आणि ती आई झाली.. भाग ३

हि एका आईची कथा

आणि ती आई झाली..

भाग ३

आतापर्यंत हसतंखेळतं असलेलं आनंदी वातावरण  प्रसादच्या बोलण्याने एकदम गंभीर झालं. सर्वजण शांत झाले. प्रसाद असं काही बोलेल याची कोणालाच कल्पना नव्हती. प्रसादचे बाबा काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाले.,

“अरे प्रसाद, ती श्रीमंतांच्या घरची मुलगी. कशी राहील इथे? लाडाकोडात वाढलेली. श्रीमंतांच्या मुलींना वळण नसतं की ना कोणते संस्कार.. आपल्या घरात ती नाही रमणार. तिचा विचार सोडून दे. तुझ्या योग्यतेची आपल्या तोलामोलाची मुलगी पाहून तुझं थाटामाटात लग्न लावून देईन. मी शब्द देतो तुला.”

प्रसादच्या आईनेही बाबांच्या बोलण्याला दुजोरा दिला. आणि म्हणाली.,

“प्रसाद, बाबा बरोबर बोलत आहेत. एक  जुनी म्हण आहे “सून करावी गरीबा घरची आणि लेक द्यावी श्रीमंता घरी” ते काही उगीच नाही. गरिबाघरची पोर मान ठेवेल. आदर राखून बोलेल. पण श्रीमंतांची पोर आपल्या संपत्तीचा बडेजाव करेल. आपल्याला कमी लेखेल. म्हणून म्हणते बाबा म्हणतात तेच बरोबर आहे.आम्ही तुला शोभेल अशी मुलगी पाहून तुझं लग्न लावून देऊ”

प्रसादने दोघांचंही बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. आणि समजावणीच्या सुरात तो म्हणाला.

”आई, बाबा, तुम्ही म्हणता ते योग्य असेलही. तुम्ही तुमच्या अनुभवावरून बोलत असाल. पण आई, एका अनोळखी मुलीसोबत मी माझं संपूर्ण आयुष्य घालवण्यापेक्षा जिला मी ओळखतो. जिला माझ्या गुणदोषाबद्दल आधीच कल्पना आहे. तिच्या सोबत संसार करणं जास्त सोयींचं नाही का? आणि आस्था खरंच खूप चांगली मुलगी आहे. ती आपल्या घराला छान सांभाळुन सुखाचा संसार करेल. मला खात्री आहे.”

प्रसादचे आई बाबा नाराज झाले. आणि चिडून म्हणाले,

“आमची या लग्नाला संमती नाही. बाकी तुझी इच्छा. आणि तुझ्या मर्जीप्रमाणे तुला वागायचं असेल तर ते या घरात राहून शक्य नाही.चालता हो या घरातून”

“अहो, काय बोलताय हे? आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाला तुम्ही घराबाहेर काढताय? नाही, नको.. मी समजावते त्याला. तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका. पाया पडते मी तुमच्या”

प्रसादची आई काकुळतीला येऊन बाबांना आर्जवे करत होती. तिला थांबवत प्रसाद म्हणाला.,

“आई, तू कोणापुढेही हात पसरू नको. माझा निर्णय झालाय. मी लग्न करेन ते फक्त आस्थाशीच. दुसऱ्या कोणाशी नाही आणि त्यासाठी मला हे घर सोडावं लागलं तरी काही हरकत नाही. जातो मी बाबा..”

प्रसाद त्याच्या खोलीत गेला. मोजकेच दोन चार कपड्यांचे जोड, सर्टिफिकेटची फाईल, मोबाईल, आणि त्यांची एक फॅमिली फोटो असलेली छोटी फ्रेम इतकंच बॅगेत भरलं आणि तो बाहेर हॉलमध्ये आला. प्रसाद बाबांना  नमस्कार करण्यासाठी खाली वाकला पण बाबा तिथून दूर झाले तोंड दुसऱ्या दिशेला फिरवून उभे राहिले. त्याने आईला नमस्कार केला. आई रडत होती.  त्याच्या डोक्यावरून हात फिरवत “यशवंत हो” असा आशीर्वाद देत डोळ्यातली आसवं टिपत कोपऱ्यात उभी राहिली. प्रसादने मनूला जवळ घेतलं. 

