Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

आणि याज्ञसेनी हसली

Read Later
आणि याज्ञसेनी हसली
स्पर्धा : राज्यस्तरीय लघुकथा करंडक
विषय : आणि ती हसली
नाव : आणि याज्ञसेनी हसली
टीम : छत्रपती संभाजी नगर


रात्रीचा प्रहर होता. श्रीकृष्ण ध्यानमग्न होऊन आपल्या बैठकीवर विराजमान होते. एक मंद प्रकाश देणारा दिवा तेवत ठेवला होता. तेवढ्यात एक दास सम्राग्नी पांचाली भेटायला आल्या आहेत हा निरोप घेऊन आला. श्रीकृष्ण यांनी हातानेच इशारा करून अनुमती दिली. श्रीकृष्ण म्हणजे त्याकाळी भूतलावरील सर्वात तेजस्वी व्यक्तिमत्त्व. ते दिवसा सुर्यासमान प्रखर आणि रात्री चंद्रासमान शीतल भासत. ज्ञानाचा अफाट सागर त्यांच्याजवळ होता. पण मुखावर किंचितही गर्व नव्हता. थोड्या वेळाने धीमी पावले टाकत सम्राग्नी द्रौपदीने प्रवेश केला. तिच्या नजरेत एक अनामिक भीती होती. तिने लाल वस्त्रे परिधान केली होती. मोकळे केस तिने घेतलेल्या प्रतिज्ञेचे स्मरण करून देत होते. अग्नितून निपजलेली असल्यामुळे मुखावर अग्निसम तेज होते. नेत्रांमध्ये एक निर्धार होता. मुखावर निराकार भाव होते. नारीजातीची जन्मजात कोमलता लयास जाऊन जीवनातील कटू अनुभवांमुळे एक वेगळीच कठोरता व्यक्तिमत्वात आली होती. तरीही हृदयात अद्यापही करुणा शिल्लक होती.

" प्रणाम गोविंद. " द्रौपदी म्हणाली.

" प्रणाम. इतक्या रात्री कशी आठवण आली ?" श्रीकृष्ण मंद स्मितहास्य करत म्हणाले.

" आर्य युधिष्ठिरकडून समजले की उद्या आर्य भीमसेन दुशासनाचा वध करतील. " द्रौपदी म्हणाली.

" होय याज्ञसेनी. योग्य बातमी कानावर आली आहे. उद्या कदाचित तुझ्या मोकळ्या केसांवर रक्ताचा अभिषेक होईल. " श्रीकृष्ण म्हणाले.

" माधव , एकीकडे माझे केस त्या पापीच्या रक्तासाठी तहानलेले आहेत तर दुसरीकडे माता गांधारी समोर येतात. मी कस सामोरी जाऊ त्या शिवभक्तीनीला ? या सर्वांमध्ये त्या साध्वीचा काय दोष ? रामायणात देवी सीतेने लक्ष्मणास पुत्रवत प्रेम केले आणि उद्या मी दुशासनाच्या रक्ताने केसांवर अभिषेक करणार ? मी स्त्रीधर्माला कलंक तर लावत नाहीये ना ? इतिहास मला काय म्हणून लक्षात ठेवेल ?" सम्राग्नी पांचाली हुंदका देत म्हणाली.

" पांचाली , माता गांधारीचा विचार नको करू. संपूर्ण नारीजातीचा विचार कर. त्या सभेत फक्त तुझा अपमान झाला नाही तर आर्यावर्तच्या संपूर्ण स्त्रीजातीचा अपमान झाला. जिथे भरतभूमीच्या सम्राग्नीला सभेत खेचून निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला जातो तिथे सामान्य स्त्रियांची काय अवस्था असेल ? भावविवश नको होऊ. धृपदनंदिनी , दुशासन आणि सौमित्रची काही तुलना नाही. सौमित्रने देवी सीतेला कधी नजर वर करूनही पाहिले नाही. म्हणूनच त्याला सीतेच्या पायाचीच आभूषणे ओळखू आली. इतिहास तुला कायम आदर्श नारीच्या रूपात पाहतील. भविष्यात जेव्हा जेव्हा स्त्रीजातीवर अन्याय होईल तेव्हा तुझे उदाहरण त्यांना कायम प्रेरणा देईल. प्रतिशोध म्हणून नाही तर न्याय प्रस्थापित करण्यासाठी उद्या तुला केस धुवावे लागतील. मी तुझ्या पाठीशी आहे. या युद्धानंतर सर्वात जास्त दोषारोप माझ्यावरच होतील. त्याची चिंता नको करू. सूर्योदयाची वाट पहा. उद्याचा सूर्योदय अधर्मावर धर्माचा विजयी झेंडा फडकवेल." श्रीकृष्ण तेजस्वी वाणीतून बोलले.

***

दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झाले. यावेळी सेनापतीपद राधेय म्हणजेच सुर्यपुत्र कर्ण यांच्याकडे होते. माता कुंतीला वचन दिल्याप्रमाणे त्यांचे लक्ष्य केवळ अर्जुनवध हेच होते. अर्जुनाचा रथ समोर आल्यावर अंगराज कर्ण यांच्या मुखावर विशेष प्रसन्नता आली. गांडीवधारी , भूतलावरील महान धनुर्धर पार्थ आणि सारथी कोण तर साक्षात नारायण. या जोडीकडून पराभव जरी आला तरी तो किती श्रेष्ठ असेल हा विचार कर्णाच्या मनात विजेप्रमाणे चमकून गेला. सारथी राजा शल्य यांचा आवाज कानावर पडताच महारथी कर्ण पुन्हा भानावर आले.

" काय झाले सेनापती ? घाबरलात ?" राजा शल्य हसले.

" नाही. समोर जो रथ उभा आहे त्याचा प्रतिकार केवळ महादेव करू शकतात. पण हे सौभाग्य मला लाभले याचा आनंद होतोय. " विलक्षण तेजस्वी असलेले अंगराज कर्ण उद्गारले.

***

पांडवांचे सेनापती धृष्टद्युम्न यांनी योजल्याप्रमाणे दुशासनाला रणात एकटे पाडून त्याच्यापर्यंत कुणाचीही मदत पोहोचू नये अशी व्यवस्था करण्यात आली. अखेर भीमसेन आणि दुशासन समोरासमोर आले. समोर मृत्यू दिसत असूनही तो गांधारीनंदन डगमगला नाही.

" दुशासना , मी तुला गदायुद्ध करण्याचे आव्हान देतोय. आज तुला कुणीच वाचवू शकत नाही. " भीमसेन गर्जला.

भीमसेन आपली गदा घेऊन रथाखाली उतरले. पर्वतासमान शक्तीशाली आणि मजबूत देहयष्टी असलेल्या भीमसेनच्या नेत्रांमध्ये आग भडकत होती. दुशासनही रथाच्या खाली उतरला.

" मी भित्रा नाही. माझी गदाही तुझ्यासोबत लढण्यासाठी किती दिवसापासून आसुसलेली आहे." दुशासन गर्जला.

