आणि ती आई झाली.. भाग १४ (अंतिम)

कथा तिच्या मातृत्वांची

आणि ती आई झाली..

भाग - १४ (अंतिम)


 

गाडी वस्तीत शिरली तसं तिला गजबज दिसू लागली. एक कुबट वास येत होता. एकमेकांना चिटकून वसलेल्या झोपड्या दिसत होत्या. काही बायका पाण्याच्या नळावर पाण्यावरून वाद घालत होत्या. एका घरासमोर एक पुरुष आपल्या बायकोला बेदम मारत होता. शिवीगाळ करत होता. एका ठिकाणी काही लोक एकत्र येऊन पत्ते, जुगार खेळत बसले होते. आस्था बैचेन झाली. लहानपणापासुन श्रीमंतीत वाढलेल्या, लग्नानंतर प्रसादसोबत गरिबीतही सुखाने संसार करणाऱ्या आस्थासाठी  हे सारं नवीन होतं. या दुःखाची तिला तिळमात्रही कल्पना नव्हती. भांबवलेल्या नजरेने ती हे सारं पाहत होती.

गाडी बाळूच्या घरासमोर थांबली. सगळेजण गाडीतून खाली उतरले.  एका मोडक्या झोपडीपाशी ती आलिशान गाडी थांबलेली पाहून आजूबाजूचे लोक जमा होऊ लागले. आस्था आत गेली. जमिनीवर एका कोपऱ्यात बाळू हातापायांची वळकुटी करून पांघरून घेऊन झोपला होता. आस्थाने त्याच्या तोंडावरचं पांघरून दूर केलं. त्याच्या माथ्यावर हात ठेवला आणि पटकन दूर केला. बाळू तापाने फणफणत होता. तिने पटकन बारक्याला एक कापड आणि एका भांड्यात मीठ घालून पाणी आणायला सांगितलं. ती बाळूच्या माथ्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. ताप उतरत नव्हता. 

इतक्यात तिची डॉक्टर मैत्रीण कीर्ती तिथे आली. तीने बाळूला  तपासलं. इंजेक्शन आणि काही औषध लिहून दिली. बाळूची ती अवस्था पाहून तिला गहिवरून आलं. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आजूबाजूच्या बायका कौतुकाने तिच्याकडे पाहू लागल्या. इतक्यात तंबी तिच्यासाठी चहा घेऊन आला. आस्था तिथल्या बायकांशी कधी एकरूप झाली तिलाच समजलं नाही. लहान मुलांना घरातल्या दारिद्र्यामुळे शाळेत न पाठवता छोट्या मोठ्या कामाला पाठवणाऱ्या लोकांची आणि मुलांची संख्या जास्त होती. ती सर्वांचं म्हणणं ऐकून घेत होती. त्यांना समजून घेत होती. आस्था दिवसभर तिथेच राहिली. तिने फोन करून प्रसादला तस कळवलं होतं. प्रसादला तिच्या वस्तीत जाण्याचं नवल वाटलं आणि काळजीही. तो लगेंच ऑफिसमधून तिला घेण्यासाठी वस्तीच्या दिशेने निघाला. 

संध्याकाळ होत आली होती. आता बऱ्यापैकी बाळूचा ताप कमी झाला होता. तिने सदाला सांगून नारळपाणी आणि फळे आणायला सांगितलं. बाळूचं घर म्हणजे फक्त पसारा. सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. कपडे कुठेही टाकले होते. आस्थाने घर आवरलं. शेजारणीच्या मदतीने बाळूसाठी रव्याची पेज बनवली. ती त्याला भरवली. आता बाळूने डोळे उघडले. समोर आस्थाला पाहून आपसूक त्याच्या तोंडी शब्द उदगारले. 

“माई, तु कधी आलीस?”

पुन्हा एकदा माई या शब्दाने गहीवर दाटून आला.

“सकाळीच आले. आणि मी आता  तुझं काहीच ऐकणार नाही. मी तुला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. तुला पूर्णपणे बरे वाटल्याशिवाय तुला सोडणारच नाही.”

आस्था निक्षुन म्हणाली. बाळू कसनूसं हसला. थोड्या वेळात प्रसादही तिथे पोहचला. आस्थाने बाळूला घरी घेऊन जाण्याची इच्छा प्रसादजवळ बोलून दाखवली. प्रसादने आस्थाच्या इच्छेखातर होकार दिला. प्रसादने सदा आणि ड्राईव्हरला गाडी घेऊन पुढे जाण्यास सांगितलं. सदा आणि ड्राईव्हर गाडी घेऊन घरी निघून गेले. प्रसादने आपल्या गाडीच्या गाडीच्या मागच्या सीटवर बाळूला झोपवलं. 

आस्था पुढच्या सीटवर बसली. ते आपल्या घरी निघाले. पूर्ण रस्ताभर आस्था शांत बसून होती. तिला शांत बसलेलं पाहून प्रसाद म्हणाला.,

“काय झालं डार्लिंग, इतकी शांत का?. तो ठीक आहे आता. दोन दिवस आराम केला की एकदम खडखडीत बरा होईल. नको काळजी करू.”

आणि त्याने प्रेमाने तिच्या हातावर हात ठेवला. तशी ती भानावर आली. तिने दचकून प्रसादकडे पाहिलं.

“अग, कुठे हरवलीस? माझ्या बोलण्याकडे तुझं लक्ष नव्हतं की काय?”

प्रसाद हसून म्हणाला. 

”प्रसाद आज मी आयुष्यात पहिल्यांदा इतकं दारिद्र्य पाहिलं. दुःखी रंजलेली, गांजलेली माणसं पाहिली. रोजची त्यांची जगण्याची लढाई सुरु असते. एकीकडे अमाप संपत्त्तीत लोळणारी माणसं आणि दुसरीकडे जगण्यासाठी संघर्ष करणारी ही गरीब माणसं. काय विचित्र आहे नाही? परमेश्वर पण बघ ना, एखाद्याला सुख भरभरून देतो आणि दुसरीकडे त्याच सुखासाठी एखादयाला आजन्म वाट पाहायला लावतो. किती विचित्र न्याय आहे ना ईश्वराचा! आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं प्रसाद.”

हे बोलताना आस्थाच्या डोळ्यात पाणी आलं. 

“अगदी खरंय ग, पण हे संचिताचे भोग असतात. प्रत्येकाला भोगावेच लागतात. तु खूप भावनिक होऊन विचार करत आहेस. तु प्लिज जास्त विचार करू नकोस. शांत हो बघू.”

प्रसाद तिला प्रेमाने समजावत होता. थोडया  वेळात गाडी बंगल्यात शिरली. गाडीचा हॉर्न वाजवून त्याने सदाला आवाज दिला. सदा पटकन धावत बाहेर आला. ड्राइव्हरच्या मदतीने त्याने बाळूला मागच्या सीटवरुन उचलून बाहेर काढलं  आणि आस्थाच्या शेजारच्या खोलीत झोपवलं. आस्था आणि प्रसाद दोघेही फ्रेश झाले. आस्था जरा शांत होती. जेवणाच्या टेबलवरही ती काहीच बोलत नव्हती. तिचं जेवणात आजिबात लक्ष नव्हतं. ती कसल्यातरी विचारात मग्न होती. प्रसादने दोन तीन वेळा आवाज दिल्याने तिची तंद्री तुटली होती. रात्रीचं जेवणं आटोपून ते झोपण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेले. प्रसादने तिला तिच्या औषधांची आठवण करून दिली. ते घेऊन झाल्यावर क्षणभर थांबून आस्था प्रसादला म्हणाली.,

“प्रसाद, बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात एक विचार येतोय. तुला सांगण्याचा धीर होत नाहीये.”

“अग बोल ना, काय बोलायचं आहे. मनात असेल ते बोल बिनधास्त. का इतका संकोच?” 

प्रसाद तिच्याकडे पाहून म्हणाला. 

“बऱ्याच दिवसांपासून ही मुलं आपल्या घरी येत आहेत. त्यांचा आपल्याला आणि आपल्याला त्यांच्या लळा लागला आहे. आणि त्यात बाळू म्हणजे माझा जीव की प्राण.. तो असला की मला खूप छान वाटतं. बाळूच्या येण्याने माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख आलं आहे. पुन्हा एकदा आनंद. 

त्याने ‘माई’ म्हणून पहिल्यांदा हाक मारली ना तेंव्हा मला इतका आनंद झाला होता म्हणून सांगू! प्रसाद, आपण बाळूला दत्तक घेऊया का?”

“काय..? वेडी झालीस का तु? थोडा वेळ तुझा विरंगुळा व्हावा म्हणून मी त्यांना इथे यायला परवानगी दिली. पण तु आता हे काय बोलते आहेस? आपल्याला त्या मुलांविषयी काहीच नाही. कोण, कुठली? कोण जाणे! आजकाल वाचतेस ना,

वर्तमानपत्रात काय काय छापून येतं ते? आणि आपल्याला तरी त्याचे आई बाबा होता येईल का? तितके आपण सक्षम आहोत का?”

प्रसाद जवळ जवळ किंचाळलाच तरीही शांत स्वरात आस्था म्हणाली.,

“प्रसाद, प्लिज चिडू नकोस. माझ्या बोलण्याचा नीट विचार कर. आणि कोण म्हणालं तुला की, आपण चांगले आई बाबा होऊ शकणार नाही? अरे या जगात कितीतरी अशी जोडपी आहेत की शारीरिकदृष्ट्या मूल जन्मास घालण्यास असमर्थ आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते चांगले आईबाबा होऊ शकणार नाही.आपण नक्कीच चांगले आईबाबा होऊ शकतो. अशी कितीतरी अनाथ मुलं आहेत की ज्यांना आई बाबा नाहीत. आपण अशा एका जरी मुलाचे आईबाबा होऊ शकलो ना तर आपलं आयुष्य सार्थकी लागेल. त्या मुलाचं भविष्य घडेल. बाळूसारख्या एका जरी मुलाच आपण पालकत्व स्वीकारलं ना, त्याच्या आयुष्याच सोनं होईल हे का विसरतो आहेस तु?”

आस्थाच्या बोलण्याने प्रसाद विचारमग्न झाला. त्याला तिचं म्हणणं बुद्धीला पटत होतं पण मन मान्य करायला तयार नव्हतं. तो तिला म्हणाला.,

“आस्था, तुझं म्हणणं मला पटतंय पण असा तडकाफडकी निर्णय घेणं योग्य नाही. मला विचार करावा लागेल. आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. आपल्या आईबाबांना विचारावं लागेल. मी त्यांना इथे बोलवून घेतो मग आपण ठरवू काय ते.!”

आस्थाने मान डोलावली. तिच्या मनात आशा पल्लवीत झाल्या. ती अलगद प्रसादच्या कुशीत शिरली. त्याच्या हाताची उशी करून शांत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आस्था झोपेतून उठल्या उठल्या बाळूच्या खोलीत गेली. तो शांतपणे झोपला होता. त्याचा निरागस चेहरा पाहून तिचा ऊर मायेने भरून आला. तीने त्याच्या माथ्यावर हात ठेवून ताप तपासून पाहिला. आता ताप उतरला होता. 

चार दिवसाच्या आरामानंतर बाळू एकदम ठणठणीत झाला. चेहऱ्यावर एक हुरूप दिसू लागला. आस्थाने त्याची खूप काळजी घेतली होती. प्रसादलाही त्याचा लळा  लागला होता. त्याच्या विषयी प्रेम वाटू लागलं होतं. आता त्याच्याही मनात बाळूला दत्तक घ्यावं हा विचार डोकावू लागला. प्रसादने आपल्या आई वडिलांना घरी बोलवून घेतलं. आईवडिलांना त्याचा निर्णय सांगितला. आईने सुरुवातीला थोडा विरोध केला. पण काही दिवसांत आईला प्रसाद आणि आस्थाचा निर्णय पटला. आणि त्यांनीही बाळूचा नातू म्हणून स्वीकार केला. पण अजून ही गोष्ट बाळूला माहित नव्हती. 

रविवारचा दिवस होता. प्रसाद, आईबाबा सकाळी निवांतपणे ब्रेकफास्ट करत होते. आस्थाने कमलाला

बाळूलाही पोहे आणि चहा द्यायला सांगितलं.  नाश्ता करता करता बाळू म्हणाला.,

“माई, मी आता बरा झालोय.  आता मला जायला हवं. माझा मालक वाट बघत असल. इतक्या दिवसांचा पगार बी कापल आता.”

तो थोडा काळजीत पडला. आस्थाने आईबाबा आणि प्रसादकडे पाहिलं. सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. आस्था हसून बाळूला म्हणाली. 

“बाळू, आता तु कुठेही जाणार नाहीस. आमच्या सोबतच राहणार आहेस. आजपासून मी आणि प्रसाद तुझे आईबाबा..! आणि हे तुझे आजी आजोबा. बाळ, तुझ्या माई या हाकेने मला साद घातलीस. तु मला माझं मातृत्व दिलंस. मला सोडून जाऊ नको रे”

बाळूच्या डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहू लागले. त्याने आस्थाला तिला घट्ट मिठी मारत म्हणाला.,

“नाही माई, मी तुला कधीच सोडून जाणार नाही.”

समोरचं दृश्य पाहून प्रसाद आणि आईबाबांचेही डोळे पाणावले. प्रसादने आस्था आणि बाळूला जवळ घेतलं. आज बाळूला त्याचे आईबाबा भेटले होते. आज एक कुटुंब पूर्ण झालं होतं. 


 

बाळूला आस्थाच्या रूपाने त्याची स्वर्गवासी आई पुन्हा मिळाली होती. एक परिवार मिळाला होता. पण तो आपल्या मित्रांना कधीच विसरला नाही. तो कायम आस्था सोबत त्या जुन्या वस्तीत येत राहिला. आस्थानेही त्या वस्तीच्या उद्धारासाठी काम करण्यास सुरुवात केली. तिथल्या स्त्रियांचे अधिकार,  त्यांचे प्रश्न सोडवू लागली. त्यांच्यासाठी गृहोद्योग देऊन त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडला होता. आस्थाने स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलं. प्रसादनेही आस्थाला तिच्या या कार्यात सहकार्य केलं. जागोजागी ‘माई अनाथालय’, ‘माई महिलाश्रम’, ‘माई वृद्धाश्रम’ उभे राहिले. 

आणि ती खऱ्या अर्थाने साऱ्या समाजाची आई झाली होती.


 

पूर्णविराम..

© निशा थोरे..

🎭 Series Post

View all