“मनू, काळजी घे हा आईबाबांची आणि हो तुझी सुद्धा”

असं म्हणून तो घराबाहेर पडला. निघताना त्याने अविला कॉल करून घरातून बाहेर पडल्याचं सांगितलं. अविने त्याला त्याच्या रूमवर बोलवून घेतलं. प्रसाद अवीच्या रूमवर पोहचला.

“अरे मित्रा, फिकीर नॉट. मी आहे ना! सगळं ठीक होईल. तुझी दुसरी सोय होईपर्यंत बिनधास्त रहा.”

अवी प्रसादच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला.

“अव्या, खूप धन्यवाद मित्रा, खूप मोठं टेन्शन दूर केलंस.”

“मित्र म्हणतोस आणि आभार काय मानतोस  वेड्या.”

अवि हसत म्हणाला. प्रसादला  थोडं हायसं वाटलं. थोडा विचार करत तो अविला म्हणाला.,

“अव्या, उद्या आपल्याला आस्थाच्या घरी जायचं आहे. आस्थाला मागणी घालण्यासाठी तिच्या आईबाबांना भेटायचं आहे. माझ्या आई बाबांनी जरी परवानगी दिली नसली तरी तिचे आई बाबा नक्कीच आम्हाला समजावून घेतील.खात्री आहे मला. उद्याच जाऊया”

या विचारांनी प्रसादच्या मनाला थोडा धीर मिळाला. अविनेही मान डोलावून आस्थाच्या घरी जाण्याला होकार दिला. प्रसादने आस्थाला फोन करून घडलेला सारा वृतांत सांगितला. आस्था कॉल वरच रडू लागली.

“प्रसाद आता काय होईल रे? तुझे आईबाबांनी परवानगी नाही दिली आता पुढे काय? मला खूप टेन्शन येत आहे”

“आस्था, मी उद्या तुझ्या घरी येतोय आईबाबांना भेटायला. बाबांना थांबवून ठेव घरी. काही झालं तरी आपलं स्वप्नं पूर्ण करायचं आहे हे विसरू नको. आपलं लग्न होणारच नक्की होणार”

तिला धीर देत प्रसाद आस्थाशी थोडा वेळ बोलून, उद्या भेटण्याचं प्रॉमिस करून फोन ठेवून दिला. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच  प्रसाद आणि अवि आस्थाच्या घरी पोहचले. आस्थाने दोघांचं हसून स्वागत केलं आणि आत यायला सांगितलं. आस्थाचे बाबा हॉल मध्ये पेपर वाचत बसले होते. आणि आई स्वयंपाक घरात नाश्ता तयार करत होती. बाहेरच्या खोलीत आवाज ऐकून तीही स्वयंपाक घरातून बाहेर हॉलमध्ये आली. प्रसादला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. इतक्यात आस्थाने दोघांना सोफ्यावर बसायला सांगितलं. आणि तिने बोलायला सुरुवात केली. 

