आनंदयात्री...

Real story of willpower..

# आनंदयात्री..

# प्रेरणादायी कथा

©® आर्या पाटील

विलासराव ऑपरेशन थिएटर बाहेर येरझाऱ्या घालित होते. चेहऱ्यावर उठलेली अगतिकतेची लकेर त्यांच दु:ख पारदर्शी करीत होती. आत त्यांच्या जीवनसंगिनीवर नियतीने असा काही घाव घातला होता की आनंदाचं गणित पार विस्कटलं होतं. दु:खाने गुणाकार करून सुखाला पूर्णपणे वजा केले होते. वेदनांची बेरीज होऊन जीवनाच्या गणिताची बाकी शून्य होऊ पाहत होती. विलासरावांची पत्नी मालतीताई यांना गँगरीनचं निदान झालं आणि त्यांच्या सुखाला अगणित वेदनांची नजर लागली. आधीच मधुमेह आणि त्यात शरीरभर पसरू पाहत असलेला गँगरीन. या अश्या बिकट परिस्थितीत विज्ञानानेही हात टेकले. उपचाराची परिसीमा झाली पण मृत होत चाललेल्या रक्तपेशींना उच्च दाबाच्या ऑक्सिजनमध्येही नवसंजिवनी मिळाली नाही. जर त्यांना जिवंत ठेवायचे असेल तर हात आणि पाय शरिरापासून वेगळे करण्याशिवाय पर्याय नव्हता. जीवनाच्या बदल्यात जगणं पणाला लागणार होतं. पेशाने शिक्षिका असलेल्या मालतीताईंना नक्की जीवन निवडावं की जगणं हाच एक प्रश्न पडला. हात आणि पाय गमावून आयुष्य जगणं सोप्पं नव्हतं.

" मालती, तुला जगावं लागेल आमच्यासाठी. तुझ्या मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभ्या लेकीसाठी..यशाच्या आभाळात झेप घेतलेल्या लेकाची एकमेव प्रेरणा आहेस तु.तुच जर हतबल झालीस तर भरारी घेतलेले त्याचे पंख निष्क्रिय होतील. आणि मी कसा जिवंत राहीन तुझ्याशिवाय? आम्ही तुझा आधार बनू. फक्त आता हिंमत धर." ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी विलासरावांनी मालतीताईंमध्ये नवउभारीची चेतना निर्माण केली.

मातृत्वाची चाहूल लागलेल्या लेकीला आठवताच त्या पुन्हा अगतिक झाल्या.

" स्नेहा, कधी एकदा माझं कोकरू माझ्या कुशीत येतं असं झालय बघ. तुमचं बालपण जणू पुन्हा खुणावू लागलय. भूमिका बदलली आहे पण ओढ मात्र तिच आहे. आजी बनून माझ्या नातवंडाच भरभरून कौतुक करायचं आहे.. त्याची तेलमालिश करून पुन्हा कोवळा स्पर्श अनुभवायचा आहे.हाताचा पाळणा करून त्याला गोंजारायचे आहे. नाऊ माखू घालण्याचा आनंद मनमुराद लुटायचा आहे. त्याच्या रुपात आईपण पुन्हा जगायचे आहे." लेकीला विश्वासाने सांगितलेल्या मनीच्या इच्छा त्यांना जशाच्या तश्या आठवल्या..

आता मनातल्या इच्छा फक्त मनातच विरणार होत्या. लेकीच्या लेकराला आपल्या हातात घेण्याचं भाग्यही नशिबात पडणार नाही,बाळंतपणात लेकीला आईची माया देता येणार नाही याचं शल्य जीवनाच्या त्या कठिण प्रसंगी राहून राहून बोचत होतं.

शेवटी मनाला खंबीर करित त्यांनी स्वत:ला सावरलं. आलेल्या बिकट परिस्थितीविरुद्ध लढण्याची ताकद गोळा करून त्या या भयानक संकटाला सामोऱ्या गेल्या.

इकडे त्यांच्यावर ऑपरेशन सुरु असतांना लेकीलाही प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या.आईचं कळल्यापासून ती प्रचंड हतबल झाली होती. त्याचीच परिणीती तिच्या डिलिव्हरी दरम्यानच्या कॉम्प्लिकेशन मध्ये झाली. डॉक्टरांनी सिजर करण्याचा निर्णय घेतला.

