शीर्षक : आणि ती हसली ...
विषय : आणि ती हसली ...
फेरी : राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा
अभिज्ञान शाकुन्तलम् … अंक ७ वा … राजा दुष्यंत आणि पुत्र सर्वदमन यांची भेट …
ती अगदी मग्न होऊन वाचत होती . दुष्यंताच्या डोळ्यात अश्रू आले आणि इकडे वृषादेखील हेलावली . राजाने त्या बालकाला अतीव आनंदाने अलिंगन दिले आणि वृषाने ग्रंथ बंद करून डोळे मिटून घेतले . एक समाधानाचे हसू तिच्या चेहऱ्यावर रेंगाळले . पुस्तक असो , कथा असो , नाटक असो किंवा एखादा चित्रपट ... शेवटाची उत्सुकता कोणालाच चुकलेली नाही ..!
" मॅडम , पुढचे क्लायंट आलेत . आत पाठवू का ?"
" पाच मिनिटांनी पाठव ."
" आज फारचं गुंतून गेले मी वाचनात , वेळ संपलेली पण कळाले सुध्दा नाही ..! "
वृषा स्वतःशी संवाद करत थोडं आवरून बसली .
" या आजोबा , कसे आहात ?"
" मी छान आहे, तू कशी आहेस ?"
" तुमच्यासारखे एवढे छान मित्र असल्यावर मी कशी असणार ?"
" ह्या मित्राला आज काय आणले आहेस मग ?"
" शेवयांची खीर ..! आवडते ना ?"
"खूप ", आजोबांचा चेहरा अगदी खुलून गेला.
"आजोबा काही फरक आहे का आता ?"
" हो गं, आता नाही जास्त स्वप्न पडत मला… रात्री शांत झोप लागते . काल रात्रीतर राधेय आलेला पण कळालं नाही मला ."
" बापरे आजोबा, बरीच प्रगती आहे म्हणजे ."
"तुझ्यासारखी मानसशास्त्र असल्यावर काय होणार!", आजोबा हसून म्हणाले आणि वृषालादेखील हसू आले .
"बरं आजोबा आता आजचं सेशन करू . आज थोडी गडबड आहे घरी लवकर जायचे आहे ." असे म्हणून वृषाने आजोबांचे सेशन पूर्ण केले आणि क्लिनिक बंद करून चार वाजता बाहेर पडली . रिक्षा पकडून घरी निघाली होती तेवढ्यात , रिक्षाला थांबवून रिक्षा चालवणारे काका खाली उतरले .
" मॅडम दोन मिनिटं , बहुतेक एक छोटं कुत्र्याचं पिल्लू चाकाखाली आलंय . मी बघतो जरा ", असं म्हणून काका निघून गेले . काकांचे बोलणे ऐकून ती देखील उतरली . त्या पिल्लाला पायाला जखम झाली होती . काकांनी आणि तिने त्याला स्कार्फ मध्ये गुंडाळून नीट बांधले आणि दवाखान्यात निघाले .
बॅगमध्ये स्कार्फ शोधताना वृषाने बरंच सामान सीटवर काढून ठेवलेलं . काकांशी बोलत बोलत ती ते भरत होती . दवाखाना आला तसं त्या पिल्लाला घेऊन दोघे आतमध्ये गेले . त्याचे योग्य ते उपचार करून वृषा त्याला घरी घेऊन आली .
एका जुन्या वाकळेची नीट घडी घालून त्या पिल्लाला त्याच्यावर नीट गुंडाळून ठेवले . अगदीच छोटे होते ते . वृषाला तसा प्राण्यांचा किंवा निसर्गाचा लळा नव्हता . अगदीच आवडत नाही असं नाही , पण तिला तिचं घर सोडलं तर ती बाकी कशात रमायची नाही .
पुस्तक वाचन हल्ली जडलेली एक सवय ..!
" अभिज्ञान शाकुन्तलम् " तिने वाचायला घेतलं आणि त्यात अगदीच गुंतून गेली ती . शकुंतलेच्या निसर्गप्रेमाने तिला एक नवी दिशा दिली . शकुंतलेच्या पाठवणीच्या वेळी कालिदासाने केलेले ते वर्णन ऐकून हळहळली . खरंच निसर्गात एवढं गुंतण्यासारखं काय आहे . याच्या शोधात जवळच्याच एका टेकडीवर गेली .
