आनंदाचा ठेवा

आईला बाळ आणि बाळाला आई मिळाली आणि सगळंच सुरळीत झालं.


             मिहिका आज हॉस्पिटलला चेकअपला गेली होती. चार दिवसांपूर्वीच तिला हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली होती. तिचा ॲक्सीडेंट झाला होता त्यामुळे ती अडमिट होती. ॲक्सीडेंट झाल्यामुळे मिहिका कधीच आई होऊ शकणार नव्हती. हे तिला अजून सांगितलेलं नव्हतं. तिला हे सगळं कसं सांगायचं हा प्रश्न डॉक्टर आणि मिहिर दोघांनाही पडला होता. मिहिर स्वतःच डिस्टर्ब होता. पण मिहिकला या अवस्थेत सांगितल्यावर ती कशी रिॲक्ट होते आणि त्याचा तिच्या तब्बेतीवर काय परिणाम होईल याचं त्याला टेन्शन होतं. त्यासाठी त्याला खंबीर होणं आवश्यक होतं. मिहिका शुद्धीवर आल्यापासून आजपर्यंत तिला सांगण्याचा धीर होत नव्हता पण आता तिला सांगायलाच हवं होतं. शिवाय ते डॉक्टरांनीच सांगितलं तर जास्त योग्य ठरणार होतं.
आज मिहिकाला सगळं सांगण्याचा निश्चय डॉक्टर आणि मिहिरने केला होता. मिहिकाला विकनेस जरी आला होता तरी ती आता त्या प्रसंगातून सावरली होती. डॉक्टरांनी जखम चेक केली आणि ड्रेसिंग करतांना तिच्याशी गप्पा मारत मारत तिला सांगण्याचा प्रयत्न करत होते. मिहिरला मात्र भयंकर टेन्शन आलं होतं. डॉक्टर म्हणाले, "मिहीका मॅडम आज फारच फ्रेश वाटताय तुम्ही, कसं वाटतंय?? जखम पण भरलिये आता. तीनचार दिवसात तुम्ही कामाला पण जाऊ शकाल. घरी बसून कंटाळा पण आला असेल ना?" " हो ना डॉक्टर, फार कंटाळा येतो घरात. सतत कामाची सवय असल्याने हे असं घरी बसवत नाही मला." "मिहीका तुम्हाला थोडे दिवस काळजी घ्यावी लागेल जखमेची. आणि हो तुम्ही आई होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. नाही म्हटलं तरी चालेल...." डॉक्टरांनी जरा भित भितच सांगितलं आणि केबिन मध्ये एकदम निशब्द शांतता पसरली. डॉक्टरांचे शब्द काळजाला चिरताहेत असं मिहिकला वाटलं. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. "मिहिर बघ काय म्हणताहेत डॉक्टर.....डॉक्टर असं का म्हणताय तुम्ही....मी काय गुन्हा केला म्हणून माझ्याच बाबतीत असं घडलं??? मिहिर तू काहीच का नाही बोलत....बोल ना..."डॉक्टर आणि मिहिर यांना काय बोलावं तेच सुचत नव्हतं. तरी डॉक्टर म्हणाले, "मिहीका तुम्ही तर मोठ्या पोस्ट वर आहात ना?? तुम्हाला कामात झोकून द्यायला वेळ मिळेल. पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तुम्हाला काम करता येईल. तुमच्या पदाला न्याय देता येईल..." "डॉक्टर मला मोठं पद भूशवायच आहे, पदाला न्यायही द्यायचा आहे, पण अशा पद्धतीने ?? डॉक्टर काहीच उपाय नाही का हो?? असेल ना काहीतरी.... प्लिज तुम्ही शोधा ना काहीतरी उपाय.... टेक युअर ओन टाईम डॉक्टर..." मिहिकाला हा धक्का सहनच होत नव्हता. मिहिरही डोळ्यातलं पाणी लपविण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. पण मिहिकाला आपण सांभाळून घ्यायचा निश्चय करून ते दोघे घरी आले.
त्या दिवसापासून मिहीका एकटीच टक लाऊन कुठेतरी शून्यात बघत बसायची. तिला स्वतःच्या जेवणाखाण्याची शुद्ध नसायची. मिहिर तिला आणि घराला सांभाळण्याची तारेवरची कसरत करत होता. त्यालाही लाईफ एमलेस वाटत होतं. पण त्याच्यावर मिहिकला सांभाळण्याची जबाबदारी होती. थोडे दिवस ऑफिस मध्ये रजा टाकून मिहिर तिची काळजी घेत होता. पण पुढे काय हा प्रश्न होताच. तो तिला ऑफिस कामासाठी प्रवृत्त करायचा त्यात तिचे मन काही काळ तरी रमायचे पण त्यानंतर पुन्हा तोच पाढा... काही दिवसांनी ती जरा शॉक मधून बाहेर आली असं मिहिरला वाटलं, तो तिला फिरायला घेऊन गेला. आणि आता त्याने ऑफिस जॉईन करावं असं मनाशी ठरवलं. मिहिकालाही समजावलं तीही तयार झाली. मात्र तिने काही दिवस आराम करून मग जॉईन व्हावं असं ठरलं.
दुसऱ्या दिवशी तो तयार झाला आणि ऑफिसला निघाला. मिहिकानेही स्वतःची काळजी घ्यायचं वचन दिलं. तो बाहेर गेला. मिहिका त्याला बाय करून घरात आली आणि तिच्या डोक्यात काय आलं कोण जाणे तिने दार लावलं आणि आराम करायचं सोडून बाहेर निघून गेली. मिहिर शेजारच्या काकूंना सांगून निघाला होता पण त्यांना काहीही कळायच्या आत मिहीका निघून गेली. कुठे चाललीये तिलाही ठाऊक नव्हतं. चालत चालत ती मंदिरात गेली. मंदिरात नंदादीप तेवत होता. त्या मंद प्रकाशात देवाची मूर्ती खूप प्रसन्न दिसत होती. पण आज मिहिकाने देवाशी भांडण्याचा चंगच बांधला होता. ती देवासमोर बसून कितीतरी वेळ रडत होती.काय केलं देवा मी?? का मला एवढी मोठी शिक्षा का दिली तू??? मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही की वाईट चिंतलंही नाही मग ही शिक्षा मला का दिली?? का माझ्याशी असा वागला....." खूप खूप बडबडत होती. मग ढसा ढसा रडली. रडून रडून थकली बिचारी पण देव काय बोलणार??? मूर्तीच ती....शेवटी मी पुन्हा तुझं नाव देखील घेणार नाही की तुझ्या दरात सुद्धा येणार नाही असं बोलून देवळाबाहेर पडली. भर दुपारची वेळ होती. देवळातून निघतांना तिला उन्हाचे चटके जाणवत होते.
शेजारच्या काकू तिला जेवायला बोलवायला आल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मिहिका घरात नाहीये....त्या खूप घाबरल्या....त्यांनी लगेच मिहिरला कॉल केला आणि बोलवून घेतलं... कुठे शोधायचं हिला आता सगळ्यांनाच प्रश्न होता.....
मिहीका विमनस्क अवस्थेत देवळाबाहेर आली. घराकडे निघणार तितक्यात तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तिला वाटलं आपल्याला भास होतोय. पण खरचच एका झुडपाखाली कोणीतरी बाळ टाकून निघून गेलं होतं. "ह्या टळटळीत उन्हात बाळाला कोणी टाकून दिलं असेल ??? किती विचित्र माणसं असतात ज्यांना नसतात त्यांना बाळ हवं असतं आणि असणारे असे भर उन्हात रत्यात टाकून देतात." ती मनाशीच पुटपुटली. आजूबाजूला कोणी दिसतंय का ते पाहिलं. आजूबाजूला कोणीच नव्हतं. दूरवरचा फुलवाला म्हणाला,"कोणीतरी त्या बाळाला टाकून गेलय. खूप हका मारल्या तर ती बाई पळून गेली." मिहिकाने बाळाला उचललं आणि छातीशी कवटाळलं. बाळ लगेच रडायचं थांबलं. मिहिका बाळाला घेऊन देवळात गेली. देवासमोर बाळाला ठेवलं आणि देवाला म्हणाली,"देवा ऐकलं रे माझं म्हणणं, किती आभार मानू तुझे??? हे कोणाचं बाळ आहे माहिती नाही पण ते आता माझ्या ओटीत टाकलंय तू ....देवा आज तुझ्या अस्तित्वाची खूण पटली बघ..... देवा मी तुझे उपकार कधी कधी विसरणार नाही.....देवा काही कर मला पण हे बाळ माझ्याकडेच राहू दे...." मिहिका बाळाला घेऊन देवळाबाहेर आली आणि बाळाला पोटाशी घेऊन उन्हातून अनवाणी चालू लागली. तिला ते टळटळीत
ऊन चांदण्यासारख भासत होतं. ती बाळाला घेऊन घराकडे निघाली. तितक्यात मिहिर आणि बिल्डिंग मधले लोकं तिच्या दिशेने येताना दिसले. ती खूप आनंदात आहे हे पाहून मिहीरला खूप बरं वाटलं तिने मिहिराला सगळा प्रकार सांगितला. "पण आता हे बाळ कोणाचं हा प्रश्नच आहे आणि आपण नेणं चुकीचं आहे." मिहिर म्हणाला. "नाही मी बाळाला कोणालाही देणार नाही ते माझं बाळ आहे." मिहिका हट्टाला पेटली होती. मग मिहिरने पोलिसात बाळ सापडल्याची माहिती दिली आणि मिहिकाच्या मनस्थितीची पोलिसांना कल्पना दिली. पोलिस तपासात बाळाची आई स्वतःच्या बाळाला झुडपात टाकून मुद्दाम गेल्याच लक्षात आलं. बाळाची आई फरार झाली होती. शेवटी मिहिर आणि मिहिकाने पोलिसांच्या मदतीने रीतसर बाळाला दत्तक घेतलं. आता मिहीका खूप खुश होती आणि मिहिरही...त्यांच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपले होते... सगळ्यांना सगळं मिळालं होतं.....बाळाला आई आणि मीहिकाला आनंदाचा ठेवा....


सौ. मंजुषा गारखेडकर