आणि ती आई झाली.. भाग ८

ही एका आईची कथा तिच्या मातृत्वाची

आणि ती आई झाली..

भाग - ८

बिल्डरला फ्लॅटची पूर्ण रक्कम मिळाली. त्याने प्रसादला आणि आस्थाला फ्लॅटची चावी देऊन घराचा ताबा दिला. दोघेही खूप आनंदात होते. आस्थाचं स्वतःचं हक्काचं घर झालं होतं. भविष्याच्या दृष्टीने तिने खूप काळजीपूर्वक पाऊलं उचलली होती. त्याचंच हे फळ होतं. दोघांच्या मेहनतीची ही फलश्रुती होती.  घर झालं. घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आल्या. आता ते दोघेही नोकरीत छान स्थिरावले होते. 

काही दिवसांनी त्यांनी सर्व सामान नवीन घरी शिफ्ट केलं. साश्रुपूर्ण नयनांनी जुन्या सोसायटीचा, तिथल्या लोकांचा निरोप घेतला. कलशपूजन करून गृहप्रवेश केला. नवीन घरी आल्यावर आस्थाने प्रसादच्या मदतीने सर्व सामान लावून घेतलं. नवीन पडदे चढवले. घरात चार शोभेच्या वस्तू आणल्या. बाल्कनीत छोटासा बगीचा तयार केला. मातीच्या कुंडीत इवली इवली फुलं उमलू लागली, जाई जुई, मोगरा, गुलाब, चाफा, अबोली इवल्याशा बाल्कनीत सुखाने नांदू लागली. प्रसाद आणि आस्थाने आपला राजा राणीचा संसार छान सजवला होता. 

एक दिवस आस्था प्रसादला म्हणाली,

“प्रसाद, आपण आपल्या नवीन घराची वास्तूशांती नाही केली. करूया का? त्या निमित्ताने दुरावलेली नाती जवळ येतील. आपल्या मित्रमैत्रिणींना छोटीशी ट्रीट दिल्यासारखं होईल. लग्नात थोरांचे आशीर्वाद राहिले होते. या निमित्ताने ते मिळतील. करूया ना! अगदी साध्या पद्धतीने करू. आपल्या जुन्या सोसायटी मधल्या शिंदे काकूना जेवणाची ऑर्डर देऊन टाकू. स्वस्तात होईल शिवाय त्या आपुलकीने करतील. आपल्या आईबाबांना सुद्धा बोलवूया.  चालेल ना?”

प्रसादने होकारार्थी मान हलवली. त्यालाही आईची खूप आठवण येत होती. दीड दोन वर्षे झाली होती आईबाबांना भेटून. आस्थाने मृणालला फोन केला त्यांच्याच गुरुजींना पूजा घालण्यासाठी आमंत्रित केलं. पूजेची तारीख ठरली. आस्था आणि प्रसादने आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रणं दिली. प्रसादने घरी फोन केला. फोन आईने उचलला. आईने ”हॅलो’ म्हणताच प्रसादच्या डोळ्यांत पाणी दाटून आले.

“आई.. कशी आहेस ग? बाबा कसे आहेत ग?”

प्रसादचा आवाज ऐकताच आईच्या डोळ्यांतून मेघ बरसू लागले. किती झालं तरी आईच ती.. मुलाच्या मायेनं लगेच विघळली. थोडं जुजबी बोलणं झाल्यानंतर प्रसादने फोन करण्याचं  कारण सांगितलं. आनंदित होऊन तो म्हणाला.,

“आई, आम्ही नवीन घर घेतलं. त्याचीच वास्तूशांत पूजा आहे. आमंत्रण द्यायला फोन केलाय मी. आई, बाबांना सांग ना, मागच्या गोष्टी विसरा आता. पूजेला या तुमचे आशीर्वाद मिळू दे आम्हाला. आई मी वाट पाहतोय नक्की या.”

“प्रसाद, तुला बाबांचा स्वभाव माहीत आहे. तरी मी त्यांना विचारून कळवते तुला. पूजेला येण्याचा नक्की प्रयत्न करेन.”

आईने प्रसादला पूजेला येण्याचं कबूल केलं आणि फोन ठेवून दिला. आस्थानेही तिच्या घरी फोन केला. पूजेचं निमंत्रण दिलं. आस्था म्हणाली.,

“मम्मा, नवीन घराची वास्तूशांती पूजा आहे. डॅडाला घेऊन ये. मम्मा, माझी निवड चुकीची नव्हती. प्रसाद खूप चांगला मुलगा आहे. बघ इतक्या कमी अवधीत आमचं स्वतःचं घर झालं. मी खूप सुखी आहे त्याच्यासोबत. अजून काय सुख हवं असतं मम्मा?”

आस्थाच्या आईने फक्त कानाला रिसिव्हर लावला होता पण तिच्याशी नीट बोलत नव्हती. आई बोलत नाही पाहिल्यावर आस्थाने आमंत्रण देऊन फोन कट केला. 

पूजेचा दिवस सुनिश्चित झाला. प्रसाद आणि आस्थाने दोघांनी जोरदार तयारी केली. सकाळीच गुरुजी आले आणि त्यांनी पूजेला आरंभ केला. स्वतः आस्था आणि प्रसाद पूजेला बसले.  होम हवन केला. मंत्र पठण सुरू झाले. सारी वास्तू त्या मंत्राच्या उच्चाराने पवित्र झाली होती. वास्तूपुरुषाची पूजा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. अतिशय मंगलमय वातावरणात पूजा संपन्न झाली. रात्री सर्व निमंत्रित पाहुणे मंडळी उपस्थित होती. सर्वांना दोघांच्या धाडसाचं कौतुक वाटत होतं. प्रसादचे आईबाबा, आणि प्रसादाची धाकटी बहीण पूजेला आले होते. आस्थाच्या घरून मात्र पूजेला कोणीच हजर नव्हतं. आस्था जराशी हिरमुसली पण लगेच चेहऱ्यावर हसू आणत डोळ्यांतली आसवं तिने मोठ्या शिताफीने लपवली. दोघेही स्वतः जातीने सर्वाना काय हवं नको ते पाहत होते. रात्रीची जेवणं उरकली. प्रसाद आणि आस्थाने सर्वांसाठी रिटर्न गिफ्ट आणले होते. ते सर्वांना दिले. सर्वांनी दोघांचं अभिनंदन करून तिथून निरोप घेतला. 

प्रसादचे आईबाबाही घरी जाण्यास निघाले. आस्था पटकन प्रसादच्या आईचा हात हातात घेत म्हणाली.,

“आई, तुम्ही आलात खूप छान वाटलं. मोठ्यांच्या आशिर्वादाशिवाय आमच्या या यशाला काहीच किंमत राहिली नसती. तुमचे आशिर्वाद मिळाले. खूप खुश आहे मी. आई, आज तुम्ही नका ना जाऊ. दोन दिवस रहा. मग जा. तेवढंच प्रसाद आणि मलाही बरं वाटेल.”

प्रसादच्या आईला तिचं मन मोडवेना. तिने प्रसादच्या बाबांकडे पाहिलं. त्यांनी मान हलवून संमती दर्शवली. ते सर्वजण दोन दिवस राहिले. आपल्या मुलाचा भरलेला संसार पाहून तृप्त झाले. आपल्या मुलाने आणि सुनेने इतक्या कमी वेळेत स्वतःचं घर घेतलं. त्यांच्यासाठी ही गोष्ट खुप मोठी होती. दोघांनाही आनंदी पाहून प्रसादच्या आईवडिलांचा राग निवळला. आस्थाने आपल्या सासुसासाऱ्यांची मनापासून काय हवं नको ते पाहिलं. तिच्या प्रेमळ बोलण्याने तिच्या विषयी त्यांच्या मनात असलेला गैरसमज दूर झाला. त्यांनी दोघांनाही भरभरुन आशिर्वाद दिले. आणि दोन दिवसांनी निरोप घेऊन सुखा समाधानाने आपल्या घरी परतले. 

आता खरंतर दोघांच्या खडतर आयुष्याला सुरुवात झाली. आस्थाने साईन केलेल्या बॉण्ड नुसार तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. रात्री उशिरापर्यंत काम करावं लागत होतं. कधी शहरात तर कधी शहराबाहेर मीटिंग साठी जावं लागत होतं. प्रसादाची साथ होतीच. तोही मेहनत घेत होता. घरी आस्थाला घरकामातही मदत होता. एकमेकांना समजून उमजून संसार सुरू होता. 

सगळं सुखासुखी छान सुरू होतं. पण अचानक आस्थाबद्दल ऑफिसमध्ये वावड्या उठू लागल्या.आणि त्या वावटळी तिच्या घरापर्यंत प्रसादच्या कानावर येऊन धडकल्या. डायरेक्टर साहेबांनी केलेली तीन लाखाची मदत हाच चर्चेचा विषय होता. खरंतर ही बातमी खूप कॉन्फिडेन्शियल होती. पण त्यांची असिस्टंट शिल्पाने असूयेपोटी ही बातमी सर्वत्र पसरवली. 

“काय असं नातं आहे की, अगदी पर्सनल अकाउंट मधून साहेबांनी रक्कम दिली. बॉण्ड वैगेरे एक नाटक आहे. कामाच्या निमित्ताने त्यांना जास्तीतजास्त एकत्र वेळ घालवायचा असतो म्हणूनच हे सगळं नाट्य. आम्हाला नाही आजवर कधी इतकी मोठी मदत केली. काहीतरी असल्याशिवाय उगीच कोणी इतकं सढळ हस्ते मदत करतं?”

लोकांच्या तोंडाला हात लावता येत नव्हता. एक दिवस आस्थाच्या कानावर ही बातमी आली. ती प्रचंड चिडली होती. डोळ्यांत संताप घेऊन तशीच ती घरी पोहचली. प्रसाद आधीच येऊन बसला होता. घरात येताच आस्थाने रागाने बॅग सोफ्यावर भिरकावली आणि मटकन सोफ्यावर बसली. डोळ्यातल्या आसवांनी कधीच डोळ्याच्या कडा ओलांडल्या होत्या. काहीच न बोलता ती शांत बसून राहिली. प्रसाद तिच्यासाठी कॉफी घेऊन बाहेर आला. कॉफीचा मग टेबलवर ठेवला. तिच्या शेजारी बसत तिचा हात हातात घेत म्हणाला.,

“काय झालं शोना? का इतकी चिडली आहेस? कोणी काही बोललं का?”

त्याच्या प्रेमळ शब्दांनी तिला गहिवरून आलं. ती त्याच्या कुशीत शिरून रडू लागली. प्रसाद तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्याने आस्थाला रडू दिलं. मोकळं होऊ दिलं. थोडी शांत झाल्यावर आस्थाने ऑफिसमध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी प्रसादला सांगितल्या. प्रसाद थोडा गंभीर झाला. आस्थाला दूर करत तो दुसरीकडे जाऊन बसला. आस्था घाबरली. तिला वाटलं. प्रसादला या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटल्या असतील म्हणुन तो नाराज होऊन दूर झाला. ती कळवळून म्हणाली.,

“प्रसाद, बाबू, तुला माझ्यावर विश्वास नाही का? या खोट्या अफवांवर तुझा विश्वास बसला? हे सगळं खोटं आहे बच्चा, मी काहीही चुकीची वागले नाही. आपल्या संसारासाठीच तर कष्ट करतेय. असा दूर जाऊ नकोस. मला सांग तुझा माझ्यावर, आपल्या प्रेमावर विश्वास आहे की नाही? आणि तुझा विश्वासच गमावला असेल तर मला जगण्याचा हक्कच उरला नाही”

तिच्या या वाक्यासरशी प्रसाद पटकन तिच्याजवळ येऊन तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला.,

“शू!! शांत हो. अशा मरणाच्या गोष्टी करायच्या नाहीत. माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. एखादे वेळेस मी चुकेन पण  तू कधीच चुकीचं वागणार नाही याची खात्री आहे मला. आपल्या संसारासाठीच करतेस तू सगळं माहीत आहे मला. कोणी काहीही बोलू दे.. माझा तुझ्यावर विश्वास आहे  आणि मी कायम तुझ्यासोबत आहे हे कधीही विसरू नकोस.”

त्याचं बोलणं ऐकून आस्थाला खूप रडू आलं. ती हुंदके देऊन रडू लागली. तिला समजावत तिचे डोळे पुसत प्रसाद म्हणाला 

“आता रडणं बंद.. जा उठ फ्रेश हो. मी कुकर लावला आहे. तू फ्रेश होऊन येईपर्यंत भाजी टाकतो गॅसवर. मग तू पोळ्या करून घे. पटकन स्वयंपाक कर. मला खूप भूक लागलीय आज.”

आस्थाने डोळे पुसले आणि ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तिला मनापासून प्रसादचा खूप आभिमान वाटत होता. प्रसादसारखा जोडीदार मिळाला म्हणून स्वतःला नशीबवान समजत होती. 

पुढे काय होतं?  प्रसाद आणि आस्थाचं प्रेम असंच टिकून राहील का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©निशा थोरे..

🎭 Series Post

View all