एकाच वेळी विलासराव दोन संकटांशी सामना करित होते. एका बाजूला अवयव गमावणारी अर्धांगिनी तर दुसऱ्या बाजूला मातृत्वाचं दान पदरात पाडून घेतांना अग्निदिव्यातून जाणारी लेक.

मुलगा आणि जावई सोबत होते. पण तरीही मनाची तगमग थांबत नव्हती. प्रसंगच तेवढा कठिण होता. नियतीने सुख दु:खाच्या कात्रीत बरोबर सापडवलं होतं त्यांना.

दोन्ही ऑपरेशनं यशस्वी पार पडली.. पण जातांना विरुद्ध परिणाम देऊन गेली.

मालतीताईंनी फक्त अवयव गमावले नव्हते त्यासोबतच जगण्याची जिद्द आणि इच्छाशक्तीही गमावली होती.

याउलट त्यांच्या लेकीची झोळी मातृत्वाने समृद्ध झाली होती.

नव्या लेकराचा स्वागतसोहळा दु:खाच्या गडद अंधारात नामशेष झाला..

" आई इथे असती तर आभाळ ठेंगणं झालं असतं तिला. नातीला कुठे ठेवू नि कुठे नको असे झाले असते माझ्या आईला. किती स्वप्न रंगवली होती आजी होण्याची. पण क्षणात मातीमोल ठरली. बाबा मी आईला असे नाही पाहू शकत. तिने फक्त हातपाय नाहीत तर तिची स्वप्ने गमावली आहेत.."बोलता बोलता तिला अश्रू अनावर झाले. आई झालेल्या तिला आनंदापेक्षा आईच्या वेदना अधिक छळित होत्या.

" बेटा, तुच असा धीर सोडलास तर तिला कोण बघेल. हातपाय गमावणं म्हणजे जगण्याची उमेद गमावणं. एकदा उमेदच संपली तर जगणच संपून जाईल. आणि आपल्याला तेच नाही होऊ द्यायचं. जगण्याची उमेद हरवून बसलेल्या तुझ्या आईची आपणच इच्छाशक्ती बनायचे आहे. नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढून तिच्यात जगण्याची नवपालवी फुलवायची आहे. आणि माझी नातं याच नवपालवीचं रूप बनून या जगात आली आहे. ती तुझ्या आईच्या जगण्याचा गाभा बनेन. तिने आजी म्हणून पाहिलेल्या साऱ्या इच्छा आपण पूर्ण करायच्या आणि तिला प्रवाही ठेवायचे." लेकीच्या डोक्यावरून हात फिरवित विलासराव म्हणाले.

तिनेही वडिलांच्या सकारात्मक विचारणसरणीचा अंश स्वत:मध्ये उतरवला. आईची आई बनण्यासाठी ती ही खंबीर झाली.

जेव्हा मालतीताई शुद्धीवर आल्या तेव्हा गमावलेले हातपाय त्यांना मरणापलिकडील वेदना देऊन गेल्या.

खूप रडल्या त्या स्वत:ला असे अर्धवट पाहून. नजर शरिरावर जाताच तिलाही भोवळ आली. आयुष्यभर देहाचा भार वाहिलेल्या पायांची आणि हातांची किंमत त्याक्षणी त्यांना अनमोल वाटली.

त्या परिस्थितीत विलासराव त्यांचा आधार बनले.

" मालती तु एक आदर्श शिक्षिका आहेस. फक्त पुस्तकी ज्ञान न देता तु तुझ्या विद्यार्थांना जगण्याची दिशा दाखवलीस. तु आदर्श आहेस त्यांची तुच अशी हिमंत हरलीस तर ते कोणाचं अनुकरण करतील. आमच्यासाठी, तुझ्या विद्यार्थांसाठी हात पायांचा विचार न करता तुला उभं राहवच लागेल.." विलासरावांनी हिंमतीचं बळ त्यांच्या तुटलेल्या पंखात ओतप्रोत भरलं. आणि पंखाविना उडण्याची जिद्द निर्माण केली.

यात त्यांच्या विद्यार्थ्यांचे योगदानही अमूल्य ठरले.

आपल्या पालकांना घेवून विद्यार्थी दवाखान्यात पोहचले.

" मॅडम तुम्ही लवकर शाळेत या. आम्हांला खूप आठवण येते तुमची. तुमच्यासारखं गणित कोणालाच शिकविता येत नाही. मराठीतील कवितांचे सुरही शाळेत निनादत नाहीत. खेळाच्या तासाला आमच्या सोबत उत्साहाने खेळणाऱ्या तुम्ही पदोपदी आठवता. तुम्ही लवकर बऱ्या व्हा.." मुलांनी जणू त्यांच्या इच्छाशक्ती गमावलेल्या कुडीत आत्मविश्वास भरला.

नातीला पाहूनही त्यांना जगण्याची उमेद निर्माण होत होती.

जखमा भरल्यानंतर ते कृत्रिम अवयवांसाठीही उपचार सुरू करणार होते.

जगण्याला दिशा मिळते न मिळते तोच कोरोनाच्या रुपात नवं संकट दत्त म्हणून उभं राहिलं. लॉकडाऊनमध्ये कृत्रिम अवयवांसाठीचे उपचार नाही शक्य झाले. शरिराच्या जखमा भरत होत्या पण मनाचा गँगरीन अजूनही त्यांना पोखरतच होता.

हात पाय गमावले होते पण जगण्याची उमेद नव्हती गमावायची. दरम्यान सगळच ठप्प झालं. कोरोनाचा राक्षस हाहाकार माजवून गेला. क्रित्येक संसार उद्धवस्त झाले. डोळ्यांदेखत होत्याचं नव्हतं झालं. पण या साऱ्यांत माणसाची माणुसकी कुठेच हरली नाही.

आणि याच माणुसकीला हाताशी घेवून मालतीताईंनी आत्मविश्वासाच्या आभाळी उंच भरारी घेतली.

कोपरापासून तुटलेल्या हातांनी त्यांनी लिखाणाचे कौशल्य अवगत केले. गुडघ्यापासून तुटलेल्या पायावर देहाचा भार टाकून त्या उभ्या राहिल्याच.आदिवासी पाड्यावरील ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिलेले त्यांचे विद्यार्थी हेच त्यांच्यासाठी प्रेरणा ठरले. आपल्या विद्यार्थांचं शिक्षण त्यांनी थांबू दिलं नाही. त्यांच्या घराच्या अंगणात शाळा.. नव्हे नव्हे प्रेरणाशाळा भरली. आणि त्यात शिकणारे विद्यार्थी त्यांचे प्रेरणास्त्रोत. विलासरावांनी आणि त्यांच्या मुलानेही या ज्ञानदानात त्यांना मोलाचे सहकार्य केले.पुन्हा एकदा मुलांच्या वाणीला पाढ्यांची सवय झाली.पुन्हा एकदा मालतीताईंचे फळ्याशी नाते जडले. कवितांच्या शब्दांनी त्यांना जगण्याचे सुर शोधून दिले. जगण्याचा मार्ग सापडला होता. आता थांबायचे नव्हते. पुढेच जायचे होते. शुल्लक कारणांसाठी आत्महत्या करणाऱ्या अनेक लोकांसाठी त्या प्रेरणा बनत होत्या.

आता फक्त एकच इच्छा होती की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लवकरात लवकर मिळावं. हातपाय गमावले असले तरी शिकविण्यासाठी त्या शारीरिक आणि मानसिकदृष्याही फिट होत्या.सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्या पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या कार्यक्षेत्री, आपल्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होऊ शकत होत्या.

ते होईल तेव्हा होईल पण तुर्तास तरी मानसिक आनंदाचा, उमेदीचा.. नव्हे नव्हे नव्याने जगण्याचा मार्ग त्यांना सापडला होत्या. या मार्गावर आनंदयात्री बनून मार्गस्थ झालेल्या मालतीताई सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरल्या होत्या..

सदर कथा ही सत्यघटनेवर आधारित आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड सारख्या दुर्गम भागात शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या माऊलीवर ही जीवघेणी परिस्थिती ओढावली होती पण दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आपल्या माणसांची सोबत यांच्या बळावर त्या या संकटातून आत्मविश्वासाने बाहेर पडत आहेत. स्वत: वर ओढवलेल्या एवढ्या मोठ्या संकटातही त्यांनी ज्ञानदानाचे कार्य थांबवले नाही. कोरोना काळात अंगणात शाळा भरवून शिक्षणापासून वंचित मुलांना प्रवाही ठेवले. दु:खाच्या छायेखाली सुखाचा कोवळा प्रकाश पसरवित त्या आनंदयात्री ठरल्या. आता फक्त त्यांना पुन्हा शाळेत रुजू होण्याची ऑर्डर मिळावी एवढीच इच्छा. एका हाडाच्या शिक्षिकेसाठी हिच गोष्ट जगण्याची नवी उमेद ठरेल..

©® आर्या पाटील