थंडगार वाऱ्याची झुळूक , मऊशार गवत आणि मोकळे आकाश अनुभवल्यावर ती देखील त्यात समरस झाली . तिच्याही नकळत बऱ्याच गोष्टी हळूहळू अनुभवायला लागली .
घरातली काम आवरून आता आठवा अंक वाचून पुस्तक पूर्ण करावं , या विचारात तिने बॅग उघडली . पुन्हा सगळं सामान काढलं , पण पुस्तकाचा काही थांगपत्ता नाही . पुस्तक कुठे गेले असेल, या विचारात ती गुंग झाली .
नवीन पुस्तक घेणं अवघड न्हवते पण ते पुस्तक तिच्या मैत्रिणीने दिलेली शेवटची आठवण होती . तिची मैत्रीण म्हणजे तिची आई ..!
आज महिना झाला आईला जाऊन . बाबा तर ती लहान असतानाच शहीद झालेले . आणि दादा तो बाबांच्या पाऊलावर पाऊल ठेवून भरती झाला . त्याला पण पुन्हा ड्युटीवर जाऊन आठवडा होत आला . वृषा मग त्या घरात आता पूर्ण एकटी होती . तिच्या आईने तिला सहज वाचायला दिलेले पुस्तक कपाटात पडून होते . पण , आई गेल्यावर न राहवून तिने ते वाचायला घेतले .
एव्हाना रात्र झालेली … ती अजून पण पुस्तकाच्या विचारात सोफ्यावर बसून होती . तेवढ्यात त्या पिल्लाला जाग आली आणि ते एकदम हळू आवाज कण्हू लागले .
एवढ्या वेळ विचारात असलेल्या वृषाचे लक्ष वेधून घेण्यात तो यशस्वी झाला . तिने उठून त्याला जखम झालेली तिथे औषध लावले आणि गोंजारू लागली . तोसुद्धा मग शांत पडून राहिला . पुस्तक हरवल्याने तिची जेवायची इच्छा न्हवती . ती तशीच झोपून गेली .
दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा तोच दिनक्रम … पण आज वृषामध्ये तो उत्साह नव्हता . पुस्तक हरवल्याचे पडसाद अजूनही तिच्या मनावर होते . सर्व आवरून ती नेहमीप्रमाणे क्लिनिकला जायला निघाली . जाताना त्या पिल्लाला पुन्हा एकदा दवाखान्यात नेले . आज तो सुद्धा बऱ्यापैकी ठीक होता . वृषाचा स्कार्फ काढून तोंडात धरून तिच्यासमोर घेऊन उभा राहिला . त्याच्याकडे बघत तिलासुद्धा क्षणभर हसू आले . त्याला घेऊन ती क्लिनिकमध्ये गेली .
एका बास्केटमध्ये तो शांत बसलेला . आजचे सर्व पेशंट , त्यांचे सेशन्स वैगेरे उरकून संध्याकाळी ती टेकडीवर जाऊन बसली . काहीही केलं , तरी तो पुस्तकाचा विषय काही तिच्या डोक्यातून जात न्हवता .
वृषा म्हणजे बऱ्यापैकी अबोल . स्वतःच्या कोशातून बाहेर यायला तिचा सक्त नकार असायचा पण ती आनंदी असायची . तिच्या अबोलपणामुळे तिच्या कामात कधी अडथळा नाही आला . तिच्या छोट्या दुनियेत ती आनंदी होती . आता ती दुनिया छोटी कधीपर्यंत राहील , हे तिलादेखील माहीत न्हवते . कारण कदाचित आता पुस्तकाच्या शेवटी ती आली असली तरी तिची कहाणी लवकरचं चालू होणार होती .
तिथे शांत बसलेली असताना तिला अचानक काहीतरी आठवले . "आईने दिलेल्या पेटीमध्ये अजून एक पिशवी आहे ", ती तडकच घरी निघाली . घरी येऊन सगळं नीट आवरून तिने ती पेटी उघडली . आईने तिला घेतलेली चिंतामणी रंगाची साडी , जी तिला सहज आवडलेली ती आईने जाता जाता तिला दिली होती .
