आप्त (मराठी कथा:Marathi story)

Family story. Bonds beyond the family. Love of family members.

आप्त 

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील नावे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
*************************
"मोरया मोरया मी बाळ तान्हे...." शंकर आजोबा देव घरात पूजा करत होते.... संपूर्ण घरात छान अगरबत्ती आणि धुपाचा सुवास दरवळत होता. पूर्ण घर अगदी प्रसन्न झालं होतं. अजूनही प्रभा फाकायची होती. बाहेर सगळं एकदम संथ आणि शांत होतं. घरात सुद्धा कोणाची कसलीच घाई नव्हती. शंकर आजोबांसोबत श्रेयस पूजेला बसला होता. रेणुका आजी आणि समिधा स्वयंपाक घरात नैवेद्य आणि नाश्त्याची तयारी करत होत्या. घरभर मस्त खमंग भाजलेल्या रव्याचा, बदाम, काजू, पिस्ता यांचा सुवास दरवळू लागला होता. शिऱ्याची तयारी सुरू होती. 

"झाला का नैवेद्य? लवकर घेऊन या..." शंकर आजोबांनी हाक मारली. 

"हो आजोबा! आलेच..." समिधा म्हणाली. 

छान मुद पाडलेला शिरा, त्यावर काजू - बदामाचे काप आणि तुळशीपत्र ठेवून ती नैवेद्य घेऊन बाहेर जातच होती; एवढ्यात अमोल आला.

"अगं दे! मी घेऊन जातो.... तू बाकीच्यांच्या चहा पाण्याचं बघ..." तो म्हणाला आणि शिरा घेऊन गेला. 

"चल आपण सगळ्यांना चहा आणि लहान मुलांना दूध घेऊन जाऊ... नैवेद्य होईलच तोवर.." रेणुका आजी म्हणाल्या. 

समिधा हो म्हणाली. चहा करत ठेवला आणि बाजूला दूध गरम करायला ठेवलं. ती जुन्या आठवणीत रमून गेली....

समिधा आणि अमोल दोघेही अनाथ आश्रमात वाढलेले. लहानपणी कोणालाही त्रास न देता सगळ्यांना मदत करणारी ही दोघं आश्रमात सगळ्यांची लाडकी होती. कालांतराने दोघं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात सेटल होत गेले... एकमेकांबद्दल त्यांना प्रेम वाटू लागलं आणि त्यांचं लग्न सुद्धा झालं. पण, एका कुटुंबाची कमतरता दोघांनाही जाणवू लागली. एकमेकांच्या साथीने त्यांनी एक भन्नाट कल्पना अमलात आणायची ठरवली आणि म्हणूनच त्यांचं पूर्ण घर आज माणसांनी भरलेलं होतं. सगळे त्यांचे आप्त होते.... रक्ताच्या नात्याने नसले तरी मनाच्या नात्याने जोडले गेले होते. सगळ्यांचा वेगळा स्वभाव, वेगळे विचार पण तेवढीच ओढ आणि आपुलकी! सख्खे नातेवाईक जेवढं करणार नाहीत तेवढं समर्पण! मजा, मस्ती त्याबरोबरच शिस्त पण तेवढीच कडक. या परिवारात अजून एक महत्वाचा मेंबर म्हणजे त्यांची टेरेस बाग! तिथे लावलेली बोन्साय झाडं, वेली, फळभाज्या यांचं तर एक वेगळंच स्थान! खरंच किती भाग्यवान आहोत ना आपण एवढं मोठं कुटुंबं लाभलं आपल्याला. 

"कुठे हरवलीस?" रेणुका आजींनी तिला एक टक तंद्रीत पाहून हाताला धरून विचारलं. 

"नाही! काही नाही... चला... थोड्यावेळात आपल्याला सभागृहात जायचं आहे ना... आवरूया!" ती भानावर येत म्हणाली. 

दोघींनी मिळून मोठ्या ट्रे मध्ये चहा आणि दुधाचे कप ठेवले आणि बाहेर घेऊन आल्या. तोवर शंकर आजोबांची पूजा झाली होती.

"चला चला.... आजी, आजोबा, सगळी बच्चे कंपनी या लवकर...." अमोल दोघींच्या हातातले ट्रे टेबल वर ठेवत म्हणाला. 

शंकर आजोबांना पकडून अजून ७ आजोबा आणि रेणुका आजींना पकडून अजून ४ आज्या आल्या! श्रेयस आणि अजून ८ मुलं आली आणि सगळे पंगत करून बसले. अमोल आणि समिधा ने मिळून सगळ्यांना सकाळचा चहा नाश्ता आणि प्रसाद दिला. ते दोघं सुद्धा त्यांच्यात बसले.. गप्पा मारता मारता सगळ्यांनी खाऊन घेतलं! 

"चला आता आपल्याला आजच्या विशेष कार्यक्रमासाठी सभागृहात जायचं आहे... सगळ्यांनी मस्त मस्त तयार होऊन या.... बरोबर ९:३० वाजता तुमच्या घरचे तिथे येतील त्या आधी आपल्याला जायचं आहे..." अमोल म्हणाला. 

सगळ्या आज्या एका खोलीत आणि सगळे आजोबा एका खोलीत गेले! लहान मुलांना अमोल तयार करत होता आणि मुलींना समिधा! सगळे छान तयार होऊन आले. आजोबांचा धोतर - टोपी, आज्यांनी नेसलेल्या नऊवारी साड्या आणि लहान मुलांचे पण तसेच पारंपरिक पेहराव! सगळे खूपच लोभस दिसत होते. 

"अरे वा! सगळे खूप छान दिसतायत!" अमोल म्हणाला. 

सगळे खूप खुश होते. अमोल ने सगळ्यांचा एक सेल्फी घेतला आणि सगळ्यांचं सभागृहाच्या दिशेने प्रस्थान झालं. आज त्यांच्यासाठी खूप खास दिवस होता! त्यांच्याच सोसायटी मध्ये असलेल्या हॉलच बुकिंग आजच्या कार्यक्रमासाठी केलं होतं! झेंडूंच्या माळांनी पूर्ण हॉल सजला होता. खुर्च्या मांडून झाल्या होत्या आणि रंगमंचाच्या मागच्या लाल पडद्यावर सोनेरी ग्लिटर फोम शीट ने "१ ला वर्धापनदिन सोहळा" असं स्टाईल मध्ये लिहिलं होतं! हळूहळू आता लोकं यायला सुरुवात झाली होती आणि थोड्याच वेळात पूर्ण सभागृह माणसांनी फुलून गेलं. 

"सुस्वागतम्! तुम्ही सगळे आज इथे वेळात वेळ काढून आलात म्हणून खूप खूप धन्यवाद. तर, आज आपल्या "आप्त केअरिंग सेंटर" चा पहिला वर्धापनदिन! म्हणून हा छोटासा कार्यक्रम. आज आपण इथे खूप मजा करणार आहोत. पहिल्यांदा आपण दोन दिवसांची कॅम्प घेतली होती ती आज संपत आहे आणि तुमची मुलं, आई, वडील आज पुन्हा तुमच्या घरी येतील. त्याआधीचं हे सगळ्या कुटुंबासोबत असणारं सेलिब्रेशन!" अमोलने माईक घेऊन सगळ्यांचं स्वागत केलं आणि दिवसभराचा थोडक्यात आढावा दिला. 

टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळे आता पुढच्या कार्यक्रमासाठी उत्सुक झाले. 

"आता सगळे आजी आजोबा आणि लहान मुलं तुमच्यासमोर काहीतरी सादर करणार आहेत. तो, दिल थाम के बैठीये!" समिधा म्हणाली. 

पुन्हा जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला. समिधा आणि अमोल स्टेज वरून खाली येऊन बसले. सगळ्या आजी आजोबांनी आणि मुलांनी मिळून गाणी, डान्स, श्लोक पठण आणि कथा कथन या सगळ्याची तयारी केली होती. वयाची पंच्याहत्तरी पार केलेले आजी आजोबा सुद्धा लहान मुलांमध्ये त्यांच्या एवढेच होऊन सगळं एन्जॉय करत होते. त्यांचं असं दिलखुलास वागणं, मजा करणं हे सगळ्यांना आवडत होतं! या केअरिंग सेंटर मध्ये येण्या आधीच त्यांचं जीवन आणि आत्ताचं जीवन यात जमीन आस्मानाचा फरक होता! सगळे कार्यक्रम असेच मजा करत करत संपन्न झाले. पुन्हा अमोल आणि समिधा स्टेजवर गेले! 

