अंत भाग अंतिम

Gosht eka kutumbachi

सायली जोशी
टीम कोल्हापूर
कथामालिका विषय: कौटुंबिक कथा
शीर्षक: अंत भाग -अंतिम

पंतांना नेहमीपेक्षा उठायला उशीर झाल्याने महेश त्यांना बोलवायला आला. कीर्तीच्या सासरी पूजेला जायचे असल्याने सारे जण आवराआवर करत होते. गडबडीने पंतांनी उठून आन्हिक आवरले आणि ते तयार झाले.
सारे जण आवरून पंतांची वाट पाहत होते. उशीर झाला म्हणून सुहास आणि महेश आधीच बाहेर पडले होते. त्यामुळे मेघना गाडी चालवण्यास बसली. पंतांना हे पसंत पडेना, नाईलाजाने ते मेघनाच्या शेजारी बसले. सुमारे तासाभराचं अंतर मेघनाने इतक्या सफाईदारपणे पार पाडलं, की पंतांनी मनातल्या मनात तिची स्तुती केली.

इकडे पूजा सुरू झाली होती. कीर्ती आणि धीरजची जोडी खूपच छान दिसत होती. वसुधाबाई आपल्या लेकीला पाहून गहिवरल्या. थोडयाच वेळात आरतीने पूजेची सांगता होऊन पूजा पार पडली. कीर्तीच्या सासू-सासर्‍यांनी आपल्या पाहुण्यांना व्याह्यांची ओळख करून दिली. कीर्तीचे सासरेही अगदी मनमोकळ्या स्वभावाचे होते. घरातल्या प्रत्येक कामात त्यांचे बारीक लक्ष होते. मदत करत होते.
पंतांनी हे सारे पाहिले आणि ते कुठेतरी स्वतःवरच नाराज झाले. त्यांना वाटले 'कुटुंब असावे, तर असे.'

थोड्याच वेळात जेवणावळी पार पडल्या आणि देशमुख मंडळी पुन्हा आपल्या गावी जाण्यास निघाली. कीर्ती वसुधाबाईंना बिलगली. त्यांनी आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला आणि सांभाळून राहण्यास सांगितले. तेथून निघताना पंतांचा पाय जड झाला होता. पण 'हे पडले लेकीचे सासर! येथे राहायचे कसे, अगदी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी?' सारे जायला निघाले. अजित भाऊजी आणि जाऊबाई येथूनच आपल्या घरी गेले.

गाव जवळ येऊ लागले तसे, वसुधाबाईंनी मेघनाला गाडी अंबाबाईच्या मंदिराकडे वळवायला सांगितली. देवळापाशी गाडी थांबली आणि सारे जण त्यातून खाली उतरले. पंतांना पाहताच तिथला पुजारी धावत -पळत पुढे आला आणि त्याने वाट मोकळी करून, साऱ्या देशमुख मंडळींच्या दर्शनाची व्यवस्था केली.

देवीच्या मूर्तीपुढे वसुधाबाई हात जोडून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, "आई आज तुझ्या दर्शनाची तीव्र इच्छा झाली म्हणून इथवर आले. इथून पुढे मी तुझ्या दर्शनाला येऊ शकेन की नाही, माहित नाही. आजपर्यंत माझे काही चुकले असल्यास, क्षमा कर आणि इथून पुढे साऱ्यांना सांभाळून घे. बस् ,इतकीच इच्छा उरली आहे आता."
वसुधाबाई सारे मनापासून बोलत होत्या. त्यांना स्वतःच्याच बोलण्याची थोडीशी भीती वाटली आणि त्या स्वतःशीच म्हणाल्या, 'देवाच्या मनात जे असेल तेच होईल.'

पाचव्या दिवशी पाचपरतवणीला कीर्ती आपल्या माहेरी आली. तिच्या येण्याने घर पुन्हा भरून गेले. आपल्या सासरचे कौतुक तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. सासरच्या लोकांबद्दल काय बोलू आणि काय नको, असे तिला झाले होते. वसुधाबाईंना खूप समाधान वाटले, 'आपली लेक योग्य घरी पडली याचे.'
चार दिवस राहून कीर्ती पुन्हा आपल्या सासरी निघून गेली.

पंतांचा स्वभाव हळूहळू बदलत होता. अधूनमधून त्यांच्या कुरबुरी सुरू होत्या. मात्र त्याकडे सारे आता दुर्लक्ष करीत होते.

एका महिन्यानंतर वसुधाबाईंची तब्येत अचानक बिघडली. उपास -तापास, औषधोपचार सारे काही झाले. पण गुण कशानेच येईना. कीर्तीही आपल्या आईसाठी धावत पळत पुन्हा माहेरी आली. डॉक्टरी उपायही थकले आणि घरची सारी मंडळी पुन्हा एकदा काळजीत पडली.