साडीच्या खाली एक छान मोरपीस होते . त्याच्या बाजूला आईने "अभिज्ञान शाकुन्तलम्" ठेवलेले आणि खाली एक पिशवी होती . तिने अलगद साडी आणि मोरपीस बाजूला काढून ठेवले . ती पिशवी हातात घेतली .
त्यातसुद्धा एक ग्रंथ होता…" मृत्युंजय "
तिने ती कादंबरी उघडली आणि आईचं पत्र दिसले . एवढया दिवसांचे मनात साठलेले अश्रू आज ते पत्र बघून नाही थांबवू शकली ती . त्या पत्राकडे बघत कितीतरी वेळ एकटीच अश्रू गाळत बसली . थोडं सावरल्यावर तिने ते पत्र हातात घेतले .
प्रिय वृषाली ,
कशी आहेस हे विचारण्याचा हक्क नाही ना बाळा आता मला… साहजिक आहे , दुःखी असशील . बाबा न्हवते आणि आता आईदेखील लांब गेली पण , मला नक्कीच असं वाटतं की मी माझ्या बाळाला स्वतःला सांभाळायला शिकवून गेलेय .
साडी आवडली असेल ना , तुझ्या वाढदिवसाला द्यायची होती गं तुला … पण बघ त्या आधीच तुला मिळाली . दोन पुस्तक ठेवून जातेय . शकुंतला झाली असेल वाचून , माहितेय मला . त्याशिवाय तू ही पिशवी हातात घेतली नसणारेस .
मृत्युंजय , तुझ्या बाबांनी दिलेली गं मला . मला बजावून सांगितलेलं की वाचचं . आणि कादंबरी वाचून झाल्यावर काय म्हणले माहितेय मला ते , म्हणाले की संपूर्ण कादंबरीत मला काय आवडलं असेल तर ती वृषाली आहे . मला पण अशीच एक वृषाली देशील ?
आणि तुझं नाव त्यांनी वृषाली ठेवले . त्यांना का तसं वाटलं , मला माहित नाही . पण एक नक्की होतं की यामागे काहीतरी कारण नक्की असणार .
"यथावकाश मला ते कळालंसुद्धा ..! ते काय होतं , हे नाही सांगणार मी तुला . ओघाओघाने ते येईलच समोर पण , जेव्हा समोर येईल ते तुझ्यासाठी खूप जास्त आनंददायी असेल बाळा . मला विश्वास आहे . बाकी कादंबरी वाच , आयुष्यभराची सोबत मिळेल."
डबडबल्या डोळ्यांनी तिने त्या पत्राला घट्ट छातीशी कवटाळले . काहीच कळाले नसले तरी , थोडेफार कळाले होते.
रात्रीचं सगळं आवरून तिने कादंबरी वाचायला घेतली . "अंगराज कर्ण ", एक अलौकिक व्यक्तिमत्त्व . तिने वाचायला घेतलं आणि ती अगदीच गुंतून गेली . पहाटेपर्यंत कर्णाचे पहिले स्वगत वाचून झाले आणि कुंतीचे चालू झाले .
आता मात्र झोपेने वेस ओलांडली आणि ती तशीच वाचता वाचता झोपून गेली . उशिरा जाग आल्यामुळे आज क्लिनिकला सुट्टी घेतली . महाराणी कुंती सुद्धा तिची वाट बघत होत्या . सर्व आवरून पुन्हा तिने वाचायला घेतले . दुपारपर्यंत कुंतीचे स्वगत वाचून झाले . नियतीच्या फेऱ्यात अडकलेल्या कुंती बद्दल तिच्या मनात संमिश्र भाव उमटले .
सायंकाळी पुन्हा कर्णाचे स्वगत वाचायला घेतले . कर्णाची पत्नी "वृषाली". किती अप्रतिम वर्णन होते तिचे , कर्ण आणि वृषालीचा विवाह . कर्णाच्या नजरेतून पाहिलेली वृषाली , ती अगदी मनापासून अनुभवू लागली . कादंबरी जस जशी पुढे सरकत होती तशी वृषासुद्धा मृत्युंजयामध्ये समरस होत होती . पुढील काही दिवस मृत्युंजय आणि वृषा जणू सोबती झालेले .यावेळी मात्र तिने जीवापाड ती कादंबरी हाताळली .
