"आपले लाडके मन"

Our Mind. It is actually everything. Whats in it do read

"आपले लाडके मन"

मी लाडके या साठी म्हणत आहे कारण, किती आणि केवढ्या प्रकारे लाड, कौतुक करत असतो ना आपण आपल्या मनाचे!

खरं तर, माणसाचे खरे स्वरूप माहीत असलेला आरसा म्हणजे त्याचे मन!

जे पारदर्शक ही असते आणि काही बाबतीत कारस्थानी सुद्धा असते ते मन!

जे गुंतले की आपले नाही तर दुसऱ्या साठी विचार करते ते मन!

जे अवितरत धडधडणाऱ्या त्या हृदयाला सुद्धा मुठीत ठेवते ते मन!

मन ते जे सतत बुद्धीच्या आणि विचारांच्या पेक्षा जास्त गतीने धावते!

मनाबद्दल असे ही म्हणतात की 'मन चिंती ते वैरी न चिंती'!

तर असे हे सुंदर मन जे सगळ्या मोहाचे केंद्रबिंदूसुद्धा आहे पण तरीही त्याला बंधन घालणे हे तितकेच कठीण आहे.

वय काहीही असो अगदी स्वीट सिक्सटीन की सिक्सटी पण त्या मनाची त्या ओढीची त्या विचारांची त्याची तीव्रता ही तेवढीच अफाट असते.

'मन उधाण वाऱ्याचे-गुंज पावसाचे

का होते बेभान कसे गहिवरते'

अजय अतुल यांनी बनवलेले हे अप्रतिम गाणे सुद्धा मनाचे छान वर्णन करते!

मी तर म्हणेन की तुम्ही जगत असता हे कळते ज्या श्वास घेण्याने तो श्वास म्हणजे मन.

जिथे पोकळी निर्माण झाली की मग ते सतत हरवते ते म्हणजे मन.

ज्याला शुद्ध राहत नाही ते मन आणि जे बेधुंद होते ते ही मनच!

नवीन जाणिवा करून देते ते मन

नवीन ईच्छा निर्माण करते ते मन

जगण्याची उमेद देते ते मन

आशेची किरणे देते ते मन!

मन एक आधार

मन एक तरंग

मन समुद्रासम अथांग

मन आकाशापेक्षा व्यापक!

भीती वाटते ती पण मनाला

आनंद होतो तो पण मनालाच

विश्वास असतो तो पण मनात

सुख नांदते ते पण मनातच!

मन आपल्याला सल्ला देते

मन आपल्याला दिशा दाखवते

मन नवनवीन स्वप्ने रचवते

मन पूर्ण अस्तित्व बनवते!

आपल्या लोकांसाठी झटते ते पण मन

थोडे ऍडजस्ट करते ते पण मन,

इतरांचे मन आणि मान जपते ते पण मन,

स्वतःला समजावते ते पण मनच!

या अश्या आपल्या लाडक्या मनाचे लाड पण आपण भरपूर करत असतो.

नको तेव्हा त्याला खतपाणी घालतो,

अनावश्यक वेळेला गोंजारतो

कधी कधी गरज नसताना त्याला हट्टी बनवितो

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला अश्या वेळी योग्य सुद्धा मानतो.

तसेच उदास असलो, वैतागलेले असलो, निराश असलो तरीही मनाला सांभाळता आले पाहिजे. त्यावेळेस त्याचे उगाच लाड नकोत.

एखाद्याचा मूड नाही असे जेव्हा दिसते तेव्हा त्याच्या मनातील विचारांना सुयोग्य दिशा देता आली पाहिजे...

एखादा चिडला असेल तर त्याला विचारांवर कसा संयम ठेवता आला पाहिजे हे सांगितले पाहिजे...

चुकीचा विचार ते अर्थपूर्ण कृती या मधील अंतर म्हणजे मनाचे सबलीकरण, नाही का?

तर सांगण्याचा हेतू एवढाच की जर मन एवढे प्रभावी ताकदवान आणि अफाट सक्षम आहे तर या आपल्या मनात आपण तीच ऊर्जा निर्माण केली पाहिजे जी आपल्या आयुष्याला पुढे घेऊन जाईल.

कारण आयुष्याचा उद्देश हा सतत आनंदी राहणे हाच असला पाहिजे, आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे....

आता हा प्रयत्न योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी पोचण्यासाठी आपल्या लाडक्या मनाला सांगा ना जरा!

सोबतचा फोटो:- सूर्यास्ताच्या प्रतिबिंबाचा!

©®अमित मेढेकर