रागात भीमसेनने गदा भूमीवर आपटली आणि मोठा कंप झाला. मग दोघांमध्ये गदायुद्ध सुरू झाले. भीम इतक्या त्वेषाने प्रहार करू लागला की गदांमधून अग्नीच्या ज्वाला पडू लागल्या. दुशासनाला मृत्यू समोर दिसत असूनही तो निर्भयपणे लढत होता. शेवटी त्याची गदा खाली पडली. भीमसेननेही आपली गदा फेकली. दोघेही मल्लयुद्ध करू लागले. भीमसेनने दोन्ही हात जोडून दुशासनाच्या देहावर प्रहार केला. दुशासन भूमीवर मूर्च्छित होऊन पडला. पण भीमसेनचा क्रोधाग्नि कुठे शांत होणार होता ? त्याने लाथा मारून दुशासनला परत जागी केले. तो परत दुशासनावर प्रहार करू लागला. भीमसेनला तो दिवस आठवला. ते हात आठवले ज्या हातांनी दुशासनाने द्रौपदीचे केस पकडून तिला दरबारात खेचत आणले होते. भीमसेनची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने दुशासनाचा एक हात उपटून काढला. दुशासन खूप मोठ्या आवाजात किंचाळला. मग दुशासनाला खूप वेळा भूमीवर आपटून भीमसेनने दुसरा हातही उपटून फेकला. आता भीमसेनला दुशासनाची छाती दिसत होती. त्याने आपले दोन्ही हात जोडून दुशासनाच्या छातीवर प्रहार करायला सुरुवात केली. दुशासनाच्या मुखातून रक्त बाहेर पडले. तो किंचाळला. हा त्याचा शेवटचा गगनभेदी आक्रोश. शेवटी त्याच्या देहातून प्राणपाखरू उडाला. सूर्यास्त झाला. दुशासनाच्या मृत्यूची बातमी अंगराज कर्ण , युवराज दुर्योधन यांच्यापर्यंत पोहोचली. अंगराज कर्ण यांनी पार्थला पराभूत केले पण केवळ सूर्यास्त झाल्यामुळे त्यांना पार्थला मृत्यू देता आला नाही. प्रिय बंधू दुशासनाला मृत पाहताच दुर्योधनाचे भान हरपले.

" कर्ण , माझा भाऊ मला कायमचा सोडून गेला. आयुष्यभर माझी सावली बनून राहिलेला माझा बंधू मला एकटे सोडून गेला. मी राम नाही पण तो माझा लक्ष्मण होता. " दुर्योधनने नभाचेही काळीज फाडणारा मोठा आक्रोश केला.

सेनापती कर्णने त्याचे सांत्वन केले. एका रथावर बसून देवी द्रौपदी कुरुक्षेत्री आली. भीमसेन तिला पाहून आनंदी झाले. भीमसेनने दुशासनाच्या शवाभोवती नृत्य केले.

" ये पांचाली , आज तू तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर. " भीमसेन असुरी हास्य देत म्हणाला.

देवी पांचाली दुशासनाजवळ असलेल्या एका दगडाजवळ बसली. माता कुंतीने बनवलेले लाडू चोरून खाणारा , घरात सर्वात जास्त अन्न ग्रहण करणारा , कुस्ती खेळताना मग्न होणारा , थट्टामस्करी करणारा , संकट आले तर कुटुंबरक्षणार्थ सर्वात आधी पुढे येणारा देवी हिडिंबाचा पती आज कुणालाच दिसला नाही. स्वयं सम्राट युधिष्ठिरही भीमसेनचे हे रूप पाहून चिंतेत पडले. एखादा दानव भीमसेनच्या देहात घुसलाय असा भास सर्वाना होऊ लागला. भीमसेनने दुशासनाच्या छातीचे रक्त काढून ते मुठीत भरून द्रौपदीच्या केसांवर टाकले. द्रौपदी चेहऱ्यावर कसलेच भाव न आणता दुशासनाच्या त्या मृतदेहाकडे बघत होती. भीमसेन तिच्या डोक्यावरून रक्ताचा अभिषेक करू लागला. रक्ताचा धारा द्रौपदीच्या देहाला भिजवू लागल्या. विटंबना झालेल्या मृतदेहाला पाहून द्रौपदीच्या नेत्रातून आसवे गळली.

" दुशासना , माझ्यात करुणा नाही असे समजू नको. वहिनी म्हणून थोडा जरी आदर दिला असता तर आज हा दिवस उगवला नसता. त्या दिवशी मला विष देऊन मृत्यू जरी दिला असता तरी मी क्षमा केली असती. तू नात्यांचा मर्यादाभंग केला नसता तर आज भीमसेनसमोर मी उभी राहिले असते. मी कठोर नाही. तुझ्या पापकर्मामुळे मला कठोर बनावे लागले. या युद्धात पहिला बाण तू मारला. आता युद्धाच्या अंताकडे मार्गक्रमणही तुझ्याच वधापासून सुरू होईल. " द्रौपदी मनोमन म्हणाली.

