आणि ती आई झाली.. भाग ७

ही कथा एका आईची.. तिच्या मातृत्वाची..

आणि ती आई झाली..

भाग - ७

आस्थाच्या ध्यानी मनी स्वप्नी फक्त स्वतःचं घर दिसत होतं. काहीही करून घर घ्यायचंच तिने मनाशी पक्का निश्चय केला होता. 

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून आस्था तिच्या बँकेत गेली. आत गेल्यावर तिने शिपायाला 

“मला बँक मॅनेजर साहेबांना भेटायचं आहे” असं सांगितलं. बँक मॅनेजर साहेबानी तिला त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि बसायला सांगितलं. 

“येस, बोला मॅडम काय काम आहे आपलं?” 

त्यांनी प्रश्न केला. आस्था बोलू लागली

सर, मी आस्था करमरकर. मला होम लोनबद्दल माहिती हवी आहे. ही त्या प्रोजेक्टची फाईल जिथे आम्ही घर घेण्याचा विचार करत आहोत. तुम्ही एकदा फाईल नीट तपासून पहा म्हणजे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण आहेत ना. आम्ही पुढे जाण्यास काही हरकत नाही ना? हेच समजून घ्यायचं आहे”

मॅनेजर साहेबांनी फाईल नीट तपासून पाहिली. सगळ्या कायदेशीर बाबी बिल्डरने पूर्ण केल्या होत्या. सगळे कागदपत्रे नीट तपासल्यानंतर ते म्हणाले.,

“मॅडम, प्रोजेक्टची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत. तुम्हाला फ्लॅट खरेदी करायला काहीच हरकत नाही. इथे शेजारी होम लोन विभाग आहे ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील.”

त्यानंतर त्यांनी दोघांच्या सॅलरी स्लिप पाहिल्या. लोन होण्यास काहीच हरकत नाही असं त्यांनी सांगितलं. आस्थाला खूप आनंद झाला. त्यांचे आभार मानून ती केबिनच्या बाहेर पडली. आणि होम लोन विभागात गेली. समोरच्या व्यक्तीला पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला.

“अरे रुद्र, तू इथे? व्हॉट अ सरप्राईज!”

रुद्रलाही आस्थाला पाहून खूप आनंद झाला होता. रुद्र त्यांच्या बंगल्याच्या शेजारच्या सोसायटीत राहणारा मुलगा. ओळख होती. पण फारसं बोलणं झालं नव्हतं. आस्थाने रुद्राला बँकेत येण्याचं कारण सांगितलं. तिच्याकडे जमा असलेली रक्कम त्याला सांगितली. सगळी परिस्थिती समजावून सांगितली. रुद्र म्हणाला.

“काही काळजी करू नकोस आस्था. सर्व कागदपत्रे ठीक आहेत. तुमच्या दोघांच्या पेमेंटच्या बेसिसवर लोन नक्की पास होईल. ती माझी जबाबदारी. तू आता निर्धास्तपणे घरी जा. मी बघतो पुढे काय करायचं ते”

रुद्रचं बोलणं ऐकून आस्थाला थोडा धीर आला. तिने तिचं बँकेतील रिकरिंग अकाऊंट बंद करण्याचा अर्ज दिला. आणि तेवढ्या रक्कमेचा बिल्डरच्या नावे डी.डी. काढला. जाताना रुद्रला भेटून त्याचे आभार मानले. आणि जाता जाता त्याला म्हणाली.,

“रुद्र, माझे बाबा कसे आहेत रे?”

हा प्रश्न विचारताना तिचा आवाज थरथरला. गळ्यात हुंदका दाटून आला. डोळे गच्च भरून आले. रुद्रलाही अवघडल्यासारखं झालं. तरी त्याने तिला डोळ्यांनीच शांत व्हायला सांगितलं.

“तुझे बाबा एकदम छान आहेत. आईपण चांगली आहे.तू अजिबात काळजी करू नको”

काही वेळाने आस्थाने त्याचा निरोप घेतला आणि ती घरी पोहचली. प्रसाद घरी आल्यावर तिने बँकेत घडलेला संपूर्ण वृतांत सांगितला. गृहकर्ज होण्यास कसलीच अडचण नसल्याचंही सांगितलं. रुद्र भेटल्याचं सांगितलं. प्रसादलाही आपलं स्वतःचं घर होणार म्हणून खूप आनंद झाला होता.

