आणि कृष्ण भेटला..

आणि कृष्ण भेटला


गोष्ट छोटी डोंगराएवढी..
आणि कृष्ण भेटला..

“यामिनी, आज ऑफिस मधून लवकर घरी ये बाई.. आज गोकुळाष्टमी.. तुझ्या कान्हाचा जन्म.. आज पूजा करायची आहे. लवकर ये..”

यामिनीच्या आईने तिला ऑफिसला निघतानाच बजावलं.

“हो आई, तुम्ही पूजेची तयारी करून ठेवा मी येईन लवकर आणि नाही जमलं तर तुम्ही पूजा उरकून घ्या. आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे माझी.. तरीही बघते मी..”

घराबाहेर पडताना ती उदासपणे म्हणाली. दरवर्षी मोठ्या उत्साहाने तिच्या लाडक्या देवतेची, श्रीकृष्णाची पूजा करणाऱ्या यामिनीला यंदा मात्र कसलाच उत्साह वाटत नव्हता. गोकुळाष्टमी हा तिचा सर्वात आवडता सण. लहानपणापासूनच तिला कान्हाची नित्यनेमाने पूजाअर्चा करायला फार आवडायचं. तिची श्रीकृष्णावर खूप श्रद्धा होती. ‘भगवंत भक्तीचा भुकेला असतो. तो कायम आपल्या सोबत असतो’ यावर तिचा ठाम विश्वास होता. पण हल्ली ऑफिसमधल्या गोष्टींनी ती निराश झाली होती. कसल्यातरी चिंतेने तिला ग्रासलं होतं.

“नरिमन पॉईंट?”

तिने टॅक्सीवाल्याला विचारलं. त्याने इशारा करताच ती टॅक्सीत बसली.

विचारांच्या तंद्रीत ती एकदाची ऑफिसला पोहचली. मित्तल अँड मित्तल कंपनीचं दहाव्या मजल्यावरचं मोठं आलिशान कॉर्पोरेट ऑफिस. ऑफिसमधले तिचे सहकारी तिच्याकडे पाहून कुजबुजत होते. मनातली अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिने लैंगिक अत्याचारविरोधी समितीकडे केलेल्या तक्रारीचा आज निकाल होता. समितीचे सदस्य आत कॉन्फरन्स रूममध्ये येऊन बसले आणि तिला आत बोलावलं. चेअरमन शुक्ला यांनी बोलायला सुरुवात केली.

“मिस. यामिनी, आम्ही तुमची लेखी तक्रार वाचली. त्या संदर्भात दोन्ही बाजू समजून घेण्यासाठी आपण इथे जमले आहोत. तुम्ही थोडक्यात सांगाल त्या दिवशी नेमकं काय झालं?”

“सर, मी या ऑफिसमध्ये अकाउंट्स विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून गेल्या सहा महिन्यापूर्वी नव्याने रुजू झाले. मि. भावेश शहा हे माझे सिनियर आहेत. सुरुवातीला ते माझ्याशी खूप चांगलं वागत होते पण त्यानंतर काही दिवसांतच त्यांचं माझ्याशी असलेलं वागणं बदललं. ते मुद्दाम माझ्याशी सलगी करत होते. कधी खांद्यावर कधी पाठीवरून हात फिरवायचे. कधी कंबरेला, कधी नको तिथे स्पर्श करत होते. खूप घाण वाटायची मला. कधी केबिनमध्ये बोलवून त्यांच्या कॉम्प्युटरमधले अश्लील फोटो, व्हिडिओ दाखवायचे. मी त्यांना रोखण्याचा माझ्या परीने खूप प्रयत्न करत होते पण ते मला जास्तच त्रास देऊ लागले. मी खूप वैतागले होते आणि मग एक दिवस मी या जाचाला कंटाळून माझा राजीनामा त्यांच्याकडे दिला. त्यांनी तो फाडून टाकला आणि म्हणाले,

“तू कंपनीचा बॉण्ड साइन केला आहेस. तुझे ओरिजिनल सर्टिफिकेट आमच्याकडे आहेत. आधीच बॉण्ड तोडल्यास तुला त्याची पेनल्टी क्लोज म्हणून दोन लाख भरावे लागतील. त्यानंतरच तुला राजीनामा देता येईल..”

