Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा कथा -आरसा

Read Later
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा कथा -आरसा


आणि ती हसली.
कथा- आरसा
मुक्ता कुलकर्णी, जयसिंगपूर. 

ही गोष्ट बरीच जुनी आहे. म्हणजे १५-२० वर्षं लोटली त्याला. दरवर्षी श्रावण येतो.. गौरी गणपती येतात. देव पापक्षालन करतो का? मला नाही वाटत तसं! गौरी मला सोडून गेली… आयुष्यात एक कधीही न संपणारं रिकामेपण देऊन!
आज मागं वळून बघताना माझ्यात असलेल्या त्रुटी, उणीवा जाणवतात. आपण स्वतःला कायच्या काय भारी समजत होतो.. किती मुर्खपणा केला त्या भरात असं वाटतं! आता वेळ निघून गेली आहे..
     शरदच्या समोर अख्खा जीवनपट उभा राहून त्याला रोज वाकुल्या दाखवतो.. आणि विचारतो काय केलंस तू? शरदने कूस बदलली. आजही त्याला तो दिवस लख्ख आठवतो. गौरीला बघायला जातानाच मध्यस्थ म्हणाले होते, मुलगी दिसायला काही खास नाही पण स्वभावाने लाखात एक आहे. आणि रुप किती दिवस? संसाराला सद्गुणांचा उपयोग होतो.
      वास्तविक शरदचं अनुजावर फार प्रेम होतं. त्यानं तिला सांगताच तिनं त्याचा तोंडावर अपमान केला आणि परत माझ्याशी बोलायला जरी आलास तरी जीभ हासडून हातात देईन अशी थेट धमकी दिली होती. त्यामुळे त्याचं लग्नावरुन मनच उडालं होतं. कुणाशीही लग्न करायची इच्छा राहिली नव्हती. अनुजा नाही तर कुणीच नाही! पण अनुजा रसरशीत होती. शरद सारख्या सुमार मुलाला ती होकार देणं अशक्य आहे हे त्याच्या मित्रांनाही माहिती होतं. पण त्यांनीच त्याला ती तुझ्याकडंच बघते बघ.. प्रेमात असं काही नसतं एकदा विचार तिला असं म्हणून भरीला घातलं आणि मजा बघत राहिले. शरद मात्र मनानं तुटून गेला. नंतर तो कधीच कुठल्याही मुलीशी बोलला नाही. ती जागा कायम अनुजाचीच राहिली. तिनं नकार दिला तरीही!
     खाजगी कंपनीतील साधारण पगाराची नोकरी, सुमार व्यक्तिमत्त्व एकत्र कुटुंब या गोष्टी पाहता शरदला स्थळं पण तशीच यायची. तो प्रत्येक मुलीत अनुजाला शोधायचा. आणि अर्थातच ती दिसायची नाही. आईच्या हट्टासाठी कुणाशी तरी लग्न करायचं म्हणून तो हो म्हणायचा. पण… . पण मुलीकडून नापसंती यायची. त्याचं साधारण दिसणं, सुमार पगार. हळूहळू शरदला स्थळं येईनाशी झाली होती.

घरी आई, बाबा, दादा वहिनी सगळे प्रयत्न करत होते पण… शरदचं लग्न हा घोरच होऊन बसला होता. शेवटी एकदाचं गौरीचं स्थळ कुणीतरी सुचवलं. अनिच्छेने शरद तयार झाला. मुलगी बघितली आणि त्याचं मनच उडालं. अगदी साधारणातली साधारण होती ती. सावळा रंग, ठेंगणा बांधा, नकटं नाक. एका क्षणी त्याला अनुजा आठवली. गोरी पान, उंचीपुरी, तलवारी सारखं नाक. चेहऱ्यावर भरपूर आत्मविश्वास आणि गौरीच्या चेहऱ्यावर टेन्शन, भीती काळजी अशी संमिश्र छाया. त्यानं पुन्हा तिच्याकडे बघितलंही नाही.
मुलगी बघून येताच आईची कटकट सुरू झाली. आता फार बघत बसायला नको. त्यांनी होकार दिला तर करुन टाकूया लग्न. आधीच तुझं वय उलटत चाललंय, मुलीपण फारशा येत नाहीत. तू फार चिकित्सा करु नयेस. मग शरदनं होकार दिला. गौरीकडून होकार येताच जीव भांड्यात पडला सगळ्यांचा!
