आणि ती उमगली

खरचं स्त्रीला कोणीच समजू शकत नाही.


स्पर्धा:- राज्यस्तरीय लघुकथा करंडक
विषय:- स्त्रीला समजून घेणं खरचं कठीण असतं का हो?
नाव:- आणि ती उमगली
टीम:- पालघर

"काय हो आई आधीपासून अश्याच आहेत का?"

"अश्या? म्हणजे?"

"काही नाही सोडा. बरं! आपण उद्या जायचं आहे ना माझ्या मैत्रिणीकडे?"

"हो जायचं आहे आणि हे बघ मी हाफ डे पण मागितला आहे सरांकडे."

"बरं.."

"बरं नाही बघ! नाहीतर परत बोलशील मी खोटं बोलत होतो. तुम्हा बायकांना काय बहाणेचं हवे असतात."

"काय म्हणालात?"

"काही नाही गं. उद्या काय कपडे घालू? म्हणजे काही ड्रेसकोड वैगरे आहे का?" तो विषय बदली करत बोलला.

"अम्म.. तसं काही माहीत नाही, पण पार्टी आहे तर सिम्पल पार्टीवेअरचं घालू."

"ओके! चल आवर पटकन म्हणजे लवकर झोपता येईल. मी पण उद्या हाफ डे घेतला आहे म्हणजे मला लवकर जाऊन कामं उरकली पाहिजेत नाहीतर सर परवासाठी जास्तीची कामं ठेवतील काढून."


ती स्मित करून किचन आवरून झोपायला येते. सकाळी तो कामावर निघून जातो आणि ही घरातली कामं भरभर आवरून सासूबाईंच्या जेवणाचं बघते.

वयाच्या पंधराव्या वर्षी झालेलं लग्न, सोळाव्या वर्षी पदरात एक मुलगा आणि विसाव्या वर्षी आलेलं वैधव्य यामुळे तिच्या सासूबाईंना संसार सुख फक्त पाच वर्षे मिळालं. एकट्याने मुलाला वाढवणं, आईवडील दोघांचं प्रेम देणं, समाजातील पुरुषजातीच्या त्यांच्या प्रती असलेल्या वाईट नजरा या सगळ्याला गेली कित्येक वर्षे त्या एकट्या सामोऱ्या जात होत्या म्हणून त्या चिडचिड्या झाल्या होत्या. या ना त्या कारणावरून सुनेवर चिडचिड करणं, तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढणं, भाजीत मीठ बरोबर असलं तरी कधी कमी आहे म्हणून ताट ढकलून देणं तर कधी न जेवणं, सगळं करून पण बाहेर काही ना काही खोटं सांगणं. या सगळ्याला ती खूप कंटाळली होती.

दोघे पार्टीला जाणार म्हणून सासूबाई काहीबाही कारणं सांगून तिचं काम वाढवून ठेवत होत्या. संध्याकाळी सहाचा प्रोग्राम होता. दिवसभर तिच्याकडून लाडू तर चिरोटे असे उशीर लागणारे आणि कामं वाढवणारे पदार्थ त्यांनी बनवून घेतले. शेवटी न राहवून तिने बडबड सुरू केली आणि त्या दोघींचा वाद झाला. तिने फोन करून त्याला सगळं सांगितलं आणि काही झालं तरी आता या घरात ती राहणार नाही असं तिने निक्षूनच सांगितलं आणि पार्टीचे कपडे घेऊन घराबाहेर पडली. ती खाली उतरत असतांना घरात जोरात काहीतरी पडल्यासारखा आवाज आला म्हणून ती माघारी फिरली तर सासूबाई पडल्या होत्या आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता. तिने तडक शेजारच्या भाऊंना बोलावून सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. रिक्षात बसून त्याला फोन करून कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेत आहोत? ते सांगून लगेच पोहोचायला सांगितले.

हॉस्पिटलमध्ये लगेचच त्यांना ऍडमिट करून घेतलं आणि चेकअप आणि काही टेस्ट झाल्यावर सासूबाईंना लकवा मारल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. चांगली काळजी घेतल्यास स्वतःची कामं स्वतः करू शकता येतील इतपत त्या बऱ्या होऊ शकतात असं डॉक्टरांच म्हणणं होतं. काही इंजेक्शन आणि मसाज ऑइल त्यांनी प्रिस्क्राईब केले. सगळ्या वेळा डॉक्टरांनी सांगितल्या. सांगितल्याप्रमाणे ती सासूबाईंची सगळी काळजी घेत होती. त्यांचं खाणं-पिणं, औषधांच्या वेळा, पायाची मालिश, त्यांचं शी-शू सगळं मनापासून ती करत होती. सासूबाईंच्या डोळ्यातही नकळत पाणी आले आणि त्यांनी तोडके मोडके हात जोडून तिची माफी मागितली. तिने सुद्धा सासूबाईंचा हात आपल्या दोन्ही हातात घेत नकारार्थी मान हलवत त्यांना डोळ्यानेच शांत राहण्यासाठी सांगितलं. तिथेच उभं राहून पहात असलेला तो स्वतःशीच म्हणाला..\"स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असत का?\"


कधी भांडते तर कधी चिडते आणि कधी कधी ओक्साबोक्शी रडून पुन्हा सगळ्या घराला आनंदी ठेवायला धडपडते.

समाप्त...