आरसा भाग ४
( मागच्या भागात आपण पाहिलं की, राघव दुसऱ्या दिवशी एक निर्णयाने ऑफिसला जातो आणि काही दिवस ऑफिसमधून काम करता येणार नाही असे स्पष्ट सांगतो त्यावर प्रतिभा त्याला पुन्हा कामावर यायची गरज नाही असे म्हणते त्यावर राघव राजीनामा द्यायला तयार होतो. आता पुढे...)
राघव कॅबिनमधून बाहेर जाणार तोच प्रतिभाचा कठोर आवाज राघवच्या कानावर पडतो, " राघव तुला राजीनामा द्यायचा असेल तर तू खुशाल दे पण नोटीस पिरियड पूर्ण करून जायचं. " प्रतिभाचा इगो यावेळी मोठा होता.
" मॅडम, पहिली गोष्ट मी राजीनामा तुम्ही सांगताय म्हणून देतोय. माझ्या वार्षिक सुट्ट्या बाकी असताना आणि वर्क फ्रॉम होमचा अर्ज नाकारला गेल्यामुळे मला राजीनामा द्यावा
लागतोय आणि आता राहिला प्रश्न नोटीस पिरियडचा तर तो मी नक्कीच पूर्ण करेन पण माझी आई हॉस्पिटलमधून सुखरूप परत आल्यावर. " असं बोलून प्रतिभाच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता राघव निघून जातो.
प्रतिभाला राघवने डिचवल्यासारखं झालं. प्रतिभाला राघवला धडा शिकवायचा होता आणि त्यासाठी ती काहीही करणार होती. हॅन्डओव्हर द्यायला आज ना उद्या राघवला ऑफिसला यावं लागणारच होतं. त्याचं वेळीच वाट आता प्रतिभा पाहत होती.
इकडे राघव परत हॉस्पिटलमध्ये आला आणि ताईला घरी जायला सांगितलं. थोडावेळ आराम करून ती पुन्हा रात्री येणार होती. आईला आराम करायला लावून राघव काही फोन करत होता. थोडा वेळ काही फोन झाल्यानंतर राघवचा चेहरा एका क्षणी चमकला आणि तो निश्चिन्त मनाने येऊन आईच्या पायाजवळ बसला.
संध्याकाळी ताई आल्यावर राघव आईचा निरोप घेऊन निघाला. हॉस्पिटलमधून निघून राघव एका गॅरेजजवळ गेला. तिथे त्याचा शाळेतला मित्र होता 'अखिलेश '.
अखिलेश राघवला पाहून आनंदाने जवळ येतो आणि त्याला मिठी मारतो. अखिलेश राघवच्या आईच्या तब्बेतीची चौकशी करतो आणि एका गाडीची चावी राघवच्या हातावर ठेवतो. त्यावर राघव म्हणतो, " मित्रा तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीये? अश्यावेळी तू उभा राहिला आहेस माझ्या मदतीला की तुझे उपकार विसरूच शकणार नाही मी. "
" मित्राचे आभार कधीच मानायचे नसतात, फक्त हक्काने आवाज द्यायचा असतो. आणि मी खूप जास्त काही केलेलं नाही. फक्त माझी जुनी कॅब तुला चालवायला दिली आहे. आता मी गॅरेज चालवतो तर कॅब उभीच असते. तुझ्याकडे ड्रायविंग लायसन आहेच. त्यामुळे आता जास्त विचार न करता तुझ्या कामाचा 'श्री गणेशा ' कर. " अखिलेशचे बोल ऐकून राघवला एक आधार मिळाला होता. आता राघव रात्री कॅब चालवून दिवसा आईजवळ थांबू शकत होता शिवाय नवी नोकरीं मिळेपर्यंत राघवला या कॅबची मदत होणार होती.
क्रमश :.........