*कथेचे नाव:-आणि आई हसली.
*विषय* :आणि ती हसली
*फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा*
"वीरा किती हा पसारा...कपड्यांच्या घड्याही नाही केल्या तू." वीराची आई मालविका वैतागत म्हणाली
"अमेय कितीवेळा सांगितल आहे, शांता काकु लॉकडाउनमुळे येत नाही आहे. तेव्हा स्वत:चे ताट घासुन ठेवत जा, पण ऐकशील तर शप्पथ." मालविका अमेय म्हणजे तिच्याा मुलावर डाफरली, जो मोबाईलमध्ये गेम खेळत होता.
"..अरे !जरा तरी मदत करा...मी काय काय करू एकटी ... ऑफिसच काम सांभाळु का घरकाम करू ?."
मालविकाचा हा त्रागा दोन्ही मुलांनी ऐकुन न ऐकल्यासारखाचं केला.
बिचारी अगदी रडवेली झालेली होती ,इकडे लॉकडाउन असुनही बँकेच्या लोकांना सुट्टी नव्हती.त्यामुळे रोटेशनमध्ये का होईना तिला जाव लागा़यचं आणि सुकेत म्हणजे तिचा नवराही ऑउट ऑफ इंडियामध्ये असल्यामुळें त्याची काही मदत नव्हतीच तिला.
वय वर्ष बारा असलेला अमेय आणि अठरा वर्षाच्या वीराकडुन काडीचीही मदत होत नव्हती.त्यातल्या त्यात सुकेतच्या आईचा काय तो आधार होता.त्याच बसल्याजागी भाजी चिर किंवा कपडे घडी कर अशी छोटी कामे करून देत असत .
लॉकडाउनमुळे घरगुती मदतही (डॉमेस्टीक हेल्प)बंद होती. इतक्यात मालविकाला कोल्हापुरच्या ग्रामीण शाखेत चौदा दिवस रिपोर्ट करायला सांगितले होते कारण तिकडचा कॅशियर करोना पॉझिटिव्ह निघाला होता आणि मालविकाची शाखा मोठी असल्याने तिथे दोन कॅशिअर होते.तेव्हा ग्रामिण शाखेला मालविका गेली तरी चालण्यासारखे होते.
हिच बातमी तिने आज घरी आल्यावर सासुबाईंना सांगितली, तसंपण तिकडची बँकेची शाखा लांब असल्यामुळें घरी पोहचायला रोज रात्रीचे अकरा तरी होणार होते आणि सकाळी परत पाचला निघाव लागणार होतं.
"आई मी काय करू आता, घर आणि बँक दोन्ही सांभाळण पंधरा दिवस जरा अवघड वाटतयं ." मालविका जवळ जवळ रडतच म्हणाली.
"तुझा मामा आहे ना त्या गावी ?" सुकेतच्या आईने विचारलं. मग मी सांगते तस कर..."त्यादिवशी सासु सुनेमध्ये बरीच चर्चा झाली.
************************************
दुसऱ्या दिवशी वीरा जरा उशीरानेच उठली पाहिलं तर घड्याळात नऊ वाजले होते..
"ओह शीट !ऑनलाईन लेक्चर गेलं माझं साडे आठचं. आई मला उठवलं का नाही ?" ती आईला आवाज देत म्हणाली.
पण प्रतिसाद द्यायला मालविका कुठेच नव्हती.
अमोलही 'आई ब्रेकफास्ट हवा' असे म्हणत किचनमध्ये आला आणि फ्रीजला चिकटवलेली चिठ्ठी वाचुन तो इतका जोराने ओरडला की इकडे विराने दोन्ही कानावर हात ठेवला .
ती धावतच आली आणि अमयला झापत विचारलं.
" काय झालं? कशाला बोंब मारतोय,आजी दचकेल ना !"
ह्यावर प्रतिसादात अमेयने मॅग्नेट लावलेल्या चिठ्ठीकडे बोट दाखवत म्हणाला..."वीरा आपण कामातून गेलो. साफ मेलो,आई गेली."
"गप रे ! रताळ्या,काही काय बोलतोय !" ,वीरा अमेयच्या पाठीत धपाटा घालत म्हणाली आणि तिने फ्रिजवरची चिठ्ठी वाचायला सुरवात केली.
प्रिय वीरा आणि अमेय,
मला काही काही कामामुळे चौदा दिवस बाहेर जावे लागतयं.सॉरी आजच जायच होतं ...आणि तुम्ही दोघही झोपला होता म्हणुन न उठवता गेले.
फ्रिजमध्ये दुध आणि अंडी सोडुन काही नाही आहे. ब्रेड डायनिंग टेबलावर आहे. तेव्हा आजीकडुन पैसे घ्या आणि जेवणासाठी सामान आणा तसेच अंड्याचं काहीतरी बनवुन नाश्ता करा. शक्यतो घरीच खा आणि आजीला डायबिटीस असल्यामुळे तिला टायमावर जेवण द्या.
मी चौदा दिवसांनी परत येइन. घराची काळजी घ्या आणि गावाकडचा भाग असल्यामुळे माझा फोन लागणार नाही कदाचित.
तुमची ममा.
वीरा जेव्हा हे पत्र वाचत होती तेव्हाच अमेयने कानावर हात ठेवले कारण वाचुन झाल्यावर वीरानेही जोराने ओरडुन अमेयचीच रिएक्शन परत दिली होती .
दोघांच्या किंचाळ्या ऐकुन वीराची आजीही स्वयंपाकघरात येउन म्हणाली,
"काय चाललय ,कसली धाड भरलीय ?का जोरात ओरडुन विडियो पोस्ट करायचा नवीन ट्रेंड आला आहे का इन्सटावर ?"
"आजी बघ, आई गेली आपल्याला सोडुन ..." अमेयने रडवेला चेहरा करून आजीकडे चिठ्ठी देत म्हणाला.
"सोडुन काय गेली रे!कामावर गेलीय .ती पण करोना वॉरीयर आहे ...आपल्या सगळ्यांकरता कामावर गेलीय."
"काही काय आजी ?आई कुठे डॉक्टर, नर्स किंवा पोलिस आहे .ती तर स्वच्छाता विभागातही नाही." वीरा म्हणाली
"ती तर साधी बँकेत आहे ग! " अमेयही आजीचं म्हणण खोडत म्हणाला.
"वीरा ह्यावर चर्चा नंतर करूया हा, मला भुक लागलीय आणि तुम्हालाही लागली असेल. "आजी म्हणाली.
"हो ना !आजी मस्त ऑम्लेट करना .."अमेयने फरमाइश केली"
"माझ्याच्याने आता जास्त वेळ उभं राहता येत नाही .वीरा तुच कर ग. मी कांदे चिरून देते. "
"अमेय चल भांडी धुउन टाक. "
आजीने ऑर्डर देत म्हणाली,तसं दोन्ही मुलांना नाईलाजाने नाश्ता आणि भांडी करावीच लागली.
भरभर खाउन दोघेही दहाच्या ऑनलाइन क्लाससाठी स्व:ताच्या रूममध्ये पळाली.
मग बाराला आजीने परत हाक मारली,
"वीरा जेवणाच काय करायच ? एक वाजेपर्यंत जेवण तयार व्हायला हवे ग..मग माझी गोळी घ्यायची वेळ होइल .."
हे ऐकल्यावर तर पुन्हा किचनमध्ये जायच्या नावामुळे वीराला एकदम कसतरीच झालं.
"आजी पिझा मागवुया का आज , उद्या बनवते..चालेल?" तिने आजीला मीठी मारत लाडातच विचारलं.
" करोना काळात बाहेरच मागवण सेफ नाही राणी ."
तू डाळ भात बनव..आपण पापड नि लोणच्याबरोबर खाऊ .चलेगा..!"आजीनेही मस्तपणे वीराचा बेत हाणून पाडला.
बिचारी पाय आपटतच किचनकडे वळाली.गरमीत नुसतं डाळ भात लावतानाही ती घामाघुम झाली होती.कसेतरी डाळ भात बनवुन पापड तळुन तिने डिनर टेबलवर जेवण ठेवल .
अमेयनी भांडी उघडुन बघितली आणि म्हणाला "मला नुसता डाळ भात नको.भाजी हवी.नाहीतरी मी नाही जेवणार."
" अम्या एवढ्या गरमीत मी जेवण केल्यावर तू हे बोलतोस..मुकाट्याने जेव नाहीतर उपाशी रहा. " वीरा रागातच म्हणाली.
आजीने मग दोघांच्या वादाच्यामध्ये पडत म्हणाली..
"वीरा एक दिवस जेवण बनवलं तर दमलीस ... मालविका तर रोज तुमच्यासाठी सगळं बनवते. तुम्ही कोणी करता का मदत तिला?"
हे ऐकुन अमेय आणि वीराला जेवण बनविण्याच्यामागे आईच्या मेहनतीची जाणीव झाली.
आजीनेही अमेयला सांगितलं ..."हे बघ आई आता नाही आहे..वीराचेही क्लास असतात.तर भांडी धुवायचं आणि जागेवर ठेवायच काम तुझं."
"आपण सगळ्यांनी काम वाटुन घेतली तरच घर स्वच्छ राहिल आणि सद्यस्थितीत हे फारच महत्वाचे आहे."
आजीच्या ह्या म्हणण्यावरती दोघांनीही माना डोलावल्या.
अमेयला आता भांडी घासताना आपण उगाच टाकत असलेले एक्स्ट्रा गाल्स आणि ताटं आठवायला लागलेली.आई तर त्याला फक्त स्वत:ची दोन्ही वेळेची दोन ताटे घासायला सांगायची आणि तेही किती जड वाटायचं हे जाणवायला लागल होतं त्याला.
लादी पुसताना,केर काढताना ,सामान आणताना,जेवण करताना वीराला आणि अमेयला आईची आठवण येत होती.
ऑनलाईन क्लास सांभाळुन घराच काम करताना दोघेही दमायचे. आता गेम्स ,चँटींग सार काही दुरावल होतं.
कधीतरी आईचा फोन आला तरी आजीची ताकिद होती कि तु लवकर ये, आम्हाला त्रास होतोय हे नाहीच बोलायचं.त्यामुळे मालविकाला त्रास होऊ शकतो.
"तिही एक वॉरीयर आहे आणि वॉरीयरला त्याची फॅमिली नेहमीच सपोर्ट करते ,मोटिवेट करते." असचं आजी सतत सांगत असे दोघांना.पण त्यांची आई कुठल्या प्रकारची वॉरीयर आहे हे काही दोघांना कळतही नव्हतं, ना आजी काही विचारल्यावर सांगायची. एवढच म्हणायची "मालविका यायची असेल त्यादिवशी सांगेन."
बघता बघता मालविका येण्याचा दिवस उजाडला ...उद्या मालविका परत येणार होती. अमेय आणि विरालाही आता न कुरकुर करता जेवायची सवय लागली होती. तेवढ्यात आजीने जेवणाच्या टेबलावर विषय काढला ..
" परवापासुन तुम्हाला सुट्टी मुलांनो...तुम्ही पुन्हा लोळा,घर घाणेरड करा .तुमची आई तर येणारच आहे.ती सगळं बघेल आणि कामावर पण जाईल . उद्यापासून आजीचे इन्स्ट्रक्शन बंद "
हे ऐकल्यावर दोघही मनापासुन खुश झाले शिक्षा संपल्यासारखे. पण आजी पुढे म्हणाली ."तुम्हाला माहीत आहे मी मालविकाला वॉरीयर का म्हणते?"
"नाही आजी, सांग ना ग !"दोघांनी अधिर होत म्हटलं.
"कारण ती इतर करोना योध्यांसारखी देश चालवण्याकरता बँकेत काम करते.मला सांगा लॉकडाउनमध्ये जर बँकेचे सर्व व्यवहार बंद केले तर तुम्ही पैसे कसे काढणार .अगदी ऑनलाईनही व्यवहार करायचं म्हटलं तरी त्यासाठी दिवस रात्र बँकेची माणस काम करत असतात.
इतर अनेक आर्थिक गरजांसाठी आपल्याला सर्वांना बँकेत जाव लागतचं. त्यामुळे बँकेच्या लोकांचाही जीव सतत धोक्यात असतो. बँकेच्या लोकांमुळेही अर्थचक्र फिरत राहतं."
"मग आहेना तुमची आई एक करोना वॉरीयर आणि ती अजुनही एक वॉरीयर आहे बर का?"
"ती कोणती आजी ? आपली आई एक वॉरीयर आहे जाणवल्यावर मुलांचे डोळे पाणावले.
"ती घर सांभाळते,जेवण करते ,माझी आणि तुमची काळजी घेते ..हे सगळी ती एखाद्या सैनिकाप्रमाणे करते.
जसा एका सैनिकाला, तो कितीही जखमी झाला किंवा घाबरला तरी युद्धभुमी सोडता नाही येत...तसचं मालविकालाही कितीही कंटाळा आला, दुखलं खुपलं तरी घराच्या जबाबदाऱ्या नाही सोडु शकतं किंवा टाळताही नाही येतं. "
" ह्यात आपण तिला कितीशी मदत करतो..युद्घभुमीत रेडक्रॉस जखमी सैनिकांना मदत करते. तसचं आपणही मालविकाला मदत नको का करायला !खासकरून ह्यावेळी जेव्हा ती बाहेर न दिसणाऱ्या शत्रु बरोबर लढतेय."
हे सगळ ऐकल्यावर वीरा आणि अमेयला आपण आईला कसा त्रास देतो ते आठवलं .दोघांनीही मनोमन निश्चय केला की आईला मदत करायचीच आणि आई येइल तेव्हा सरप्राइज़ द्यायचं.
दुसऱ्या दिवशी जेव्हा मालविका घरी आली तेव्हा मुलांनी वंदे मातरम हे गीत लावलं आणि आईला सलामी दिली.
ते पाहुन तर मालविकाचे डोळ्यातील अश्रुंनी तिला दिसणच धुसर केलं. दोन्ही मुलांनी मारलेली मिठी तिला सुखावुन गेली. बऱ्याच दिवसाच्या ताणानंतर मालविका मोकळेपणाने हसली होती.
खरतर मातृदिनाच्या दिवशी मुलांऐवजी सासुकडुनच तिला जबाबदारीची जाणीव झालेल्या मुलांचे बेस्ट गिफ्ट मिळाले होते.
समाप्त*
*©वृषाली गुडे
*जिल्हा - मुंबई