सायली जोशी
टीम कोल्हापूर
कथामालिका विषय: कौटुंबिक कथा
शीर्षक: अंत भाग2
गाडी दवाखान्याजवळ थांबली. तशा वसुधाबाई आपल्या विचारातून बाहेर आल्या. मेघनाने गाडीतून पट्कन उतरून आपल्या सासुबाईंना खाली उतरवले, पण अचानक वसुधाबाई तोल जाऊन खाली कोसळल्या आणि एकदमच गडबड उडाली.
बराच वेळाने वसुधाबाईंना जाग आली. तेव्हा त्या दवाखान्यातल्या बेडवर झोपल्या होत्या. त्यांच्या बाजूच्या बेडवर मेघना, महेश आणि कीर्ती बसले होते.
"आई ठीक आहात ना?" सासुबाईंना जाग आलेली पाहताच मेघना त्यांच्या जवळ जात म्हणाली. कीर्ती आपले डोळे पुसत वसुधाबाईंना बिलगली तर महेश डॉक्टरांना बोलवायला बाहेर गेला.
"महेशराव काळजी करण्याचं काही कारण नाही. ताप जास्त असल्यामुळे अशक्तपणा वाढला आणि त्यांना चक्कर आली. बाकी काही नाही. थोडे लवकर उपचार घेतले असते, तर ताप इतका वाढला नसता. असो, मी काही औषधे लिहून देतो ती मात्र वेळेवर त्यांना द्या आणि बाईंना थोडी हुशारी वाटली की, तुम्ही इथून घरी जाऊ शकता. घरी मात्र त्यांना पूर्ण विश्रांती घेऊ द्या." डॉक्टर वसुधाबाईंना तपासात म्हणाले.
इकडे घरी पंतांनी नुसता दंगा चालवला होता. नुकताच कामावरून आलेला सुहास त्यांना समजावत होता. पण कधी नव्हे ते सुहासची बायको प्रीती त्यांना बोलली म्हणून ते धुसफुसत होते. 'मुले बोलतात, आता सुनाही बोलू लागल्या.'
मग न राहवून सुहासने आता पंतांवर आवाज चढवला. " बास पंत.. आईला एवढे बरे नाही आणि तुम्ही तिची काळजी करायचे सोडून आम्हाला नियम पाळायला काय सांगता? लहानपणापासून हेच पाहत आलो आहोत आम्ही. एक बाप म्हणून तुम्ही आमच्यावर कधीही माया केली नाहीत. कुठल्याशा भीतीच्या छायेत, दडपणाखाली मोठे झालो आम्ही. आता आणखी अंत पाहू नका.
निदान आता तरी आपला हट्ट सोडा आणि आम्हाला सुखाने जगू द्या."
हे ऐकून प्रीती उभ्या जागी थरथर कापत होती. अबोल असणारा सुहास पंतांना इतके काही बोलेल असे तिला कधीच वाटले नव्हते.
बऱ्याच वेळाने वसुधाबाई घरी आल्या. त्यांच्या मागोमाग मेघना, महेश आणि कीर्ती आत आले. अपेक्षेप्रमाणे पंत घरात येण्यासाठी या साऱ्यांना आडवतील असे वाटले होते. पण घरचे वातावरण एकदमच शांत होते.
वसुधाबाई आपल्या खोलीत आल्या. तिथे शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर बसलेल्या पंतांना पाहून वसुधाबाईंच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती उमटली. पण त्या आल्याची चाहूलही पंतांना लागली नव्हती. मग त्या आवाज न करता गादीवर आडव्या झाल्या.
आजवर पंतांना कुणी विरोध केला नव्हता. ते म्हणतील तसेच वागत होते सारे. पंतांच्या मनात खळबळ माजली होती. समोर आप्पांचा फोटो भिंतीवर टांगला होता. मिटल्या डोळ्यांनीच पंत तो फोटो पाहत होते. क्षणभर त्यांना वाटले, आप्पा आपल्याकडे पाहून हसत आहेत आणि म्हणत आहेत, 'मी तुला समजवायला आलो होतो, तेव्हाही तू माझ्याशी सुहास सारखाच वागला होतास. मनाला लागेल असे खूप काही बोलला होतास. आज सुहासने तुला 'पंत 'म्हणून संबोधले. याचाच अर्थ असा की, तू आपल्या मुलापासून कितीतरी दूर गेला आहेस! चुकलास तू. आपल्या माणसांची मनं आपणच राखायची असतात..शरद.'
