आनंदाचे लाडू

Due to lockdown..... So many things comes in mind. Every person has there own experience in this period. But to keep mind fresh you have to thing always positive

#आनंदाचे_लाडू

©️अंजली मीनानाथ धस्के

    यंदा मुलांच्या परीक्षा लवकर झाल्या. मे महिन्यात माहेरी जाणारी  आसावरी मार्च महिन्यातच माहेरी गेली. मे महिन्यातल माहेरचं उन तिला सहन व्हायचं नाही. यंदा मार्च महिन्यात माहेरी गेल्याने मनसोक्त भटकून घेण्याचा तिचा मानस होता.

   सुरवातीचे चार पाच दिवस तर आईकडून लाड करून घेण्यात गेले. मैत्रिणींना भेटण्याचं निश्चित केलं आणि लॉक डाऊनची घोषणा झाली.

      बरं झालं माहेरी आधीच आलो होतो ..... नाहीतर या वर्षी माहेरी येता आलं नसतं.... असं वाटून ती आनंदात होती.

          हा आनंद फार काळ टिकला नाही. कामाला येणाऱ्या मावशी, माळी काका आता कोणी  येत नव्हतं. खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंपाकाच्या मावशींनाही सुट्टी दिल्या गेली.

            एरवी तिने सकाळी वाटेल तेव्हा उठावं . वहिनीने हातात चहाचा कप द्यावा . तिने तिचं फक्त आवरल की झालं. तिची स्वतःची पोरं तर ' आई ' अशी हाक मारायची सुद्धा विसरतात की काय इतकी ती मामा मामी आजी आजोबा यांच्यात रमायची.  आईने खास  तिच्यासाठी  बनवलेल्या पदार्थाचा तिने मनसोक्त आस्वाद घ्यावा. दुपारी एसीच्या गार हवेत वामकुक्षी घ्यावी.

      स्वत:च्या घरी कधी वाट्याला येत नाही तो सगळा निवांतपणा माहेरी उपभोगावा. अशीच तिची धारणा . गेले कित्येक वर्षे तिची ही धारणा कायम ही राखण्यात आली होती.

पण यंदा आक्रित घडलं.  ज्यांच्या जीवावर माहेरची सगळी भिस्त होती ते सगळे सक्तीच्या सुट्टीवर गेले. आणि सुट्टी मजेत घालवायला आलेल्या तिला कामाला जुंपाव लागलं.

आता माहेरचा अभिमान असणारं तेच मोठं घर ... त्यातली कामं नकोशी वाटू लागली.

घरी करत होती त्यापेक्षाही जास्त कामे माहेरी करावी लागत होती. एरवी दिवसभर खा खा करणारी पोरं बघून  आपण  माहेरी आलो की  पोरांच्या अंगावर ही मुठभर मास चढत अस वाटून ती मनाने तृप्त होत असे. पण आता घरातल्या एका पोराने जरी   भूक लागली म्हटलं की ," त्याच्यासोबत  तिच्या डोळ्यासमोर प्रत्येकाच्या आवडी निवडी, फार्माएशी.... त्या पाठोपाठ पडणारा भांड्यांचा डोंगर आणि पोरांची छोटीच पण तरी टी शर्ट मधून डोकावणारी ढेरी दिसू लागे "

स्वतःच्या घरी असतो पाठीत एक धपाटा घालून सांगता आलं असतं ," आता १५ मिनिटापूर्वी खाल्लं की.... किती खाशील .. ती ढेरी कमी कर आधी मग देईल हवं ते खायला " पण इथे तसं म्हणून काहीच फायदा नव्हता. मुलांचे लाड .... लाड कसले फाजील लाड करणारे खूप .... त्यामुळे काही झालं तरी झुकतं माप मुलांनाच मिळणार हे निश्चित. मुलांच्या फर्माईशी आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या मोठ्यांच्या फर्माईशी पूर्ण करता करता दिवस मावळतीला जावू लागला. दिवसाची वामकुक्षी न मिळालेल्या जीवाला रात्रीच्या झोपेचे वेध लागायला लागले. दुपारी सुस्तावलेल्या पोरांना रात्री जणू चेव चढू लागला. काही केल्या लवकर झोपायच नाव घेत नव्हती.

   घरातल्या कामांकडे कानाडोळा करावा म्हटलं तर  आई आणि वहिनी कंबर कसून काम करत असतांना आपण बसून खाण तिला जड जावू लागलं.

     नवऱ्याचा फोन आला की तो नेहमीप्रमाणे चिडवे ," मज्जा आहे बुवा एका माणसाची ..... यंदा माहेरी जास्त रहायला मिळणार .... आवडीच खायला मिळणार " एरवी त्याने असं म्हटल की तिच्या मनात आनंदाचे लाडू फुटायचे पण आता मात्र तिला दिवसभर केलेली काम आठवून टाहो फोडावासा वाटू लागला.

       माहेरी आलं की नेहमी जादूची कांडी फिरावी आणि तिने काडी इकडची तिकडे न करता सगळी कामं व्हावी असंच घडत होत पण यावेळी कोणी तरी जादूची कांडी अशी काही फिरवली की कितीही काम करा .... कामं काही संपत नव्हतं.

अंगणातल्या बागेच .... त्यातल्या बंगळीच कोण ते कौतुक होत तिला ..... पण आता तेच आंगण झाडायची वेळ स्वतःवर आली म्हंटल्यावर घामाने चिंब भिजलेल्या तिच्या जीवाला बंगळीवर झुलण्याचा विसर पडला.  भांडी घासून घासून कोरड्या पडलेल्या हातांना बघून आईच्या हातचे पदार्थ म्हणजे नुसते जिभेचे चोचले वाटू लागले.

           पूर्वी ती आली म्हणून बाबा आणि दादा घराबाहेर पडले की  परत येतांना खास तिच्यासाठी काही ना काही घेवून येत असे. यंदा मात्र त्यांनी बाहेर जावूच नये असं तिचं ठाम मत असतांना ते कामाचं निमित्त करून बाहेर पडत होते. येतांना तिच्यासाठी काही तरी घेवून येत होते. तेव्हा त्या वस्तू भेटल्याचा आनंद कमी पण त्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करावे लागणार याचीच चिंता तिला सतावत होती.

   पूर्वी माहेरी असतांना मैत्रिणीचा फोन आला की ती निवांत गप्पा मारत असे. पण यंदा मैत्रिणींना भेटता येत नव्हतं की मनसोक्त गप्पा मारता येत नव्हत्या. घरातसतत काहीतरी काम सुरूच होत. काम सुरू असतांना फोन वर बोलण्यात तिचं चित्तच नसायचं.

एरवी उत्साहाने लाड पुरवणारी आई आता घरात राहून तीच ती कामं करून पुरती वैतागली होती . खरेदीची प्रचंड आवड असलेली वहिनी तिच्या सोबत कुठेही आणि कधीही  खरेदीला व फिरण्याला जाण्यासाठी तयार असायची. तीच वहिनीही आता  घरात कोंडल्या गेल्याने उदास झाली होती.

पूर्वीसारखी काम वेळच्या वेळेवर होत नव्हती. दिवसाचा दिनक्रम बदलून गेला होता त्यामुळे तर आसावरीचीही चीड चीड होत होती.

नेहमी माहेरी आली की आवर्जून पार्लरला जाणारी आसावरी यंदा मात्र तिला गेले कित्येक दिवस स्वतःला आरशात नीट बघता ही आलं नव्हतं.

         मुलांचं आजोळी राहणं सार्थकी लागलं. त्यांच्या सुट्टया मजेत जात होत्या. त्यामुळे त्यांना घराची आठवण येत नव्हती.

आसावरीसाठी सासर माहेर हा भेदच नष्ट झाल्याने तिला मात्र स्वत:च्या घरी जाण्याचे वेध लागले.

 रोज देवाला ती मनातल्या मनात हजार वेळा म्हणत होती ," बाबारे लवकर हा करोना मरू दे. लॉक डाऊन उठू दे आणि मला माझ्या घरी जायला मिळू दे "

पूर्वी घरातली कामं करताना तिला माहेरची आठवण यायची. माहेरी असतो तर .... निवांत राहिलो असतो. आपण न करता ही सगळी कामं वेळच्या वेळी झाली असती. आवडीच आयात खायला मिळालं असत.... एक ना अनेक विचार तिच्या मनात यायचे.

यंदा मात्र माहेरी असतांना तिला तिच्या स्वतः च्या घराची आठवण येवू लागली. माहेरच्या घराला झाडू मारतांना मानत येवू लागले ... नवऱ्याला एक काम धड येत नाही. आपल्या घराची तर रया गेली असेल.

पूजेसाठी फुलं तोडायला अंगणात गेली की तिला तिच्या घरी कुंडीत लावलेल्या तुळशीची आठवण येई आणि जीव कासावीस होई. तिच्या घरी सगळी कामं तिलाच करायची आहे म्हंटल्यावर  मनात असेल ते काम आधी करावं बाकी कामं नाही झाली तरी तिला बोलणारं कोणी नव्हतं पण इथे माहेरी त्यांच्या दिनक्रमाप्रमाणे सगळी कामं करताना तिचा जीव मेटाकुटीला आला होता. तिने काम केलंच पाहिजे असा कोणाचा आग्रह नव्हता पण काम न करावं तर तिला  अपराधीपणाची भावना जाणवत होती. वेगळ्याच मानसिक पेचात ती सापडली. एरवी तिच्या घरी ती कामं करून थकली की नवरोबा प्रेमाने चौकशी करून तिचा थकवा घालवत होता पण इथे तर आता सगळेच थकलेले मग कोण कोणाचं कौतुक करणार.

तिची धुसफुस बघून तिच्या बाबांना जाणवलं की आपल्या चीमिणीचं काही तरी बिनसल आहे. त्यांनी खास वेळ काढून तिच्याशी बोलायचं ठरवलं. दोघे घराच्या माडीवर गहू वाळवायला गेल्यावर त्यांना  तिच्याशी एकांतात निवांत बोलण्याची संधी मिळाली. गव्हावरून हळुवार हात फिरवत त्यांनीच तिला विचारलं," आज माझी चिमणी अशी गप्प गप्प का ? काही बिनसलंय का तुझं? " वडिलांनी असं विचारताच तिचा बांध फुटला... पाणावलेल्या डोळ्यांनी बोलली ," कसं सांगू बाबा ..... सांगितलं तर तुम्हाला खूप वाईट वाटेल" ते लगेच म्हणाले ," डोळ्यात पाणी आलंय माझ्या चिमणीच्या ..... आता  तू नाही सांगितलं तर मात्र नक्कीच खूप वाईट वाटेल". त्यांनी तिचा हात हातात घेऊन हलकेच थोपटला. तेवढ्या स्पर्शानेही ती आश्वस्थ झाली. मन मोकळं करत बोलून गेली," बाबा मला माझ्या घराची खूप आठवण येते.  तुम्हाला वाटेल कामं पडतात म्हणून मला घराची आठवण येते. काम तर मी माझ्या घरीही करतेच की पण ही सक्तीची सुट्टी नको झाली आहे. इथे येवुन गेलं की मी पुढचं वर्ष भर मी इथल्या आठवणीत तिकडे मस्त राहते. इथून मी रिचार्ज होवून जाते. पण यंदा मनात काय सुरु आहे काही कळत नाही. प्रत्येक क्षणाला तिकडची आठवण येते. इथं मन रमत नाही पण हे मी कुणाला सांगुही शकत नाही. आईचं मन फार दुखावेल माझं हे आताच बोलणं ऐकून म्हणून गप्प राहून मनातले विचार मनातच ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. पण खरंच हो बाबा .... आता मला माझ्या घरी जायचं आहे."

   तिचं बोलणं ऐकून बाबांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटल आणि म्हणाले ," बस येवढच..... देव करो आणि तुला तुझ्या घरी लवकर जायला मिळो " त्यांचे हे बोल ऐकून तिने पट्कन विचारलं," बाबा तुम्हाला माझा राग नाही आला?.... मला इथे करमत नाही ऐकुन वाईट नाही वाटलं? " बाबा हसून म्हणाले " वेडा बाई राग कशाला येईल.?... वाईटही का वाटावं? ... माझ्या चिमणीला तिच्या घरट्याची आठवण येते यात आनंदच आहे मला .....  आईलाही अजिबात वाईट वाटणार नाही . तीही यातून गेली आहे. तुम्ही मोठे झाल्यावर आईही माहेरी गेली तरी तुमच्या शाळेचं.... अभ्यासाचं निमित्त करून लवकर परत यायची. अनेकदा तिला सांगून पाहिलं की गेलीस तर रहा निवांत इथली कामं रोजचीच आहे  पण ती म्हणायची ,' तिकडे गेलं की चार दिवस बरं वाटतं मग इकडची आठवण येवुन मन बेचैन होत. तिथल्या आरामात ही इथल्या कामांचीच ओढ असते." तुम्हा बायकांना सासरी असलं की कायम माहेरची आठवण येते . सगळा जीव महेरात असतो तुमचा.... पण माहेरी आल्यावर  लेकीला आपल्या घराची आठवण आली तर आई वडीलांनी समजून जावं  की लेक आता तिच्या संसारात रमली आहे. तू तुझ्या संसारात रमली आहे हे ऐकुन माझे मन  तर  समाधानाने भरून गेले आहे. काळजी नको करू ..... हेही दिवस जातील.... तुला लवकरच तुझ्या घरी जायला मिळेल  पण तोपर्यंत माझ्या चिमणीच्या डोळ्यात पाणी येता कामा नये.... चल .... खाली चल तुझ्या साठी एक गंमत आणली आहे. "

दोघे पायऱ्या उतरून खाली आले. बाबांनी तिच्या हातात फ्रीज उघडून आयक्रिमचा  कोन दिला. लहानपणापासून ती उदास असली की बाबा तिला असाच आईसक्रिमचा कोन द्यायचे. तो कोन बघून ती लहानपणी जशी खुश व्हायची तशीच आताही खुश झाली पण लगेच दुसऱ्या क्षणी तिने विचारलं," आता आईसक्रिम खाल्ल तर चालेल? " ..... तेही लगेच म्हणाले ," एखाद्या वेळेस खायला काही हरकत नाही....  चालेल .... नक्कीच " .

त्यांनी तिची समजूत काढता ती पट्कन बाबांना बिलगली . तेवढ्यात तिथे आई आली आणि म्हणाली, " अजूनही आईसक्रीम दिलं की बाबांना बिलगायची तुझी सवय गेली नाही वाटतं " आईचं ते बोलणं ऐकून ती आईला चिडवत म्हणाली ," आता बाबांनाच नाही तर आईलाही बिलगायची  सवय लागली आहे". लगेच ती

आईलाही  बिलगली.

 तिची धुस फुस कुठल्या कुठे पळून गेली होती. आता तिच्या मनात बाबांचे शब्द घोळत होते ," लेक संसारात रमली " का कुणास ठाऊक पण तिच्या मनात आनंदाचे लाडू फुटू लागले. तिच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद आई बाबांनी टिपला आणि ते ही लेकीच्या प्रेमानें  भरून पावले.

©️अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

लेक बाबांच्या कायम जवळची असते म्हणूनच लेक आणि बाबांची मी काढलेली ही रांगोळी इथे देत आहे.