"आत्ता पर्यंत आपण खूप मजा केली. या सगळ्यात वेळ कसा गेला समजलं नाही. जेवणाची सोय आपण इथे केली आहे... आता सगळ्यांनी मिळून जेवण करायचं मग आपण प्रत्येकाचे अनुभव ऐकणार आहोत! तुमच्यापैकी जरी कोणाला काही बोलायचं असेल तरी तुम्ही इथे येऊन बोलू शकता. त्याआधी चला सगळे जेवायला..." समिधा म्हणाली. 

सगळे जेवायला गेले. जेवणाची अगदी पारंपरिक पद्धतीने मांडणी केली होती. सगळ्यांना बसायला पाट ठेवले होते! ताटाभोवती रांगोळ्या होत्या आणि केळीची पानं मांडून ठेवली होती. सगळे एकदम पंगत करून बसले. वाढपी येऊन एक एक पदार्थ ताटात वाढत होते! पोळी, भाजी, चटणी, लोणचं, वरण, भात त्यावर तुपाची धार आणि आमटी असा बेत होता! अन्न वाढून झाल्यावर रोजच्या सवयी प्रमाणे मुलांनी आजी -  आजोबांसोबत "वदनी कवळ घेता..." म्हणून ताटाला नमस्कार करून जेवायला सुरुवात केली. मुलांच्या पालकांना हे फार आश्चर्यकारक होतं! त्यांच्या चेहऱ्यावर असणारं हे आश्चर्य अमोल आणि समिधा ने बरोबर टिपलं होतं. त्या दोघांनी एकमेकांकडे बघून एक स्मित केलं आणि सगळे गप्पा मारता मारता जेवायला लागले. यात मुलांनी रोज ते कश्या गमती करत असतात हे आपापल्या पालकांना सांगितलं. घरी असताना हे नको ते नको करत नाकं मुरडणारी मुलं तिथे पानात वाढलेलं सगळं खात होते. हा त्यांच्या पालकांसाठी दुसरा सुखद धक्का होता. सगळ्यांची जेवणं झाली! आता सगळे अजूनच उत्साहात होते... कारण, आता दिवसभर आपली मुलं आजी आजोबंसोबत काय काय करतात याचे अनुभव सगळ्यांसमोर येणार होते. प्रत्येकजण आपापल्या जागेवर येऊन बसला. स्टेज वर श्रेयस आणि त्याचे इतर मित्र - मैत्रिणी आले. 

"नमस्कार! मी श्रेयस! आज आम्ही सगळे दिवसभर केअरिंग सेंटर मध्ये काय करतो, इथे यायच्या आधी आणि नंतर आमच्यात काय बदल झाले आहेत हे एका छोट्याश्या नाटकाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत." श्रेयस ने थोडी कल्पना दिली.  

सगळे पटकन आपापल्या जागी गेले आणि नाटकाला सुरुवात झाली. 

"काय हे श्रेयस! किती पसारा करून ठेवला आहेस? दिवसभर काम करून यायचं आणि तू हा असा त्रास देतोस! आणि हे काय? आज पुन्हा बाहेरून पिझ्झा खाल्ला ना? सखू मावशी कुठे गेल्या? त्या पण नीट लक्ष देत नाहीयेत आता..." श्रेयस ची आई बनलेली सानिका त्याला ओरडत होती. 

"सखू मावशी दुपारीच घरी गेल्या आणि मला तू ती कोबीची भाजी बनवली आहेस ती आवडत नाही म्हणून मग मी माझ्या पॉकेट मनी मधून पिझ्झा मागवला." श्रेयस म्हणाला. 

सानिका ने डोक्यावर हात मारून घेतला. आता या मुलाला काय करावं हे तिला कळत नव्हतं! असे भाव तिने चेहऱ्यावर आणले. खाली बसून त्याचे आई - बाबा हे सगळं बघत होते. त्यांना ते दिवस आठवले. अगदी असंच आपण आपल्या मुलाला ओरडत होतो म्हणून त्यांचे डोळे सुद्धा पाणावले. सगळेच पालक या प्रसंगातून गेले होते. शिवाय ज्यांचे आई - बाबा या केअरिंग सेंटर मध्ये आले होते त्यांना पण त्यांच्यात आता विलक्षण सकारात्मक बदल दिसत होते. सगळ्या शारीरिक व्याधी विसरून मुलांबरोबर खेळता खेळता त्यांचा व्यायाम होत होता, नको नको ते विचार आता ते करत नव्हते म्हणून त्यांची मुलं बिनधास्त कामाला जात होती. बघता बघता मुलांचं नाटक संपलं! आता सगळे आजी - आजोबा त्यांचे अनुभव सांगणार होते. 

"नमस्कार! मी रेणुका. समिधा आणि अमोल ने "आप्त" ची सुरुवात केली त्याच्या पहिल्या दिवसापासून मी इथे आहे. माझा एकुलता एक मुलगा आणि सून! दोघेही लाघवी आहेत. पण, आजच्या या महागाईच्या काळात दोघांना काम करणं भागच होतं म्हणून मी स्वतः वृद्धाश्रमात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला होता! दोघंही विरोध करत असताना मी माझ्या मतावर ठाम होते पण, नेमकं त्याच दिवशी समिधा आणि अमोल नी त्यांची ही कल्पना माझ्या मुलाला; दीपक ला सांगितली होती आणि त्यांची माझ्यासाठी असणारी काळजी मिटली. खरंच तो क्षण खूप महत्त्वाचा होता. तेव्हा जरा जरी उशीर झाला असता तरी माझ्या मुलांना दुखावून मी घर सोडलं असतं!" रेणुका आजींनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. 

त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे डोळे सुद्धा ओलवले होते. त्यांचं बोलणं झाल्यावर ते दोघं स्टेज वर गेले. दोघांनी आजींना जवळ घेतलं आणि दीपक ने बोलण्यासाठी माईक घेतला. 

"आई बरोबर बोलतेय. त्या दिवशी जर समिधा वहिनी आणि अमोल मला भेटले नसते तर आई साठी कल्याणी ने नोकरी सोडायचा विचार केला होता. आईची खालावत जाणारी तब्येत आम्हाला बघवत नव्हती. पण, आप्त मुळे तिच्यात आज कमालीचा बदल झाला आहे शिवाय आमची काळजी पण मिटली आहे. थँक्स यार अमोल! वहिनी!" दीपक जड कंठाने म्हणाला. 

अमोल आणि समिधा आता स्टेज वर गेले. 

"आपल्या सेंटर च आप्त नाव आहे ना? मग थँक्यू काय म्हणतोस!" अमोल त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला. 

सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु दिसत होते. सगळ्यांचे अनुभव आणि केलेली मजा, मस्ती सांगून झाल्यावर समिधा ने माईक घेतला. 

"आज आपलं जणू एक फॅमिली गेट टू गेदर झालं! वेळ कसा गेला हे आपल्याला समजलं पण नाही. आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये... फक्त आज आपल्या या आप्त मागचा मूळ हेतू आणि अजून काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे." समिधा म्हणाली. 

सगळे आता एकदम कान देऊन ऐकू लागले. सुरुवात अमोल ने केली. 

"तुम्हाला माहीतच आहे, आम्ही दोघं अनाथ आश्रमात वाढलो! एकटेपणा काय असतो, कुटुंबाची कमी काय असते हे आमच्या शिवाय जास्त कोणाला कळणार? म्हणून वर्षभरापूर्वी आम्ही हा केअरिंग सेंटर चा विचार केला. "वसुधैव कुटुम्बकम्" असं म्हणतात, मग जर हे विश्व सगळ्यांचं कुटुंबं आहे तर आम्ही एकटे कसे असू हा विचार आमच्या डोक्यात आला. त्यातही आजच्या या धावपळीतून घरात लहान मुलांकडे किंवा वयस्कर आई - बाबांकडे लक्ष देणं एवढं शक्य होत नाहीये... लहान मुलांसाठी पाळणाघर आहे पण, या आज्जी - आजोबांसाठी? म्हणून आप्त मध्ये आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. लहान मुलांना संस्कार आणि परंपरा शिकायला मिळतात तर आज्जी - आजोबांना आजची नवीन टेक्नॉलॉजी! त्यांचं मन रमावं, कोणालाही कंटाळा येऊ नये, सतत एक ओढ निर्माण व्हावी म्हणून हे "आप्त केअरिंग सेंटर!" सगळ्यांसाठीच! इथे आम्ही सगळे मिळून एकमेकांना मदत करतो, मुलं एकमेकांच्या होम वर्क मध्ये मदत करतात, आजी - आजोबा त्यांना हस्तकला शिकवतात आणि त्याचा रिझल्ट म्हणजे मुलं प्रत्येकवेळी स्वतःच्या हाताने तयार केलेलं गिफ्ट सगळ्यांना देतात." अमोल म्हणाला. 

