गोष्ट छोटी डोंगराएवढी..
विषय:- आणि कृष्ण भेटला..
हे भगवंता! खरंतर मी कोण आहे? मलाच पडलेला प्रश्न.. ना मी राधा ना मी मीरा.. तूझ्या शिवाय काय रे माझं वेगळं अस्तित्व? तुझ्या चरणाशी विलीन होण्यास व्याकुळ झालेली मी.. स्वतःला कृष्णसखी म्हणवून घेण्यास खरंच पात्र आहे की नाही? खरंच नाही रे ज्ञात मला.. पण तुझ्या नामात कायम गुंग असलेली, तुझ्या मुरलीवर प्रीत जडलेली, तुझ्या सावळ्या रंगात रंगून श्याममयी होऊ पाहणारी, सावळ्या हरीची सावळबाधा झालेली मी तुझी एक तुच्छ दासी..
हे श्रीरंगा, महाभारतातल्या देवकी, कुंती, गांधारी, द्रौपदी, रूक्मिणी, सत्यभामा, कुब्जा, वृषाली,राधा आणि मीरा या साऱ्या जणींनी आपली कैफियत मांडली. देवा, तू त्यांची व्यथा ऐकूनही घेतलीस. खूप महान आणि लढवय्या होत्या त्या.! मला माहित आहे मी त्यांच्या इतकी महान नाही पण ईश्वरा, तू तुझ्या पायाशी लीन होऊ पाहणाऱ्या भक्तांना निराश करत नाहीस ना? म्हणूनच थोडसं धारिष्ट्य एकवटून मी आज तुझ्यासमोर माझी कैफियत मांडणार आहे. मनातली व्यथा सांगणार आहे. सर्वांचे ऐकून घेऊन वेदनांचे निर्मुलन करतोस न तू? मग हे भगवंता, माझ्या साठी फक्त एकदा धावून ये.. आळवलेल्या आर्त स्वरांचा अर्थ समजून घे..
हे मधुसूदना! मी एकविसाव्या शतकातली आधुनिक नारी. मी आजची प्रगतशील स्त्री. कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर.. ‘रांधा, वाढा उष्टी काढा..’ ही चौकट भेदून बाहेर पडलेली. चूल आणि मूल या संकल्पनेला सुरुंग लावून बाहेरच्या जगावर अधिराज्य गाजवणारी.. होय, मीच ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीपणे कार्यरत असणारी. होय मी आजचीच स्त्री..
हे कान्हा! मग इतकी प्रगतशील असूनही का मी इतकी अगतिक? का माझ्या देहाची, मनाची विटंबना? खरंतर ही विटंबना तेंव्हाही अगदी पुरातन काळापासून होतीच ना रे? लोकनिंदेला भयभीत होऊन पोटच्या मुलाचा त्याग करणारी कुंतीमाता, आपल्या मातापित्यांनी पितामह भीष्मांना दिलेल्या वचनपूर्तीसाठी, आपल्या राज्याच्या हितासाठी आपल्या सुखांचा, स्वप्नांचा त्याग करणारी आपल्याच डोळ्यांवर जीवनभर पट्टी बांधून एका अंध पतीबरोबर संसार करणारी महाराज्ञी गांधारी.. आठवतेय ना तुला?
युधिष्ठिरानें आपल्या सहचारिणीला फक्त एक वस्तू समजून द्युतक्रीडेत पणाला लावून भर दरबारात याज्ञसेनी द्रौपदीचा अपमानच केला. स्त्री म्हणजे काय एक भोगवस्तू होती? द्रौपदीला द्युतक्रीडेत हरून तिचं वस्त्रहरण करण्याची जणू दुर्योधनाला त्याने अनुमतीच दिली होती. ही कसली विटंबना तिच्या चारित्र्याची तुझी सखी असूनही? तिथे उपस्थित असलेले घडत असलेला हा कुटप्रपंच हातांची घडी घालून निमूटपणे उघड्या डोळ्यांनी पाहणारा समाज आठवतोय ना तुला? तेंव्हापासून ते आजपर्यंत फक्त बघ्याची भूमिका अगदी चोखपणे पार पाडणारा हा समाज आजही अगदी तसाच आहे. तेंव्हाही एक स्त्रीच शोषित, पीडित होती आणि आजही तीच शोषित, पीडित आहे. आजही दुर्योधन, दुःशासनाचे असंख्य हात वस्त्रहरण करू पाहणारे, आजही त्याच बरबटलेल्या वासनाधीन नजरा, शीलहरण करू पाहणाऱ्या, आजही तेच पुरुषी विचारांचं नागवेपण.. असंख्य द्रौपदी अगतिक झालेल्या. जीवाच्या आकांताने टाहो फोडणाऱ्या आजही तशाच रे! पण त्यांच्या मदतीला धावून येणासाठी एकही कृष्ण उरला नाही रे.. नदी नाल्यातून वाहणारे असंख्य कर्ण आजही तसेच रे.. पण त्यांना वाचवणाऱ्या, मायेने वाढवणाऱ्या राधामाता मात्र हरवल्या. हीच खरी आजच्या युगाची शोकांतिका आहे बघ..
