळीत मावणार नाही एवढं फरसाण आमच्या हातात ठेवलं. अन्वरच्या गोबऱ्या गालांवरून मायेनं हात फिरवला अन म्हणाली, “ आज माझ्या गणपतीची खरी आरती झाली रं बाबांनो. धन्य झाले.” अन रडत रडत तिनं अन्वरचा मुका घेतला. मग आम्ही पुन्हा मंडळाकडे उधळलो. 
          मंडळाची आरती चालू होऊन दहा मिनिटं झाली होती. किश्या मोठ्यानं आरडत व्हता,“जय देव जय देव जय मंगलमूर्ती....!” सातवीला घरातले गणपती उठले. अन्वरने स्वतः सुलभा आजीच्या गणपतीचं विसर्जन केलं. पुढचे पाच दिवस किश्यानं आरडून वरडून लोकांना लय त्रास दिला. अन्वर मात्र मागे उभा राहून मनातल्या मनात गणपतीची आरती म्हणायचा. मंडळाच्या आरतीचा मान आता गेला होता पण आजीच्या घरची आरती म्हणून अन्वरच्या मनाला जो आनंद झाला होता त्याची सय आता जगात कशालाचं नव्हती.

विशाल घाडगे ©™✍️

Circle Image

विशाल घाडगे

Student

Writer, Poet, Storyteller, Lyricist, Author, Rapper. I write the stories about village and its rural culture.