आणि ती आई झाली.. भाग १३

Katha tichya matrutvachi

आणि ती आई झाली..

भाग - १३ 

प्रसाद आणि त्याचा नोकर सदा त्या मुलांना शोधायला निघाला. गाडी झोपडपट्टीच्या दिशेने धावू लागली. प्रसादच्या मनात विचार घोळू लागले. 

“हे ईश्वरा, आता कुठे आस्थाच्या चेहऱ्यावर मी आनंद पाहिला होता इतक्या दिवसांनी. ती आजारातून बरी होऊ लागली होती. त्या मुलांच्या रूपाने तूच तिच्या आयुष्यात आनंद घेऊन आला होतास. मग का पुन्हा तिचा आनंद असा हिरावून घेत आहेस? प्लिज देवा, माझ्या आस्थाच्या चेहऱ्यावरचा आनंद परत दे. तुम्ही मला भेटू दे. आजन्म मी तुझे उपकार विसरणार नाही. इतकीच कृपा कर रे देवा.” 

त्याच्या डोळ्यांत आसवं उभी राहिली. सदालाही गहिवरून आलं. थोड्याच वेळात गाडी जवळच्या झोपडपट्टीत शिरली. झोपडपट्टीच्या सुरुवातीलाच एक चहाची टपरी दिसली आणि तिथे काम करणारा तंबी सर्वांसाठी चहा घेऊन येताना दिसला.

“साहेब, तो पहा छोटा मुलगा. तो होता त्या मुलांसोबत.”

प्रसादने चमकून त्या दिशेने पाहिलं. तंबी सर्वांना चहा देत होता. ड्राइव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. प्रसाद आणि सदा गाडीतून खाली उतरले. त्या टपरीच्या दिशेने येऊ लागले. सदाने तंबीला आवाज दिला. 

“अरे साहेब तुम्ही! इकडे कसे?”

चकित झालेल्या तंबीच्या मुखातून आपोआप उदगार बाहेर पडले. तंबीने सदाला अचूक ओळखले होते. सदा म्हणाला,

“तंबी, हे आमचे मालक. तुम्हाला भेटायला आले आहेत.”

तंबीने प्रसादकडे पाहिलं. हसून म्हणाला.,

“साहेब, माझ्याकडे काय काम व्हतं? बरं ते जाऊ द्या. आधी तुम्ही आमच्या इथला चाय तर पिऊन बघा. कुठ बी मिळायचा नाय असला चाय.”

असं म्हणून त्याने “दोन कटिंग..” असा आवाज दिला आपल्या मालकाकडे पाहत म्हणाला.,

“चाय चे पैसे माझ्या पगारातून कापा मालक” 

हॉटेल मालकाने त्याच्याकडे पाहून मान डोलावली. आपल्या पैशांनी आपण कोणाला तरी चहा पाजत आहोत. याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. प्रसादनेही तो आनंद त्याला मिळवून देण्यासाठी आनंदाने चहा घेतला. नकळत त्याला जुन्या दिवसांची आठवण झाली. कॉलेजचा कट्टा, चहाची टपरी,  एकाच छोट्या काचेच्या ग्लास मधुन आस्था आणि त्याने घेतलेला चहा आठवलं. एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या अविरत गप्पा सारं काही त्याला आठवत होतं. तंबी अगदी खरं म्हणाला होता. चहा एकदम कडक मस्तच झाला होता. प्रसादला चहा पिऊन एकदम तरतरी आली. चहा संपून त्याने बोलण्यास सुरुवात केली. 

“तम्बी, तु बाईसाहेबांना ओळखतो ना?”

तंबीने मान डोलावली. प्रसाद बोलू लागला.

“ती खूप आजारी आहे. त्यादिवशी तुम्ही सर्वांनी तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणलं. तीचा चेहरा आनंदाने नाहून निघाला होता. पण तुम्ही परत आला नाहीत. ती पुन्हा उदास झाली. आजारी पडली. आता तर ती कोणाशीच बोलत नाही. ”

डोळ्यात आलेलं पाणी पुसत प्रसाद म्हणाला.,

“मला तुमची मदत हवीय. कराल का?”

“साहेब बोला ना, काय मदत करू? बाईसाहेब लै चांगल्या हाईत. त्या दिशी त्यांनी आमाला खायला प्यायला दिल. लई चांगल्या.” - तंबी

“तु आणि तुझे ते मित्र तिला भेटायला येऊ शकता का?” - प्रसाद

“साहेब, रोज नाय जमणार. पण येऊ कधीमधी. माझ्या बाकीच्या दोस्तांना पण घेऊन येतु.” - तंबी

“ आता येऊ शकतोस?” 

प्रसादने तंबीला विचारलं. त्याने नाईलाजाने त्या हॉटेल मालकाकडे पाहिलं. ही गोष्ट  प्रसादच्या लक्षात आली. प्रसादने तंबीच्या मालकाकडून परवानगी घेतली तसा तंबीचा चेहरा फुलला. ते सर्वजण कारच्या दिशेने जाऊ लागले. सर्वजण गाडीत बसले. तंबीने मग मुक्या, काळया, बारक्या, इस्माईल, बाळू यांना एकत्र जमवलं आणि सर्वजण प्रसादच्या घरी पोहचले. 

घरी पोहचताच प्रसाद आस्थाच्या खोलीत आला आणि त्याने तिला आवाज दिला. 

“आस्था, डोळे उघड बघू. कोण आलंय बघ तुला भेटायला?”

आस्थाने डोळे किलकिले करून पाहिलं. समोर बाळू आणि त्याचे मित्र उभे होते. तिला कळत नव्हतं की हे सत्य आहे का भास? बाळू जवळ आला. आपसूक त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडला.

“माई..”

त्या आवाजासरशी आस्था झोपेतून जागी झाली. खरोखरीच समोर बाळू आणि त्याचे मित्र उभे होते. तो तिचा भास नव्हता. तीने पटकन बाळूला कुशीत घेतलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. इतक्या वर्षांनी कोणीतरी तिला ‘माई’ म्हणून आवाज दिला होता. तिला भरून आलं. डोळे झरू लागले. प्रसाद आणि सदाच्या डोळ्यातही पाणी आलं. सर्वांना घरी आलेलं पाहून तिला खूप आनंद झाला. ती उठून बसली. तीने सदाला सांगून त्यांच्या साठी नाश्ता मागवून घेतला. मुलं आनंदाने खाण्याचा आस्वाद घेत होती. आस्थाही उठून बसली. प्रसादने त्या संधीचा फायदा घेत लगेच तिलाही जेवण भरवलं. मुलांना पाहून आस्था खूप आनंदात होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदी छटा उमटली होती.  थोड्या वेळाने  गप्पा मारून मुलांनी तिचा निरोप घेतला. पण त्यांच्याकडून पुन्हा घरी येण्याचं वचन घ्यायला ती विसरली नाही. प्रसाद त्या मुलांना घेऊन बाहेर अंगणांत आला आणि बाळूला म्हणाला.,

“बाळू, मघाशी आस्था खुप आनंदी होती. तुम्ही आलात तुम्हा सर्वांना पाहून ती पुन्हा उठून बसली. तु तिला माई म्हणून आवाज दिला. किती आनंदली होती ती.! पहिल्यांदा कोणीतरी तिला अशी हाक दिली होती. तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला हवाय बाळू! ती हवीय मला. माझं एक काम करशील का? तुझ्या मित्रांना घेऊन रोज थोड्या वेळेसाठी तरी इथे घरी येशील?” 

बाळूने आपल्या मित्रांकडे पाहिलं आणि म्हणाला.,

“ साहेब, आम्ही येऊ. माई बरी व्हायला पाहिजे. आम्हाला बी इथं आल्यावर बर वाटत. आई, तिची माया आम्हांला बी पाहिजेल ना. पण आमचा मालक रागवल आमच्यावर. काम सोडून इथं बसुन राहिलो म्हणून.”

“तु त्याची काळजी करू नको. मी बोलेन तुमच्या मालकाशी. त्यांची परवानगी घेऊच आपण. पण प्लिज तुम्ही या.”

दोन्ही हात जोडून प्रसाद मुलांसमोर उभा होता. आपल्या जिवलग बायकोसाठी, तिला वाचवण्यासाठी त्याची काहीही करण्याची तयारी होती. कोणासमोरही हात जोडण्यास तयार होता. मग बाळूने फार आढेवेढे न घेता आपल्या मित्रांसोबत प्रसादला घरी येण्याचं कबूल केलं. 

आता ती मुले रोज नित्य नियमाने थोड्या वेळेसाठी का होईना, त्यांच्या कामातून सवड काढून घरी येऊ लागली. आस्थासोबत गप्पा गोष्टी करु लागली. आस्थाही त्यांच्या सोबत रमू लागली. दिवस छान सरत होते. आता दिवसेंदिवस आस्थाची प्रकृती सुधारत होती. पूर्वीची आस्था परत आली होती. तीच अवखळ, हसरी आस्था पूर्वीसारखीच सर्वांसोबत वावरू लागली. आस्थाच्या प्रकृतीतला सुधार पाहून डॉक्टर्सही अचंबित झाले होते. प्रसादही खूप आनंदात होता. आजवर त्याच्या व्यवसायाच्या व्यापामुळे त्याला आस्थाकडे लक्ष देता आला नव्हतं. पण आता संपूर्ण वेळ आस्थाला देण्याचं ठरवलं होतं. तिच्या सुखासाठी तो कायम तिच्याजवळ असणार होता. त्या मुलांच्या रूपाने  प्रसादने आस्थाच्या आयुष्यात हरवलेला आनंद परत आणला होता. तिच्या चेहऱ्यावर आलेला आनंदाने  घरात पुन्हा एकदा नवचैतन्य आलं होतं. मुलांच्या येण्याने घराचं गोकुळ झालं होतं. आस्था सर्व मुलांची काळजी घेत होती. तीने त्यांच्यासाठी नवीन कपडे घेतले.  आस्था मूलं घरी आली की त्यांना पोटभर खायला प्यायला द्यायची शिवाय घरी घरी खाण्यासाठी डब्यात घालूनही द्यायची. बाळू आणि त्याचे मित्रही खूप आनंदात असायचे. त्यांनाही मायेचं घर, आईची माया मिळत होती. ज्या सुखाची कधी कल्पनाही केली नव्हती ते सुख त्यांना उपभोगता येत होतं.


 

दिवस छान सरत होते. एक दिवस काय झालं. नेहमीप्रमाणे आस्था मुलांची वाट पहात बसली होती. तीने त्यांच्यासाठी  छान नाश्ता बनवला होता. थोड्याच वेळात मुलं घरी आली. आस्था बाहेर आली. पण  तिला त्यांच्या सोबत आज बाळू दिसला नाही.  तिने विचारलं.,

“अरे आज बाळू का आला नाही?”

“माई बाळूला बर नाय. झोपलाय घरी.” 

बारक्या म्हणाला. आस्था थोडी अस्वस्थ झाली. मुलांच्या गप्पा सुरु होत्या. तीने त्यांच्यासाठी आवडीने बनवलेले पदार्थ खाणं सुरु होतं. पण आस्थाच संपूर्ण लक्ष बाळूकडे लागलं होतं. ती बोलत होती. पण मन मात्र बाळूच्या काळजीने भरून गेलं होतं. मुलांचा नाश्ता झाला आणि मुलं घराकडे निघाली. इतक्यात आस्थाने आवाज दिला. त्यांना थांबवत ती म्हणाली.,

“बारक्या थांब, मी सुद्धा येते तुमच्या बरोबर. मला बाळूची काळजी वाटतेय. मी एकदा बाळूला भेटले की मला बर वाटेल. मी आलेच”

असं म्हणत तीने तिच्या ड्राईव्हरला आवाज दिला आणि गाडी काढायला सांगितली. त्याचवेळी तीने तिच्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला आणि तिला बाळूच्या वस्तीचा पत्ता देऊन त्वरीत यायला सांगितलं. सर्वजण गाडीत बसले. आस्था मुलांच्या शेजारी बसली. एकदम तिला त्यांची आई झाल्याची भावना खूप सुखावून गेली होती. जगात आपणच सर्वात सुखी आहोत असं तिला वाटून राहिलं. गाडी झोपडपट्टीच्या दिशेने धावू लागली. 

पुढे काय होतं? बाळूच पुढे काय होतं? पाहूया पुढील आणि अंतिम भागात..

क्रमशः 

© निशा थोरे..

🎭 Series Post

View all