Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

आणि प्राची हसली

Read Later
आणि प्राची हसली
कथा : आणि प्राची हसली
विषय : आणि ती हसली
टीम : छत्रपती संभाजीनगर
राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


त्या दिवशी सात्विकचा वाढदिवस होता. मित्रांनी जबरदस्ती करून त्याला रेड लाईट एरियात आणले होते. रात्रीचा प्रहर होता. भडक मेकअप करून कितीतरी वेश्या त्यांचे ग्राहक शोधत होत्या.

" यार , डॅडला कळलं तर खूप मार बसेल. " सात्विक घाबरतच म्हणाला.

" आबे लल्लू , तू आता वीस वर्षांचा झालाय. आता तरी मर्द बन. एकदा प्राचीबाईला बघशील ना तर पागल होशील. " सात्विकचा मित्र म्हणाला.

सर्वजण एका घरात घुसले. त्या घरात भरपूर बायका होत्या. गजऱ्याचा वास सर्वत्र दरवळत होता.

" क्या रे चिकने ? आज कुणाला घेऊन आलास. " एक जाडजूड बाई समोर आली.

त्या बाईने केसांमध्ये गजरा घातला होता. चेहऱ्यावर भडक मेकअप केला होता. एका हातात मोठी पर्स होती.

" रेशमाबाई , हा माझा मित्र सात्विक. वाढदिवस आहे याचा आज. आम्ही विचार केला की गिफ्ट म्हणून प्राचीबाईसोबत एक रात्र घालवू द्यावी. " सात्विकचा मित्र डोळा मारत म्हणाला.

रेशमाबाईने हात पुढे केला. मित्राने इशारा करताच सात्विकने खिश्यातून पैसे काढले.

" प्राचीला तयार व्हायला सांगा. " रेशमाबाई पैसे मोजत हाताखालच्या एका मुलाला म्हणाली.

थोड्या वेळाने सात्विकचे सर्व मित्र जिकडेतिकडे विखुरले गेले. रेशमाबाईने सात्विकला प्राचीच्या खोलीचा रस्ता दाखवला. घाबरतच सात्विकने प्राचीच्या खोलीत प्रवेश केला. त्या ठिकाणी सर्वात मोठी खोली प्राचीची होती. प्राचीचे रूप ते काय वर्णावे ? जणू स्वर्गातील अप्सरा भूतलावर प्रकट झाली असावी. कमळासारखे डोळे , रेखीव चेहरा , चंदनासारखा गोरापान मुखचंद्रमा , गुलाबी नाजूक ओठ. सात्विक ते रूप पाहून स्तब्धच झाला. प्राची मात्र जोरात हसली.

" तुम्ही का हसताय ?" सात्विकने विचारले.

" तू नुकताच मिसुरडे फुटलेला कोवळा पोरगा वाटतोय. अजून मर्द बनायला टाइम आहे तुला. मी छत्तीस वर्षाची बाई. अस वाटतय क्रिकेटरच्या जीवनाची पहिली बॅटिंग आणि समोर बॉलिंग मलिंगा करतोय. " प्राची म्हणाली.

सात्विकने स्मितहास्य दिले.

" तुम्ही हसताना खूप सुंदर दिसतात. " सात्विक म्हणाला.

" हम्म. चला सात्विक. कामाला लागू. " प्राची जवळ जात सात्विकच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

सात्विक प्राचीच्या डोळ्यात बुडाला. तिच्या देहाचा सुगंध त्याला वेड लावून गेला. त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. नंतर त्याला जाणवले की प्राचीला ताप आला आहे.

" तुम्हाला ताप आला आहे. " सात्विक उठून म्हणाला.

" अरे तू तुझं काम कर ना. कश्याला काळजी करतो माझी ?" प्राची ओरडली.

" मी गोळ्या आणतो. " सात्विक लगेच खोलीबाहेर पडला.