लग्नाचा मुहूर्त आणि साखरपुडा यात सहा महिने अंतर होतं. पण शरद कधी कधी गौरीला भेटायला गेला नाही. साखरपुड्यात सगळ्यांच्या नजरेतून दिसणारी कुचेष्टा शरदला सलत होती. त्यातच भांडीवाली म्हातारी म्हणताना त्यानं ऐकलं, " सटवाईला नवरा नाही, म्हसोबाला बायको नाही.. तशी गत. जाऊ दे , बाई आहे मग झालं तर! " आपण का हो म्हटलं? का आईचं ऐकलं? अशी सणक आली त्याला. पण लग्न मोडायचं धाडस नव्हतं. यथावकाश लग्न झालं. माप ओलांडून गौरी घरात आली. पण ती कुणालाही फारशी पसंत नव्हती. तिला रुळायला अवधीही न देता सगळे तिच्याकडून एक्सपर्ट अपेक्षा करत होते. शरद पण तिला टाळायचा. काही कारणाने ती त्याच्या आसपास आली की आई एकटीच काम करतेय जा मदत कर तिला म्हणून हुसकून लावायचा.
हौसेने माप ओलांडून आलेली गौरी कोमेजत चालली. आपण कुणालाही आवडत नाही हे लक्षात आलं तिच्या! घरच्यांना पण जाणवलं शरद तिला टाळतो. त्यादिवशी दादा वहिनी, आई बाबा सगळे मिळून वहिनीच्या माहेरी गेले. तिथं अनंताच्या पूजेचं प्रस्थ होतं. पूजा झाल्यावर पण दोन दिवस ते तिकडंच राहिले. शरद आणि गौरीला एकांत मिळून त्यांचे मनाचे धागे जुळावेत हा हेतू.
त्यादिवशी शरदचा शाळेतला मित्र. डॉ.अभिमन्यू नामवंत प्लास्टिक सर्जन झाला होता. काॅस्मेटीक सर्जरी शिकायला तो चेन्नई येथे गेला होता. त्यामुळे शरदच्या लग्नाला तो आला नव्हता. आतासारखे मोबाईल पण नव्हते तेव्हा. त्यामुळे त्याला फार काही माहिती पण नव्हतं. आता तो परत आला होता आणि त्याने आपल्या वर्गमित्रांसाठी पार्टी ठेवली होती. शरदला फार आनंद झाला. दुहेरी आनंद होता तो म्हणजे गौरी पासून लांब रहायचं कारण मिळालं आणि अभिमन्यू बरोबर निवांतपणे गप्पा मारता येतील..
पार्टी झाल्यावर सगळे गेले. अभिमन्यूने शरदला लग्नाला येऊ न शकल्याबद्दल साॅरी म्हटलं. अभिमन्यूला एक गोष्ट जाणवली, शरद लग्न, बायको यांवर फारसा बोलत नाही. लग्न होऊन सहाच महिने झाले आहेत पण हा घरी जायला उत्सुक नाही. अभिमन्यूने पण फार काही चौकशी केली नाही. त्याला विचारलं, "शऱ्या, चल सोडतो तुला घरी. सोडू? "
" थांब.. जरा गप्पा मारु. मग जाऊया "
"शऱ्या, हरामखोरा.. लग्न होऊन सहाच महिने झालेले आहेत. इथं काय वेळ घालवतो. जा घरी. बायकोसोबत हनिमून कर जा" अभिमन्यू म्हणाला.
"मला नाही जायचं घरी.. " शरदला किंचित नशा चढली होती. " मला नाही आवडत ती "
अभिमन्यू चमकलाच.. "काय म्हणालास? आवडत नाही.. भाड्या लग्न का केलंस मग? एका पोरीच्या आयुष्याशी खेळायचा हक्क कुणी दिला तुला?" अभिमन्यू अधूनमधून शिव्या द्यायचाच. पण आज शरदचं बोलणं ऐकून संताप अनावर होऊन त्यानं खरोखर चवताळून शिव्या दिल्या.
शरद तसाही नेभळट होता. चल निघतो म्हणून घराकडे निघाला. रात्रीचे बारा वाजत आले होते. शरद घरी गेला. घरी कुणीही नव्हते. गौरी त्याची वाट बघत होती. दार वाजताच तिनं दार उघडलं.
शरद आत आला.. "अहो, किती उशीर केलात. घरी मी एकटीच होते. मला भीती वाटत होती. सगळे नाहीत… " गौरीचं वाक्य मध्येच तोडत शरद म्हणाला, "म्हणून तर उशिरा आलो."
"म्हणजे? " गौरीनं विचारलं.
"म्हणजे मला नाही आवडत तुझ्यासोबत.. तू झोपली असशील म्हणून वेळ काढत होतो बाहेर. "
ते ऐकून गौरीचे डोळे पाणावले. "आवडत नाही म्हणजे? "
"तू… . .. तू मला आवडत नाहीस. " दारुने शरदमधला कुत्रा आता वाघ झाला होता. "कधी बघितलं आहेस का स्वतःला आरशात? कसली दिसतेस? तुझं रंगरुप.. कुठूनही मला शोभत नाहीस तू. "
" मग का लग्न केलंत माझ्याशी?" रडत गौरीनं विचारलं.