"हो! आम्ही इथे दिवसभर रोज नवीन नवीन खेळ खेळतो, गोष्टी वाचतो, ऐकतो, व्यायाम करतो, बेसिक कामं शिकतो आणि एकमेकांची काळजी सुद्धा घेतो. अजून एक सगळ्यात आवडीचं काम म्हणजे आपल्या सोसायटीच्या टेरेस वर फुलवलेली बाग! या मुलांनी आणि सगळ्या आजी - आजोबांनी ती फुलवली आहे. रोज झाडांना पाणी देणं, खत घालणं ही सगळी कामं आम्ही सगळे मिळून करतो! एवढंच नाही तर ती आपल्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहेत म्हणून रोज त्यांच्याशी गप्पा पण मारतो! झाडं पण त्याला छान प्रतिसाद देतात हो! फक्त गरज असते निरीक्षणाची." समिधा म्हणाली. 

एवढ्यात एक पालक उठून उभे राहिले. त्यांना काहीतरी बोलायचं आहे हे जाणून समिधा आणि अमोल ने त्यांना स्टेजवर बोलावलं. 

"नमस्कार! आम्ही सानिका चे आई - बाबा. आज इथे सगळ्यांना आम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटतेय! आप्त मध्ये येण्यापूर्वी आमची सानिका ज्या पाळणाघरात जायची तिथे ती एवढी अॅक्टिव कधीच नव्हती. घरूनच तिला आम्ही जेवणाचा डबा द्यायचो त्यामुळे कधी वेळ नसेल तर बाहेरून ऑर्डर करून द्यायचो म्हणून तिला पौष्टिक अन्न खायची सवय सुद्धा नव्हती. पण, आप्त मध्ये ती यायला लागली तेव्हा पासून फार बोलकी झाली आहे. समिधा ताई आणि अमोल ने आजी - आजोबांना पण यात सामावून घेतल्यामुळे आमच्या मुलांवर चांगले संस्कार घडतायत. म्हणून आम्हाला कसलीच काळजी नाहीये." सानिकाचे बाबा म्हणाले. 

"हो! हे बरोबर बोलतायत. वाचनाची आवड, धार्मिक कार्य, धाडसी वृत्ती, मनमिळावू पणा, आदर आणि शेअरिंग हे सगळे गुण तिच्यात उतरतायत. हे आमच्यासाठी खूप आहे. बाहेर पाळणाघरात जेवढी फी घेतात त्या पेक्षा कमी फी आणि एवढे चांगले संस्कार आमच्या मुलांवर घडतायत. खरंच आम्ही सगळे तुमचे खूप खूप आभारी आहोत. संध्याकाळी आम्ही दमून घरी आल्यावर आम्हाला सानिका अजिबात त्रास देत नाही. उलट आमची काळजी घेते. ती इथे सुखरूप असते म्हणून आम्ही तिकडे बिनधास्त काम करू शकतो. थँक्यू सो मच!" सानिका ची आई म्हणाली.

सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या बोलण्याचं समर्थन केलं. त्या नंतर अजून बरेच खेळ खेळले गेले. ज्यामुळे सगळी कुटुंबं नव्याने जवळ आली. आप्त चा खरा उद्देश कधीच साध्य झाला होता. तिथे फक्त निखळ आनंद होता. स्वतःच्या कुटुंबा सोबतच त्यांचं आणखी एक कुटुंबं तयार झालं होतं! कधीही एकमेकांची साथ न सोडण्यासाठी.

समाप्त.
*****************************
आप्त! म्हणजे नातेवाईक आणि मैत्रीच्या पलिकडे असणारं नातं. ज्यात फक्त आणि फक्त आनंद असतो. एकमेकांना सांभाळून घेणारे, खऱ्या अर्थाने एकमेकांच्या सुख - दुःखात सहभागी होणारे म्हणजे आप्त! कधीही फायदा किंवा तोटा हा विचार न करता नेहमी मदतीचा हात देणारे आणि हाकेच्या आधीच धावून येणारे म्हणजे आप्त! यात झाडांचा तर फार महत्त्वाचा वाटा! सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतंच की, झाडं आपल्या वागण्याला प्रतिसाद देतात! ते खरं आहे... पानांची, फांद्यांची होणारी  हालचाल, वारा नसताना पण अचानक येणारा फुलांचा सुवास हे त्याची साक्ष देतो. 

एका केअरिंग सेंटर मुळे जोडलं गेलेलं हे अनोखं कुटुंबं, प्रत्येकाचे वेगळे विचार, स्वभाव आणि पद्धत! तुम्हाला कसे वाटले? हे नक्की कमेंट करून सांगा.