थोड्या वेळाने त्याने गोळ्या आणल्या. प्राचीचा ज्वर वाढतच होता. सात्विकने त्याचा रुमाल ओला केला. रात्रभर प्राचीच्या डोक्यावर ओली पट्टी ठेवत होता. सकाळी त्याने जेव्हा मित्रांना हा किस्सा सांगितला तेव्हा मित्र खूप हसले. पण सात्विकला काही वाईट वाटले नाही. उलट तो अजूनच प्राचीच्या प्रेमात पडायला लागला. तो रोज रात्री प्राचीला भेटायला जात असे. हळूहळू दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडले. इतर वेश्या प्राचीची ईर्ष्या करू लागल्या. सात्विक प्राचीला रोज नवनवे भेटवस्तू आणून देत असे. एकेदिवशी प्राचीने सात्विकला एक इच्छा बोलून दाखवली.

" सात्विक , मला एकदा तुझे घर पाहायचे आहे. " प्राची म्हणाली.

सात्विक तेव्हा काहीच म्हणला नाही पण एकेदिवशी फोन करून त्याने प्राचीला घरी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. प्राचीला खूप आनंद झाला. शेवटी तो दिवस आला. कितीतरी वर्षांनी प्राची त्या कुप्रसिद्ध गल्लीतून बाहेर पडली होती. काळा बुरखा घालून ती सात्विकच्या बाईकवर बसली होती. सोसायटीच्या वॉचमनला सात्विकने आधीच पैसे दिले होते. सोसायटीपासून काही अंतरावर सात्विकने प्राचीला उतरवले.

" मी कॉल केल्यावर आत ये. जर कुणी काही विचारले तर सेल्समन आहेस अस सांग. " सात्विक म्हणाला.

प्राचीने होकारार्थी मान हलवली. आमच्या गल्लीत शिरताना यांना लाज वाटत नाही पण आम्हाला यांच्या गल्लीत आणताना इतकी लाज वाटते हा विचार सहज तिच्या डोक्यात चमकून गेला. थोड्या वेळाने सात्विकने फोन केला. वॉचमनने प्राचीला सोसायटीच्या आत येऊ दिले. सात्विकने सांगितलेल्या " ए विंग " बिल्डिंगमध्ये जाऊन तिने फ्लॅट नंबर चौदाचा दरवाजा आपटला. सात्विकने लगेच तिला आत खेचले. सात्विकचा तीन बीएचके वेल फर्निशड फ्लॅट होता. प्राचीने एक नजर सर्वत्र फिरवली.

" खूप छान फ्लॅट आहे. मोठ्या घरचा दिसतो तू. बाप कुठेय तुझा ?" प्राचीने विचारले.

" बाप सॉरी डॅड आणि मॉम बाहेर गेलेत. रात्रीच येतील. तू बस ना. " सात्विक म्हणाला.

प्राची हॉलमधल्या सोफ्यावर बसली. सात्विक पाणी घेऊन आला. प्राची पाणी पित असताना सात्विकने खिश्यातून रिंग काढली. प्राचीचा हात हातात घेतला.

" प्राची ,
मी लहानपणीपासून फक्त मॉम आणि डॅडमध्ये भांडणे बघितली. मला कधीच असे वाटत नव्हते की जगात प्रेम नावाची गोष्ट असते. मॉम किटी पार्टीमध्ये आणि डॅड त्यांच्या बिजनेस मिटिंगमध्ये बिझी असायचे. माझ्यासाठी कुणाकडेच वेळ नसायचा. मित्रपण स्वार्थी होते. फक्त माझ्या पैश्यांकडे बघून खेचले जायचे. पण जेव्हापासून तू भेटलीस मी तुझ्या प्रेमातच पडलो. प्रेमाला वयाचं बंधन नसते ना ? तुझ्या रूपात मला कुणीतरी हक्काचा माणूस भेटला. एकटेपणा कायमचा दूर झाला. माझ्याशी लग्न करशील प्राची ?" सात्विक म्हणाला.

प्राचीने ती अंगठी स्विकारली आणि सात्विकच्या ओठांवर ओठ टेकवले. वस्त्रांची बंधने गळून पडली. दोघेही प्रणयक्रीडेत मग्न झाले. दोघेही नग्न होऊन एकमेकांच्या मिठीत विसावा घेत होते. अचानक दरवाजा आपटू लागला. काही कळायच्या आत दरवाजा उघडला गेला आणि सोसायटीचे लोक आत आले. सात्विकला घाम फुटला. सात्विक आणि प्राचीने कपडे घातले. लोक गोंधळ करू लागले. सात्विकचे आईवडीलही समोर हजर होते.

" हे आहेत का तुमच्या मुलाचे संस्कार ?" एकजण ओरडला.

" ते काहीही नाही. आजच हा फ्लॅट सोडा. " दुसरा म्हणाला.

" डॅड , मी प्राचीवर खूप प्रेम करतो. " सात्विक धाडस करत म्हणाला.

सात्विकच्या वडिलांनी त्याला जोरात थोबाडीत मारली. सात्विकच्या वडिलांनी रागाचा एक कटाक्ष प्राचीवर टाकला. प्राचीकडे बघितल्यावर त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. प्राची परत हसू लागली.

" वाह. पितापुत्रांनी एकाच स्त्रीवर प्रेम केले. तू मला घरातून उचलून रंडीखान्यात ढकलले आणि तुझ्या मुलाने रंडीखान्यातून उचलून घरात येऊन बसवले. येते. " प्राची म्हणाली आणि निघाली.

सोसायटीत खूप गोंधळ उडाला. सात्विकच्या वडिलांची सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली.

***

रात्री प्राचीने सर्व मैत्रिणींना दारू आणि बिर्याणीची पार्टी दिली.

" मला समजलं नाही. सात्विकच्या बापाचा आणि तुझा काय संबंध ?" एकीने विचारले.

" त्यानेच आणलं होतं हिला माझ्यापाशी. " रेशमाबाई म्हणाली.

" तो माझ्या वडिलांच्या वाड्यात काम करायचा. एकदा त्याने वाड्यात चोरी केली. जेव्हा पकडला गेला तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला कामावरून काढले. त्याचा बदला म्हणून त्याने मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्न झाले होते त्याचे पण बायकोला सोडणारे म्हणत होता. सोळा वर्षांची होते मी. दागिने घेऊन पळून आले. ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच मला विकले. एकेदिवशी सात्विकच्या वॉलेटमध्ये त्याची फोटो बघितली. मग मला सर्व समजलं. वाटलं नियतीनेच माझा बदला पूर्ण व्हावा म्हणून हा डाव रचला आहे. आज मी आधीच वॉचमनला डबल पैसे खाऊ घातले होते. वॉचमनने थोड्या वेळाने लोक गोळा गेले. त्याला माझ्या कुटुंबाची इज्जत घालवायची होती मला वेश्या बनवून. आज मी त्याची इज्जत घालवली. " प्राची म्हणाली.

" पण या सर्वात सात्विकचा काय दोष ? तो किती प्रेम करायचा तुझ्यावर. " एकीने विचारले.

प्राचीचे डोळे पाणावले.

" पागल आहे तो. वेश्येसोबत लग्न करणार होता. आता कधीच ही वाट धरणार नाही. बापाची प्रॉपर्टी हवी असते मुलांना मग बापाच्या पापाचे फळ नको भोगायला ? असो. मी आनंदात आहे. कसला चेहरा झाला होता सात्विकच्या बापाचा. असाच चेहरा माझ्या वडिलांचाही झाला असेल ना. सोळा वर्षाची होते ना. ओळखता आलं नाही माणसांना. प्राचीने तिचा बदला घेतला. बदला घेतला. " प्राची हसली.

ती हसली. डोळ्यात पाणी येईपर्यंत हसली. खूप खूप वेळ हसली.

©® पार्थ धवन
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//