आणि ती आई झाली.. भाग ११

Hi eka aaichi katha

आणि ती आई झाली..

भाग - ११

पहाटे आस्था शुद्धीवर आली. ती त्या अवस्थेत प्रसादचं नाव घेत होती. डॉक्टरांनी बाहेर येऊन आस्था शुद्धीवर आल्याचं सांगितलं आणि तिला भेटण्याची परवानगी दिली. प्रसाद  आस्था जवळ आला. त्याचे डोळे पाण्याने डबडबले. काय बोलावं त्याला उमजेना.

“प्रसाद, काय झालं? माझं बाळ कुठेय? सिस्टर आपल्या बाळाला बाहेर घेऊन गेली आहे का? मला माझ्या बाळाला पाहायचं आहे. जा घेऊन यायला सांग”

आस्था प्रसादला प्रश्न विचारत होती. प्रसादकडे तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्याने तिला जवळ कुशीत घेतलं. 

“आस्था, आपलं बाळ गेलं ग.!”

आस्थाला खूप मोठा धक्का बसला होता. ती प्रसादकडे एकटक पाहत होती. त्याचे शब्द तिच्या कानावर पडले खरे पण तिच्या पर्यंत पोहचत नव्हते. हा धक्का पचवणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहत होते. गेली सात महिने पोटात वाढवलेल्या त्या इवल्याश्या जीवाला आज तिने गमावलं होतं. तिचा अंश हरपला होता.

“माझं बाळ..” 

आस्थाने मोठ्याने हंबरडा फोडला. तिच्या मनाला प्रचंड वेदना होत होत्या. तिच्या आवाजाने प्रसादचे आई बाबा आत आले. आई तिला जवळ घेऊन तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात डॉक्टर आणि नर्स आतमध्ये आले. त्यांनी सर्वाना बाहेर जाण्यास सांगितलं. आस्थाला इंजेक्शन देऊन शांत केलं.

दोन चार दिवसांनी आस्थाला घरी सोडण्यात आलं. त्यानंतर मात्र आस्था खूप शांत झाली. पूर्वीची सतत हसतमुख हसणारी आस्था गप्प राहू लागली. कोणाशी बोलनाशी झाली. आपल्याच विचारात मग्न राहू लागली. ऑफिसमध्ये तिने राजीनामा पाठवून दिला. तिने कंपनीशी केलेल्या बॉण्डची रक्कम पी. एफ च्या रक्कमेतून चुकती केली. सर्व व्यवहार संपवून टाकला. आता आस्था घरीच राहू लागली. प्रसादचे आई बाबा, त्याची बहीण त्यांच्यासोबत राहू लागले. तिची काळजी घेऊ लागले. 

ऋतुचक्र नियमाने आपलं काम करत होतं. जखमेवर खपली धरू लागली होती. आस्था सावरण्याचा प्रयत्न करत होती. 

एके दिवशी शेजारच्या सुमतीकाकू घरी आल्या. आस्था त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटे घेऊन आली. तिला पाहून सुमतीकाकू आस्थाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

“पोरी, काहीही काळजी करू नको. जे पांडुरंगाच्या मनात होतं तेच घडलं. पण यातूनही काही चांगलं घडणार आहे असा विचार कर. अग, इतकी हताश होऊ नकोस. परत तुझ्या पोटी बीज रुजेलच ना. पुन्हा बहर येईल. नवी पालवी फुटेल. आणि तू आई होशील. पुन्हा घरात गोकुळ नांदेल. सगळं छान होईल”

सुमितीकाकूंनी भरभरून आशीर्वाद दिला. आस्थाच्या आशा पल्लवित झाल्या. मनात आशेचा अंकुर अंकुरला. डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आई होण्याच्या तिच्या इच्छेमुळे मनाला उभारी मिळाली. तसं प्रसाद नियमितपणे आस्थाला डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन जात होता.  तिचं पथ्यपाणी नीट पाहत होता. आस्थाची काळजी घेत होता. 

एक दिवस तिने सुमतीकाकूंचं बोलणं प्रसादला सांगितलं. तिलाही पुन्हा आई व्हायचं होतं. पण प्रसाद मात्र आता या विषयावर बोलणं टाळू लागला. आस्थाचं असं मागे तगादा लावणं त्याला क्लेशदायक  वाटू लागलं. आस्था पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलत असायची. प्रसाद काहीही न बोलता तिच्या बोलण्याकडे पाठ फिरवायचा. सततच्या तिच्या विचारण्याला प्रसाद कंटाळला होता. एक दिवस चिडून म्हणाला.,

“आस्था, पुन्हा पुन्हा तोच विषय काढू नकोस. जेंव्हा व्हायचं असेल तेंव्हा होईल. काय घाई आहे तुला?”

“प्रसाद, हो आहे मला घाई. आई व्हायचं आहे मला. तू तुझ्या कामात बिझी राहिलास. माझं बाळ गेलं. कोण जबाबदार? तू माझे, बाबांचे कॉल्स घेतले नाही. माझ्यापेक्षा तुला बिझनेस महत्वाचा वाटला. तरीही मी शांत राहिले. कोणालाच दोष दिला नाही. माझ्या नशिबाचा दोष म्हणून शांत राहिले.  पण आता तू जे बोलतोय, वागतोय त्यावरून मला वाटतंय तुलाच मूल नको होतं. बाळ जाण्याचं तुला काहीच वाटत नाही का रे? आपण पुन्हा चान्स का नाही घ्यायचा?“

आस्थाने प्रसादला प्रश्न केला. चिडून प्रसाद म्हणाला.,

“ठीक आहे उद्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाणारच आहोत. त्यांच्याशी बोलून ठरव तू काय करायचं ते? आता झोप”

आणि प्रसाद दुसऱ्या कुशीवर झाला. दुसऱ्या दिवशी ते दोघे त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तिला तपासलं. प्रकृती उत्तम असल्याचं  सांगितलं. आस्थाने तिच्या मनातली गोष्ट डॉक्टरांना बोलून दाखवली. तिचं बोलणं ऐकून डॉक्टर गंभीर झाले. आणि म्हणाले.,

“आस्था बेटा, तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकतो. तू ज्या अवस्थेतून जात आहेस ती खरंच खूप वाईट आहे. पण सत्य नाकारून चालणार नाही. ते सत्य तुला सांगावंच लागेल. त्या सत्याला तुलाच सामोरं जावं लागेल”

“डॉक्टर, नेमकं काय झालंय? तुम्ही असं का बोलताय? प्लिज डॉक्टर, जे काही सत्य असेल ते मला सांगा. मी ऐकायला तयार आहे.”

आस्था कळकळीने आर्जव करत होती. 

“तुझा जेंव्हा अपघात झाला. तू पडलीस. त्यावेळी तुझ्या गर्भाशयाला खूप जोरात मार बसला. गर्भाशयाला खूप इजा झाली. त्यामुळे आस्था तुला कधीही मुलाला जन्म देता येणार नाही. तू कधीही आई होऊ शकणार नाही. आणि तसा पुन्हा प्रयत्न जरी केला तर तुझ्या आणि पोटात वाढणाऱ्या जीवाला धोका उदभवू शकतो.”

आस्थाच्या डोळ्यांत पाणी साठू लागलं. ती जागच्या जागी स्तब्ध झाली. तिने मान वळवून  प्रसादकडे पाहिलं. तो खाली मान घालून डोळ्यातली आसवं लपवण्याचा प्रयत्न करत होता. प्रसादला डॉक्टरांनी आधीच ही गोष्ट सांगितली होती. म्हणून तो आस्थाचं बोलणं टाळत होता. दुर्लक्ष करत होता. प्रसाद आणि आस्था घरी आले. कोणीच काहीच बोलत नव्हतं. आस्था सोफ्यावर बसून होती. प्रसादने आस्थाला आवाज दिला. पण त्याचे शब्द तिच्या कानावर पडतच नव्हते. प्रसादने हलवून तिला जागं केलं. तशी ती जोरात किंचाळली. मोठ्याने रडू लागली. पुन्हा एकदा तिच्या पदरी निराशा पडली होती. मनात अंकुरलेला आशेचा बीज कोमेजून गेला होता. आई होण्याचं तिचं स्वप्न  मावळत चाललं होतं. आता ती कधीच आई होऊ शकणार नव्हती. तिच्या शरीराने माघार घेतली होती. 

त्यानंतर आस्था कधीच रडली नाही. कोणाशी बोलली नाही. ती शरीराने फक्त जिवंत होती. पण मन कधीच मरण पावलं होतं. ती स्वतःच्याच कोषात राहू लागली. प्रसाद त्याच्या बिझनेसमध्ये व्यस्त झाला. दिवसागणिक धंद्यात प्रगती होत होती. बिझनेस मोठा होत होता. काही वर्षातच त्याची सॉफ्टवेअर कंपनी नावारूपाला आली. मग काही वर्षांनी प्रसाद आणि आस्था आपल्या कुटुंबा समवेत नवीन बंगल्यात राहायला आले. दारात चारचाकी उभी राहिली. प्रसादने आस्थाला बोलल्याप्रमाणे सोन्याच्या, हिरेमोत्यांच्या दागिन्यांनी मढवलं होतं. घरात प्रत्येक कामाला नोकर चाकर होते. प्रसादची बहीणही डॉक्टर झाली. गेल्या वर्षीच प्रसादने मोठ्या धुमधडाक्यात तिचं लग्न लावून दिलं होतं. ती तिच्या घरी सुखात नांदत होती. आता प्रसादकडे सर्व काही होतं. संपप्ती, ऐश्वर्य, बंगला, कार, नोकरचाकर त्याच्या दिमतीला हजर होते. पैसा आला. ऐश्वर्य आलं आस्थाच्या आईवडिलांना आपली चूक उमगली. तेही आता आस्थाला भेटायला वरचेवर येऊ लागले. सर्वकाही  असूनही प्रसादची आस्था मात्र हरवली. पूर्वीची खेळकर, चुलबुली आस्था मात्र पुन्हा कधीच कोणाला सापडली नाही. 

आस्थाच्या लग्नाला आता बारा वर्षे झाली होती. पूजाअर्चा, व्रत-वैकल्ये, दवाखाने  सगळं झालं तरी तिची अजून कूस उजवली नव्हती. पूर्वी बारशी, मुंजी, ओटीभरणी, वाढदिवसाच्या कार्यक्रमाला तिला आवर्जून बोलावलं जायचं पण आता तिला कोणीही  बोलवत नव्हतं. वांझपणाचा  शिक्का माथी. तिला आई व्हायचं होतं. आईपणाच्या सुखासाठी तिचं मन आसुसलेलं होतं. इतके उपचार करूनही तिला मूल होऊ शकणार नव्हतं.  नेहमी उदास असायची. दिवसेंदिवस तिची तब्बेत खंगत चालली होती. 

लग्नाच्या बाराव्या वाढदिवसाच्या रात्री आस्थाला हे सारं आठवत होतं. डोळ्यांतून मेघ रिते होत होते. एखाद्या चित्रपटासारखा बारा वर्षाचा काळ डोळ्यांसमोर फिरत होता. संपूर्ण रात्र जुन्या आठवणीत निघून गेली. पहाटे केंव्हातरी तिचा डोळा लागला. प्रसाद तिला शांत झोपलेलं पाहून तिला न उठवताच त्याच्या कामाला निघून गेला. 

थोड्या वेळाने आस्थाला जाग ती लहान मुलांच्या आवाजाने. ती उठून बसली. तिच्या खोलीच्या खिडकीतून तिने बाहेर पाहिलं. काही मुलं जवळच्या कचराकुंडीपाशी गोळा झाली होती. तिच्या मनात कुतूहल जागं झालं. भिंतीच्या आधाराने ती सावकाश गॅलरीत येऊन उभी राहिली. तिच्या नोकरांनी काल रात्रीचं उरलेलं अन्न टाकून दिलं होतं. तेच अन्न खाण्यासाठी, गोळा करण्यासाठी त्या मुलांची झुंबड उडाली होती. टाकून दिलेल्या अन्नावरही ती मुलं आनंदाने ताव मारत होती. साधारण आठ दहा वर्षाची ती मुलं असावीत. काळ्या सावळ्या रंगाची, कळकट कपडे, गलिच्छ अवतार, पोट हापाळी गेलेलं. तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तसूभरही कमी झालेला दिसत नव्हता. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक तिला दिसत होती. तिला गलबलून आलं. ती त्यांच्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहत होती. आस्थाने पाहिलं की  त्यातल्या एका मुलाला कचराकुंडीत एक लेदरचं नोटांनी भरलेलं पाकीट सापडलं. बाकीची मुलं त्याच्यापाशी गोळा झाली. मुलांनी इकडे तिकडे पाहिलं. कोणाचं असेल? ती विचार करू लागली. आणि मग ते सर्वजण तिच्या बंगल्याच्या दिशेने येताना तिला दिसली.  

बंगल्यातली डोअरबेल वाजली. नोकराने मुलांना बाहेरच हटकले. आस्थाने नोकराला आवाज दिला आणि मुलांना आत बोलायला सांगितलं. मुलं बाहेर उभी होती. आस्था सावकाश बाहेरच्या खोलीत आली. तिने मुलांना बसायला सांगितलं. त्यातल्या एका चुणचुणीत मुलाने बोलायला सुरुवात केली. 

“बाईसाहेब, आम्हाला तुमच्या बंगल्याबाहीर हे पाकीट सापडलं. तुमचं हाय का हे? तुमच्या बंगल्याबाहीर सापडलं म्हणून तुम्हास्नी द्यायला आलो.”

आस्थाने नोकराकडे पाहिलं. त्याने पाकीट आणून तिच्याकडे दिलं. 

पुढे काय होतं? कोण होती ती मुलं? आस्था आणि त्यांचा काय संबंध होता? पाहूया पुढील भागात.. 

क्रमशः

©निशा थोरे..


 

🎭 Series Post

View all