“मी एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातली मुलगी. इतके पैसे कुठून आणणार? माझा नाईलाज झाला आणि घाबरून मी सगळं सहन करत राहिले. त्या दिवशी त्यांनी मला मुद्दाम उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबवून घेतलं. बाकीचे सहकारी घरी गेले तरीही मी एकटीच काम करत बसले होते. थोड्या वेळाने त्यांनी कॉल करून मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं. ते त्यांच्या जागेवरून उठले आणि माझ्यामागे येऊन उभे राहिले. माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले,

“मिस. यामिनी माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. मी सी.ई.ओ.च्या पोजिशनसाठी मॅनेजमेन्टला तुझं नाव सुचवू शकतो पण त्यासाठी तुला माझ्या सोबत एक्स्ट्रा ओव्हरटाईम करावा लागेल..”

त्यांची बिभित्स नजर माझ्या सर्वांगावर फिरत होती. मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला आणि केबिनबाहेर पडताना त्यांनी मला अडवलं. ते माझ्यावर जबरदस्ती करू लागले. ते ओढत मला रेस्टरूममध्ये घेऊन जात होते. मी ओरडत होते पण बाहेर कोणीच नसल्याने माझा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता. मी संपूर्ण शक्तिनिशी त्यांना ढकलून दिलं आणि कशीबशी त्यांच्या तावडीतून माझी सुटका करून घेतली. अंगावरच्या फाटक्या कपड्यांत मी घरी गेले असते तर आईबाबांनी चिंतेने जीवच दिला असता म्हणून मग मी माझ्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेले आणि तसं माझ्या घरी कळवलं. दुसऱ्या दिवशी मी झाल्या प्रकरणाची समितीकडे रीतसर लेखी तक्रार केली. सर, माझे सिनियर मि. भावेश शहा यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा आणि मला सेक्श्युअली अब्युज करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्यावर सक्त कारवाई व्हावी अशी माझी समितीकडे विनंती आहे..”

यामिनी रडू लागली. भावेश चिडून म्हणाले,

“खोटा बोलते ही.. मी अशा काई वागलेला नाही. या अशल्या मुलींची हीच कामा असतात. श्रीमंत मानुस गाठाचा. आपले प्रेमाच्या जाल्यात ओढायचा. अडकला तर ठीक, नाहीतर असले घाणेरडे आरोप करून तेला बदनाम करायचा आणि पैसे उकळायाचं बस्स हेच काम.. अशल्या मुलींना मी चांगलाच ओलखतो. कंपनीची प्रतिष्ठा पणाला लावलं हिने. हिला कामावरतून काढून टाका.”

“सर हे खोटं बोलताहेत. खरंच यांनी माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. विश्वास ठेवा माझ्यावर..”

ती पोटतिडकीने सांगत होती.

“सर, मी अशा कायबी केलेला नाय. कश्यावरून ही खरा बोलते? काय पुरावा आहे हिच्याकडे? पण पैश्यासाठी ही कोणते थराला जाऊ शकते याचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी आता तुमच्याशमोर दाखवू शकतो.”

असं म्हणत भावेश यांनी ऑफिसच्या एका पार्टीतले यामिनीचे काही फोटोज सर्वांना दाखवले. त्यात ती पुरुष सहकाऱ्यांशी हसून खेळून बोलताना दिसत होती. त्यांनी तिच्या खांद्यावर हात टाकून अगदी जवळ बसून फोटो काढले होते. त्यावरून तिच्या चरित्र्यावर शंका घेतली जात होती. तिचं वागणं, वेशभूषा यावरून तिला जज केलं जात होतं, आक्षेप घेतला जात होता. भावेश यांनी ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून तिच्याविरोधात खोटी साक्ष द्यायला लावली होती. यामिनीने कमिटीला सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सांगितलं तर भावेशने त्यांच्या केबिनचा आणि केबिन बाहेरचा कॅमेरा बिघडल्याने बंद असल्याचं सांगितलं. यामिनीकडचा तोही पुरावा नष्ट करण्यात आला होता.

समितीने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. बराच वेळ विचार विनिमय सुरू होतं. शेवटी चेअरमन शुक्ला यांनी बोलायला सुरुवात केली.

