Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आणि कृष्ण भेटला

Read Later
आणि कृष्ण भेटला


अनिकाला तिच्या पित्याने जोरात थोबाडीत मारली.

" हे धंदे करण्यासाठी पाठवतो आम्ही कॉलेजला ?" अनिकाचे बाबा ओरडले.

" अहो , जाऊद्या ना. " अनिकाची आई रडत होती.

" तुम्ही गप्प बसा. तुमच्याच लाडामुळे ही अशी झाली आहे. आज रात्रभर हिला जेवायला भेटणार नाही. " अनिकाचे बाबा म्हणाले.

बाथरूममध्ये अंधार करून अनिकाला तिच्या घरच्यांनी रात्रभर तिथेच कोंडवले. रात्रभर रडून अनिकाचे डोळे सुजले.

***

" हल्ली हे प्रकार खूप वाढले आहेत रमाकांत. हे सर्व पाश्चात्य लोकांचे खेळ. आपले लोक त्यांचे अनुकरण करतात. " अनिकाचे चुलतकाका उमाकांत चहाचा घोट घेत म्हणाले.

" पण आता करावे काय कळत नाही. डॉक्टरांना दाखवले तर ते म्हणताय हा काही आजार नाही. " रमाकांत म्हणजे अनिकाचे बाबा रडत म्हणाले.

" माझ्या मुलाशी म्हणजे भावेशशी लग्न लावून देऊ. एकदा लग्न झाले की अनिका त्या मुलीला विसरेल. नाहीतर भविष्यात हा प्रकार वाढला तर तोंडाला काळे फासावे लागेल. " उमाकांत म्हणाला.

रमाकांतला पटले. लग्न ठरले. अनिकाने खूप विरोध केला. कुणीच तिचे ऐकले नाही. पण काय अपराध होता अनिकाचा ? तर तिने नैसर्गिक आकर्षणाला " ओ " दिली होती. अनिका लेस्बियन होती. कॉलेजची सर्वात जिवलग मैत्रीण स्पर्शासोबत तिचे प्रेमसंबंध होते. एका मुलाने अनिकाला प्रोपोज केले , पण अनिकाने स्पष्ट नकार दिला. तेव्हापासून अनिकावर सतत नजर ठेवून त्या मुलाने अनिकाचे हे रहस्य जाणले आणि अनिकाच्या घरच्यांना सांगितले. असो. घरात लग्नाची तयारी सुरू झाली. अनिकाचा भाऊ कृष्णा घरी आला. कृष्णाचे रूप ते काय वर्णावे ? अतिशय राजस राजबिंडा होता. एकदा बघितल्यावर नजर हटत नसे. लहानपणीपासूनच तो खूप हुशार होता. आयआयटी पवईमधून शिक्षण घेत होता. कृष्णा घरी येताच सर्व नातेवाईक त्याच्याभोवती जमा झाले. त्यांना थोडे बोलून कृष्णा आईजवळ आला.

" आई , हे काय ? अनिकाचे अजून शिक्षणही पूर्ण झाले नाही आणि तुम्ही तिचे लग्न लावून देताय ?" कृष्णाने विचारले.

" मुलगा चांगला आहे. आपल्या उमाकांतकाकांचा मुलगा भावेश. " कृष्णाची आई म्हणाली.

" तो जेलमध्ये जाऊन आलेला ? आई , काय झाले आहे तुम्हाला ? अजून माझे लग्न नाही झाले आणि माझ्या लहान बहिणीचे लग्न ?" कृष्णा अस्वस्थ होऊन म्हणाला.

" तू शांत बस. आयआयटीत शिकतोय म्हणजे शिंग फुटले का ?" इतके बोलून कृष्णाची आई वळली.

मग कृष्णा त्याच्या बाबांकडे गेला.

" बाबा , हे काय आहे ? इतक्या कमी वयात लग्न ? फर्स्ट यिअरमध्ये आहे ती. " कृष्णा म्हणाला.

" तू गप्प बस. मोठ्यांच्या गोष्टीमध्ये नको पडूस. चार दिवस आलाय तर राहून जा. आम्हाला अक्कल नको शिकवू. " कृष्णाचे बाबा रागावले.

मग कृष्णा अनिकाच्या खोलीत गेला. तिथे खूप मुली आधीच उपस्थित होत्या. अनिका नवरीच्या वेषात बसली होती.

" मला अनिकाशी एकांतात बोलायचे आहे. " कृष्णा मोठ्या आवाजात म्हणाला.

सर्व मुली खोलीबाहेर गेल्या.

कृष्णाने दार लावले. तो अनिकाजवळ येऊन बसला. अनिकाच्या चेहऱ्यावर निराकार भाव होते.

" छोटी , यावेळी राखीपौर्णिमेला फोनही नाही उचलला. मेसेजला रिप्लाय नाही. राखी नाही पाठवली आणि गिफ्टपण नाही मागितले. " कृष्णा म्हणाला.

" गिफ्ट ? देशील मला गिफ्ट. "

" हो. सांग तर. काय हवे ? मोबाईल , मेकअप बॉक्स ?" कृष्णाने विचारले.

" विष दे ना. "

" काय ?"

" दादा , मी लेस्बियन आहे. हे घरच्यांना कळलं तेव्हा त्यांनी खूप मारले मला. आता लग्न लावताय. मला पुरूषी स्पर्श नाही आवडत. लग्नानंतर रोज बलात्कार होईल माझा. त्यापेक्षा विष दे मला. " अनिका कृष्णाच्या छातीवर डोके टेकवून रडू लागली.

कृष्णाचे डोळे पाणावले. त्याने अनिकाचे अश्रू पुसले.

" चल. " अनिकाचा हात धरून कृष्णा तिला बाहेर घेऊन आला.

बाहेर येऊन त्याने आधी म्युजिक बंद केले.

" हे लग्न नाही होणार. " कृष्णा ओरडला.

" तू कोण आहेस हे ठरवणारा ?" कृष्णाचे बाबा समोर आले.

" मी अनिकाचा भाऊ आहे. तिचे रक्षण करणे कर्तव्य आहे माझे. बाबा , समलैंगिक असणे हे नैसर्गिक असते. तुम्ही जबरदस्ती करून खूप चुकीचे करत आहात. ती कधीच सुखात राहणार नाही. घुसमट होईल तिची. मी जिवंत असेपर्यंत माझ्या बहिणीला तिच्या इच्छेविरुद्ध कुणीही स्पर्श करणार नाही. इच्छेविरुद्ध केलेला प्रत्येक स्पर्श बलात्कारच असतो. मी माझ्या बहिणीवर बलात्कार होऊ देणार नाही. "

" जर हे लग्न झाले नाही तर आम्ही श्राद्ध घालू हिचे." कृष्णाचे बाबा ओरडले.

" मग माझेही श्राध्द घाला. माझी प्लेसमेंट झाली आहे. मी सांभाळेल माझ्या बहिणीला. तुम्ही जन्मदाते असूनही मुलीला नरकात ढकलताय , पण मी राखीच्या धाग्याने बांधलो गेलोय. मी समर्थ आहे माझ्या बहिणीला सांभाळायला. चल अनिका. " कृष्णाने अनिकाचा हात धरला आणि दोघे घराबाहेर जाऊ लागले.

अनिका भावाकडे एकटक बघत होती. तिला तिच्या भावात द्रौपदीची अब्रू वाचवणारा कृष्णाच दिसला.

©® पार्थ धवन
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//