आणि ती जिंकली...

आपली क्षमता ओळखणं गरजेचं असत

नेहमीप्रमाणे आजही तिचा पारा चढलेलाच होता. नाक लाल होत, डोळ्यामध्ये वेगळाच आक्रोश दिसत होता, शारीरिक हालचाली पण अस्वस्थ वाटत होत्या. बॅग टेबलवर आपटत. आपल्या खुर्ची वर डोळे बंद करून उगीचच काही तरीच विचार करण्यात ती व्यग्र होती. 
      मी हळूच मागून गेले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. 
    "अरे देवा...", तिच्या दाटलेल्या कंठातून अचानक उद्गार निघाले.
"अग ये अशी का घाबरलीस मी आहे".
  दाटून आलेल्या कंठाची वाट मोकळी करत ती आपल्याच अडखळत्या स्वरात त्यात थोडी सांकेतिक भाषेचा वापर करून ती सांगू लागली. 
"मी बसमध्ये बसली कि तो मुद्दाम येतो माझ्या सीट जवळ आजूबाजूला आणि किळसवाणे स्पर्श करतो."
"काय? अग कोणी तरी आपला गैरफायदा घेतो आहे आणि आपण काय करतो आहे नुसतंच अश्रू गाळत बसलो आहे.अग आपला आत्मविश्वास तिथेच डगमगतो आणि मग समोरचा व्यक्ती आपल्या याच अवस्थेचा परत परत फायदा घेतो."
"मला खूप भीती वाटते ग त्याची. त्याच ते दाढी मिशीने माखलेलं तोंड, तो काळाकुट्ट चेहरा त्यात तो बचबच भरलेला खर्रा.... छेsssss किळस येते आठवलं कि आणि त्या घाणेरड्या हातांनी तो जेव्हा माझ्या पाठीला, मांडीला, कमरेला स्पर्श करतो ना तेव्हा तिरस्करणीय लहरी अंगात उठतात ."
"उद्या तो तुला परत भेटेल ना तेव्हा स्वतःलाच प्रश्न विचार... तो तुझ्याच सोबत का असा करतो? तू बधिर आहेस म्हणून काय? कि तू कमजोर आहे? किंवा तू दुर्बल आहेस ? बस मधील एवढ्या मुलींना सोडून नेमका तो तुलाच का आपला शिकार बनवितो ? एक ध्यानात ठेव तू फक्त कानाने बधिर आहेस बस एवढंच. मला दूरच दिसत नाही म्हणून मी चष्मा लावते तस तुझं आहे ऐकायला नाही येत म्हणून तू हे यंत्र वापरतेस. जेव्हा तू स्वतःला दीन दुबळी समजणे बंद करशील ना तेव्हाच पुढचा तुला घाबरेल नाही तर तुझ्या सारख्या कमजोर मनाच्या मुलींना शिकार बनवून तो आपल्या दोन पायांच्या खाली लपवून ठेवलेल्या असमाधानकारी पुरुषार्थाला असाच शमवेल. हि कूस जर तुझ्या आत्मविश्वासाला लागली ना मग सगळच हिरमुसडेल आणि याचाच फायदा तो भामटा घेत आला आहे आता पर्यंत. त्याला कळू दे तुझी ताकत आणि त्याची मर्यादा आणि हो आपली मदत आपल्यालाच करावी लागते. लक्ष्यात ठेव."
       तिने अश्रूंचा ओघ आवरला. डोळे घट्ट बंद केलेत आणि मनाला निवांत करू लागली. 
       पंचायत समिती मध्ये अपंग कोट्यात लिपिक म्हणून दोन महिन्या आधी तिची निवड झाली होती. नागपूर तळेगाव असं 100 किलो मीटर च अंतर ती ST महामंडळाच्या बसने गाठायची. निरागस तेज , डोळे झुकलेले, कानातील श्रवणयंत्र आणि  तिच्या मनाची दूविधावस्था चेहऱ्यावर साफ झळकत असायची. तीच बोललेलं अनेकांना नाही कळायचं. सौम्य श्रावण दोष पण उत्तम श्रवण यंत्राद्वारे तिला जवळपास सगळेच आवाज ऐकायला यायचे पण बोलतांना तिचा आत्मविश्वास खूप खालवायचा सतत हुरहूर असायची आपल्यातील अक्षमतेची. समोरच्याला आपण बोलले कळेल कि नाही या नादात ती बोलायला व्यक्त व्हायला खूप घाबरायची आणि त्याचाच फायदा तो उचलायचा. तो हि रोज सकाळी 10 ला यायचा त्याच बसमध्ये आणि आपल्यातील पुरुषार्थाला जागा करण्याचा प्रयत्न करायचा. कोणत्याही स्त्रीच्या शरीराला स्पर्श केला कि त्याला समाधान वाटायच. दोन पायाच्या मध्ये अस्वस्थ पडलेल्या त्याच्या पुरुषार्थाला लगेच चालना मिळायची मग त्याच अस्वस्थ अवयव अजूनच बैचैन व्हायचं आणि मग त्याचा स्वतःवर ताबा सुटायचा. त्या बैचैन आणि अस्वस्थ अवयवाला ताब्यात आणण्यासाठी मग तो नव्या तुरण्या म्हणा कि वयस्कर म्हणा कोणाचाही सहारा घेऊन आपली तृष्णा भागवायचा. आज चुकीने असं घडलं म्हणून तो माफी मागायचा आणि समोरच्या स्त्री ची प्रतिक्रिया बघून मग तोच तोच नको असलेला स्पर्श तिच्या शरीराला वारंवार करून आपली गरज भागवायचा. कदाचित भीती पोटी सगळे चूप बसायचे. तो शिकार हि अश्यांची करायचा जे फक्त नजरेने वार करतील. थोड्या घाबरट आणि दुर्बल मुली त्याच पहिलं टार्गेट असायच्या. गोष्ट विचार करायला भाग पडणारी होती. 
          तिची आजची रात्र विचारात कड बदलतच विस्तरली. रात्र जशी जशी गडद होत होती तिचा श्वास तसतसा उंचावत होता... रात्रेच्या गर्द शांततेत तिच्या मनात खळबळ माजलेली होती.. उद्याच्या सूर्योदयसोबत 
पुन्हा नव्याने दिवस उगवणार होता. नेहमीप्रमाणे तयारी करून ती निघाली पुन्हा त्याच दिशेने. वेळेवर बस आली. ती बसमध्ये चढली. हृदयाचे ठोके झपाट्याने वाढलेले होते तिने मूठ घट्ट बांधली आणि आज मुद्दाम कॉर्नरच्या सीट वर जाऊन बसली. तो हि चढला तिच्या मागोमाग. तिला कॉर्नरच्या सीटवर बघून तो आनंदी दिसत होता. त्याच्या घाणेरड्या डोळ्यांमधून ती चमक दिसत होती. 
त्याला तर सुवर्ण संधी लाभली होती. तो नेमका तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. बस सुरु झाली आणि सोबतच त्याचे चाळेही. 
        त्याने तिला अलगद स्पर्श करत तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूहळू त्याचा हात तिच्या छातीच्या दिशेने वळू लागला. त्या किळसवाण्या स्पर्शाच्या लहरी तिच्या मस्तकात शिरत होत्या. आधीच बांधलेली मूठ तिने परत घट्ट केली. डोळे हि गच्च बंद होते. हात पाय थरथरत होते. तिच्या स्तनात आणि त्याच्या बोटात आता इंचाच अंतर उरलेलं होत. 
     "आज जर मी हिम्मत केली नाही तर उद्या हा माझ्या कमरेखाली स्पर्श करायला घाबरणार नाही", तिने मनाशी संवाद केला. 
     बॅगमधून स्टीलची बाटली काढली. घट्ट हातात पकडली आणि आपलं पूर्ण बळ एकवटून त्याच्या दोन्ही पायांच्या मध्ये उलट्या हाताने मारली. बाटलीने योग्य निशाणा साधला आणि तो मोठ्याने डरकाळी फोडून जमिनीवर कोसळला. त्याचा पुरुषार्थ जमिनीवर रक्तारेन होऊन पडलेलं होत. ज्या अवयवाची तृष्णा शमविण्यासाठी तो निरागस मुलींना छळायचा तिने त्याचीच वाट लावली होती. 
     बसमधन झपझप खाली उतरत ती मागे न वळता ऑफिसच्या दिशेने निघाली. हृदयाचे ठोके आता शांत झाले होते. ती झपाट्याने ऑफिसच्या आत शिरली आणि आपल्या खुर्चीवर येऊन बसली... 
     मी तिचीच वाट बघत बसले होते. ती लगबगीने आपल्या खुर्चीवर बसली आणि लांब श्वास घेत मोठ्ठा सुस्कारा सोडला.
       आज तिच्या चेहऱ्यावर कमालीचं तेज होत. तिची माझी नजरेला नजर भिडली. चेहऱ्यावरील आत्मविश्वासाने तिचा चेहरा चमकत होता. डोळ्यांमध्ये समाधाना झळकत होत. तिच्या हावभावाने मला मुकरीत्या कळवलं होत... "मी जिंकली आहे".....

        आपल्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोत्साहित करतात तेव्हा लेख कसा वाटला आपल्या प्रतिक्रियेने नक्की कळवा... 
धन्यवाद!
©️®️अश्विनी दुरुगकर.