आज वृषाचा वाढदिवस होता . दादाने सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या . ती मात्र वेगळ्याच दुनियेत होती . आज आईने आणलेली ती साडी सहजच नेसून बसली . आईचे आशीर्वाद , कर्णाचा शेवट जवळ आला होता . तिच्याकडे सुद्धा सायंकाळ झाली होती . बाहेर गॅलरीमध्ये बसून ती वाचत होती .
"ॐ भुर्भुव:स्व: तत्सवितुर्वरेण्यम्sss!" एकाएकी त्याच्या ओठांची ती ही हालचाल क्षणात थांबली ! सर्वांनी श्वास रोखले . त्याचा आकाशदत्त श्वास पूर्ण थांबला . छातीवरचं स्पंदनारं लोहत्राण आता शांत झाला . स्थिर झालं !
कर्णाचा हा शेवट वाचून ती पुन्हा रडली . इकडे कर्णाचा शेवट झाला आणि तिकडे सुर्यदेखील अस्तास गेला . सुर्यपूत्र कर्ण अनंतात विलीन झाले .
डोळे बंद करून ती झोक्यात शांत बसलेली असताना फोन वाजल्याने तिची तंद्री भंगली . अनोळखी नंबर होता पण कोणी पेशंट असेल म्हणून तिने कॉल उचलला तर , ती गोंधळून गेली . तशीच नेसलेली साडी नीट करून तिने दवाखान्यात धाव घेतली . काउंटरवर चौकशी करून ती पळतच आत गेली . दार उघडलं आणि ती हेलावली .
आजोबांनी अगदी क्षीणपणे आवाज दिला,
"वृषाली….", आणि ती भानावर आली .
"आजोबा काय हे , असे कसे अचानक ऍडमिट झालात ?"
"म्हातारी माणसं आम्ही, कधी काय होईल सांगता येत का बाळा…"
"आजोबा पण काय हे , लवकर बरे व्हा."
"हो बाळा, आता मी काय सांगतो ते नीट ऐक ..! माझं नाव पुरुषोत्तम देसाई . मी तुझ्या क्लिनिकमध्ये आलो तेव्हा फक्त पी. देसाई. एवढंच सांगितलेलं . मी तुझ्या आईचा बाबा . तुझी आई पण तुझ्यासारखीच होती . कॉलेजला होती तेव्हा काय नियतीच्या मनात आलं काय माहित आणि तिच्यावर बलात्कार झाला .
तुझी आजी म्हणजे कृष्णा तो धक्का नाही सहन करू शकली . माझं कुटुंब अगदी दोन दिवसात उध्वस्त झालं . मी तर अगदी सुन्न झालो होतो .
बायको गेली , गरोदर मुलगी घरात काय करावं , काहीच समजत न्हवतं . तुझी आई तर जणू हसणं बोलणं सगळं विसरून गेलेली . मला तिच्यापुढे काही सुचलंच नाही ग . तिला विचारलं मी बाळ पडायचं का , तर ठामपणे नकार दिला आणि आमच्या दोघांची भांडण झाली .
काही दिवस असेच अबोल्यात गेले . मग मीच तिच्याकडे हट्ट धरला आणि तिला म्हणलं , तुला बाळ वाढवायचं आहे ना ठीक आहे पण , माझी एक अट आहे . तू एकटी ह्या बाळाला वाढवणार नाहीस . हे बाळ आपल्या घरी येणार नाही . हे बाळ आश्रमात जाईल .
माझा निर्णय तिने मान्य केला पण त्या दिवसापासून ती माझ्याशी बोलली नाही . नवव्या महिन्यात खूप त्रास झाला तिला . बाळाचा जन्म झाला पण तिला पुन्हा बाळंतपण झेपणार नाही असं डॉक्टरानी सांगितलं . पुन्हा एकदा कोलमडून गेली ती . खूप रडली माझ्या कुशीत. त्या बाळाला आम्ही आश्रमात दिलं , आश्रमाचे मालक माझे जुने स्नेही होते . दोन महिने गेले ह्या सगळ्यातून सावरायला . दोन महिन्यांनी तुझे बाबा आमच्या घरी आले . त्याचं खूप प्रेम होतं तुझ्या आईवर , पण जोपर्यंत आपण नीट स्थिरसावर होत नाही तोपर्यंत लग्न नाही म्हणून त्याने काहीच सांगितलं न्हवतं .