“डॅडा, हे माझे मित्र. हा प्रसाद करमरकर आणि हा अविनाश भोसले. डॅडा, प्रसाद फर्स्ट क्लास मध्ये पास झाला आणि एका मल्टिनॅशनल कंपनीत आय टी इंजिनिअर म्हणून जॉब सुद्धा मिळाला आहे ”

आस्था आनंदाने भरभरून सांगत होती. आस्थाच्या बाबांनी दोघांकडे पाहिलं. दोघांनीही हात जोडून अभिवादन केलं. बाबांनी मान झुकवून त्याचा स्वीकार केला. आणि म्हणाले.,

“बरं मग, माझ्याकडे काय काम काढलंय? ” 

बाबांनी प्रश्न केला. प्रसादने दीर्घ श्वास घेतला. आणि म्हणाला.,

“काका, मी मुद्दामच आज तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम घेऊन आलोय. गेली चार वर्षे मी आणि आस्था एकमेकांना ओळखतो आहोत. आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि आम्हाला लग्न करायचं आहे. तुमच्या आशीर्वादाने आमच्या भावी आयुष्याची सुरुवात व्हावी इतकीच इच्छा बाळगून मी आस्थाला मागणी घालायला आलो आहे. काका, मी आस्थाला आयुष्यभर सुखात ठेवेन. कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. आता तर आमच्या दोघांच्या हातात नोकऱ्याही आहेत. आम्ही आनंदाने संसार करू पण  तुमचा होकार आमच्या दोघांसाठीही खूप महत्त्वाचा आहे”

प्रसाद बोलत होता. आणि इकडे आस्थाच्या बाबांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. रागाने ते लालबुंद झाले. जागेवरून उठत चिडून म्हणाले.,

“मूर्खा, तुझी लायकी आहे का माझ्या मुलीला मागणी घालण्याची?  आणि तुमच्याकडे अशी पध्दत आहे का  लग्नाची मागणी घालायला स्वतःच जायचं. वडीलधाऱ्या मंडळींना यात सहभागी नाही करायचं? तुमच्या सारख्या मुलांना मी चांगलं ओळखतो. श्रीमंतां घरची मुलगी पटवायची आणि मग तिच्या पैश्यावर आयुष्यभर ऐश करायची. चल चालता हो इथून. अरे, तुझा जितका महिन्याचा पगार आहे ना तितके पैसे आस्था एका दिवसात शॉपिंगला घालवते. म्हणे तिला सुखात ठेवेन. ”

आस्थाचे बाबा रागाने बडबडत होते. प्रसादला आणि अविला खूप वाईट वाटत होतं पण तरीही दोघे शांत होते. बाबांचं हे बोलणं ऐकून आस्थाला आता राहवेना. तिलाही बाबांच्या बोलण्याचा खूप संताप आला होता. बाबांना थांबवत ती म्हणाली.,

“डॅडा, काय बोलत आहात तुम्ही? तुम्ही माझ्या मित्रांचा अपमान करत आहात. तुम्हाला काहीही अधिकार नाही त्यांना असं हिणवुन बोलण्याचा. दुसरी गोष्ट डॅडा, माझा निर्णय झालाय मी लग्न करेन ते प्रसादशीच. नाहीतर मी स्वतःला संपवून टाकेन”

“अग, या नालायक मुलासाठी तू जीव द्यायला निघालीस. आम्ही लहानाचं मोठं केलं त्याचं काहीच वाटत नाही तुला? चार वर्षाच्या प्रेमासाठी वीस-एकवीस वर्ष आम्ही केलेल्या प्रेमाला तू विसरलीस? कृतघ्न निघालीस कार्टे! आई बाबांच्या नावाला कलंक लावायला निघालीस? ”

बाबा तिच्यावर आग ओकत होते. तरीही आस्था शांतपणे म्हणाली.,

“मीही काहीही चुकीचं वागले नाही. प्रत्येकाला आपला भावी जोडीदार निवडण्याचा अधिकार नसावा का? आणि डॅडा, विरोध करण्याचं कारण तरी सांगा. माझी निवड कुठे चुकली आहे? काय कमी आहे प्रसादमध्ये? चांगल्या घरातला, सुशिक्षित, निर्व्यसनी नोकरीदार मुलगा आहे. डॅडा, इतकी वर्षे मी त्याला ओळखते. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो मला खरंच सुखात ठेवेल. प्लिज तुम्ही या लग्नाला परवानगी द्या.”

“नाही ते कदापिही शक्य नाही. तू अजून का थांबला आहेस? निघ इथून.”

त्यांच्या बोलण्याने व्यथित झालेले प्रसाद आणि अवि जायला निघाले. इतक्यात आस्था प्रसादला अडवत म्हणाली.,

“थांब प्रसाद, मीही येते तुझ्याबरोबर. हा निर्णय आपल्या दोघांचा होता मग परिणाम तू एकट्यानेच का भोगायचे?”

तिच्या या वाक्यासरशी आईचा राग अनावर झाला आणि तिने आस्थाच्या कानाखाली सणसणीत लगावून दिली. आस्था धावत तिच्या खोलीत गेली आणि फक्त एक सर्टिफिकेटची फाईल घेऊन बाहेर आली. आस्थाने प्रसादला निघण्यासाठी खुणावले. 

“चल प्रसाद निघुया”


 

”खबरदार आस्था! या घराचा उंबरठा ओलांडलास तर! तुला  माझ्या संपत्तीचा एक भागही मिळणार नाही. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. विचार करून पाऊल उचल”

आस्थाचे बाबा गरजले. पण तरीही आस्था तिच्या निर्णयावर ठाम होती. ती प्रसादचा हात पकडून बाहेरच्या दिशेने चालू लागली.

आई आवाज देत राहिली. आस्थाने फक्त एकदा मागे वळून संपुर्ण घरावर नजर फिरवली. साश्रुपूर्ण नयनांनी तिने त्या घराला निरोप दिला. 

एका नवीन आयुष्याला सुरुवात. खुप धाडसी निर्णय होता तो! परिणामांची तमा न बाळगता टाकलेलं धाडसी पाऊल! प्रसाद आस्थाचा हात घट्ट पकडत तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. बाहेर येताच अविने लगेच त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना फोन केला. सगळेजण लगेच सागर कॅफे मध्ये जमले. या विषयावर सखोल चर्चा, सल्ला मसलत  सुरू झाली.अविने आपल्या मित्राला सांगून लगेच दोघांसाठी घराचा बंदोबस्त केला. अवि मित्रांसोबत राहत असल्याने आस्थाला तिकडे घेऊन जाणं योग्य वाटलं नाही म्हणून आजच्या दिवस आस्था मृणालसोबत राहणार होती.

दुसऱ्या दिवशी विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन आस्था आणि प्रसादचं लग्न लावून द्यायचं ठरलं. तिथेच साक्षीदार तयार झाले. सर्व मित्रमैत्रिणींनी मिळून आस्था आणि प्रसादसाठी लग्नाच्या कपड्यांची जबाबदारी उचलली. प्रसाद आणि आस्था सर्वांकडे अवाक होऊन पाहतच राहिले.

“किती पटापट यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं! खरंच मित्र असावेत तर असे.. प्रत्येक सुखदुःखात साथ देणारे.”

आस्थाच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळले. सर्व गोष्टींचं नियोजन करून, दुसऱ्या दिवशी विवाह नोंदणी कोर्टात भेटण्याचं ठरवून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. 

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत सर्वजण विवाह नोंदणी कार्यालयात पोहचले. आस्थाने नारंगी रंगाची सेमी पैठणी नेसली होती. प्रसादने व्हाईट शर्ट, ब्लॅक जीन्स आणि त्यावर ब्लेझर चढवला होता. अवि गुलाबाच्या फुलांचे दोन पुष्पहार घेऊन आला होता. साक्षीदार म्हणून आलेले मित्रमैत्रिणी गोळा झाले. ऑफिस सुरू व्हायला अजून अवकाश होता. सर्वजण बाहेर थांबले होते.

पुढे काय होतं? आस्था आणि प्रसादचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल? की कोणतं नवीन संकट येईल?  पाहूया पुढील भागात.. 

क्रमशः

© निशा थोरे..

🎭 Series Post

View all