अंत भाग -1

Gosht eka kutumbachi

"खबरदार सुनबाई.. उंबऱ्याबाहेर पाऊल टाकलत तर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होतील." हे ऐकून मेघनाने पंतांकडे -शरदरावांकडे म्हणजेच आपल्या सासऱ्यांकडे एक नजर टाकली आणि ती आपल्या तापाने फणफणलेल्या सासुबाईंच्या, वसुधाबाईंच्या हाताला धरून घराबाहेर पडली.
"केवढा हा अपमान आमचा?" पंतांचा आवाज दूरवर रस्त्यापर्यंत येत होता.

मेघनाने पट्कन पुढे होऊन गाडी काढली आणि सासुबाईंना त्यात बसवून तिने गावातल्या मोठ्या दवाखान्याकडे नेली. गाडी गल्ली -बोळातून सुसाट धावत होती आणि गावातल्या बायका आश्चर्याने मेघनाकडे आणि सुसाट पळणाऱ्या गाडीकडे पाहत होत्या.
एरवी घराबाहेर न पडणाऱ्या देशमुखांच्या बायका आज गाडीतून जाताना दिसत होत्या! तर इकडे वसुधाबाई गाडीत जीव मुठीत धरून बसल्या होत्या.

ग्लानीत वसुधाबाईंचे विचार सुसाट धावत होते. घरात पंतांची शिस्त ,नियम इतके कडक होते की ते ज्यांनी मोडले त्यांची खैर नसे आणि हे साऱ्या गावाला माहिती होते. घरातल्या स्त्रियांचे हसण्या- खिदळण्याचे आवाज ऐकू येता कामा नयेत. त्यांनी कामा व्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडता कामा नये. 'त्या चार दिवसात' आपली खोली सोडून घरात कुठेही फिरू नये.
रोजचा स्वयंपाक साधा असावा. शिवाय घरात सर्व वस्तू जागच्या जागीच असल्याच पाहिजेत. स्वच्छता तर इतकी भयानक ठेवावी लागे, की पंतांच्या सूचना ऐकून गडी वैतागून जात.

वसुधाबाई लग्न करून देशमुखांच्या घरी आल्या तेव्हा केवळ वीस वर्षांच्या होत्या. शरदरावांच्या आई, म्हणजेच माईंच्या शिस्तीत, धाकात त्यांचा संसार फुलू लागला.
यथावकाश संसाराच्या वेलीवर तीन फुले उमलली, महेश, सुहास आणि कीर्ती. वसुधा आपल्या तीनही मुलांत रमून गेली. घरात मदतीला दोन गडी होते, सासुबाई होत्या. बाकी घरचा कारभार, शेती आप्पा म्हणजे सासरे पाहत होतेच. त्यामुळे फारसे अडले नाही त्यांचे कधी.

शरदरावांचे लहान भाऊ अजित हे कामानिमित्त शहरात राहत असत. ते आपल्या कुटुंबासह अधून - मधून येत गावाकडे. त्यांच्याकडून शहरातल्या अनेक गोष्टी वसुधाला ऐकायला मिळत.
मग वसुधाबाईंना वाटे, 'आपणही शहरात जावे. तिथल्या गाड्या, धावणाऱ्या बसेस, चकचकीत रस्ते, मोठ- मोठाल्या इमारती पाहाव्यात, काचेच्या दुकानातून उंची कपडे खरेदी करावेत..आपली सारी हौस- मौज करून घ्यावी.'
एक दिवस हिंमत करून वसुधाबाईंनी आपली सारी हौस शरदरावांना बोलून दाखवली.

तसे शरदराव खूपच भडकले. "ह्या गावातून कोणी कुठेही जाणार नाही. या घरचा मोठा मुलगा आहे मी आणि तू मोठी सून. माझी बायको, या घरची सून म्हणून तू घरची सारी जबाबदारी पार पाडणे, तुझे कर्तव्य आहे. इथल्या जबाबदाऱ्या सोडून शहरात राहायला जाणं मला अजिबात जमणार नाही."