हे भगवंता, तेंव्हा निदान द्रौपदीच्या शिलरक्षणार्थ तू धावून तरी आला होतास पण आता ती हाक, तो धावा, तो आक्रोश तुझ्यापर्यंत पोहचतच नाही का रे? ती साद का तुला ऐकू येत नाही? भक्तांच्या मदतीला धावून येणारा माझा भगवंत, माझा श्रीहरी कुठे हरवलाय सांग ना? का आणि कसले हे भोग अजूनही? कधी स्वतःचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा, तर कधी अग्निपरीक्षा देऊनही पतीने पत्नीचा केलेला त्याग.. का ही तिची सत्त्वपरीक्षा? का ही तिला शिक्षा स्त्रीपणाची? परमेश्वरा, तू म्हणाला होतास ना?
“दृष्टांचा संहार करण्यासाठी प्रत्येक युगात मी अवतार घेईन..”
मग देवा, कुठे आहेस तू? इतकी अराजकता माजली असताना तू शांत कसा? पापी लोकांचा नाश करण्या तू ये रे भगवंता.. तुझी वाट पाहून माझे डोळेही थकलेत..
हे मुकुंदा, तू कधीच मैत्रीत भेद केला नाहीस. सूदाम्याचा सखा, अर्जुनाचा मित्र, सारथी, शुभचिंतक, मार्गदर्शक झालास. अगदी द्रौपदीचाही सखा झालास. त्याकाळातही एका विवाहित स्त्रीचा, राधेचा प्रियकर झालास पण देवा, तशी निरपेक्ष मैत्री, ते निस्वार्थ प्रेम.. कुठे राहिलंय रे आता? स्वार्थाने बरबटलेल्या मैत्रीच्या नात्यात ना ती ओढ ना निस्वार्थ प्रेम! गरज म्हणून केलेली मैत्री कशी चिरंतन टिकेल? ती निखळ मैत्री लोप पावत चालली आहे रे! भगवंता, ‘श्रीकृष्ण-सुदामाच्या’ निःस्वार्थ मैत्रीचे दाखले फक्त पुराणातच पहायला मिळतील की काय तुलाच ठाऊक! म्हणूनच देवा, मनापासून तुला सांगतेय, तुझ्यासारखा मित्र होणे नाही ना तसं निखळ मैत्रेय..
हे करुणाकरा, राधेवर तुझं असलेलं निस्सीम प्रेम अगदी अद्वैत. त्याला कशाचीच तोड नाही रे.. त्या प्रेमाची तुलनाच होऊ शकत नाही. राधेचा श्वास होतास तू. निरपेक्ष प्रेमाची आस होतास तू. तूच होतास राधेचा ध्यास. कायम मनात तिच्या तुझाच वास.. ना देहाची ओढ, ना कसली आसक्ती.. त्याच्याही पलीकडे जाऊन राधेची जडलेली तुझ्यावरची प्रीत.. श्वासात वाहणारा तुझाच परिमळ.. मुखी तिच्या तुझेच नाव.. किती गाढ भक्ती, खोलवर रुजलेली प्रीतीची घट्ट मुळं.. जाणवतात रे मनाला माझ्या..
हे केशवा! तुझंच गुणगान ऐकत, तुझं नामस्मरण करत मी लहानाची मोठी झाले. अगदी तेंव्हा पासूनच जीवाला लागलेला तुझ्या नामाचा छंद.. मनात वसत जाणारी तुझी मोहक छबी.. तुझ्या चरणी विलीन होण्याची लागलेली ओढ. त्यामुळेच तर खऱ्या प्रेमाचा अर्थ मला उमगत गेला.