“दोन्ही बाजू ऐकून घेता, कमिटीसमोर सादर करण्यात आलेले पुरावे पाहता मिस. यामिनी यांनी भावेश शहा यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध होत आहे.”

त्यांचं बोलणं ऐकून यामिनीच्या डोळ्यांत पाणी दाटू लागलं.

“देवा, तू खरंच आहेस ना रे? माझ्यावर अन्याय होत असतानाही तू इतका शांत कसा? पुन्हा एकदा असत्याचा विजय झाला होता आणि सत्याचा पराभव.. का भगवंता? माझ्या आजवरच्या श्रद्धेचं हेच फळ?”

ती हताश झाली होती. समितीचा निर्णय झाला होता. शुक्ला पुढे म्हणाले,

“त्यामुळे भावेश शहा यांची या केसमधून निर्दोष मुक्तता करण्यात..”

“थांबा सर..”

सर्वांच्या नजरा दाराकडे वळाल्या. दारात मार्केटिंग हेड गोस्वामी आणि सिक्युरिटी मुरलीधर उभा होता.

“तुम्ही आत का आलात? किती महत्वाच्या विषयावर मिटिंग आहे ही.. तुम्हाला कळत नाही का? और मुरली तुम? क्या मजाक है? तुम सिक्युरिटी होकर भी ये गलती कैसे कर सकते हो?”

मि. शुक्ला त्याच्यावर बरसले.

“आय ऍम सॉरी सर.. आम्ही असे अचानक आत आलो पण मुरलीला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे आणि ते या केसच्या संदर्भातलंच आहे.”

गोस्वामी माफी मागत म्हणाले. सर्वांचं लक्ष मुरलीधर काय सांगतोय याकडे गेलं.

“बोलो मुरली, काय बात है? क्या कहना है तुम्हे?”

“साब, मुझे पता है आप लोग यहाँ क्यू इकठ्ठे हुये हो! उस दिन जो भी कुछ मैने देखा वो मै आपको बताना चाहता हूँ! मुझे पता नही आगे मेरा क्या होगा? मेरी नोकरी रहेगी या चली जायेगी लेकिन मै सच बात बताये बिना जी नही सकता! उस दिन यामिनी मॅडम के साथ भावेश सर बदतमिजी कर रहे थें! उनके साथ जबरदस्ती कर रहे थे! मैने देखा की वो यामिनी मॅडम को खींचकर रेस्टरूम में लेके जा रहे थे! उन्होने उनके साथ..”

“खोटा बोलतो हा.. या चालाक मुलीने याला माजे विरोधात खोटी साक्ष द्यायला तयार केलाय. मुरली, झूठ मत बोल, वरना मै तुझे नौकरीसे निकाल दूंगा..”

भावेश चवताळून त्याच्या अंगावर धावून जात म्हणाला.

“साब, मै झूठ नही बोल रहा.. उस दिन मेरे बीवीका बद्दे था मै उसके लिए शुभकामनाये देने के लिये व्हिडिओ बना रहा था.. देखिये इसमे मैने क्या देखा?”

असं म्हणत त्याने त्याचा मोबाईल शुक्ला यांना दिला. तो व्हिडिओ पाहून सारेच दंग झाले. मुरली कंपनीच्या गार्डनमध्ये उभं राहून व्हिडिओ बनवत होता आणि मागे भावेश यामिनीला खेचत रेस्टरूमकडे घेऊन जाताना स्पष्ट दिसत होतं. भावेशचा गुन्हा सिद्ध झाला. समितीच्या निर्णयानुसार कंपनीने त्याला तत्काळ कामावरून काढून टाकलं आणि यामिनीला सन्मानाने तिच्या पूर्वपदावर नियुक्त केलं.

आज मुरलीधरमुळे भावेश पकडला गेला. यामिनीने त्याचे खूप आभार मानले. सर्वांनी त्याच्या साहसाचं टाळ्यांच्या गजरात कौतुक केलं.

आज खऱ्या अर्थाने यामिनीची पूजा सफल झाली होती. मुरलीच्या रूपात तिचा कान्हा तिला भेटला होता.

समाप्त
© निशा थोरे (अनुप्रिया)