Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अंत भाग -4

Read Later
अंत भाग -4

सायली जोशी
टीम कोल्हापूर
कथामालिका विषय: कौटुंबिक कथा
शीर्षक: अंत भाग -4

वसुधाबाईंची तब्येत अचानक बिघडली आणि घरी सर्वांची धावपळ झाली. मेघना आणि प्रिती काळजीत पडल्या. पण डॉक्टरांनी फारसे काळजीचे कारण नसल्याचे सांगितले. त्यांनी थोडं पथ्य -पाणी सांगितलं. मात्र मानसिक ताण आला असण्याची शक्यता त्यांना जास्त वाटत होती. त्यामुळे 'घरचे वातावरण कायम हसते- खेळते हवे. कसलाही ताण वसुधाबाईंवर येता कामा नये.' असे डॉक्टर पंतांना सांगून गेले. इतक्या वर्षात पंतांच्या चेहऱ्यावर आज प्रथमच काळजी दिसली, आपल्या बायकोसाठी!

कीर्तीच्या होणाऱ्या सासुबाई आपल्या लेकासह, वसुधाबाईंना भेटायला आल्या. मायेने त्यांची विचारपूस केली त्यांनी. आपल्या जावयाकडे पाहून वसुधाबाई खुश झाल्या. 'एकुलत्या एका लेकीचं लग्न..असे आजारी पडून कसे चालायचे?'
लवकरच त्या हिंडू फिरू लागल्या.

आता वसुधाबाईंची तब्येत बरी असल्याने लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली.
वसुधाबाईंनी सुहास आणि प्रितीला बोलावून घेतले आणि जवळचा मुहूर्त बघून कीर्तीचे लग्न लवकर कसे पार पडेल, हे पाहायला सांगितले. त्यानुसार तीन आठवड्यांनी उत्तम मुहूर्त मिळाला आणि दोन्ही घरी लग्नघाई सुरू झाली.

देशमुखांच्या घराला रंगरंगोटी करण्यात आली. दरवाज्याच्या बाजुस गजाननाची प्रतिमा कोरून, 'शुभ -विवाह 'अशी वळणदार अक्षरे कोरली गेली. तोरणं, फुलांच्या माळांनी घर सजले. दारात मोठा मंडप उभारण्यात आला. निरनिराळे फराळाचे, गोडाधोडाचे पदार्थ तयार होऊ लागले.
वसुधाबाई या तयारीत रमून गेल्या, तर पंत उत्साहाने स्वतः जातीने या साऱ्या तयारीवर देखरेख करत होते.

लग्न गावात, घरच्या अंगणातच पार पडणार असल्याने, छापलेल्या पत्रिका जवळजवळ साऱ्या गावभर वाटण्यात आल्या.

हळूहळू पाहुणे मंडळी जमू लागली. मेघना आणि प्रितीच्या माहेरची मंडळीही आली. आता वसुधाबाईंच्या दोन्ही सुना आणखी जोमाने कामाला लागल्या. महेश आणि सुहासची धावपळ होऊ लागली आणि पंत आपला स्वभाव विसरून सर्वात मिसळून गेले. ते वसुधाबाईंची काळजी घेऊ लागले, त्यांना काय हवं, काय नको ते पाहू लागले.
कीर्तीच्या लग्नामुळे जादूच झाली होती जणू! जावयाचा पायगुण म्हणायचा.. सारं काही अगदी छान, सुरळीत होऊ पाहत होतं. पंतांचा स्वभावही हळूहळू बदलत होता.

चार दिवसांनी कीर्तीच्या मेहंदीचा कार्यक्रम रंगला. मैत्रिणींनी तिच्या हातावर छान, नक्षीदार मेहंदी काढली. दुसऱ्या दिवशी मुहूर्तमेढ रोवली गेली आणि कीर्तीच्या हाती हिरवा चुडा भरला गेला.

"आता नवरी मुलीने घराबाहेर पडायचे नाही बरं!" असे म्हणत अजित भाऊजी आणि जाऊबाई घरात आल्या आणि वसुधाबाईंच्या आनंदाला पारावर उरला नाही.
कितीतरी वर्षांनी ते 'आपल्या घरी 'आले होते. पंत आपल्या भावासोबत काही बोलले नाहीत. मात्र त्यांच्या चेहेऱ्यावर थोडीशी नाराजी दिसत होती. लग्न घर पाहुण्यांनी भरून गेले. मुहूर्त जवळ येऊ लागला, तशी गडबड सुरू झाली.