मधला तो एक वर्षाचा काळ तो सीमेवरच होता . जेव्हा घरी आला तेव्हा तडक आमच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आला . त्यालासुद्धा वडील न्हवते . आम्ही त्याच्यापासून काहीच लपवले नाही . सर्व अगदी खरे सांगितले . दुसऱ्या दिवशी निर्णय सांगतो म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या आईलाच घेऊन आला . त्यांना सगळं मान्य होत , पण तुझी आई म्हणाली लग्न कोर्टात करू . लग्न झाले आणि ती सासरी गेली . त्यानंतर तिच्या पर्यंत कोणीतरी खोटी खबर पोहोचवली की तुझे वडील गेले. तेव्हा मी काही कामानिमित्त बाहेर गेलेलो . ती घरी आलेली पण , घराला टाळा बघून तिला ते खरं वाटलं .
तिचे यजमान तिला घेऊन इथे निघून आले , तिथे राहिली असती तर अजून आठवणींमध्ये गुंतली असती . मी पुन्हा आलो तर ती नव्हती . हतबल होतो मी . एकटेपण सरत न्हवतं . मला तिच्या बाळाची आठवण झाली आणि मी त्या आश्रमाच्या मालकाशी संपर्क साधला . मित्र असल्यामुळे त्यानेदेखील मला साहाय्य केले आणि मी राधेयला घेऊन घरी आलो . स्वार्थी झालो होतो , क्षणात त्याला अनाथ केलं होतं आणि क्षणात आपलंसुद्धा .
नंतर कळालं तुझ्या आईने तुमच्या दोघांना दत्तक घेतलंय . राधेय मोठा झाल्यावर आम्हीदेखील इथे आलो . तुझी आई अनायसे भेटली . भेटली पण अशा वेळी जेव्हा शेवटच्या टप्प्यात होती . सगळे रागलोभ दूर झाले . राधेयला मी वडील म्हणून माझ्या मित्राच्या मुलाचे नाव दिले . त्याला मी सर्व सत्य सांगितले , तरीदेखील नाही गं सोडून गेला .अजून एक सत्य म्हणजे तुझे बाबा माझ्या कायम संपर्कात होते . त्यांनीच त्याच नाव राधेय ठेवलं .", एवढं बोलून आजोबांचा श्वास अडकू लागला .
"आजोबा बास ना , नका ना बोलू अजून…", राधेय दरवाजातून धावतच आला.
"राधे..य…तुझी…वृ.. षाली…", एवढं बोलून आजोबांचा श्वास थांबला .
दोघेही अगदी सुन्न झालेले . ना तिला काही सुचत होतं, ना त्याला … तरी धीर एकवटून त्याने तिला आवाज दिला, " वृषाली…", आणि ती तशीच हमसून हमसून रडू लागली .
"वृषाली गेले ना आजोबा आता , नको ना रडू … जाताना कर्णाला त्याची वृषाली देऊन गेले . माझ्या आयुष्यात एकचं व्यक्ती होती , ती म्हणजे आजोबा आणि आता वृषाली . "
वृषाली आता शांतपणे सगळं ऐकत होती . बाबांचा आईला मृत्युंजय वाचण्याचा हट्ट , माझं नाव वृषाली , आईचं मला पत्र , आनंदाचा क्षण म्हणजे कर्ण . राधेय म्हणजे कर्ण , म्हणजे हे सगळं विधिलिखित होतं . राधेय आणि वृषाली …!
वृषाने आता नजर वर करून त्याच्याकडे बघितलं . तो सुद्धा पाणावलेल्या नजरेने तिच्याकडे बघत होता . त्याने हळूच त्याच्या मागच्या टेबलवरून "अभिज्ञान शाकुन्तलम् " घेऊन तिच्यासमोर धरले.
"राधेय…", म्हणत ती रडता रडता गालात हसली .
नियतीच्या फेऱ्याने अखेर राधेय आणि वृषाली एकत्र आले , कायमचे ...!!!
सिद्धी घाडगे
जिल्हा - सातारा , सांगली .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा