आणि ती आई झाली.. भाग २

हि कथा एका आईची तिच्या मातृत्वाची..

आणि ती आई झाली..

भाग २ 


संध्याकाळी भेट ठरली. आस्थाने दिलेल्या बातमीने प्रसाद खूप खुश होता. त्याने पुन्हा वेबसाईट ओपन करून निकाल पाहिला. रिझल्ट पाहून तो आईला शोधत स्वयंपाक घरात आला. 

“आई, ए आई.., मी पास झालो. मी इंजिनिअर झालो.”

असं म्हणत त्याने आईला आनंदाने घट्ट मिठी मारली. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

“अरे व्वा!, अभिनंदन बेटा.. पास झालास. नोकरी मिळाली.. असाच यशस्वी हो..थांब त्या आधी देवापुढे साखर ठेवते. आमच्या दोघांचं स्वप्न तू पूर्ण केलंस. तुझ्या बाबांची खूप इच्छा होती तू इंजिनिअर व्हावं. आणि  मनूने  डॉक्टर. तू इंजिनिअर झालास. तुझ्या बाबांना खूप आनंद होईल बघ. मी लगेच कळवते त्यांना. आता मनू डॉक्टर झाली की आम्ही धन्य झालो. ”

आईच्या डोळ्यांत दाटून आलेले आनंदाश्रू पुसत प्रसाद म्हणाला,

“हे काय आई, तू आजच्या आनंदाच्या दिवशी अशी डोळ्यांतून पाणी का काढते? आता हस बघू.! आणि आज रात्रीच्या जेवणात छान श्रीखंड पुरीचा बेत कर. मी संध्याकाळी बाहेर जाणार आहे. सेलिब्रेशन आहे मित्रांसोबत. जाऊन लगेच येतो घरी.”

त्याने आईला वाकून नमस्कार केला. आणि खोलीत निघून आला. इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. 

“हाय प्रसाद, अभिनंदन लेका.! फर्स्ट क्लास मध्ये पास झालास. पार्टी तो देनी पडेगी. कधी भेटायचं सांग?”

प्रसादचा जिवलग मित्र अविचा फोन होता. पार्टीसाठी अगदी उतावीळ झाला होता. 

“अरे अव्या, पार्टीचं काय घेऊन बसलास? कधीपण ये. मी पार्टी द्यायला तयार आहे. आज येतोस का? मी आणि आस्था संध्याकाळी भेटतोय. आपल्या नेहमीच्या ‘सागर कॅफे’ मध्ये.. आपल्या बाकीच्या मित्र मैत्रिणींना पण सांग. 
तिथेच पार्टी करू. मस्त मज्जा करू. मी तसं आस्थालाही कळवतो.”

प्रसाद एकदम भरभरून बोलत होता. संध्याकाळी पार्टीचा प्लॅन ठरला. प्रसादने अविकडे बाकीची विचारपूस केली. कोण पास झालं? कोणाची दांडी गुल झाली? आणि मग थोडंसं बोलून त्याने फोन ठेवून दिला. 

संध्याकाळ झाली. प्रसाद फ्रेश होऊन तयार होऊ लागला. त्याने आस्थाच्या आवडीची जीन्स आणि नेव्ही ब्लु  रंगाचा टी शर्ट घातला.केसांना जेल लावून केस सेट केले.  हलकासा परफ्यूम मारला. व्हाईट कलरचे स्पोर्ट शूज घातले. मधल्या बोटात बाईकची चावी अडकवून गोल गोल फिरवत स्वारी निघाली पार्टीला. आईला येतो म्हणून प्रसाद घराच्या बाहेर पडला. निघताना मात्र तो आस्थाला कॉल करायला विसरला नव्हता. त्याने पार्किंगमध्ये लावलेली बाईक बाहेर काढली. बाईक सुसाट वेगाने ‘सागर कॅफे’ च्या दिशेने धावू लागली.  

प्रसाद सागर कॅफेपाशी येऊन पोहचला. कॅफेच्या आवारात त्याने बाईक लावली. त्याची नजर समोर गेली.  आस्था आधीच त्याची वाट पाहत कॅफेच्या बाहेर थांबली होती. हात हलवून त्यांनी एकमेकांना आल्याचं सांगितलं. प्रसाद आस्थाच्या जवळ आला. हात पुढे करत म्हणाला.,

“अभिनंदन डियर, खूप शुभेच्छा”

“थॅंक्यु प्रसाद, तुझंही खूप खूप अभिनंदन. चल आता आत जाऊ, बाकीचे आलेत का ते पाहू”

स्मित हास्य करत आस्था त्याला कॅफेच्या आत घेऊन जाऊ लागली. त्यांनी पाच सहा जणांचा एक मोठा टेबल बुक केला. दोघे तिथे जाऊन बसले आणि सर्वांची वाट पाहू लागले.  हळूहळू बाकीचे मित्रमैत्रिणींही गोळा होऊ लागले. एकमेकांना ‘जादू की झप्पी’ देत एकमेकांचं अभिनंदन केलं. पार्टी छान रंगत चालली होती. प्रसाद आणि त्याचे मित्र मैत्रिणी छान एन्जॉय करत होते. आस्थाही हसून सर्वाना प्रतिसाद देत होती. एन्जॉय करत होती  म्हणजे तसं दाखवत होती की काय कोण जाणे! काहीशी चिंतीत वाटत होती. प्रसादच्या नजरेतून ही गोष्ट चुकली नव्हती. काहीतरी बिनसलं आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने लवकरच उरकतं घेतलं. आणि वेळेत घरी पोहचायला हवं असं सांगून पार्टी संपवून एकमेकांचा निरोप घेतला. प्रसाद आस्थाला तिच्या घरापर्यंत सोडणार होता. आस्था आणि प्रसाद घरी निघाले. आस्थाच्या घराच्या दिशेने गाडी धावू लागली. थोड्याच अंतरावर आस्थाचं घर जवळ आलं होतं. बाईकचा वेग थोडा कमी करत प्रसाद आस्थाला म्हणाला,

“पिल्लू, काय झालं? आजच्या आनंदाच्या दिवशी अशी उदास का? सगळं ठीक आहे ना?”

त्याच्या प्रश्नासरशी भानावर येत आस्था म्हणाली, 

“प्रसाद, गाडी साईडला घेतोस का? मला बोलायचं आहे तुझ्याशी.”

प्रसादने लगेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडाजवळ गाडी लावली. आस्थाच्या डोळ्यांत आसवं उभी राहिली. आस्था बोलू लागली. 

“प्रसाद, काही दिवसांपूर्वी माझ्यासाठी एक स्थळ सांगून आलं होतं. मुलाकडचे पाहून गेले. ‘संग्राम सरंजामे’ नाव आहे त्याचं. खूप मोठी आसामी आहेत ते. बाबांच्या बिझनेस रिलेशनमधले. शिकलेली, घर सांभाळणारी मुलगी आहे म्हटल्यावर त्यांनी लगेच त्यांचा होकार कळवून टाकला. पण मी आणि माझ्या घरचे सर्वजण परीक्षेच्या रिझल्टची वाट पाहत होते. निकाल लागला मी पास झाले. सर्वाना आनंद झाला. आता माझ्या घरचे लग्नाची घाई करतील. प्रसाद, तुला घरी आपल्या प्रेमाबद्दल सांगायला हवं. नाहीतर काही खरं नाही आपलं. मला खूप टेन्शन येतंय रे! मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. प्रसाद प्लिज काहीतरी कर.”

आस्थाचं कळकळीचं बोलणं ऐकून प्रसाद थोडा गंभीर झाला. आस्थाला जवळ घेत म्हणाला.,

“आस्था, तू आजिबात काळजी करू नको. मी आजच घरी आपल्याबद्दल सांगतो. आणि लवकरच आई बाबांना घेऊन तुझ्या घरी येतो तुला मागणी घालायला. आपण दोघेही सुशिक्षित आहोत. आपल्या हातात जॉब्स आहेत. मला वाटतं आपल्या घरच्यांना काहीच अडचण असणार नाही. तू अजिबात चिंता करू नकोस. सगळं ठीक होईल. सो चिल्ड बेबी. एक छान स्माईल दे बघू”


प्रसादच्या बोलण्याने आस्थाला धीर आला. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले आणि प्रेमाने ती त्याला बिलगली.थोड्या वेळाने भानावर येत आस्था म्हणाली.,

“प्रसाद आपल्याला लवकर निर्णय घ्यावा लागेल. चल आता मला घरी सोड पकटन. उशीर झालाय आई रागवेल”

प्रसादने होकारार्थी मान डोलावली आणि त्याने आस्थाला तिच्या घराजवळ सोडलं. घरात जाण्यापूर्वी आस्थाला निरोप देताना  प्रसादने त्याच्या दोन्ही  हातांच्या ओंजळीत आस्थाचा चेहरा घेतला. आणि तिच्या कपाळावर त्याने ओठ टेकवले. आस्था लाजून त्याच्या कुशीत शिरली. नेमकं तेच दृश्य आस्थाच्या आईने स्वयंपाक घराच्या खिडकीतून  पाहिलं. खरंतर तेव्हांच आईचा पारा खूप चढला होता. पण तिने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवलं आणि आस्थाला घरात येऊ दिलं. आस्था घरात आली. आस्थाच्या वडिलांची बिझनेस मीटिंग असल्याने आज त्यांना उशीर होणार होता. आस्था फ्रेश होऊन, चेंज करून बाहेर हॉलमध्ये येऊन बसली.  इतक्यात तिची आई तिथे आली. 

“आस्था, तो मुलगा कोण होता?”

“कोण मम्मा?  कोण मुलगा?”

“खोटं बोलू नकोस आस्था, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तुमच्या दोघांचे चाळे. तुझ्या डॅडाला समजलं तर जीव घेतील तुझा आणि माझाही ”

आई खूप रागाने बडबडत होती.

“मम्मा, काय बोलतेस तू हे? चाळे? मित्र आहे तो माझा. प्रसाद नाव आहे त्याचं.” - आस्था

“मित्र आहे ना मग मित्रासारखंच राहावं. मिठ्या का मारत होतीस?  तो तुला.. शी.. मला बोलायलाही लाज वाटते. ”

आई खूप चिडली होती. आस्था गंभीरपणे म्हणाली,

“मम्मा, एका अर्थी बरंच झालं तू आम्हाला पाहिलंस. कारण मीच डॅडा आल्यावर तुम्हाला सर्व सांगणार होते. जो मुलगा मला सोडायला आला होता त्याचं नाव प्रसाद करमरकर. गेली चार वर्षे आम्ही एकमेकांना ओळखतो. आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि आम्हाला लग्न करायचं आहे.” 

तिचं बोलणं मधेच तोडत आस्थाची आई म्हणाली.

“वेड लागलंय का तुला? तुला माहीत आहे ना! डॅडाला हे मुळीच आवडणार नाही. ते हे लग्न कधीच होऊ देणार नाही आणि त्यांनी तुझं आधीच लग्न ठरवलं आहे. विसरलीस का?”

आई प्रचंड रागावली होती. पण आस्था निक्षून म्हणाली., 

“मम्मा, काहीही झालं तरी माझं लग्न प्रसादशीच होईल. हा माझा अंतिम निर्णय आहे” 

आणि ती उठून तडक आपल्या खोलीत निघून गेली. आई तिला आवाज देत राहिली. तीने काहीही न ऐकता सरळ खोलीत जाऊन दार धाडकन लावून घेतलं. 

