आणि ती आई झाली.. भाग १२

ही एका आईची कथा

आणि ती आई झाली..

भाग - १२ 

आस्थाने पाकीट उघडून पाहिलं. त्यात काही कागदपत्रे होती. ड्राइविंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड त्यावर ‘सुरेंद्र थापा’ असं नाव होतं. काल पार्टीला आलेल्या प्रसादच्या मित्राचं ते पाकीट होतं. तिने प्रसादला फोन करून सापडलेल्या पाकिटाबद्दल कळवलं. नोकराला सांगून त्या मुलांसाठी नाश्ता मागवला. त्यांना खायला सांगितलं. त्या मुलांचा प्रामाणिकपणा पाहून तिला खूप आनंद आणि आश्चर्यही वाटलं. तिने त्या मुलाला विचारलं.,

“हे पैश्याने भरलेलं पाकीट पाहून तुला स्वतःला ठेवावं नाही वाटलं? घरी घेऊन जावंसं नाही वाटलं? यातून खूप सारे कपडे, खायला पदार्थ आले असते. का परत केलं?”

तो मुलगा कसनुसं हसत म्हणाला.,

“बाईसाहेब, माझी आई खूप आजारी व्हती. अगदी मरणाच्या दारात. तिच्यासाठी औषध आणायला पण पैसे नव्हते. मेडिकलवाला पैसे दिल्याबिगर औषध देईना. मग मी ती औषधांची पिशवीच चोरली. मेडिकलवाला मला धरायला धावत आला पण तोवर मी तिथून पळ काढला. धावत घरी आलो. आईने मला विचारलं.,

“औषधाला पैसे कुठून आणले?” 

मी चोरी केल्याचं सांगितलं. आई खूप चिडली. मला म्हणाली,

“चोरी केलेल्या, हरामाच्या पैशाने मी माझा इलाज करणार नाही. नको मला दवा नको. मला वचन दे तू यापुढे चोऱ्यामाऱ्या, टवाळगिरी करणार नाही. इमानदारीने पैसे आणशील.” तिने माझा हात हातात घेऊन माझ्याकडून वचन घेतलं आणि औषध न घेताच सोडून गेली कायमची.”

डोळ्यांत आलेलं पाणी आवरत तो बोलू लागला., 

“आईची ती गोष्ट आजपातुर ध्यानात ठेवली. माझी आई मरणाच्या दारात असतानाही तिने इमानदारी सोडली नाही मग मी कसं सोडू? आईला दिलेलं वचन कसं मोडू? आजवर कधीच चुकीचं काम केलं नाही.  खोटं वागलो नाही. म्हणून मला या पैश्यांचं अप्रुप वाटत नाही. जे माझं कष्टाचं नाही त्याची हाव का करू?”

आस्थाला गलबलून आलं. तिने त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. डोळ्यांत दाटलेलं पाणी पुसत ती म्हणाली., 

“कुठे राहता तुम्ही आणि तुमची नावं काय रे?”

“बाईसाहेब, इथून थोडं पुढे गेलो ना.. एक झोपडपट्टी लागते. तिथेच राहतो आम्ही. हा तंबी, मुक्या, बारक्या, काळ्या, इस्माईल आणि मी बाळा” 

तो मुलगा उत्तरला. त्यांची विचित्र नावं ऐकून तिला थोडं वेगळं वाटलं. तिची प्रश्नार्थक मुद्रा पाहून बाळाने तिला पडलेले प्रश्न अचूक ओळखले. तो म्हणाला.,

“बाईसाहेब, आमच्या नावाची बी एक गोष्ट हाय.  हा चहाच्या टपरीवर काम करतो. तिथे मालक याला तंबी म्हणू लागला. मग त्याचं नाव तंबी पडलं. त्यानंतर सर्वजण याला तंबी म्हणू लागले. हा सिग्नलजवळ गजरे विकतो पण याला बोलता येत नाही. म्हणून याचं नाव मुक्या. बारक्या कचराकुंडीतून प्लास्टिक गोळा करतो. हा रंगाने काळा म्हणून सगळे याला काळ्या म्हणतात. इस्माईल बूट पॉलिश करतो. आणि मी गॅरेजमध्ये काम करतो. रिपेरिंगसाठी आलेल्या गाड्या धुतो. पुसतो.”

त्यांच्या नावाची कथा ऐकून आस्था हसली.  तिने बाळूला विचारलं.,

“आणि मग शाळा? शाळेत कधी जाता?”

त्या प्रश्नासरशी ते चौघेही एकमेकांकडे पाहू लागले. 

“आम्ही शाळेत जात नाही बाई. शाळेत गेलो तर आम्हाला जेवायला कोण देईल? आम्हाला मायबाप नाही. आमचा मालकच आम्हाला सांभाळतो.”

बाळू उत्तरला. पुन्हा एकदा आस्थाला गलबलून आलं. डोळ्यांत पाणी तरळून आलं. अजून थोडा वेळ तिने त्या मुलांशी गप्पा मारल्या. त्याना खायला दिलं. आणि थोड्या वेळाने ती मुलं तिथून निघून गेली.  आस्थाच्या डोक्यात मात्र त्यांचाच विचार घोळत होता. संध्याकाळी प्रसाद घरी आला. फ्रेश होऊन तो आस्थाच्या खोलीत आला. पण आज आस्था त्याला नेहमी पेक्षा वेगळी भासली. आनंदी एकदम पूर्वीसारखी. तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. चेहऱ्यावर आनंद चमकत होता. त्याला मनोमन हायसं वाटलं.

“काय राणी सरकार, आज एकदम खुशीत दिसताय. कसली जादू ही?”

प्रसादने तिला प्रश्न केला. त्या प्रश्नासरशी आस्था भानावर आली. आणि तिने प्रसादला सकाळी घडलेली घटना सांगितली. प्रसादला तिच्या आनंदामागचं कारण समजलं. तोही आनंदी झाला. आस्था पुढे म्हणाली.,

“प्रसाद, बघ ना, आजवर मी माझं दुःख कवटाळून बसले होते. पण माझ्यापेक्षाही दुःखी माणसं या जगात येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत जगत आहेत. बघ ना इतक्या लहान वयात त्यांना आलेलं पोरकेपण. प्रत्येकाची कहाणी वेगळी.  पण तरीही ते कसलीही तक्रार न करता हसतमुखाने कष्ट करत आहे. आनंदाने जगत आहेत आणि आपण मात्र उगीच दुःख कुरवाळत बसतो. त्या दुःखाचा बाऊ करतो. त्यांच्याकडे पाहिलं न की, आपलं दुःख किती छोटं भासू लागलंय मला.”

प्रसाद तिच्याकडे कौतुकाने पाहत होता.

“किती विचार करते ही इतरांचा! आई न होऊ शकण्याचं इतकं मोठं दुःख हिमतीने पचवत ती पुढे पुढे मार्गस्थ होतेय. आपण आपल्या धंद्याच्या व्यापात व्यस्त राहिलो. तिच्याकडे लक्षही देऊ शकलो नाही. इतकी अमाप संपत्ती असूनही तिला हवं असलेलं आईपणाचं सुख आपण तिला देऊ शकत नाही. काय हे दुर्दैव!”

मनातल्या मनात प्रसादचा संवाद सुरू होता. त्याचं त्यालाच खूप वाईट वाटत होतं. अपराधाचं शल्य मनाला टोचत होतं. आस्थाच्या वाट्याला आलेल्या दुःखासाठी तो स्वतःला दोषी मानत होता. प्रसादला खूप वाईट वाटलं डोळ्यांत पाणी दाटून आलं. भरल्या डोळ्यांनी तिने आस्थाकडे पाहिलं. आस्था तिच्याच विचारात मग्न होती. खिडकी बाहेर पाहत होती. त्या मुलांचाच विचार तिच्या मनात घोळत होता. 

“गेली बारा वर्षे मी आई होण्यासाठी धडपड करतेय. त्या सुखासाठी आसुसले आहे. किती डॉक्टर्स, दवाखाने बदलले. किती व्रतवैकल्ये उपवास  केले. देवापुढे साकडं घातलं.पण माझी कूस उजवली नाही. का हा वांझपणाचा शाप माझ्या वाट्याला? त्या अपघातात मी माझं आईपण गमावलं काय दोष होता माझा? मी आजवर प्रसादला दोष देत राहिले. त्याने माझ्याकडे लक्ष दिलं नाही. कामात गुंग होता म्हणून त्याला दूषणं लावत राहिले. पण खरंच प्रसादचा दोष होता की माझ्या नशिबाचा? प्रसादला लहान मुलं खूप आवडायची. तो तर लग्नाआधीपासूनच मुलांच्या नावांची तयारी करत होता. त्यालाही त्रास होत असेलच ना? मी फक्त माझंच दुःख कुरवाळत बसले आहे. मूल नसण्याचा त्रास प्रसादला नसेल का? फक्त स्त्रियांनाच हे दुःख असतं? समाज फक्त स्त्रियांनाच दोष देतो? पुरुषांनासुद्धा बाप न होऊ शकण्याचं दुःख असतं. स्त्रियांना जसं वांझ म्हणून हीनवलं जातं तसंच पुरुषसुद्धा एकमेकांत चर्चा करतात. चेष्टेने बोलतात.  कधी नपुंसक तर कधी पुरुषार्थहीन म्हणून कमी लेखतात. बायकोला मूल देऊ शकत नाही म्हणून हसतात. असा पुरुष समाजाच्या दृष्टीने अयोग्यच असा समज होतो. पण दोष प्रसादमध्ये नाही माझ्यात आहे हे मी किती जणांना ओरडून सांगणार?”

आस्था विचार करत होती. भावनांना वाट फुटत होती. 

“शरीराने माघार घेतली आणि माझं आईपण माझ्याकडून हिरावून घेतलं. समाजानेही किती त्रास दिला. बायका नेहमी बोल लावायच्या. बारसं, मुंजी, डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात नेहमी मला टाळलं जायचं. आणि चुकून जर मला बोलावलं तर मला बाळाला हात लावू द्यायच्या नाही. औक्षण करू द्यायच्या नाहीत. आधी माघारी बोलायच्या पण नंतर नंतर तर तोंडावर बोलू लागल्या. वांझपणाचा शिक्का कायम माथी. पण खरंच वांझपणा शरीराला असतो? नाही, वांझपणा तर विचारात असतो. स्वतःच्या उदरात अंकुर वाढवता नाही आला म्हणजे मी वांझोटी? का हा मला शाप? मी शारीरिकदृष्ट्या मूल जन्म घालण्यास असमर्थ म्हणून वाईट?”

आस्था स्वतःलाच जाब विचारत होती. नको नको ते विचार मनात पिंगा घालत होते. डोळ्यांतून खारे क्षार वाहत होते. सारी रात्र ती जागीच होती. सकाळी तिचा डोळा लागला. पाखरांच्या किलबिलाटाने तिला जाग आली. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं. तिची नजर त्या मुलांना शोधत होती. पण ती मुलं तिला दिसली नाही. ती बैचेन झाली. तीने नोकराला आवाज दिला. त्या मुलांची चौकशी करू लागली. नोकरालाही त्यांच्याबद्दल काही माहीत नव्हतं. ती त्यांची वाट पाहू लागली. दोन -चार दिवस.. एक आठवडा झाला. दिवसामागून दिवस जात होते. आस्था वाट पहात होती. मुलांच्या ओढीने ती व्याकुळ झाली. पुन्हा तिची प्रकृती बिघडत चालली. तिचा चेहरा सुकत चालला होता. ती कोमेजून जात होती. 

प्रसादला आता आस्थाची चिंता वाटू लागली. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि त्या प्रेमासाठी, तिच्या चेहऱ्यावरील हरवलेलं हास्य परत मिळवण्यासाठी तो  काहीही करायला तयार होता. त्याला तिच्या दुःखाचं मूळ कारण माहित होतं. त्याने त्या मुलांना शोधायचं ठरवलं. ती मूलं त्यांच्या बंगल्यापासून अर्धा-एक किलोमिटर अंतरावर राहतात इतकंच त्याला माहित होतं. त्याचा नोकर, सदाला त्यांचे चेहरे ठाऊक होते. म्हणून त्याने सदाला मदतीला घेतलं. पार्किंग मधून कार बाहेर काढली. आणि तो सदाला सोबत घेऊन त्या मुलांना शोधायला निघाला. 

पुढे काय होतं? ती मुले प्रसादला भेटतील? आस्थाची प्रकृती सुधारेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे

🎭 Series Post

View all