पुढे काही दिवसांनी दोघांनी बिल्डरला पहिला दीड लाख रुपयांचा डाऊन पेमेंटचा चेक दिला. आस्थाने भिशीतून पन्नास हजार घेतले आणि बिल्डरला दिले. दोन महिन्यांनी फ्लॅटचा ताबा मिळणार होता. तोपर्यंत उरलेल्या रक्कमेची सोय करायची होती. दोघांकडे दोन महिन्यांचा अवधी होती. अजून चार लाख रुपयांची सोय करायची होती. डाऊन पेमेंटची रक्कम मिळाल्यानंतर बिल्डरने ‘ऍग्रिमेंट टू सेल’ करायला सांगितलं. आस्था आणि प्रसादच्या नावाने ऍग्रिमेंट करण्यात आलं. आस्थाने ऍग्रिमेंटची ओरिजनल कॉपी लोनसाठी रुद्रला दिली. आणि लवकर कर्ज मंजूर करण्यासाठी विनंती केली. दुसरीकडे रुद्रच्या मदतीने होम लोनचं काम जवळपास होत आलं होतं. कर्ज मंजूर झालं होतं. फक्त रक्कम बिल्डरला देणं बाकी होतं. जसंजसं बांधकाम पूर्ण होईल तसं बँक बिल्डरला दोघांच्या कर्जखात्यातून रक्कम देत होती. 

“आपलं स्वतःचं हक्काचं घर होणार” या कल्पनेनेच आस्था प्रचंड खुश होती. प्रत्येक आठवड्याला सुट्टीच्या दिवशी ती नवीन घरी फेरफटका मारून यायची. बांधकाम कुठवर आलंय पाहून यायची. आतापासूनच घर सुशोभित करण्याची तिची तयारी सुरू झाली होती. प्रत्येक खोलीला वेगळा रंग, स्वयंपाकघर, बेडरूम, हॉलमधील फर्निचर, दरवाजाचा रंग, नेमप्लेट,खिडक्यांना पडदे कोणते लावायचे इथपासून सुरुवात झाली होती. हे सारं करताना तिचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. आस्थाला आनंदी पाहून प्रसादला छान वाटत होतं. 

बघता बघता दोन महिने भुर्रकन निघून गेले. आता घराचा ताबा मिळणार होता पण त्याआधी उर्वरीत रक्कम बिल्डरला द्यायची होती. आस्था आणि प्रसाद उर्वरित रक्कम गोळा करण्यात व्यस्त झाले. दोघांनी आपल्या पी.एफ. खात्यातून रक्कम उचलण्याचा निर्णय घेतला. दोघेही नुकतेच नोकरीला लागले होते त्यामुळे पी एफ खात्यात फारशी रक्कम जमा नव्हती. तिथून दोघांचे मिळून जवळपास एक लाखभर रक्कम जमा झाली. तरीही अजून उर्वरीत रक्कमेची सोय होत नव्हती. पुन्हा एकदा संकटाने चाहूल दिली. मदतीचे सगळे मार्ग बंद झाले होते. जवळची सगळी पुंजी त्यांनी नवीन घरात गुंतवली होती. काय करावं समजेना. दोघेही विचारात पडले. इतक्यात आस्थाच्या मनात एक विचार डोकावला.

“आपल्याच कंपनीतून डायरेक्टर साहेबांना कर्ज विचारलं तर? ते आपल्याला मदत करतील का? आता आपण कर्ज घेऊ आणि महिन्याच्या पगारातून एक ठराविक रक्कम देत जाऊ” 

आस्थाला तिच्या मनाने केलेला विचार पटला. तिने प्रसादला ते बोलून दाखवलं. 

“ठीक आहे. हाही प्रयत्न करून पाहू. मीही माझ्या ऑफिसमध्ये साहेबांना विचारतो. पाहूया काय होतंय.”

प्रसाद थोडा चिंतीत वाटत होता. आस्था गोड हास्य ओठावर आणत म्हणाली,

“सगळं ठीक होणार आहे प्रसाद. आपण स्वतःचं घर होणार आहे. तू अजिबात चिंता करू नको. बाप्पा आपल्या पाठीशी आहे. माहीत आहे ना!”

आस्था प्रसादला धीर देत होती. वातावरण तणावमुक्त, हलकं करण्याचा प्रयत्न करत होती. 


 

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आस्था आणि प्रसाद ऑफिसला गेले. प्रसादने कर्ज मागणीचा अर्ज त्याच्या साहेबांना दिला. “कंपनी नव्याने जॉईन केलेल्या स्टाफसाठी आम्ही इतकी रक्कम देऊ शकत नाही. ही कंपनीची पॉलिसी नाही.” हे कारण सांगून त्यांनी तो अर्ज फेटाळून लावला. प्रसादने हताश होऊन आस्थाला फोन केला आणि घडलेला सर्व वृतांत सांगितला. आस्था चिंतीत झाली. पण तरीही ती प्रसादला धीर देत म्हणाली.,

 “सगळं ठीक होईल. तू काळजी करू नको. मी आहे ना.” 

तिचे शब्द प्रसादच्या मनाला उभारी देत होते. थोडा वेळ बोलून तिने फोन ठेवून दिला आणि ती एच आर विभागात आली. तिने एच.आर.कडून कर्ज मागणीचा अर्ज घेतला आणि फॉर्म भरून एच. आर. कडे, शिल्पाला दिला. फॉर्मवरची रक्कम पाहून तिचे डोळे मोठे झाले. ती म्हणाली.,

“आस्था, रक्कम बरोबर लिहली आहेस ना! की एक शून्य चुकून जास्त झालाय?”

आणि ती मिश्कीलपणे हसू लागली,.

“नाही ग बरोबर आहे लिहलेली रक्कम. तू अर्ज पुढे पाठव. मी सरांशी बोलून घेईन”

आस्थाने हसून उत्तर दिलं. थोड्या वेळाने तिने डायरेक्टर साहेबांच्या असिस्टंट कडून साहेबांचा वेळ मागून घेतला. आस्थाला केबिनमध्ये बोलवण्यात आलं. आस्थाला बसायला सांगितलं. आणि साहेबांनी तिला प्रश्न केला.,

“आस्था, तुम्ही दिलेला कर्ज मागणीचा अर्ज पाहिला. तीन लाख रुपये.. इतकी मोठी रक्कम? तुम्हाला आपल्या कंपनीची पॉलिसी माहीत आहेत ना. तुमच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कमच तुम्हाला मंजूर होऊ शकते. मग असा अर्ज करताना विचार नाही का केला?”

आस्थाने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

“सर, मला आपल्या कंपनीची पॉलिसी माहीत आहेत. पण सर या रक्कमेची मला नितांत गरज आहे. आम्ही नवीन फ्लॅट घेतला आहे. सर्व सोय झालीय. फक्त ही उर्वरित रक्कम दिली की फ्लॅटचा ताबा मिळेल. आणि आपणाकडून कर्ज मिळाल्यानंतर मी माझ्या पगारातून प्रत्येक महिन्यात थोडी थोडी किंवा तुम्ही ठरवून दिलेली रक्कम परत करत जाईन. प्लिज सर, माझं कर्ज मंजूर करा. खूप मेहरबानी होईल सर.”

साहेबांनी तिच्या बोलण्याचा विचार केला. 

“आस्था एक गुणी, हुशार, प्रत्येक कामात तरबेज अशी  सहकारी आहे. तिला कंपनीत टिकवून ठेवलं पाहिजे. आजवर तिने कर्ज म्हणून मागितलेल्या रक्कमेपेक्षा कितीतरी पटीत जास्त तिच्यामूळे कंपनीला फायदाच झाला आहे. कंपनीसाठी ही रक्कम मोठी नाही. पण इतर कामगारांचाही विचार करायला हवा. नाहीतर आपणच केलेले कंपनीचे नियम आपणच मोडले असं व्हायचं. काय करता येईल?”

साहेबांना प्रश्न पडला. थोडा वेळ विचार करून साहेबांनी आपल्या व्यवसायिक कुशाग्र बुद्धीचा वापर केला. ते म्हणाले.,

“आस्था, खरंतर हे कंपनीच्या नियमांना धरून नाही. तरीही तुमच्या आतापर्यंतच्या कामाचा आलेख पाहता मी तुम्हाला कर्ज देण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या अकाउंट मधून नाही करता येणार पण माझ्या वैयक्तिक अकाउंट मधून करता येईल. पण माझ्या काही अटी आहेत. त्या जर तुम्हाला मान्य असतील तरच हे कर्ज मंजूर होईल.”

इतकं बोलून ते क्षणभर थांबले आणि त्यांनी आस्थाकडे पाहिलं. आस्था थोडी घाबरली. 

“काय अटी असतील? काही विचित्र मागणी तर नसेल? तसं काही असेल तर आपण स्पष्ट नकार देऊ. कर्ज नाही मिळालं तरी चालेल.”

आस्था मनातल्या मनात बोलत होती. मनाशी पक्का निर्धार 

करून तिने साहेबांना अटी विचारल्या. त्यावर साहेब म्हणाले.,

“घाबरू नका मॅडम, मी काही विचित्र अटी घालणार नाही. पण मला माझ्या कंपनीच्या फायद्याचाही विचार करायला हवा म्हणून मी अटीबद्दल म्हणालो. तर माझी पहिली अट अशी की, तुम्हाला तीन वर्षे ही कंपनी सोडून जाता येणार नाही. तसा बॉण्ड साईन करावा लागेल. दरमहा तुमच्या पगारातून दहा हजार रुपये रक्कम कापण्यात येईल. त्याच बरोबर तुमचा परफॉर्मन्स अलाऊन्स सुद्धा कट करण्यात येईल. प्रत्येक वर्षी होणारी पगार वाढीतूनही रक्कम वसूल केली जाईल. तुम्हाला कंपनीसाठी जास्तीजास्त वेळ द्यावा लागेल. नवीन प्रोजेक्टरवर काम करावं लागेल. कंपनीच्या कामानिम्मित शहराबाहेर जावं लागेल. कधी भारताबाहेरही राहावं लागेल. त्यावेळेस मात्र मी कोणतीही टिपिकल बायकांसारखी कोणतीही सबब ऐकून घेणार नाही. कोणतंही कारण खपवून घेतलं जाणार नाही. बोला मंजूर असेल तर आता लगेच चेक देतो.”

आस्था विचार करू लागली. 

“या रक्कमेची मला खूप गरज आहे. आणि ‘गरजवंताला अक्कल नसते’ हेच खरं. एकदा प्रसादशी बोलावं का? पण आपल्याकडे दुसरा कोणता मार्ग आहे का? तीन वर्षाचा बॉण्ड? काय करू?”

थोडा वेळ विचार करून आस्थाने त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या. साहेबांनी लगेच बॅगेतुन चेकबुक काढलं आणि आस्थाच्या नावाने तीन लाख रुपयांचा चेक लिहून तिच्या हाती सुपूर्द केला. “पुढील सगळ्या प्रक्रिया एच आर पूर्ण करतील” हे सांगायला ते विसरले नाहीत. आस्थाने चेक हातात घेतला. तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. सरांचे आभार कसे मानावेत तिला समजत नव्हतं. डोळ्यातल्या पाण्याने सर्वकाही सांगितलं. सरांना थॅंक्यु म्हणून आस्था केबिनच्या बाहेर पडली. 

संध्याकाळी घरी येताच तिने सर्व वृतांत प्रसादला सांगितला. चेक मिळाला हा आनंद होता पण त्यासाठी आस्थाला खूप कष्ट करावे लागणार म्हणून त्याचं मन व्यथित झालं. पुढे प्रसाद आणि आस्थाने बिल्डरला उर्वरित रक्कमेचा चेक देऊन टाकला आणि फ्लॅटचा ताबा घेतला. फायनल ‘सेल डिड’ करून पूर्णपणे कायदेशीररीत्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या.  

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©निशा थोरे..

🎭 Series Post

View all