भीमसेनने दुशासनाचे रक्त मुखाला लावले आणि ते रक्त पिणार इतक्यात द्रौपदीने त्यांना अडवले.

" थांबा आर्य. आपल्या अभिमन्यूसोबत जे झाले ते दुशासनासोबत नका होऊ देऊ. मृतदेहाची अजून विटंबना नको. बंधू आहेत ते तुमचे. " द्रौपदी हुंदका देत म्हणाली.

बंधू ? लहानपणी मला खिरीत विष मिसळून मला नदीत फेकणारा बंधू ? सतत कटकारस्थाने रचून मला मारण्याची योजना बनवणारा बंधू ? नाही. जेव्हा पहिल्यांदा हस्तिनापूरात आलो तेव्हा दुशासन असा नव्हता. पण हळूहळू मामा शकुनीने मनात विष पेरले. दुशासन आजीवन दुर्योधनाची सावली बनून राहिला. कधी स्वतःची विवेकबुद्धी वापरलीच नाही. परिणामी तोही पापी बनला. त्याचा असा वध करून मी तरी कुठे पुण्यवंत राहिलोय ? भीमसेन भानावर आले. रक्त टाकले. उठले. त्यांनी मोठा आक्रोश केला.

" तुला तुझ्या पापकर्माची शिक्षा देताना मीच पापी बनलो." भीमसेन रडत म्हणाले.

" हे महादेवा , तुझे हृदय इतके पाषाणमय कसे झाले ? या नेत्रांनी पांडव-कौरवांना हस्तिनापूरच्या महालात एकत्र खेळताना बघितले. आज याच नेत्रांना भावाला भावाचे रक्त पिताना बघावे लागत आहे. हे दृश्य बघण्यापूर्वी गुरू द्रोणसारखे मलाही का नाही मृत्यू आला ?" कुलगुरू कृपाचार्य रडू लागले.

द्रौपदी उठली आणि दुर्योधनासमोर आली.

" धृतराष्ट्रपुत्र गांधारीनंदन युवराज दुर्योधन. बघ तुझ्या पापकर्मामुळे काय काय घडत आहे. या गाथेचा खलनायक तू आहेस. तू एक पुर्ण वंश बुडवला आहेस. तुझ्या हट्टापायी तू रक्ताची नदी वाहिली. चहूबाजूंनी बघ. या सर्वांचा तळतळाट तुला लागणारे. उद्या मामा शकुनी मरेल. त्यानंतर अंगराज कर्ण मरतील. तू कुरुक्षेत्रावर एकटाच उरशील. जशी मी त्या भर दरबारात मदतीची याचना करत होते तसच तुदेखील पळत फिरशील. अधर्माचे पतन सुरू झाले आहे. तुझा मृत्यू जवळ आहे. जेव्हा जेव्हा स्त्रियांची अब्रू मातीमोल समजणारे दुर्योधनदुशासन निपजतील तेव्हा तेव्हा एक याज्ञसेनी अवश्य जन्मेल. ती न्याय मिळवेल आणि समाज पुन्हा स्वच्छ करेल. तिच्या निश्चयाच्या अग्नीत पुरूषी अत्याचाराचे पातक भस्म होऊन सृष्टी पुन्हा पवित्र होईल. " द्रौपदी म्हणाली.

इतके बोलून द्रौपदी वळली. तिच्या मुखावर एक हास्य होते. खूप वर्षांनंतर ती निर्भयपणे हसली. हे हास्य सामान्य नव्हते. हे हास्य न्याय मिळाल्याचे होते. न्याय प्रस्थापित केल्याचे होते. हे हास्य भरतभूमीतील सर्व स्त्रीजातीच्या सन्मानाचे प्रतीक होते.

©® पार्थ धवनईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//