"अहो मी कायमचे राहायला जायचे असे म्हणत नाही. जाऊबाई सारख्या बोलावतात, म्हणून चार दिवस जाऊन यावं..." वसुधा घाबरत, अडखळत आपल्या नवऱ्याला म्हणाली.

"तुमची हौस- मौज करायला इथे आम्हाला वेळ नाही. आधी घराकडे, मुलांकडे लक्ष द्या. तेच तुमचे काम आहे. नसत्या उठाठेवी हव्यात कशाला? "असे म्हणत शरदराव खोलीतून बाहेर निघून गेले. तर दाराआडून ऐकणाऱ्या माई तोंड वाकडं करून शरदरावांच्या मागे निघून गेल्या.

"माई अजित माझे ऐकत नाही. लहानपणापासूनच बंडखोर आहे तो. त्यात आप्पांचा लाडका आहे. त्यांचीच कृपा.. दिली मुभा आणि आता तो राहतो शहरात! नको म्हणत असताना तिथे स्थाईक झाला.
आता आमच्या कुटुंबाला तिथली ओढ लागली. उद्या तिथेच स्थाईक होऊ म्हणतील! एकदा का तिकडे गेलो की गावची आठवणही यायची नाही त्यांना. या बायकांच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही." बैठकीच्या खोलीत अस्वस्थतेने येरझाऱ्या घालत शरदराव माईंशी बोलत होते.

"खरचं आहे रे. माझा अजित पुरा बायकोच्या तालावर नाचतो. नको नको म्हणताना, तो मला सोडून गेला. आता तुही जाऊ नकोस रे. आम्हाला म्हातारपणाचा आधार कोण? एकटे पडू आम्ही. आता तुझ्या आप्पांचे वय झाले. कामे झेपत नाहीत त्यांना फारशी. त्यात तुझी बायको ही अशी. आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं मग? आपल्याच पोरांनी पाठ फिरवली तर, आई -बापांन पाहायचे तरी कोणाकडे?" असे म्हणत माईंनी नाटकीपणाने डोळ्याला पदर लावला.

" माई मी कुठेही जात नाही आणि तुझी सूनही. नको काळजी करू. बघतो मी काय करायचे ते.." आणि तेव्हापासून शरदरावांनी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता आपल्या मुलांवर, बायकोवर आणि साऱ्या घरावर निर्बंध लादले. 'घरातल्या स्त्रियांनी कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये. मुलांनी शाळा ते घर आणि घर ते शाळा इतकेच काय ते यावे आणि जावे. त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घरात येऊ नयेत. घरात कायम शांतता असावी. गडबड -गोंधळ असू नये. वसुधेने मुलांकडे बारीक लक्ष द्यावे. त्यांना काय हवे नको ते पहावे. त्यांच्यावर चांगले संस्कार करावे.'

हे इतके सारे निर्बंध ऐकतील तर ती मुले कसली? मग ती जास्तच हट्ट करू लागत. वसुधा त्यांना समजावे. पण शरदराव मात्र त्यांना जबर शिक्षा करत. त्यामुळे मुलांच्या मनात आपल्या वडिलांविषयी भीती निर्माण झाली.

त्या घटनेनंतर शरदरावांनी वसुधाशी बोलणे टाकले. अगदी कामापुरते बोलत असत ते. वसुधाला तर कळतच नव्हते, "आपण इतका मोठा काय गुन्हा केला आहे!"

आप्पांनी आपल्या मुलाला समजावून पाहिले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे शरदराव आप्पांशीही फटकून वागू लागले. ते फक्त माईंशी नीट बोलत असत. आता माईही वसुधाला दोष देऊ लागल्या, 'आमचे घर फोडायला निघालीस म्हणून. ' यामुळे वसुधा बुजून गेली. अबोल बनली. इतरांनी सांगायचं आणि तिने फक्त 'हो' म्हणायचं असा स्वभाव बनला तिचा.

ही गोष्ट अजितच्या कानावर गेली आणि तो आपल्या भावाची समजूत काढायला गावी पोहोचला.

क्रमशः

सायली जोशी, ईरा कोल्हापूर

विषय: कौटुंबिक कथा

🎭 Series Post

View all