पंतांना आता वसुधाबाईंचे आजारपण सहन होईना. त्या आपल्या आजुबाजूला नसल्याची कल्पनाही त्यांना करवेना. थकलेल्या, कृश झालेल्या आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन पंत वसुधाबाईंच्या उशाशी बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती, काळजी असे मिश्र भाव दाटून आले होते.
मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत पंतांनी वसुधाबाईंकडे पाहिले.
तशा वसुधाबाई पंतांना म्हणाल्या, "शरद आता माफी मागून काहीच उपयोग नाही हो. आता खूपच उशीर झाला आहे."
आपल्या मनातले ओळखल्याने पंतांनी आश्चर्याने वसुधाबाईंकडे पाहिले. उभ्या आयुष्यात पंतांनी वसुधाबाईंकडून आपल्यासाठी 'शरद 'हा असा एकेरी उल्लेख कधीच ऐकला नव्हता.

"नाही वसुधा आज मला बोलू दे." पंत गहिवरून म्हणाले.

"वसुधे, तुझी सारी स्वप्नं, इच्छा, आकांक्षा मी धुळीला मिळवल्या. तुझ्यासोबत संसार केला, मात्र तो सुखाचा कधी झालाच नाही. मी भीतीपोटी माझे नियम, अटी, शिस्त सर्वांवर लादत गेलो. माईनेही माझ्या विचारांना खत -पाणी घातले. खरंतर तिने माझा कान धरायला हवा होता गं. सर्वांनी माझ्या अपेक्षेप्रमाणेच वागले पाहिजे, असा कायम आग्रह धरला मी. कुणापुढे झुकलो नाही कधीच.

पण जेव्हा सुहास बोलला, तेव्हा कुठे मला जाणीव होऊ लागली, आपण चुकत आलो इतकी वर्ष. कदाचित हा वाढत्या वयाचाही परिणाम असू शकतो.

आठवतं तुला? अप्पा मला तुझी बाजू घेऊन समजवायला आले होते. पण मी त्यांना उलट बोलून जिव्हारी लागतील असे अनेक शब्द बोललो होतो. किती दुखावले गेले होते ते! आता त्यांच्या जागी मी उभा होतो आणि माझ्या जागी सुहास! तुम्ही सगळी माझीच माणसे आहात, हे विसरूनच गेलो होतो गं आणि आपल्याच माणसांना दुखावलं मी.

बघ, तू आज ना उद्या नक्की बरी होशील. मग सारं जग फिरवून आणेन तुला. तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करेन मी. पण माझ्यापासून अशी दूर जाऊ नकोस गं. मी अगदी एकटा पडेन. इतकी वर्ष तू माझ्या आजूबाजूला होतीस, तेव्हा मला तुझ्या सोबतीची जाणीव नव्हती. पण आता विरहाची कल्पनाही नाही करवत वसुधा..." पंत अक्षरशः ढसाढसा रडू लागले आणि महेश त्यांना सावरू लागला.

त्याही परिस्थितीत वसुधाबाईंच्या चेहऱ्यावर किंचितशी हास्याची लकेर उमटली. त्या अस्पष्ट स्वरात म्हणाल्या, "मी म्हणाले तसा खरंच खूप उशीर झाला आहे. आता या गोष्टींना काहीच अर्थ उरला नाही. त्या मी केव्हाच मागे टाकल्या आहेत. खूप सहन केलं, सोसलं. आता अडवू नका पंत."

वसुधाबाईंनी मेघना आणि प्रीतीकडे एकवार नजर टाकली आणि त्या म्हणाल्या, "साऱ्यांनी सांभाळून रहा. एकमेकांची काळजी घ्या."

त्यांनी आपला हात पंतांच्या हातातून हळूवारपणे काढून घेतला.
पुसटशा स्वरात त्या म्हणाल्या "पंत तुमच्या बदलाची सुरुवात हा माझा 'अंत 'आहे.." आणि कुठल्याशा वेदनेने वसुधाबाईंनी आपले डोळे घट्ट मिटले, ते कायमचेच.
आता सारं काही संपलं होतं. 

कीर्ती वसुधाबाईंना बिलगून रडू लागली. मेघना आणि प्रिती, महेश, सुहास, वसुधाबाईंच्या जवळ बसून मूकपणे अश्रू ढळत राहिले, तर पंतांनीही आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली,  'माफी मागायची शेवटपर्यंत राहूनच गेले,' ही सल मात्र पंतांच्या मनात कायम राहणार होती अगदी अखेरपर्यंत.

समाप्त.













 

🎭 Series Post

View all