"आई म्हणाली म्हणून! नाही तर तुझ्यासारख्या पोरीकडे मी ढुंकूनही बघितलं नसतं.लग्न तर फार लांबची गोष्ट."
हे ऐकताच गौरीचा राग दुःख एकवटलं. ती एकही अक्षर न बोलता उठली. चप्पल पायात अडकवले आणि बाहेर पडली. "मर जा" असं म्हणत शरद कोचवर पडला ती त्याला झोपच लागली.
इकडं रागाने रडत बाहेर पडलेली गौरी. वाट फुटेल तिकडं चालत चालली होती. तिला हुंदके फुटत होते. पण ते दाबून ती निघाली होती. शरदचे शब्द उकळत्या शिशाच्या रसासारखे कानात आदळत होते. तू मला आवडत नाहीस. लग्नानंतर महिनाभरात तिनं ते ओळखलं होतंच. बायकांना वाईट नजर जशी समजते तशी प्रेमाची पण समजतेच. ते प्रेम कधीही त्याच्या डोळ्यात दिसलं नव्हतं तिला. सतत मित्रांसोबत बाहेर जायचं. सारखं हिडीसफिडीस करायचं यावरून तिला समजलं होतं. ते आज त्यानं दारुच्या नशेत कबूल केलं होतं इतकंच. विचारांच्या तंद्रीत चालता चालता अचानक एक फोर व्हीलर समोरुन आली आणि… कितीही ब्रेक दाबला तरी गौरीला गाडीचा धक्का लागलाच.
अभिमन्यू गाडीतून उतरला. तरुण मुलगी पाहून दचकला. तिला रस्त्यावर टाकून जायचं मन होईना. ती बेशुद्ध होती. चेहरा रक्ताने भरला होता. त्यानं तिला हाॅस्पिटलध्ये आणलं. तिचा चेहरा वगळता कुठंही कसलीही दुखापत झाली नव्हती हे विशेष. नर्सला सांगून तिचा चेहरा स्वच्छ करुन घेतला आणि ती शुद्धीवर येण्याची वाट बघत बसला.
बऱ्याच वेळाने ती शुद्धीवर आली. त्यानं नांव विचारलं. " ताई, तुमचं नांव सांगा. घरी कळवावं लागेल तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून."
ती म्हणाली, " नांव सांगते पण नका कळवू. त्यांनीच मला मर जा म्हणून सांगितले आहे. गौरी.. गौरी शरद कापूसखेडकर "
तो उडालाच, "बरं, तुमच्या माहेरी.. "
"नको, आईचं आईला बास झालंय. माझा आणि त्रास नको."
"बरं.. नाही कळवत. पण त्यांचं तरी नांव सांगा.. " समजुतीने अभिमन्यू म्हणाला.
"राधा.. राधा विष्णुपंत काळे"
" गौरी… तू राधा मावशींची मुलगी? अगं मी अभिमन्यू. आमच्या घरी राधा मावशी कामाला यायच्या. खूप प्रामाणिक होत्या त्या. तूही येत होतीस लहानपणी त्यांच्यासोबत.. आठवतं? " गौरीला ग्लानी आली होती.
नंतर काही वेळाने गौरी पूर्ण शुध्दीवर आली. तिनं सगळं काही अभिमन्यूला सांगितलं.
अभिमन्यूनं डोक्यात पुढचा सगळा प्लॅन बनवला. गौरीचा अपघातात बिघडलेला चेहरा सगळं कसब पणाला लावून त्यानं प्लॅस्टिक सर्जरी करुन नीट केला. जवळपास दीड वर्ष तिची ट्रीटमेंट सुरू होती. तोवर ती त्याच्या हाॅस्पिटलध्ये आहे हे कुणालाही कळू दिलं नाही.
इकडे शरदची नशा उतरली. तोवर गौरी निघून गेली होती. खूप शोधून पण ती सापडली नाही. गौरीच्या आई भावाने येऊन शिव्याशाप दिले. सगळ्या घरादाराने तिचा शोध घेतला. पण कुणालाही तिचं नखसुद्धा सापडलं नाही.
दोन वर्षे गेली. शरदच्या ऑफिसमध्ये गौरी छत्रे नांवाची मुलगी जाॅईन झाली.दीड वर्षात तिनं खूप प्रगती केली. तिची टापटीप, सर्वांशी मिळून मिसळून राहणारा स्वभाव, नवी कामं शिकायची उमेद तिच्याबद्दल सगळे चांगलं बोलत. शरदला तिचा आवाज ऐकून गौरीचा भास व्हायचा. आजकाल तो काहीही निमित्ताने सारखा तिच्याशी बोलायला बघायचा. ती मात्र त्याला टाळायची.
एक दिवस मनाचा हिय्या करुन त्यानं तिच्याशी बोलायचं ठरवलं. "मिस छत्रे," ऑफिसमधून बाहेर पडताना शरद म्हणाला, " मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. काॅफी घेऊया? "
"बरं. पण प्लीज, लवकर आवरा. घरी आई एकटीच आहे. आजारी असते ती"
काॅफीची ऑर्डर दिली. "मी थेट मुद्द्यावर येतो. गेलं दीड वर्ष मी तुम्हाला बघतोय. तुमचं काम करण्याचं कसब, सर्वांना मदत करायची वृत्ती. मला फार आवडतं. मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे. "
"काय???? " गौरीला हे ऐकून धक्का बसला. "पण तुमचं लग्न झालं आहे ना? "
"होय.पण बायको माझ्यासोबत नाही रहात. तीन वर्षांपूर्वी ती निघून गेली. कुठे गेली माहिती नाही. पण ती चांगल्या चालीची नव्हती. "
"ओह.. मी तर वेगळंच ऐकलंय. तुम्हाला ती पसंत नव्हती. दिसायला चांगली नव्हती. तुम्ही तुमच्या आईच्या इच्छेसाठी तिच्याशी लग्न केलं होतं. तुम्ही तिला तोंडावर स्पष्ट सांगितलं होतं की आईची इच्छा होती म्हणून तुझ्याशी मी लग्न केलं नाही तर तुझ्यासारख्या पोरीकडे मी ढुंकूनही बघितलं नसतं.लग्न तर फार लांबची गोष्ट."
शरद हादरलाच. कारण हे बोलणं फक्त आणि फक्त गौरीला माहिती होतं. आपल्या या बोलण्याला कुणीही साक्षीदार नव्हता. दुसऱ्या दिवशी आई बाबा आल्यावर गौरी कुणाबरोबर तरी पळून गेल्याचे बनाव रचून सांगितला होता.
"तुम्हाला कसं माहिती? "
"ते तितकंसं महत्त्वाचं नाही. पण तुम्ही स्वतः इतके नीच आहात, आईची इच्छा म्हणून एका अश्राप पोरीच्या आयुष्याशी खेळलात. वर लाजमोडेपणाने तीच कशी वाईट आहे हे जगाला सांगत होतात. मी तुम्हाला विचारते, तुम्ही स्वतः काय आहात? काय आहे तुमच्याकडे? रुप? पैसा? उत्तम नोकरी?काहीही नाही. तरीही तुम्हाला अप्सरा बायको हवी. बरं, तुमच्या बायकोच्या माहेरच्या लोकांनी तुम्हाला एक सुंदर मुलगी दाखवून दुसरीच कुणी कुरुप मुलगी गळ्यात मारली नव्हती तुमच्या. बघून ठरवून लग्न केलं होतं ना तुम्ही?आणि आज मला लग्नासाठी विचारताना लाज नाही वाटली तुम्हाला? आरशात कधी बघितलं आहे का तुम्ही स्वतःकडे?"
शरद आ वासून पहातच राहिला. "तुम्ही विचार करत असाल हिला कुणी सांगितलं हे? त्या चरित्रहीन गौरीने?
नाही.. मला हे कुणीही सांगितलं नाही. हे मी स्वतः ऐकलं आहे. कारण हे जिला तुम्ही हे सारं बोलत होता ती मीच आहे. मी पण लग्न करून चांगला संसार करायची स्वप्नं घेऊन तुमच्या घरी आले होते. तिथं काय मिळालं मला? अपमान..आणि वर तोंड करून सांगता मी बदचलन होते?आता


प्लॅस्टिक सर्जरी करुन चेहरा नाक बदललं. म्हणून तुम्ही माझ्या मागे मागे करत होता. आता तुम्हाला माझे गुण दिसत होते. हेच गुण तेव्हाही होते. पण मी कुरुप होते ना. मग कसे दिसणार तुम्हाला?"
"आता तुमच्या घरी येऊन हे सगळं सांगणार आहे मी..आरसाच घेऊन येणार आहे तुम्हाला दाखवायला. मग मला बघायचं आहे तुम्ही कसे वागता.. काय सांगता"
आणि ती हसली..काय होतं त्या हसण्यात? कडवटपणा,कुत्सितपणा,नाराजी…
तिनं पर्स उचलली. ती निघून गेली. ती गेली त्या दिशेने शरद भक्क होऊन बघत राहिला.
©मुक्ता कुलकर्णी, जयसिंगपूर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//