अंतर

Gosht Sasu Sunechya Natyachi

"अमोल, तुमच्या गावी कधीही पाऊस पडतो का रे? ऐन थंडीतही?" रेवती आपल्या हातातली बॅग सांभाळत म्हणाली.

"पाहतेस ना हल्ली वातावरणाचं काही सांगता येत नाही! आता कधीही पाऊस पडू शकतो. मधेच थंडीही पडते, मधेच उकडत काय? सगळंच विचित्र झालं आहे." अमोल आपल्या बायकोला म्हणाला.

"पण आजच यायची काही गरज होती का? तसंही उद्या सुट्टीच होती. आलो असतो सकाळच्या गाडीने. एक तर तो बसवाला मधेच कुठेतरी उतरवून गेला आपल्याला. मला सवय नाहीए रे, या अशा रस्त्यावरून चालायची..तेही चिखलातून आणि हाईट म्हणजे ही साडी नेसून!" रेवती लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या सासरी, गावी येत होती.
"अजून किती चालायचं आहे?"

"असेल एक अर्धा किलोमीटर." रेवतीचा त्रासिक चेहरा पाहून अमोलने पुढच्या एक किलोमीटर रस्त्यातला अर्धा किलोमीटर रस्ता कमी करून सांगितला.

"तू जा. मी नाही येत. एक तर दिवसभर त्या लॅपटॉपवर काम करून मला खूप कंटाळा आला आहे. त्यात तो दोन तासांचा बसचा प्रवास!" रेवती वैतागून रस्त्यावर एका कडेला उभी राहिली.

खरंतर वातावरण खूप छान होतं. हवा थंड होती. भुरभुरणारा पाऊस तिच्या केसांत अडकला होता. अंगावर लाल साडी, हातात बांगड्या आणि कधी नव्हे ते कपाळाला लावलेली टिकली. रेवती खूप छान दिसत होती. तिला अशी थांबलेली पाहून अमोलने तिच्याजवळ येत तिची बॅग आपल्या हातात घेतली. तो जवळ येताच त्याच्या डोळ्यातला इशारा तिला स्पष्ट दिसला.
"ए, वेडा आहेस का रे तू?" क्षणात तिचा राग कुठल्या कुठे पळून गेला. तिने त्याच्या केसात हात फिरवत त्याचे केस विस्कटले.

तसा अमोल गालातल्या गालात हसला.

"असो, मला तुझं गावाकडचं घर पाहायचं आहे. शिवाय तिथल्या सगळ्यांची माणसांची ओळख करून घ्यायची आहे. विशेषत: माईंची. कारण माझी सासू आहे ना ती!" रेवती चालता चालता बोलत होती.

"तुझं नाही, आपलं घर म्हण. आता ते तुझंही घर आहेच की." अमोल रेवतीकडे पाहत म्हणाला.

"अमोल, अरे तुझ्या भावाला तरी फोन कर. गाडी आहे ना त्याच्याकडे? इथे आपल्याला न्यायला येईल तो." रेवती.

"अगं, माझ्या भावाकडे कुठे आहे गाडी? तो तर सायकल घेऊन शेतात जातो." अमोल.

"मग तुम्ही सगळे आमच्याकडे आला होतात, तेव्हा ती मोठी गाडी कोणाची होती?" रेवती वैतागून म्हणाली.

"ती चुलत भावाची. आमची नाही काही.
पण आता किती उशीर झाला आहे पाहिलंस ना? झोपला असेल तो." अमोलचे उत्तर ऐकून रेवती चिडली.
आजूबाजूला पाहत काहीच न बोलता मूकपणे चालत राहिली.

काही वेळाने दोघेही घरी पोहोचले. तशी अंगणात त्यांची वाट पाहत असलेली घरची सगळी मंडळी पुढे आली.
"अमोल, अरे किती उशीर? कधीची वाट पाहत आहोत आम्ही. तुम्ही दोघे येणार म्हणून सगळी तयारी केली. पण पावसाने घोळ घातला. बरं..सरिता, आरतीचे ताट आणून ओवाळून आत घे यांना." माई आपल्या जावेला म्हणाल्या.

"भुकेली असतील मुले. किती वेळ झाला? या पावसाचा नेम नाही काही." माई रेवतीकडे एक नजर टाकून आत आल्या.
त्यांनी आत येऊन भराभरा दोन पानं मांडली.

"माई, तुम्ही सगळे जेवलात?" रेवतीच्या या प्रश्नावर माईंनी उत्तरादाखल फक्त मान डोलावली. जेवताना माई फक्त अमोलशी बोलत होत्या. बाकी रेवतीच्या प्रश्नांना त्यांच्या लेखी तशी किंमतच नव्हती.

"अमोल, माई माझ्याशी नीट बोलत का नाहीत?" काही वेळाने झोपायच्या तयारीत असलेली रेवती अमोलला म्हणाली.

"अगं, तसे काही नाही. तू अजून नवीन आहेस या घरात आणि लग्नानंतर आपण पहिल्यांदाच येतो आहोत इथे म्हणून तिला थोडं अवघडल्या सारखं वाटत असेल."

"काहीही काय? अवघडल्या सारखं तर मला वाटायला हवं." रेवतीने हसून विषय तिथेच संपवला.

मात्र दुसऱ्या दिवशीही माई तसेच वागत होत्या.
"तुझ्या बायकोला काय हवं काय नको हे विचारुन घे. हे गाव आहे म्हणावं. शहरासारखी सोय नसते इथे, हे सांग तिला." माई अमोलला म्हणाल्या.

"तिचं तसं काही नसतं माई. अजून आठ - दहा दिवस आहोत आम्ही इथे. रुळेल ती लवकरच. तू नसते टेन्शन का घेतेस?"
अमोल आपल्या आईला समजावत म्हणाला आणि झालेही तसेच. रेवती लवकरच रुळली घरात. आपल्या सासरच्या कुटुंबीयांशी तिचे सुर जुळले. सरिता काकूंच्या मदतीने तिने बरेच काही शिकून घेतले.
माई मात्र तेवढ्याच तेवढं बोलत होत्या तिच्याशी. नुसत्या न्याहाळत राहायच्या तिला. ती काय करते याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. हे रेवतीला खटकत असलं तरी तिने शांत राहणं पसंत केलं.
तिला वाटायचं माईंनी आपल्याशी प्रेमाने बोलावं. सून म्हणून तिचा आदर करावा. घरचे रीतिरिवाज सांगावेत. पण माई अजूनही तिच्याशी अंतर राखून वागत होत्या. रेवतीला काय हवं, नको ते सगळं अमोलला विचारत होत्या.
सासू -सुनेतले हे अंतर कमी व्हावे म्हणून रेवतीने आपल्या सासुबाईंशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

दोन दिवसांनी अचानक माई आजारी पडल्या. रेवतीने शक्य तितकी माईंची सेवा केली. त्यांना काय हवं नको ते पाहिलं. माई बऱ्या झाल्याही. पण त्यांचे वागणे तसेच राहिले.

आठ दिवस सरले. माईंच्या वागण्याने नाराज झालेली रेवती डोळ्यात पाणी आणून निघायच्या तयारीला लागली. अमोललाही कळत नव्हते, माईचे नक्की काय बिनसले आहे ते? त्याने खोलीत येऊन माईंचा निरोप घेतला.
"माई निघतो आम्ही."

"बरं. तुझ्या बायकोला सांग, थोडं सामान बांधून ठेवलं आहे ते सोबत घेऊन जा. तिथे काही अडलं नडलं तर आम्ही आहोत म्हणावं."

"माई, हे काय चाललंय तुझं? आल्यापासून पाहतो आहे मी. रेवती तुझी कोणीच नाही का? असे तिच्याशी अंतर ठेऊन वागलीस तर तिला या घराविषयी ओढ कशी वाटणार? तिने इथे रुळण्याचा प्रयत्न केला ना? मग तू का अशी वागतेस? तुझ्या मनात तिच्याविषयी माया आहे ना? मग ती व्यक्त कर ना.."अमोल चांगलाच वैतागला होता.

"अरे, ती शहरातली मुलगी. इथे तिला कसे करमायचे? गावाकडच्या चालीरीती निराळ्या, शहरातलं वातावरण वेगळं आणि तिच्या शहरातल्या पद्धती आपल्याला नाही झेपायच्या."


"हा गैरसमज मनातून काढून टाक माई. रेवती खूप चांगली मुलगी आहे." अमोलच्या या म्हणण्यावर माई काहीच बोलल्या नाहीत.

आता माईंनी बोलावलं तरच इथे यायचं, असे मनाशी ठरवत रेवतीने भरल्या डोळ्यांनी त्यांचा निरोप घेतला.
माईंनीही रेवतीला डोळे भरून पाहून घेतलं. पण त्यांच्या मनात असलेली माया ओठावर आलीच नाही.

कधी कधी मनातले गैरसमज नात्यात पसरले की नात्यातले अंतर वाढत जाते. वेळीच साधलेला संवाद हे गैरसमज दूर करण्यास नक्कीच मदत करेल. मात्र संवाद साधण्याची तयारी दोघांची असावी, तरच नाते फुलायला मदत होईल.
समाप्त.

©️®️✍️सायली जोशी.