श्रीरंगा! तुझ्या रंगी रंगून जाताना शिकतेय मी राधेसारखं संयमी राहायला. शिकतेय मी सगळं देऊन राधा व्हायला. शिकतेय मी तिच्याकडून तिचं विरहातलं प्रेम. शिकतेय मी कधीच आपला न होऊ शकणाऱ्या मोहनावर जीवापाड प्रेम करायला. शिकतेय मी राधेच्या समर्पणाची परिभाषा कारण समर्पण म्हणजेच प्रेम. तुझ्यावर असलेला विश्वास, तुझ्यावरची श्रद्धा म्हणजेच प्रेम. तुझ्या ठायी असलेलं, तुझ्या चरणी समर्पित केलेलं माझं स्वत्व म्हणजेच प्रेम.. समर्पणाची परिसीमा ओलांडून उच्च पातळीवर नेऊन ठेवणारं, श्रीहरीच्या चरणी मिळालेलं अढळस्थान, भगवंताविषयी वाटणारी ओढ, तहान-भूक किंबहूना स्वतःला हरवून जाणं म्हणजेच प्रेम आणि त्या परमोच्च शिखर गाठणाऱ्या प्रेमाचंच तर दुसरं नाव म्हणजे भक्ती.. शिकतेय मी तुझ्याकडून तुझ्यासारखं स्थितप्रज्ञ राहायला.. शिकतेय मी तुझ्याकडून समस्येशी एकरूप होऊन कृष्ण व्हायला.. सर्व मोहपाशातून मुक्त व्हायला. इतकं सोप्प नाही बरं ते! तुझ्या भक्तिरसात नाहून निघताना एक गोष्ट मात्र प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे राधाकृष्ण ही फक्त नावं नाहीत तर ते म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन.. दोन दिव्यांचा उजेड एक दाटावा इतकं एकरूप झालेलं त्यांचं अस्तित्व.. त्या अगाध निस्सीम प्रेमाच्या पावित्र्यामूळेच तर आज थोडंतरी प्रेम या कलियुगात शिल्लक राहिले आहे नाहीतर ते निस्वार्थ प्रेम तरी कुठे राहिलंय आता? ना तो देवकीनंदन कृष्ण राहिला ना ती राधा.. ना ते निस्सीम प्रेम..ना ती कृष्णभक्त मीरा.. खरंतर आता कृष्णही होणे नाही ना राधा होणे शक्य आहे..
हे गोविंदा! मला एक सांगशील? इतकं सारं मुक्त हस्ताने प्रेमाची उधळण करून असं अचानक निघून जाणं कसं रे जमलं तुला? कसं जमलं तुला इतक्या शांतपणे अगदी सहज हात सोडवून घेणं? विरहाच्या वेदना तुलाही झाल्या असतील ना रे? कसं जमलं तुला नात्यांचे ते मोहपाश अलगद सोडवून कर्तव्यपूर्तीसाठी पुढे निघून जायला?
हे कर्मयोगी कृष्णा! तू गीतेत म्हणाला होतास,
“जेव्हा जेव्हा धरतीवर पाप वाढेल धर्माचा ऱ्हास होईल. तेंव्हा तेंव्हा दृष्टांच्या विनाशासाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठी मी अवतार घेईन..”
मग देवा, ती वेळ नाही का रे आली? ये ना भगवंता, तुझ्या भक्तांच्या रक्षणासाठी.. दुर्योधन-दुःशासना सारख्या दृष्टांचा संहार करण्यासाठी..
हे वासूदेवा! तू म्हणजे नात्यांचा उत्सव. प्रत्येक नातं भरभरून जगलास. प्रत्येक नात्याला आनंद दिलास. नातं समृद्ध केलंस पण आज प्रत्येक नातं हरवत चाललंय रे.. नात्यातला ओलावा लोप पावत चाललाय. आम्ही माणसं एक एक वेगळे बेट बनत चाललोय. त्या बेटांवर नात्यांचे सेतू बांधायला, तू नात्यांचा दुवा बनून नाती सांधायला येशील का रे? तू त्या नात्यांचा ओलावा घेऊन येशील? ये ना रे कान्हा..
हे श्रीरंगा, तुझ्याविना सारं व्यर्थ रे.. नसेन मी तुझी राधा.. नसेन मी तुझी मीरा पण मोहना, मी तुझीच अनुप्रिया ना रे! मग देवा, माझ्यासाठी एक करशील? याजन्मी नाही पण पुढच्या जन्मी तरी एकदा माझा फक्त माझाच कृष्ण होशील? बासरीत तुझ्या पुन्हा एकदा प्रीतीचे मधुर सूर भरशील? फार काही नाही मागत तुला, विरहातलं तरी एकदा राधेचं भाग्य देशील?
पूर्णविराम..
© ® निशा थोरे (अनुप्रिया)
© ® निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा