Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

आणि ती हसली...!

Read Later
आणि ती हसली...!
आणि ती हसली..!

विषय:- लघुकथा

कोकणातील सरपंचचे घर

आज घरामध्ये एकच गोंधळ उडाला होता. लोकांच्या जेवणाच्या पंगतीवर पंगती उठत होत्या. भात, वरण, तिखट डाळ, ४ भाज्या, त्यात ती कांदाभजी, मिरची, पापड, लोणचे, आळूवडी, सुरमईचा एक तुकडा असा चांगलाच जेवणाचा बेत आखला होता. आज सरपंचचे बारावे जे होते. उंच धिप्पाड अशी शरीरयष्टी असणारा सरपंच वयाच्या ४५ व्या वर्षीच हृदयाच्या झटक्याने देवाघरी निघून गेला होता. त्याची बायको वसुधा अजूनही हुंदके देत रडत होती. तिला असे रडतांना बघून शेवटी तिचा मावसभाऊ अरविंद तिच्याजवळ गेला.

" अग बस कर ताई, अजून किती रडशील? गेल्या १२ दिवसांत अवस्था काय करून घेतलीस बघ जरा, पुरे आता. गेलेल्या माणसाला असे परत आणता येते का कधी? तुला असे रडतांना बघून भावोजींना चांगले वाटत असेल का? त्यांनाही तितकेच दुःख होत असेल."

अरविंदचे बोलणे ऐकून वसुदा अजूनच रडू लागली. शेवटी अरविंद तिथून उठला आणि बाहेर सर्वजण पोटभर जेवतायत ना याकडे लक्ष देऊ लागला. गावातली सर्वच जण अगदी पोटभरून जेवत होते. पंगतीवर पंगती उठत होत्या. वसुधाने कसलीच कमी केली नव्हती. त्यांचा संपूर्ण दिवस धावपळीतच निघून गेला. मुंबई, रत्नागिरी, मालवण अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून माणसे आले होते,  ते सर्व संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत एक एक करून निघून गेले. सर्वजण निघून गेल्यावर त्या बंगल्यात फक्त वसुधा आणि त्यांच्याकडे काम करणारी रुक्मिणी अशा दोघीच राहिल्या. वसुदा अजूनही नवऱ्याच्या फोटोकडे एकटक बघत होती. नवऱ्याबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवत होते. ते आठवून नकळतपणे तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. रुक्मिणी तिची कामे आवरून वसुधा जवळ आली.

" ताई, अजून किती रडणार तुम्ही? ज्या माणसाने तुम्हाला आयुष्यभर फक्त दुःख दिले त्या माणसासाठी इतके अश्रू वाया घालवायचे?"

रुक्मिणीचे बोलणे ऐकताच वसुधाला तिच्या नवऱ्याचे वागणे आठवले. त्यामुळे ती काही क्षण भूतकाळातील त्या आठवणीत गेली.

"अग बघतेस काय अशी? जा आमच्यासाठी सुरमई फ्राय करून घेऊन ये"

नवऱ्याने असे बोलताच वसुधा रागाने त्याच्याकडे बघू लागली.

"ही बाई कोण आहे ते आधी सांगा ?" नवऱ्याच्या मिठीत असलेल्या बाईकडे बघून वसुधा बोलली.

"तुझी सवत समज. जा, तिची सेवा कर जरा, तिच्यासाठी सुरमई फ्राय करून आण."

नवरा रुबाबात तिला बोलला. त्यावर तिनेही उलट उत्तर दिले.

"माझा जीव घेतला तरी चालेल पण मी तुम्हाला या घरात माझी सवत आणू देणार नाही."

"माझ्यासमोर तोंड वर करून बोलतेस? हरामखोर कुठली."

असे बोलून नवऱ्याने तिला कमरेच्या पट्टयाने मारायला सुरू केले. वसुधा रडत राहिली, ओरडत राहिली तरीही तिच्या नवऱ्याला काहीच वाटले नाही. बाई आणि दारू या दोघांचाही नशा त्याच्या डोक्यावर चढुन बोलत होता.

कसल्याशा आवाजाने ती विचारातून बाहेर आली.

"ताई, ये ताई, थोडं जेवून घे."

रुक्मिणी ताट घेऊन पुन्हा वसुधा जवळ आली. पण वसुधा मात्र एक शब्दही बोलली नाही. रुक्मिणी बराच वेळ वसुधाच्या बाजूला बसुन तिला समजवत राहिली.

"ताई , अहो जेवण करून घ्या. तुमचा नवरा तसाही चांगला माणूस नव्हता. रोज नवनवीन बायकांचा भोग घेणारा तो मुळात माणूसच नव्हता, शैतान होता तो शैतान..!"

रुक्मिणी असे बोलली तसे वसुधाने रागाने लालबुंद होऊन तिच्यावर एक कटाक्ष टाकला. वसुधाला असे रागाने लालबुंद झालेले पाहून रुक्मिणी पण घाबरुन गेली. मग मात्र तिने थोडे सावधगिरीने बोलायला सुरू केले.

"माफ करा ताई , मी भावनेच्या भरात बोलून गेले. मी विसरुनच गेले की काहीही झाले तरी तो तुमचा नवरा होता, माझा मालक होता. त्याच्या पैशांवर आम्ही दोन घास सुखाने खात होतो."

रुक्मिणीचे ते बोलणे ऐकून वसुधा थोडी नॉर्मल झाली.
"ताई, मी जेवण झाकून ठेवते. भूक लागली तर जेवण करून घ्या. मी झोपायला जाते."

असे बोलून रुक्मिणी तिच्या रूममध्ये झोपायला गेली. तिची खोली बंगल्याला लागूनच होती.

आता त्या संपूर्ण बंगल्यात वसुधा एकटीच होती. सकाळपासून ती एक शब्दही कोणाशी बोलली नव्हती. त्यामुळे तिचा घसा सुकला होता. ती खुर्चीवरून उठली आणि टेबलाजवळ गेली. तिथे पाण्याचा तांब्या होता. जो हातात घेऊन त्यातले पाणी वसुधा गटागटा प्यायली. सर्व पाणी पिऊन झाल्यावरच तिने तांब्या खाली केला. त्याचवेळेस तिचे लक्ष बाजूला असलेल्या गोळ्यांच्या बॉक्सवर गेले. तिथे नजर जाताच तिच्या मनात धडधडू लागले. तिने लगेचच तो गोळ्यांचा बॉक्स उघडला आणि त्यातून काही गोळ्यांची पाकिटे हातात घेतली मग तसेच ती इतक्या रात्री बंगल्याच्या मागच्या बाजूला गेली. मागे गेल्यावर तिथे तिला कुणी बघत तर नाही ना याची पहिले तिने खात्री करून घेतली. मग तिने त्या गोळ्या एका घमेल्यात टाकल्या मग त्यावर रॉकेल टाकून काडीपेटीने आग लावून टाकली. सर्व गोळ्या जळून खाक झाल्या याची खात्री झाल्यावरच ती आत घरात आली. हात धुवून नवऱ्याच्या फोटोजवळ उभी राहिली. त्याचवेळेस तिला डॉक्टरांचे ते बोलणे पुन्हा आठवले-
"गोळ्या देतांना जरा काळजी घ्या. थोडा जरी गोळ्यांचा ओव्हरडोज झाला तर साहेबांना हार्टअटॅक येऊ शकतो."

ते आठवून वसुधा मोठमोठयाने हसू लागली. तिचे ते हसणे ऐकणारा घरात कुणीच नव्हता. बाजूला झाकून ठेवलेले ताट तिने हातात घेतले आणि नवऱ्याच्या फोटो समोरच ती जेवायला बसली. सुरमईचा तो मोठा तुकडा ती दोन्ही हातांनी मिळुन खाऊ लागली.

"रुक्मिणी, खरच काय सुरमई बनवली आहे. मज्जा आली."

रात्रभर ती नवऱ्याच्या फोटोकडे बघत खूप वेळ हसत राहिली. कारण लग्न करून त्या घरात आल्यापासून तिथल्या भिंतीनी तिचे फक्त रडणे ऐकले होते. आज तिला सर्वांना दाखवायचे होते की तिला हसता पण येते.

कथा समाप्त

© ® राजेश चव्हाण

ठाणे विभाग
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Rajesh Chavan

Job

Love to write

//