दुसऱ्या दिवशी नवऱ्या मुलाची उष्टी हळद कीर्तीसाठी पाठवली गेली. पिवळ्या रंगाच्या साडीत कीर्ती खूप छान दिसत होती. गळ्यात पिवळया नाजूक फुलांचा हार, कानात साजेसे झुमके..सजलेल्या कीर्तीची मेघनाने दृष्टच काढली. मेघना आणि प्रितीही सुंदर दिसत होत्या.
हळदीचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.

संध्याकाळच्या 'गोरज मुहूर्तावर 'लग्न लागायचे होते. आता मुहूर्त साधायची गडबड उडाली. थोडयाच वेळात नववधूला घेऊन वसुधाबाईंचे भाऊ, कीर्तीचे मामा स्टेजवर आले. वसुधाबाई समाधानाने सारे पाहत होत्या. त्यांचे डोळे पाणावले. 'लेकीच्या पहिल्या अक्षता पाहायच्या नाहीत, आईने! रीतच आहे तशी.' असे म्हणत त्या जड मनाने आत गेल्या.

भटजींनी मंगलाष्टक म्हटल्याचे सूर कानी येऊ लागले. मुहूर्तावर सनई -चौघडा वाजला आणि वधू- वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला.
लग्न लागले, तसे जेवणाच्या पंगतीवर पंगती बसल्या.
कीर्तीच्या पाठवणीवेळी सारेच भावूक झाले. न राहवून पंतांच्या डोळ्यात पाणी आले. "आमच्या लेकीला सुखात ठेवा," इतकेच बोलले ते आपल्या व्याह्यांना.
मेघना, प्रिती आणि वसुधाबाईंनी कीर्तीला जवळ घेतले आणि भरल्या मनाने कीर्ती आपल्या सासरी गेली.

दुसऱ्या दिवशी अजित भाऊजी आणि जाऊबाई आपल्या घरी जायला निघाले. जाऊबाई वसुधाबाईंना म्हणाल्या, "वहिनी तुमच्या आग्रहाला मान देऊन अनेक वर्षानंतर आपल्या घरी आलो आम्ही. महेश, सुहासला आम्ही पाहिलं तेव्हा किती लहान होते दोघेही! आता जबाबदारीने वागतात आणि दोघी सुनाही चांगल्या आहेत बरं स्वभावाने. त्यांच्या लग्नाला येण्याचा योग नव्हता आमचा. पण कीर्तीचा लग्नसोहळा अगदी छान पार पडला. आता तुम्ही साधनाच्या लग्नाला जोडीने यायचं..."अचानक बोलता बोलता जाऊबाई थांबल्या. त्यांनी पंतांकडे एक नजर टाकली. पण पंत शांत होते.

वसुधाबाई, भाऊजी आणि जाऊबाईंना राहण्याचा आग्रह करू लागल्या. 'त्यांच्याशी कितीतरी गोष्टी बोलायच्या होत्या, मन मोकळे करायचे होते.' वसुधाबाईंनी अपेक्षेने पंतांकडे पाहिले. पण पंत काहीच बोलेनात. पंतांच्या चेहऱ्याकडे पाहून क्षणभर वसुधाबाईंना भीती वाटली, त्यांचा बदलू पाहणारा स्वभाव पुन्हा पहिल्यासारखा झाला तर?

इतक्यात प्रिती निरोप घेऊन आली, "उद्या सकाळी कीर्तीच्या सासरी पूजेला साऱ्या देशमुख मंडळींना बोलावलं आहे."
आता अजित भाऊजी आणि जाऊबाईंना
राहावे लागले. रात्रभर वसुधाबाई आणि जाऊबाईंच्या गप्पा रंगल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मने मोकळी झाली आणि पहाटेच्या सुमारास बऱ्याच दिवसांनी वसुधाबाईंना निवांत अशी झोप लागली.

इकडे पंतांचा मात्र रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. एकुलती एक लेक सासरी गेली, 'आता वेळच्या वेळी आपल्याला आठवणीने औषध कोण आणून देणार? वसुधेचा निरोप माझ्यापर्यंत कोण पोहचवणार? "बाबा, तुमची शिस्त जरा अति होतेय बरं.."असा दम भरणारी लेक आता 'परक्याची' झाली.
आई लेकीच्या लग्नानंतर तिच्या अधिक जवळ येते आणि बाप मात्र आणखी दुरावतो!' विचार करता करता पहाटे कधीतरी पंतांचा डोळा लागला.

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//