आरसा भाग २

-----

आरसा  भाग २ 

( मागच्या भागात आपण पाहिलं की प्रतिभा आपल्या स्टाफवर  दबाव टाकून काम करून घेत असते तर आई हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे राघवला वर्क फ्रॉम होम ची परवानगी हवी आहे. आता पुढे .....) 

प्रतिभा आपल्या लॅपटॉपवर पुढील कामाची यादी बनवत असताना केबिनच्या दारावर टक - टक झाली. प्रतिभाने वर न पाहताच ,' कम इन ' म्हटलं. आधी राघव आणि त्याच्या मागे मनीष अदबीने आत आले. प्रतिभाने राघवकडे पाहत एक भुवई उंचावून विचारलं ," एवढ्या लवकर फाईल पूर्ण झाली पण ?  मला वाटलं संध्याकाळपर्यंत देशील ." 

" नाही मॅडम, फाईल नाही झाली. खरंतर मी आज घरून काम करण्यासाठी अर्ज देण्यासाठी आलो होतो. " राघव एका दमात सर्व बोलून गेला. 

" का ? कशाला हवा आहे वर्क फ्रॉम होम ? " प्रतिभा हाताची घडी घालून राघवकडे नजर रोखत म्हणाली.

" मॅम  माझी आई ऍडमीड आहे , ताई आली आज पण रात्रंदिवस तिथे ती एकटी बसू शकत नाही ना ? म्हणून मग मी सकाळी आईजवळ थांबेन आणि रात्री ताई. " राघव अगदी काकुळतीला येऊन सांगत होता. 

" हॉस्पिटलमध्ये चांगली काळजी घेतात रुग्णांची , त्यासाठी तुला तिथे थांबायची गरज नाही. आणि तरीसुद्धा वाटत असेल तर रुग्णांची काळजी घेण्यासाठी माणसे पैसे देऊन मिळतात. अजून एक, ते म्हणजे आपलं प्रोजेक्ट लवकरात लवकर सबमिट करायचं आहे आणि वर्क फ्रॉम होम तुझ्याकडून होणार नाही. तू दिवसा हॉस्पिटलमध्ये करणार काम की रात्री ? त्यापेक्षा तू दुसरा पर्याय बघ.  आधीच तुझ्या दोन सुट्ट्या झाल्या आहेत. तेव्हा आता कामाला लाग. " प्रतिभा तिच्याच तोऱ्यात बोलत होती. 

" मॅडम, मी राघवाची फाईल पूर्ण करून देतो ना दोन दिवसात. त्याची परिस्थिती एवढी चांगली नाहीये की, तो पैसे देऊन आईसाठी कोणाला ठेवू शकेल. " मनीष प्रतिभाला समजावण्याच्या सुरात सांगत होता. 

प्रतिभा तिरकी नजर करून मनिषकडे पाहत म्हणाली," तू त्याचं वकीलपत्र घेतलं आहेस का ? आणि त्याच काम तू करणार तर तुझं काम कोण करणार ? दोन महिन्यांनी नवीन प्रोजेक्ट येणार आहे त्यासाठी आतापासून तयारी करायची आहे. तेव्हा राघवच राघव बघेल , तूझ्याकडे काम कमी आहे तर या नवीन प्रोजेक्टवर काम करायला घे. " 

" मॅडम , प्लिज समजून घ्या ना. माझं आईजवळ थांबणं गरजेचं आहे. " राघव काकुळतीला येऊन म्हणत होता. 

" हे बघ राघव सर्व गोष्टीसाठी जगात पर्याय आहेत. आता पर्याय मी बघायचा की तू ते तूच ठरव." असं बोलून प्रतिभा पुन्हा कामात गर्क झाली. राघव आणि मनीष उदास चेहऱ्याने केबिन बाहेर पडले.

क्रमश : ..............  

🎭 Series Post

View all