इकडे प्रसाद घरी पोहचला. त्याचे बाबा आधीच घरी आले होते. लेकाचा उत्तीर्ण होण्याच्या, चांगल्या कंपनीत नोकरी मिळाल्याच्या बातमीने ते खूप आनंदात होते. घरी येताना प्रसादच्या आवडीची मिठाई सुद्धा आणली होती. प्रसादला समोर पाहताच बाबा उठून उभे राहिले. दोन्ही हात पसरवून आनंदाने उद्गारले

“हेय चॅम्प, अभिनंदन. आपल्या संपूर्ण घराण्याचं नाव उज्वल केलंस. आपल्या घराण्यातला पहिला इंजिनिअर. ग्रेट, वुई आर रिअली प्राउड ऑफ यू बेटा.”

प्रसादने  बाबांना खाली वाकून नमस्कार केला. बाबांनी त्याला जवळ घेतलं.  कौतुकाने, अभिमानाने त्यांचा ऊर भरून आला होता. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मनूनेही दादाचं अभिनंदन केलं.  इतक्यात आई बाहेर आली. 

“चला आता पुरे झाला कौतुक सोहळा. अहो उत्सवमूर्ती, पोटात कावळे ओरडत असतील ना. जा लवकर फ्रेश होऊन या. जेवणाच्या टेबलवर सगळे तुझी वाट पाहतोय. आज तुझ्या आवडीचा बेत केलाय. ये लवकर”

प्रसादने हसून आईला होकार दिला आणि फ्रेश होऊन जेवणाच्या टेबलावर आला. आज खरंच खूप छान साग्रसंगीत बेत होता. सगळ्यांनी भोजनावर यथेच्छ ताव मारला. साऱ्यांची जेवणं उरकली. आईने बाकीचं सर्व आवरून घेतलं. आणि सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले. आज बऱ्याच दिवसांनी बाबांना निवांत वेळ मिळाला होता किंबहुना त्यांनी तो काढला होता. बाबा बोलता बोलता प्रसादला म्हणाले.,

“हेय चॅम्प, पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू?”

“बाबा, नोकरी तर मिळाली मला. पण पुढे अजून एम. ई., पोस्ट ग्रॅज्युएशन करावं असं वाटतंय. बघू कसं होतंय ते?”

प्रसादला अजून काहीतरी सांगायचं होतं पण तो सांगायला कचरत होता. बोलताना अडखळत होता. त्याचा हा गोंधळ बाबांच्या लक्षात आला. 

“काय झालं बेटा, तुला अजून काही वेगळं सांगायचं आहे का? काही मागायचं असेल तर बिनधास्त माग. पण आपल्या बाबाची आर्थिक कुवत बघून माग हो”

आणि ते खळखळून हसले. वातावरण मोकळं झालेलं पाहून प्रसादने बोलायला सुरुवात केली.

“बाबा, मी आणि मनू जे काही आहोत ते फक्त तुम्हा दोघांमुळेच. तुम्ही दोघांनी आम्हाला आजवर काहीच कमी पडू दिलं नाही. आई बाबा म्हणून जे जे शक्य होतं ते ते तुम्ही आम्हाला दिलंत. आमच्या पायावर उभं केलंत. स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता आमच्यात निर्माण केलीत. तुमचे उपकार न विसरण्यासारखेच. आणि म्हणूनच मी आज हिंमत करून तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे आस्था. तिचे बाबा शहरातले नामांकित उद्योगपती आहेत. आम्ही दोघे एकमेकांना गेली चार वर्षे ओळखतो आहे. आम्ही दोघेही चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकऱ्या सुद्धा मिळाल्या. बाबा, आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि आम्हाला लग्न करून आयुष्यभर सोबत राहायचं आहे.”


प्रसादने एका दमात सर्व बोलून टाकलं आणि दीर्घ श्वास घेऊन आईबाबांकडे पाहिलं. आई बाबा अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होते. 

पुढे काय होतं? आस्था आणि प्रसादाच्या लग्नाला त्यांच्या घरचे परवानगी देतील का? पाहूया पुढील भागात..
© निशा थोरे..

🎭 Series Post

View all