शरदरावांनी आपले डोळे उघडले. आज कितीतरी वर्षांनी स्वतःच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या हालचालीने वसुधाबाईंना जाग आली. आपल्या डोळ्यातले पाणी त्यांना दिसू नये म्हणून शरदराव पट्कन उठून बाहेर निघून गेले.
पण त्यांना असे शांत पाहून वसुधाबाईंना जाणीव झाली, की नक्कीच काहीतरी घडले आहे. त्याविना शरदराव इतके शांत धीरगंभीर कधीच नसत.
त्यांना बाहेर जाताना पाहून प्रीती वसुधाबाईंच्या खोलीत आली. महेशने आणलेली औषधे कशी घ्यायची, हे तिने वसुधाबाईंना समजावून सांगितले आणि झाला प्रकार थोडक्यात कानावर घालून ती निघून गेली.
वसुधाबाई चिंतेत पडल्या. पंतांसमोर कधीही आवाज न काढणारा सुहास त्यांना बोलला म्हणून त्यांना काळजी वाटू लागली. 'एखादी गोष्ट प्रमाणाबाहेर गेली, तर माणसाला त्याचं ओझं होऊ लागतं हे ही तितकच खरं. इतकी वर्ष सारं घर पंतांचा ऐकत आलं. पण आता मुले मोठी झाली. त्यांना स्वतःची मतं आहेत. त्यांनी आपल्या साऱ्याच गोष्टी ऐकाव्या, सुनांनीही माझचं ऐकावं असा अट्टाहास करणे बरोबर नाही.
अजित भाऊजी यांना समजवायला आले आणि त्या दिवसापासून या घराचा आणि त्यांचा संबंधच संपला. माझा राग यांनी अजित भाऊजींवर काढला. पंत नको -नको ते बोलले त्यांना. त्या दिवसापासून गेली अनेक वर्षे अजित भाऊजी आणि जाऊबाई इथे आल्या नाहीत. माई गेल्यानंतर भाऊजी एकटेच येऊन गेले, इतकेच काय ते.
जाऊबाईंचं पत्र कधीतरी येतं आठवणीने म्हणून त्यांची ख्याली -खुशाली समजते. कधीतरी वाटतं त्यांना डोळे भरून पाहावं. त्यांच्या मुलांना जवळ घ्यावं. कितीतरी मोठी झाली असतील आता मुले! 'प्रकाश आणि साधना.'
साधनाही आता लग्नाला आली असेल. ती ही साधारण कीर्तीच्याच वयाची आहे.
कीर्तीसाठी स्थळ आता पाहावीच लागतील. पुढच्याच महिन्यात चोवीसावं सरेल. आता तिच्या लग्नाची घाई करायला हवी. महेशला सांगून पंतांच्या कानावर हा विचार घालायला हवा.
महेश पंतांच्या आज्ञेत राहणारा, त्यांचा लाडका मुलगा! पंत केवळ त्याचेच ऐकतात. मेघना म्हणजे अगदी महेशच्या विरूध्द स्वभावाची. नसती शिस्त खपत नाही तिला. माणसानं नेहमी आपल्या मर्जीप्रमाणे वागावं.. असं तिचं म्हणणं.
माझा सुहास थोडा अबोल आहे. मात्र थोडा हट्टी आहे. कधीतरी उलटून बोलतो, मात्र नंतर त्याला त्याचा पश्चाताप होतो आणि आमच्या प्रितीबाई म्हणजे सौंदर्याचा आणि सोज्वळतेचा पुतळा जणू. आज त्या पंतांना उलट बोलल्या म्हणजे आश्चर्यच आहे!
पण ही चौघं पोरं आमच्या जीवाला जीव लावणारी. सूना, सासू म्हणून आमचा मान ठेवणाऱ्या, काळजी घेणाऱ्या.
आता आम्हाला आयुष्यात आणखी काही नको. फक्त आमच्या लाडक्या लेकीचे लग्न लागू दे. मनासारखं सासर तिला मिळालं, म्हणजे डोळे मिटायला आम्ही मोकळ्या.'
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा