आणि ती आई झाली..
भाग - ९
आस्था फ्रेश होऊन बाहेर आली. ती येईपर्यंत प्रसादने भाजी गॅसच्या मंद आचेवर शिजत ठेवली होती. मग तिने पटकन पोळ्या करून घेतल्या. जेवणाच्या टेबलावर आस्थाने जेवणाची ताटं वाढून घेतली. आणि ते दोघेही जेवायला बसले. प्रसादच्या आजच्या वागण्याने आस्थाला जणू नवी उर्मी मिळाली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. तिला एकदम हलकं वाटत होतं. मनावरचं दडपण जणू प्रसादने दूर केलं होतं. प्रसादच्या बोलण्याने आस्थाला खूप आधार वाटला. जेवणं उरकली. दोघांनी मिळून जेवणाचा टेबल, किचन आवरलं. आस्थाने नाईट गाऊन अंगावर चढवला आणि झोपण्यासाठी बेडरूममध्ये आली. प्रसाद कुठलीशी कादंबरी वाचत बसला होता. आस्था त्याच्या जवळ आली. त्याच्या कुशीत शिरत म्हणाली.,
“प्रसाद, इतका प्रेमळ, समजूतदार नवरा फार कमी जणींच्या नशिबी असतो रे. मी खरंच खूप नशीबवान आहे. तुझ्यासारखा जोडीदार मला मिळाला.”
प्रसादने हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. तिला जवळ घेत म्हणाला.,
“वेडी आहेस का? तसं काही नाही ग. तू पण खूप गुणी आहेस. एवढ्या मोठ्या घरात, श्रीमंतीत वाढलेली तू. पण कधीच त्याचा गर्व केला नाही. आहे त्या परिस्थितीत तू मला साथ दिलीस. तुझ्यामुळेच आज आपण आपलं हक्काचं घर करू शकलो. समाजात आपलं एक स्थान निर्माण करू शकलो. बघ जरा इकडे, तुला जे हवं होतं ते आपण मिळवलं आहे. आपण आपलं भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. तुला सांगू आस्था, मी आणि माझा मित्र दोघे मिळून एक नवीन सॉफ्टवेअर बनवत आहोत. आमचा तो प्रोजेक्ट यशस्वी झाला तर आपण आपली सॉफ्टवेअर कंपनी सुरू करू शकतो. त्या अनुषंगाने काम सुरू आहे. लवकरच माझं स्वप्न पूर्ण होणार आहे”
आस्थाने आनंदाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. प्रसाद भरभरून बोलत होता.
“पण शोना, मला तुला खूप सुखी ठेवायचं आहे. अगदी तू तुझ्या आईवडिलांच्या घरी होती तशी. सुखात, ऐषो आरामात. आपल्या गरिबीला बाबांनी हिनवलं होतं ते सगळं मला पुसून टाकायचं आहे. तुला आता जे कष्ट भोगावे लागत आहेत ना मी ते लवकरच संपवणार आहे. तुला राणी बनवून सोन्याने मढवणार आहे. तुला खूप दूर दूर फिरायला घेऊन जाणार आहे. अगदी परदेशातही.. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. तुझ्या डोळ्यांत कधीच पाणी येऊ देणार नाही”
आस्थाच्या डोळ्यांतून नकळत आनंदाश्रू ओघळले. ती म्हणाली.,
“प्रसाद, तुझं स्वप्नं पूर्ण होणार ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. बाबू, मी तुझ्याबरोबर खूप खुश आहे. मला आणखी काही नकोय. माझ्याकडे सगळं आहे कारण माझ्याकडे तू आहेस. पण तरीही देणार असशील तर गोष्ट देशील? माझी एक इच्छा पूर्ण करशील?”
प्रसादने प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिलं. आस्था अडखळत लाजत म्हणाली.,
“प्रसाद, आपल्या लग्नाच्या वेळीस आपण ज्या ज्या गोष्टी ठरवल्या होत्या. भविष्यातील स्थेर्यासाठी मनाला मुरड घालून जी स्वप्नं पाहिली होती ती जवळपास आपण पूर्ण करत आलोय. आता आपल्या लग्नाला जवळजवळ चार वर्षे होत आलेत. आणि आता मला वाटतंय किंबहुना प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आपण कुटुंब परिपूर्ण असावं. घराचं गोकुळ व्हावं आणि मग मला सांग बालकृष्णा खेरीज पूर्णत्व कसं येईल रे? प्रसाद, मला आता आई व्हायचं रे!
आस्था लाजली आणि आपल्या दोन्ही हातानी तिने तिचा चेहरा लपवला. प्रसादही तिच्या बोलण्याने मनापासून आनंदून गेला होता. ज्या उत्कट क्षणांची तो इतके दिवस वाट पाहत होता तो क्षण त्याच्या समोर येऊन थांबला होता. आस्थाच्या लाजऱ्या संमतीने त्याला तो क्षण कायमचा एकमेकांच्या मनात रुजवायचा होता. प्रसाद अलगद तिच्या जवळ आला अगदी कानाजवळ येऊन कुजबुजला,
“आय लव यु जान”
ती शहारली. त्याने तिच्या भाळावर अलगद चुंबन केलं. तीही त्याच्या बाहुपाशात विसावली. तिच्या नाजूक ओठांच्या पाकळ्यावर आपले ओठ टेकवून प्रसादने साखर पेरणी केली. आस्था मोहरली. ती त्याच्यात विरघळून जात होती. तिच्या अंगावरची वस्त्रे तिच्या नकळत दूर होत होती. तिच्या ओठांवर दीर्घ चुंबन घेत त्याने तिला कवेत घेतलं. श्वासात श्वास मिसळून गेला. तिची काया थरथरली. तिने त्याला घट्ट मिठी मारली. गात्रे सैल झाली. तिने स्वतःला प्रसादच्या स्वाधीन केलं. दोन देह एक झाले. जन्मजन्मांतरीचे मिलन झाले. एक तृप्ततेची भावना दोघांच्या चेहऱ्यावर पसरली होती. तिची रेशमाची मिठी सैल झाली.
आणि आस्था प्रसादचा संसार सुरू झाला. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली. राजा राणीचा सुखी संसार. आस्था प्रसादच्या प्रेमात अगदी नाहून निघाली होती. मोहरून गेली होती. दिवस छान सरत होते. कालचक्र वेगाने फिरत होतं. प्रसाद आणि आस्था खूप आनंदात जीवन व्यतीत करत होते. आणि काही दिवसांतच तिच्या आयुष्यात अजून एक आनंदाची बरसात आली. आस्थाला आई होण्याची चाहूल लागली. एक छोटा पाहुणा घरी येणार होता. ती खूप आनंदून गेली. ती आई होणार होती. प्रसादला तर आनंदाने आकाश ठेंगणं झालं होतं. खूप आनंदी होता तो. आस्था त्याला खूप अमूल्य भेट देणार होती. आता प्रसाद आस्थाची खूप काळजी घेऊ लागला. रोज तिच्यासाठी प्रसाद प्रेमानं खायला घेऊन यायचा. तिला फिरायला घेऊन जायचा. तिला घरकामात मदत करू लागला. ती ऑफिसला गेली की तिच्या खाण्या पिण्याची, औषधे पथ्यपाणी यांची सारखी चौकशी करू लागला. दोघे खूप आनंदी होते. खूपदा मुलगा हवा की मुलगी यावर चर्चा व्हायची. तिला मुलगा हवा होता आणि त्याला मुलगी. दोघांनी मिळून मुलांची काय नाव ठेवायची आधीच ठरवून टाकलं होतं. खरंतर आस्था आई होणार होती पण प्रसादला बाबा होण्याचा प्रचंड उत्साह! त्यामूळे तिचं आईपण तो रोज जगत होता. आनंदाने तिला जपत होता.
प्रसादने ही गोड बातमी त्याच्या घरी आईला सांगितली. आई बाबांना खूप आनंद झाला. आता प्रसादचे आई बाबा वरचेवर आस्थाला भेटायला येऊ लागले. तेही तिची काळजी घेऊ लागले. प्रसादच्या आईने मोठया हौसेने आस्थाचं ओटीभरण केलं. जवळच्या सर्व नातेवाईकांना बोलवून छोटासा कार्यक्रम केला. आस्थाने तिच्या आईलाही ही बातमी दिली होती. आस्थाच्या आईने आस्थाच्या बाबांचं कारण सांगितलं. आस्थाची आई आली नाही पण तिच्या आईने नोकरकरवी आस्थासाठी साडी, फळं आणि ओटीचं साहित्य पाठवून दिलं. त्यातही आस्था आनंदून गेली. त्या सर्व वस्तुंना तिच्या माहेरचा गंध जो होता! कार्यक्रम छान पार पडला. सर्वजण खूप आनंदात होते.
एकीकडे आस्था आई होणार प्रसाद खूप आनंदी होता. आणि दुसरीकडे त्याने सुरू केलेली सॉफ्टवेअर कंपनीने कामाचा जोर पकडला. येणाऱ्या बाळाचा पायगुणच की काय त्याचा बिझनेस तेजीत चालू लागला. त्याच्या डोळ्यासमोर फक्त आस्थाचं सुख दिसत होतं. तिच्या वडिलांसमोर मनाशी जी खूणगाठ बांधली होती. तो संकल्प त्याला काहीही करून पूर्ण करायचा होता. तिच्या वडिलांच्या घरी ज्या सुख समृद्धीत, ऐश्वर्यात ती राहत होती. ते सगळं सुख तिला द्यायचं होतं. त्यासाठी वाटेल तितके कष्ट करण्याची त्याची तयारी होती. तो दिवसरात्र कामात व्यस्त राहू लागला. आस्थाने त्याला खूप वेळा समजावून सांगितलं होतं.,
“प्रसाद, इतकी मेहनत घेऊ नकोस. मी तुझ्यासोबत खूप आनंदी आहे. मला ऐश्वर्य, संपत्ती याचा मोह नाही. तुझ्या प्रेमाशिवाय मला काहीही नकोय. आहे त्यात आपण सुखी राहू.”
पण प्रसादला त्याच्या ध्येयाने पछाडलेलं होतं. श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी तो नुसता कामाच्या मागे धावत होता. काय होतं हे? कसली ही असूया? आस्थाच्या वडिलांपेक्षा अधिक श्रीमंत होण्याची ईर्षा? की त्यांनी केलेल्या अपमानाचा बदला? कोण जाणे..! पण तो झपाटलेल्या माणसासारखा काम करत होता.
इकडे आस्थाला सातवा महिना सुरू झाला. तरीही ती ऑफिसला जात होती. ठरलेल्या बॉण्ड प्रमाणे काम करत होती. लवकरच बॉण्डही संपणार होता. कंपनीकडून घेतलेलं कर्ज मिटणार होतं म्हणून आस्था खुश होती.
सारं काही त्यांच्या मनासारखं सुरळीत सुरू असताना एक दिवस अचानक नियतीने घात केला. आस्था आणि प्रसादच्या सुखी आयुष्यला ग्रहण लागलं.
काय झालं नेमकं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा